#कर्जबाजारी_औरंगजेब_आणि_त्याला_भिकेला_लावणारे_मराठे.
 मुघल सल्तनतीला अक्षरशः भिकारी करून सोडले ते मराठ्यांनी. 
 औरंगजेबाच्या बाप-जाद्यांनी कमवलेली सगळी धन दौलत औरंगजेबाने दक्खनला येऊन खर्च केली. 
 अत्यंत हट्टी स्वभाव माणसाला दिवाळखोर बनवतो ह्याच हे उत्तम उदाहरण आहे.
 फ्रेंच इतिहासकार मनुची औरंगजेबाच्या दरबारात काही काळ नोकरीला होता. 
 हा दक्षिणेत आल्यावर शिवाजी महाराजांना भेटलाही होता.  
 हा मनुची म्हणतो कि “दक्खनला आल्यापासून औरंगजेबाच्या मोहिमेत दर साल एक लाख माणसे व तीन लाख जनावरे मरत असत.” 
 ह्या मनुचीच्या बोलण्यात अतिशयोक्ती आहे असे क्षणभर जरी समजले तरीही लढाईत
 मेलेले, मराठ्यांनी छापा घालून मारलेले, पुरात वाहून गेलेले, चिखलाने, 
उपासमारीने, रोगराईने, अपघाताने, हाल अपेष्टांनी, आणि उपासतापासाने मेलेले 
मोगल सैनिक आणि बाजारबुणगे यांची मरायची संख्या स्मितीत करणारे अशीच आहे.
 आता माणसांची हि स्थिती तर जनावरांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. धोधो 
कोसळणाऱ्या पावसाने आणि त्यामुळे अचानक आलेल्या पुरात अशी असंख्य जनावरे 
वाहून जात असत, त्यात बुडून मरत असत.
 माणूस आणि जनावरे यांच्या 
प्रमाणेच मुघलांचे असंख्य सामान व सरंजाम पावसाने भिजून निकामी होत असे. 
त्यात भर म्हणजे मराठे अचानक धाडी घालून हा सरंजाम, खजिना, हत्ती, घोडे, 
उंट जे जे  हाताला लागेल ते ते लुटून नेत असत.
 मराठ्यांच्या हाताला 
काही लागू नये म्हणून मुघल ह्यातील बराचश्या गोष्टी जाळूनही टाकत असत. 
मराठे मुघलांच्या फौजेतून तोफा, दारुगोळा, बंदुका, दमदम्याला लागणारी 
लाकडे, ( दमदमा म्हणजे लाकडी मनोरा ) ही लाकडे तोडणारे बेलदार, गवंडी, 
ह्यांनाही लुटून आपल्याबरोबर नेत असत.
 मराठ्यांच्या आणि निसर्गाच्या
 अव-कृपेने मुघलांच्या फौजेत इतका दुष्काळ पडे कि एक शिपाई, एक तंबू, एक 
उंट, एक बैल, एक घोडा, एक हत्ती, एक तलवार, आणि एक बंदूक बक्कळ पैसे 
मोजल्याशिवाय विकत मिळतच नसे. मराठ्यांच्या सततच्या छाप्यांमुळे 
औरंगजेबाच्या छावणीत नेहमीच दुष्काळ असे. रुपयाला दोन शेर तीन शेर असे 
धान्य मिळत असे. 
 (रुपयाची किंमत तेंव्हा फारच मोठी होती. आजच्या सारखं नाही. )
 खाफीखान म्हणतो कि , "शहाजहान बादशहाने साठविलेला सगळा खजिना औरंगजेब बादशहाने रिकामा केला." 
 खाफीखानाच्या ह्या शब्दांत फार मोठा अर्थ आहे. मोगल सल्तनतीचे सुवर्ण युग जे होते ते ह्या शहाजहाँच्याच काळात होते.  
 शहाजहानचा खजिना किती होता? 
 शहाजहानच्या राज्यातील २२ सुभ्यांचा वसूल दर साल ३६ कोटी रुपये इतका होता.
 ८६ लाख रुपयांची रत्ने रत्न शाळेतून निवडून काढून आणि एक कोटी रुपये खर्च करून त्याने मयूरसिंहासन बनविले होते. 
 ३० करोड २ लाख रुपये खर्च करून ताजमहाल बनविला होता. 
 हे ३० करोड २ लाख म्हणजे आजच्या काळातले ६८०० कोटी रुपये. 
