मराठे पानिपतचे युद्ध हरण्यामागे काय कारणे होती?--------------------------3
दोन
तृतीयांश मैदान मराठ्यांनी मारले होते पण डाव्या बाजूला नजीब जोरदार
प्रतिकार करत होता. सगळे मराठा सैनिक मैदानात होते. नाम मात्र राखीव कुमक
शिल्लक होती, अनेक बुणगे देखील प्रत्यक्ष युद्धात लढत होते. संध्याकाळ
होईपर्यंत मराठे थकलेले होते.
शेवटची
चाल म्हणून अब्दालीने आपली राखीव सेने पुढे केली. त्याने १५,००० कसलेले
योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा
बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या
युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या
तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत.
राखीव फौज परिणामकारक होत आहे हे पाहून त्याने उरली सुरली १०,००० ची राखीव
फौजही नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठी सैनिकांना ताज्या
दमाच्या अफगाणी सैनिकांचा सामना करायला लागला. याच वेळेस मागून पण तोफांना
आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्या उंटांवरील
तोफांसारखा मराठी तोफखाना लवचीक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.
ताज्या
दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली. दरम्यान विश्वासराव
गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातावरण झाले. हत्तीवर बसलेले
सदाशिवराव भाऊ अब्दालीच्या बंदूकधाऱ्यांचे सहज लक्ष होऊ शकत होते हे
ध्यानात घेऊन ते हत्तीवरून उतरले आणि घोड्यावर बसून नेतृत्व करणार होते.
परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे
मराठ्यांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. आपला पराभव
झाला असे समजून मराठे मागे सरकले. या टप्प्यावर होळकरांना पराभवाची जाणीव
झाली आणि ते सैन्यातून बाहेर पडत मागे फिरले. भाऊ शेवट पर्यंत लढत होते पण
ते सुद्धा धारातीर्थी पडले आणि अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला.
मराठ्यांच्या पीछेहाटीस कारणीभूत काही मुख्य कारणे थोडक्यात बघूया :
१. बाजारबुणगे आणि यात्रेकरूंचा भरणा :पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने हजारो यात्रेकरू, व्यापारी आणि कुटुंबकबिला असे एकास एक सुमारे लाखभर बिनलढाऊ लोक फौजेबरोबर होते. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील तीर्थस्थाने पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला.युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या ज्यांचा प्रत्यक्ष लढाईत फायदा झाला असता. आपल्या तुफानी वेगासाठी प्रसिद्ध मराठ्यांची सेना या अतिरिक्त लोकांच्या भारामुळे मंदावली होती.२. हवामान :मराठे महाराष्ट्रातून निघाले (जानेवारी १७६०) तेव्हा त्यांनी थंडी पासून बचाव करणारे साहित्य सोबत घेतले नव्हते. त्यामुळे मराठे उत्तरेच्या थंडीत गारठून गेले होते. उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत लढाई करणे मराठ्यांसाठी सोपे नव्हते, उलटपक्षी अब्दालीच्या सैन्याला थंड वातावरण त्यांच्या घरच्या हवामानासारखेच होते आणि ते अंगावर चामड्यापासून बनलेला पोशाख घालायचे. युद्धात थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांना हे पुरेसे होते. अब्दालीच्या सैनिकांसाठी ही जमेची बाजू ठरली.सकाळी नऊपासून सुरू झालेल्या या युद्धात दुपारनंतर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला आणि मराठा सैन्याच्या डोळ्यांवर, डोक्यावर सूर्याची किरणे येऊ लागली. अनेकांच्या डोळ्यासमोर अंधारी आली त्यामुळे मराठे अडचणीत आले. अंतिमतः सूर्याची दिशा निर्णायक ठरली.३. कूटनीतीचा अभाव :मराठ्यांना राजपूत राजे, सुरजमल जाट, अवधचा नवाब शुजा उद्दौला यांची साथ लाभली नाही. शुजा उद्दौलाने दिल्ली दरबारचे प्रधानपद मागितले होते, सुरजमल जाटला आग्रा हवे होते तर दिल्लीतील मराठ्यांच्या वर्चस्वामुळे राजपूत नाराज होते.फर्रुखबादच्या लढाईत रोहिल्यां विरुद्ध मराठे आणि अवधचा नवाब सफदरजंग उद्दौला एकत्र लढले होते, मात्र पानिपतच्या युद्धात सफदरजंगचा मुलगा शुजा उद्दौला अब्दालीच्या बाजूने लढला. सुरजमल जाट मोहीम चालू असताना मधेच साथ सोडून गेला, तर राजपूत राजे तटस्थच राहिले.स्थानिक सरदारांना सोबत घेऊन चालणे मराठ्यांना जमले नाही.
No comments:
Post a Comment