विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 23 June 2020

पानिपतविरांच्या स्मृती जपणारे - कोपर्डे


पानिपतविरांच्या स्मृती जपणारे - कोपर्डे

सातारा -लोणंद मार्गावर साता-याहून लोणंद कडे जाताना 40 किलोमीटर अंतरावर कोपर्डे हे गाव लागते.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील हे गाव पानिपतकर शिंदेंचे म्हणून विशेष ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावात पानिपतावर पराक्रम गाजविणा-या शिंदे घराण्यातील मंडळींचे पुरातन वाडे गतवैभवाच्या खाणाखुणा सांभाळत गावाच्या वैभवात मोलाची भर पाडत उभे असलेले पहायला मिळतात.
कोपर्डे गावात प्रवेश करताना लागणारी गावाची पुरातन वेसच या गावाच्या ऐतिहासिकपणाची जाणीव करून देते.घडीव दगडांच्या बांधणीतील हे प्रवेशव्दार अजूनही सुस्थितित असून त्याच्या दोन्ही बाजूस दोन देवड्या आहेत. या वेशीला जोडूनच पुर्वी संपूर्ण गावास तटबंदी होती असे सांगितले जाते. सध्या या तटाचे उद्ध्वस्त अवशेष ठिकठिकाणी पहायला ही मिळतात.वेशीतून आत आल्यानंतर लगेचच डावीकडे पहिल्या वाड्याची वास्तू नजरेस पडते.वाड्याची तटबंदी, प्रवेशव्दार व त्याला जोडूनच असलेला एक वैशिष्ट्यपूर्ण असा भव्य बुरूज समोरच पहायला मिळतो.साधारण आयताकृती रचना असलेल्या या वाड्याची केवळ दर्शनी बाजू शाबूत असून इतर सर्व बाजूचे तट-बुरुज काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाले आहेत. वाड्याच्या आतील भागात काही नव्याने बांधलेली घरे आहेत. या घरांच्या अधूनमधूनच जुन्या वास्तूंचे काही अवशेष आहेत. या वाड्यापासून पुढे गेल्यानंतर गावाच्या मध्यभागी उभा असलेला एक उंचपुरा आणि भव्य बुरुज आपले लक्ष वेधून घेतो.गावातील वाडा समूहातील दुस-या वाड्याचा हा एकमेव बुरुज शाबूत असून या बुरूजाचे अचंबित करणारे बांधकाम पाहता या संपूर्ण वाड्याचे पुर्वीचे बांधकाम किती वैभवशाली,दिमाखदार आणि भव्य -दिव्य असावे याची फक्त कल्पनाच करावी लागते.गगणाला भिडणा-या या बुरूजाचे बांधकाम भरभक्कम आणि लढाऊ तर आहेच त्याचबरोबर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक बांधणीमुळे त्याच्या सौंदर्यात मोलाची भरच पडली आहे.
गावातील सध्याच्या ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर असलेला तिसरा वाडा अद्यापही वापरात आहे.या वाड्याच्या आतील भागात शिंदे घराण्यातील लोक वास्तव्यास आहेत.चौकोनी आकाराच्या या वाड्याच्या चारही टोकावर चार गोलाकार बुरुज असून तट-बुरूजांचे खालील बांधकाम घडीव दगडांमध्ये तर वरील निम्मे बांधकाम पक्क्या विटांमध्ये केले गेले आहे.याच्या माथ्यावर ठिकठिकाणी जंग्या आणि चर्यांची रचना आहे. दर्शनी बाजूच्या दोन बुरूजांच्या मध्यभागी उभे असलेले वाड्याचे प्रवेशव्दार त्याच्या लाकडी दारांसह अद्यापही उभे आहे.प्रवेशव्दारावर मोड्कळीस आलेला सज्जा आहे. प्रवेशव्दारारातून आत आल्यानंतर दोन्ही बाजूस ढेलजा व आतील इतर भगात प्रशस्त जोत्यावर उभ्या असलेल्या पुरातन वास्तू, तळखडे,लाकडी खांब,अनेक देवळ्या तसेच एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी चौरंग इ जुने अवशेष ठिकठिकाणी पहायला मिळतात.

- अmit निंबाळकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...