 असे अजूनही इतर हौस मौजेचे खर्च करूनही शहाजहानने मरताना २४ कोटी रुपये शिल्लक ठेवले होते.
 शिवाय सोन्या चांदीची नाणी, दागदागिने आणि हिने-मानके तर निराळीच. ह्यांचा तर हिशोबच नाही इतकी ती अगणित संख्येने होती. 
 शहाजहानच्या मंत्र जपायच्या दोन माळांची किंमतच २० लाख रुपये इतकी होती. 
 बापाच्या मृत्यू नंतर हा सगळा खजिना औरंगजेबाला मिळाला.
 शहाजहान बादशहाच्या मृत्यूनंतर औरंगजेब जेंव्हा बादशहा झाला तेंव्हा 
त्याने १४ गाड्यांवर हा सगळा प्रचंड खजिना लादून आग्र्याहून दिल्लीला आणला 
होता.
 हा सर्व पिढीजात चालत आलेला खजिना औरंगजेबाने मराठ्यांच्या स्वारीत ओतला. 
 फ्रेंच इतिहासकार मनुची तर पुढे असेही म्हणतो कि, " येव्हढ्याने भागले 
नाही म्हणून औरंगजेबाने अकबर, जहांगीर, व नूरजहाँ यांनी साठविलेले प्रचंड 
खजिने बाहेर काढले व तेही वापरले. अखेर तर आपल्या घरातील चांदीची भांडीही 
औरंगजेबाने वितळविली."
 ह्यावरून असे दिसते कि मराठ्यांवरील मोहिमांवर औरंगजेब किती आतोनात खर्च करत असे. ह्यामुळेच औरंगजेबाला पैसे हे पुरतच नसत.
 पन्हाळ्याच्या स्वारीत औरंगजेबाच्या फौजेतील 'नॉरीसला' म्हणून जो युरोपियन
 गोलंदाज ( तोफ चालविणारा) होता त्याला तर १४ महिन्यांपासूनचा पगार 
मिळालेला नव्हता.
 विशाळगडाच्या स्वारीत मुघल सैनिकांचा १५-१६ महिन्यांचा पगार थकला होता. 
 हा सैनिकांचा पगार चुकविण्यासाठी औरंगजेबाने सक्तीने फौजेतील सावकारांकडून
 पाच लाखांचे कर्ज काढण्याचा जेंव्हा विचार केला तेंव्हा सर्व सावकारांनी 
मिळून औरंगजेबाला विरोध केला आणि त्याची छावणी सोडून जाण्याची धमकीच दिली.
 त्यातल्या त्यात बंगालचा सुभेदार मुर्शिद कुलीखान दरसाल १४ लाख रुपये वसूल
 औरंगजेबाला नियमितपणे पाठवीत असे. त्यामुळे औरंगजेबाला कसेबसे खायला तरी 
मिळत असे. 
 काही अभ्यासकांच्या मते औरंगजेबाने २० वर्षांत 
मराठ्यांच्या मोहीमे विरोधात कमीत कमी ४० कोटी रुपये (म्हणजे साधारण १२ ते 
१४ हजार कोटी रुपये ) 
 २० लाख माणसे, आणि तितकीच गुरे ढोरे खर्ची घातली.
 मराठ्यांच्या विषयी असलेला परकोटीचा द्वेष आणि अत्यंत हट्टी स्वभाव ह्या 
मुळे औरंगजेबाचे महाराष्ट्रातील राहिलेले दिवस अत्यंत कष्टमय आणि गरिबीत 
गेले.
 मराठ्यांच्या विरोधातील दक्खनच्या ह्या औरंगजेबाच्या मोहिमेत 
फक्त एकच सैनिक होता आणि फक्त एकच सेनापती. आणि तो म्हणजे खुद्द औरंगजेब.
 औरंगजेब सोडला तर बाकी कुणालाही या वीस वर्ष चाललेल्या मराठ्यांच्या विरोधात चाललेल्या मोहिमेत काडीचाही अर्थ वाटत नव्हता. 
 दिवस रात्र मराठ्यांच्या विरोधात मोहिमा करून मुघलांचे सैन्य पार दमून 
गेले होते. प्रचंड हाल सोसून मुघलांचे ठाणे असलेल्या बहादूरगडासारख्या 
(श्रीगोंद्याजवळील) ठिकाणी फौजेने मुक्कामाला येऊन जरा कुठे श्वास टाकावा; 
तोच पुढे फौजेला दुसऱ्या किल्याकडे निघण्याचा हुकूम व्हायचा. 
 ह्या 
विषयी खाफीखानाची वाक्य फार बोलकी आहेत. तो म्हणतो, " औरंगजेबाकडून 
मोहिमेवर निघण्याचा हुकूम ऐकूनच लष्कराच्या हृदयात धडकी भरत असे.  
लष्कराच्या कष्टी हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळत असे."
 खाफीखान जे काही बोलला ते काही खोटे नाही. 
 अक्षरशः थकलेल्या बैलाला पेरणी टोचून उठवावे, तसा औरंगजेब आपल्या लष्कराला चालवीत असे.
 भीमसेन सक्सेनाने  ह्याचे फारच हृदयद्रावक वर्णन केलेले आहे. तो म्हणतो, "
 औरंगजेब बादशहा गादीवर बसल्यापासून तो ( म्हणजे भीमसेन सक्सेना) एखाद्या 
शहरात राहिला आहे असे कधीच झाले नाही. सारख्या मोहिमा चालूच असतात. ह्या 
मोहिमांमुळे कित्येक सैनिकांना, सरदारांना एकाकी जीवन कंठावे लागते. 
त्यामुळे ते बेजार होतात. 
 सैनिकांनी - सरदारांनी आता त्यांची 
बायका-मुले आणी नोकर चाकरच लष्करात बोलावून घेतली आहेत आणि लष्करातच 
त्यांनी आपला संसार थाटला आहे. तेथेच त्यांना मुले बाळे झाली. लष्करातच ती 
लहानाची मोठी झाली आणि लष्करातच म्हातारीही झाली, आणि लष्करातच मरणही  
पावली. दगड मातीच्या घरांची तोंडे काही त्यांच्या दृष्टीस पडली नाहीत. 
त्यांना हेच वाटे कि जगात सर्वात उत्तम निवासस्थान म्हणजे लष्करातील आपला 
तंबू आहे."
 औरंगजेबाच्या फौजेत मिळणारी सर्व सुखे, खाणेपिणे, दारू, 
बायका, नाचगाणी, कुटुंब-कबिला, नोकर चाकर,  असा सारा काही ऐषोआराम तेंव्हा 
जगजाहीर होता. आता इतके सुख जर फौजेत राहून मिळत असेल तर मग मराठ्यांच्या 
विरोधात लढायला कोण जाईल?
 दर साल उत्तर हिंदुस्थानातून ताज्या दमाची
 नवीन फौज भरती करण्याचा शिरस्ता औरंगजेबाच्या फौजेत असला तरीही लोक 
स्वखुशीने फौजेत भरती होत नसत.  जोरजबरदस्ती केल्याशिवाय, खोट्या 
गुन्ह्यांत अडकविण्याचा धमकी दिल्या शिवाय लोक फौजेत भरतीच होत नसत. 
 ‘मुहम्मद मुराद’ सारखे स्वखुशीने फौजेत भरती होणारे लोक फारच दुर्मिळ होते. 
 गुजराथ मधील ‘गोध्रा’ ह्या भागाचा फौजदार असताना  ह्या मुहम्मद मुरादने 
स्वतः औरंगजेबाकडे येण्याची तयारी दाखविली आणि त्याला पत्र लिहिले कि, 
"ह्या वेळी हजरत पातशहा दख्खन मध्ये जिहादची लढाई करत आहेत. काफरांचे 
किल्ले ( म्हणजे मराठ्यांचे) जिंकून घेण्यासाठी तुम्ही मेहनत घेत असताना 
इकडे आम्ही सुखचैनीत जगावे हे आम्हाला आवडत नाही.  मला आपल्याजवळ नेमण्यात 
आले तर मी तुम्हाला काफरांचा ( म्हणजे मराठ्यांचा) सर्वनाश करून दाखवील."
 अशी स्व-खुशीने भरती होणारी पत्रे औरंगजेबाला मिळाली कि औरंगजेबाचे आनंदाश्रूच निघत असत.  
 मुहम्मद मुरादचे हे पत्र पाहून औरंगजेबाला मोठे कौतूक वाटले. औरंगजेबाने 
ताबडतोब  मुहम्मद मुरादला पत्र पाठवून 'सहा महिन्यांचा प्रत्येक स्वाराला 
६० रुपये असा पगार ठरवून हजार स्वार बरोबर आणण्याचा आदेशच दिला.'
 पण सगळेच असे नव्हते. गुजराथचाच सुभेदार ‘शुजाअतखाना’ सारखे रडतराव कामचुकार लोक औरंगजेबाच्या फौजेत  अनेक होते.
 ( इथून पुढे महत्वाचे: कारण ह्यात औरंगजेबाची महत्वकांक्षा आणि प्रचंड धर्मवेड दिसून येते. )
 पन्हाळा किल्याकडे जात असताना औरंगजेब सैन्याची जमवा जमाव करण्यासाठी मुद्दाम मिरजेला थांबला होता. 
 हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांताच्या सुभेदाराने ताबडतोब प्रत्येकी हजार स्वार इकडे पाठवून द्यावेत असा हुकूम औरंगजेबाने काढला. 
 ह्या हुकुमाप्रमाणे गुजराथचा सुभेदार  ‘शुजाअतखानाने’ आपला दत्तक पुत्र 
‘नजरअली खान’ याच्याबरोबर हजार स्वार पाठवावेत असे त्यालाही कळविण्यात आले.
 ह्या  ‘शुजाअतखानाने’ औरंगजेबाच्या पत्राला केराची टोपली दाखवत उलट 
औरंगजेबालाच असे लिहिले कि, "  आमचे अहमदाबादचे लोक तुमच्या जिहादच्या 
मोहिमेवर येण्यास तयार नाहीत. 
 मराठ्यांना ते फारच घाबरतात. 
 पण तुमच्या काफरांच्या विरुद्ध सुरु असलेल्या लढाईला मदत म्हणून माझ्याकडून २ लाख रुपये तुम्हास पाठवीत आहे."
 शुजाअतखानाच्या ह्या चुकारतट्टू  स्वभावाचा औरंगजेबाला अतिशय संताप आला.
 आणि त्याने अत्यंत कडक शब्दात पत्र लिहिले कि, " तुला मी शहाणा समजत होतो.
 तुझ्या बुद्धिमत्तेचे कौतुक  करत होतो. तुझ्यावर मोठे उपकार करून मी तुला 
लहानश्या हुद्द्यावरून थेट सुभेदाराच्या  हुद्द्यावर बसविले. या वेळी मी 
जिहाद करत आहे. ( जिहाद म्हणजे धर्मयुद्ध.) 
 दुष्ट काफरांचा नायनाट 
करण्याकरिता मी अखंड परिश्रम घेत आहे. धर्माचा अभिमान असलेल्या प्रत्येक 
मुसलमानाने ह्या वेळी जिहादच्या युद्धात गुंतलेल्या ह्या इस्लामच्या 
बादशहाला मदत केली पाहिजे. 
 सरकारी खजिन्यातून पैसे खर्च करून १ 
हजार स्वार पाठवा म्हणून मी हुकूम केला होता. पण या कामात तू टाळाटाळ 
केलीस. निरनिराळी करणे दाखविलीस. 
 आमच्या रागाची काळजी केली नाही. 
 ह्यात तुझे फुटके नशीब, दुसरे काय... तुला एक हजार सुद्धा स्वार पाठविता आले नाही म्हणून अल्प रक्कम आम्हास पाठवतो काय?  
 तुझी ही रक्कम म्हणजे सूर्याला धूळ दाखविण्यासारखे किंवा समुद्रात एक पाण्याचा थेंब टाकण्यासारखे आहे. 
 आमचे हिंदुस्थानचे साम्राज्य म्हणजे अथांग समुद्र आहे. प्रत्येक वर्षी आणि
 प्रत्येक महिन्यात कोट्यवधी रुपये दाखल होतात आणि खर्चही होतात.
 मी तुला निष्ठावंत सेवक समजत होतो. तू हे पत्र मिळाल्याबरोबर ताबडतोब तुझ्या दत्तक मुलाबारवर तुझी फौज घेऊन येणे."
 औरंगजेब हे पत्र पाठवूनच थांबला नाही तर त्याने ताबडतोब आपला अत्यंत कडक 
आणि क्रूर स्वभावाच्या गुर्जबदाराला  ह्या शुजाअतखान आणि  नजरअलीखान यांना 
गचंडी पकडूनच घेऊन येण्यास सांगून पाठविले.
 हे म्हणजे  रडतरावाला बळबळ घोड्यावर बसवून आणण्यासारखे होते.
 मराठ्यांचा दराराच इतका होता कि शुजाअतखानाला कळून चुकले कि आता आपण काही परत जिवंत येत नाही.  
 शेवटी हा शुजाअतखान पंढरपूरजवळील ब्रम्हपुरीस औरंगजेबाच्या छावणीच्या 
ठिकाणी आला. तिथं येऊन त्याने औरंगजेबाचा वजीर आसदखानाला सपाटून लाच खाऊ 
घातली. उद्देश असा कि  ‘आसदखानाने औरंगजेब बाद्शहापाशी जोरदार शिफारस करून 
मला ब्रम्हपुरीसच राहण्याची परवानगी मिळवून द्यावी.’
 पण ऐकेल तो औरंगजेब कसला.
 औरंगजेबाने आता शुजाअतखान त्याचा दत्तक पुत्र  नजरअलीखान आणि त्यांची 
शिफारस करणारा वजीर आसदखान ह्यांना  ब्रम्हपुरीच्या रंग महालातून, दारूच्या
 पेल्यांतून, बायकांच्या गराड्यातून दरादरा  फरफटत ओढीतच बाहेर काढले आणि 
खेळणा किल्याच्या आपल्या मोहिमेत आपल्याबरोबर चालविले.
 खेळणा 
किल्याच्या प्रवासात असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसात 
उडालेल्या तंबूचे लाकडी मोठे दांडकेच वजीर आसदखानाच्या टाळक्यावर जोरदार 
आदळले आणि जागीच त्याचा मृत्य झाला. 
 जिथे वजीर आसदखाना सारख्या बड्या धेंडांची ही स्थिती तिथे हा  शुजाअतखान आणि त्याचा दत्तक पुत्र  नजरअलीखान किस झाड कि पत्ती....
 हा सगळं औरंगजेबाच्या धाकाचा आणि भीतीचा मामला होता. फणा काढून टवकारत 
पाहणाऱ्या नागापुढे उभे असलेल्या माणसाप्रमाणे औरंगजेबापुढे सारे लोक थरथर 
कापत असत. 
 दूर काबूलला असलेला औरंगजेबाचा मुलगा मुअज्जमच्या पोटात बापाच्या नुसत्या पत्रानेच पोटात गोळा उठत असे.
 आता इथून पुढे फार गमतीशीर आहे. वाचा..
 पण असा दरारा, असा कसलेला जिद्दीचा सेनापती, असे हुकमात वागणारे सैन्य, 
असा हा पाण्यासारखा ओतलेला पैसा, मराठ्यांचे एका मागून एक किल्ले जिंकून 
घेण्याचा लावलेला असा सपाटा... 
 ह्या सगळ्या गोष्टींचा मर्द मराठ्यांच्या आक्रमकपणाला पायबंद घालण्याच्या दृष्टीने काहीही उपयोग झाला नाही.
 उलट मराठे अजूनच आक्रमक झाले. 
 औरंगजेब हताशपने पन्नास-पन्नास हजार फौज घेऊन सहा-सहा महिने एकाच किल्याला वेढा देऊन बसू लागला. 
 ह्या अश्या भानगडीत औरंगजेबाचे तर्बीयत खान, हमीदुद्दीन खान, फतेउल्लाह खान, बहरामखान असे कित्येक नामांकित सरदार अडकून पडू लागले.
 उरले सुरले सरदार मराठ्यांच्या मागे धावू लागले. पण धावणार तरी 
किती?....हाताला लागतील ते मराठे कसले?... अलिमर्दानखान, रुस्तुमखान 
खुदाबंदखान, हसनलिखान असे कित्येक सरदार मराठ्यांचा पाठलाग दिवसरात्र करीतच
 असत. 
 पण मराठे त्यांना खिजगनतीलाही मोजतही नसत. 
 असा हा प्रकार सहा वर्ष सतत चालला. 
 मराठ्यांनी उत्तरेतील ‘उज्जयनी’ पासून थेट दक्षिणेतील ‘मछलीपट्टन’ पर्यंतच्या प्रदेशात नुसता धुराळा उठवून दिला. मराठे ऐकेनातच. 
 'कुठं कुठं आवरू ह्या काफिर मराठ्यांना???' असे ओरडत औरंगजेब नुसता हताशपणे हे सगळे पाहतच राहिला.
 १६९९ च्या ऑकटोबर महिन्यात औरंगजेब वसंतगडाला वेढा घालून बसला असता संताजी
 घोरपडेंचा मुलगा राणोजी घोरपडे आणि भाऊ बहिर्जी उर्फ हिंदुराव यांनी 
कर्नाटकात धामधूम उडवून देऊन हुबळीच जिंकून घेतली.
 इकडे उत्तरेत नेमाजी शिंदे, कृष्णराव सावंत ह्या सरदारांनी नर्मदा पार करून थेट मावळ्यातच प्रवेश केला. आणि प्रचंड धामधूम मांडली.
 अत्यंत महत्वाचे: मराठ्यांनी नर्मदा ओलांडली हे मोघल साम्राज्याच्या दृष्टीने भविष्यात येणाऱ्या अरिष्टाचे पूर्व लक्षण होते. 
 भीमसेन सक्सेना म्हणतो कि, " हिंदुस्थानातील आजवर झालेल्या सगळ्या मुसलमान
 सुलतानांच्या काळापासून आजपर्यंत मराठे कधीच नर्मदापार झाले नव्हते." 
औरंगजेब मराठ्यांच्या किल्ल्यात शिरला म्हणून मराठे आता औरंगजेबाच्या घरातच
 घुसले. ह्या मराठ्यांनी औरंगजेबाला बेघर केले आणि नर्मदेच्या पार हाकलून 
दिले."
 औरंगजेबाने पन्हाळा किल्याला वेढा दिला तेंव्हा राणोजी घोरपडे ह्यांनी गुलबर्ग्याकडे धामधूम सुरु केली. 
 त्याच्यावर औरंगजेबाने ‘फिरोजजंग’ नावाच्या सरदाराला पाठविले. पण  
‘फिरोजजंग’ गुलबर्ग्याकडे जाऊन पोहचण्याचा आधीच हा राणोजी घोरपडे आपल्या २०
 हजार फौजेसहित पुन्हा पन्हाळ्याच्या परिसरात येऊन औरंगजेबाच्या छावणीतच 
शिरून मोगलांची कत्तल करू लागला आणी त्याची छावणी लुटू लागला.
 पण हे काहीच नव्हते. 
 खरा तडाखा औरंगजेबाला पुढच्या वर्षी बसला. 
 त्या वर्षी १७०२ मध्ये औरंगजेबाने खेळण्याला वेढा घातला. 
 भीमसेन सक्सेना म्हणतो कि, " जसा बादशहाने खेळण्याला वेढा घातला तसा  
मराठ्यांचा जोर सर्वत्र तुफान वाढला. मराठ्यांनी ठीक ठिकाणच्या सर्व वाटा 
बंद करून टाकल्या आणि मुघलांची ते लूटमार करू लागले. ह्यात मराठ्यांना 
अगणित संपत्ती मिळाली." 
 "मी तर असे ऐकले आहे कि औरंगजेब बादशहाला 
उत्तम आरोग्य लाभावे म्हणून हे मराठे दर आठवड्याला त्यांच्या देवाकडे 
प्रार्थना करून प्रसाद आणि लाडू वाटतात. मराठ्यांना असे वाटते कि जितका हा 
‘म्हातारा’ जिवंत राहील तितके आपल्याला यश आणि त्याची संपत्ती मिळेल आणी 
मराठ्यांचं स्वराज्य हे साम्राज्यात रूपांतरित होईल.."
 खेळण्याला औरंगजेब वेढा घालून बसला असताना मराठ्यांनी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुरावरच हल्ला चढविला.
 मराठ्यांनी हे सगळे शहर उध्वस्त केले आणि तेथील सुभेदार ‘बेदरबख्तला’ आणि सुभेदार ‘अलिमर्दानखानाला’ कैद केले.  
 ह्या दोघांकडून मराठ्यांनी अक्षरशः फक्त त्यांच्या अंगावरचे कपडे सोडून 
असेल नसेल ते सर्व खंडणीच्या रूपात घेऊनच त्यांची सुटका केली. 
 त्या नंतर मराठे तिथून गोवळकॊंड्याकडे गेले आणि तिथल्या सुभेदाराला धमकावून त्याच्यापासूनही सपाटून खंडणी घेतली. 
 डिसेंबर १७०२ ला औरंगजेब जसा सिंहगड जिंकायला निघाला तसे ३० हजार मराठे गुजराथवर चालून गेले. 
 खानदेश मार्गे  तापीच्या खोऱ्यातून कूच करून मराठे थेट सुरतेजवळच येऊन 
धडकले. मराठे परत सुरतेवर चालून आलेत ह्या नुसत्या बातमीनेच सुरतेची लोक 
सगळं जिथं आहे तिथंच सोडून जीव वाचवून पळतच सुटले.. 
 (मराठ्यांचा मागचा अनुभव. मराठ्यांनी दिलेल्या ढुंगनावरच्या फटक्यांचे ओळ आजून उतरलेले नव्हते. )
 तिथून खंडणी गोळा करून मराठ्यांनी ह्या निमित्ते संपूर्ण गुजराथेत आपले पाऊल ठेवले.
 औरंगजेब केवळ निमूटपणे हे पाहतच होता. कोणाला ह्या काफर मराठ्यांवर पाठवावे? कोणीही जायला तयार होतच नसत. काय करणार...
 परसोजी भोसले त्याच प्रमाणे पवारांच्या घराण्यातील काळोजी आणि संभाजी व 
त्यांचे चुलते केरोजी व रायाजी पवार ह्यांच्या नेतृत्वाखाली  मराठ्यांनी 
वऱ्हाडात प्रवेश केला.  
 ५० हजार घोडदळाची जंगी फौज घेऊन हे मराठे वऱ्हाडात घुसले होते.
 वऱ्हाडची सुभेदारी ‘गाजीउद्दीन फिरोजजंग’ याच्याकडे होती. 
 त्याचा सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ हा मराठ्यांवर एलिचपूर येथे चालून 
आला. मराठ्यांनी ह्या लढाईत त्याची २ हजार माणसे कापून काढली. सुभेदारी 
गाजीउद्दीन फिरोजजंगचा जावई ठार केला आणि  सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ 
ह्याला कैद केले. 
 सर-सेनापती संताजी घोरपडे ह्यांनी बरोबर १३ वर्षांपूर्वी असेच ह्या  सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ ह्याला कैद केले होते. 
 मागच्या सिलसिल्याप्रमाणे मराठ्यांनी ह्या वेळीही त्याच्याकडून भर भक्कम खंडणी घेऊन त्याची मुक्तता केली.
 वऱ्हाडातून मराठे आता माळव्यात घुसले. 
 माळव्यात शिरल्यावर मराठ्यांनी आपल्या ५० हजार फौजेचे दोन भाग केले.
 एक फौज उज्जयनीवर चालून गेली. आणि दुसऱ्या फौजेने सिरोंजला वेढा दिला. 
 मराठ्यांच्या फौज नरवर ते सिरोंज  ह्या मार्गावरील कालाबाग पर्यंत पसरल्या होत्या. 
 शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन स्वतःचे स्वराज्य स्थापलेल्या 
माळव्यातील छत्रसाल बुंदेल्याशी हातमिळवणी करून मराठ्यांनी औरंगजेबाचा 
मलिदा असलेला सगळा  माळवा प्रांतच स्वतःच्या घशात घातला आणि औरंगजेबाचे 
उत्तरेतून दक्षिणेकडील जाणारे सगळे रस्तेच बंद करून टाकले.
 माळव्यावर ह्या वेळी मामा शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ हा सुभेदार होता.
 छत्रपती शिवाजी राजाचे हे ‘मराठे’  काय प्रकरण आहे याचा त्याला बापाच्या तोडलेल्या बोटांच्या प्रकरणामुळे चांगलाच अनुभव होता. 
 वऱ्हाडातील सरदार ‘रुस्तुमखान विजापुरी’ ह्याला पराभूत करून मराठे आता आपल्याकडे येत आहेत हे पाहून भीतीने त्याची गाळणच उडाली.
 हा पठ्या जिवाच्या भीतीने उज्जयिनी शहरातील एका घरामध्ये चक्क लपूनच बसला. 
 सार शहर पालथं घातलं तरी मराठ्यांना तो काही सापडेना.
 ह्या उज्जयनीजवळच मांडवगडचा किल्लेदार ‘नवाजीश खान’  म्हणून होता त्याने ताबडतोब मराठ्यांशी लढायची तयारी सुरु केली. 
 त्याने तातडीने ह्या शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ सुभेदार याच्याकडे अतिरिक्त फौजेची मदत मागितली.
 तेंव्हा ह्या पळपुट्या सुभेदार साहेबांनी ५० हजार मराठ्यांच्या विरुद्ध 
लढण्यासाठी म्हणून त्याच्याकडे थोडीथोडकी नव्हे तर ६० स्वारांची प्रचंड 
कुमक पाठवून किल्लेदार ‘नवाजीश खानाचे’  हात बळकट केले. 
 आपल्या 
सुभेदाराची हे सहकार्य पाहून किल्लेदार नवाजीश खानाची घाबरगुंडीच उडाली आणि
 तो सगळं आहे तिथं मराठ्यांसाठी सोडून जीव वाचवून ‘धार’ ला पळून गेला.
 धनधान्याने समृद्ध माळवा आणी गुजराथचा संपूर्ण प्रदेश मराठ्यांच्या हाती सापडला. 
 इकडे महाराष्ट्रात औरंगजेब ऊन वारा आणी धोधो कोसळणाऱ्या पावसात हाल 
अपेष्टा सोसून एकदा ह्या किल्ल्याला वेढा तर, दुसऱ्यांदा त्या किल्ल्याला 
वेढा देतच बसला. काहीही हाताला लागले नाही त्याच्या.. 
 औरंगजेब दुसऱ्या किल्याकडे गेला कि मागे मराठे परत पहिला किल्ला जिंकून घेत. हा सिलसिला असाच चालू होता. 
 माळवा मराठ्यांकडे गेलेला पाहून औरंगजेब मोठा चिंताक्रांत झाला. 
 आता ही मराठा भुते आग्ऱ्यावरच जाऊन कोसळतील कि काय? अशी त्याला भीती वाटली.  
 त्याने तातडीने मराठ्यांना माळव्यातून हुसकून काढावे म्हणून थोड्याच 
दिवसांपूर्वी मराठ्यांकडून मार खाल्लेल्या वऱ्हाडचा सुभेदार ‘गाजीउद्दीन 
फिरोजजंग’ याला आज्ञा केली.
 हा ‘फिरोजजंग’ मराठ्यांच्या मागावर जात ‘सिरोंज’ ला पोहचला. पण त्याने तिथं मराठ्यांशी युद्धच केले नाही. 
 उलट ‘आपण मराठ्यांना हरविले. मराठे आपल्याला बघूनच पळून गेले’ अशी खोटीच बातमी औरंगजेबाला पाठविली. 
 कोल्हापुरात असलेल्या औरंगजेबाने आनंदून जाऊन फिरोजजंगच्या ह्या 
कर्तृत्वात खुश होऊन त्याला ' सिपाह सालार' अशी पदवी देऊन त्याचा गौरव 
केला.
 पण लवकरच खरी वस्तूथिती काय आहे हे औरंगजेबाला कळली.. 
 मराठ्यांनीच ह्या फिरोजजंगला परत चांगले चोपून काढले आणी  फिरोजजंग जीव 
वाचवून पळाला.. ही खरी बातमी जेंव्हा औरंगजेबाला काळजी तेंव्हा तर त्याने 
डोक्यावर हातच मारून घेतला. 
 अत्यंत संतापून लालेलाल झालेल्या औरंगजेबाने चिडून जाऊन
 फिरोजजंगला दिलेली   ' सिपाह सालार' पदवी काढून घेतली. फिरोजजंगला ज्या बढत्या दिल्या होत्या त्याही औरंगजेबाने जप्त केल्या.
 मामा शाहिस्तेखानाचा मुलगा ‘अबूनसर खान’ ह्याने उज्जयनीत मराठ्यांना 
घाबरून जाऊन आपले तोंड काळे केले म्हणून त्याची तिथून उचलबांगडी केली आणि 
त्याच्या जागेवर ‘नवाजीशीखान’ ह्याला बसविले.
 ह्या सगळ्या 
माळव्यातील धामधुमीत मराठ्यांची दुसरी फौज हैदराबादहून पुढे जाऊन मछली 
पट्टणला जाऊन पोहचली. ह्या फौजेत १२ हजार घोडदळ आणि १० हजार पायदळ होते.
 ह्या सगळ्या प्रदेशात मराठ्यांनी सक्तीने चौथाई वसूल केली. जून महिन्यात 
गोवळकोंडा लुटले आणि घाबरून किल्ल्यात लपून बसलेल्या सुभेदाराकडून भलीमोठी 
रक्कम मराठ्यांनी वसूल केली.
 ह्यावेळी औरंगजेबाची स्वारी 
शिवाजीराजांच्या तोरणा किल्ल्याचे खनपटीला बसली होती. ढगात हरवलेल्या 
तोरण्याच्या उंच-उंच बुरुजाकडे एकटक नजर लावून.
 औरंगजेब मराठेशाही 
बुडवायला दक्षिणेत आला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श 
पुढे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांनी नेटाने 
चालविला....
 
🚩 जय जिजाऊ 
🚩 🚩 जय शिवराय 
🚩 🚩 जय शंभुराजे 
🚩