विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 8 July 2020

पावनखिंड!!!!

पावनखिंड!!!!4th std पावनखिंड | बाजीप्रभू देशपांडे ...

13 जुलै 1660 ला तो चित्तथरारक पराक्रम घडला. 6 सहस्त्र विरुद्ध 300 जण कसे लढले असतील???
काय ती माणसे असतील?
काय ती काळरात्र असेल??
म्रूत्यू पाठीवर असताना केवळ आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी अग्निकुंडात देहार्पण करण्यास आसुसलेले ते 300 बांदल, त्याची स्वराज्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा अलौकिकच म्हणावी लागेल.
आजही तो प्रसंग वाचनात आला तरी अंगावर काटा उभा राहतो!!!
काही दिवसांपूर्वी 🏇 घोडखिंड पाहण्याचा योग आला. कोल्हापूर मध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये गजापूर हे गाव आहे. या गावातील एका वाडीचं नावच पावनखिंड असं ठेवलं गेलय. गजापूर गावापासून पुर्व दिशेला 10 ते 15 मिनिटे चालत गेलो की गजापूरची घोडखिंड लागते. जिथे इतिहासातील अविस्मरणीय प्रसंग घडला. पराक्रमाची शर्थ केली गेली. स्वराज्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा काय असते हे 300 मावळ्यांनी सार्‍या जगाला दाखवून दिलं.
अतिशय चिंचोळी वाट, तेवढीच लांब आणि खोल इतकी की हजारो सैनिक त्यांच्या घोडदळासकट चालून गेले तरी शत्रूला त्याचा थांग लागणार नाही. आम्ही हॉलिवूड मुव्ही '300' मोठ्या आवडीने पाहतो पण घोडखिंडीत 300 मावळ्यांनी लढलेली लढाई आपण जाणून घ्यायचं प्रयत्न पण करत नाही म्हणून हा छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी...

आता पावनखिंडीजवळ मोठे स्मारक उभं केलंय. मुख्य रस्त्यावरून खाली पन्नास एक पायऱ्या उतरून गेलं की एका छोटय़ाशा ओढय़ावर असलेला पूल ओलांडावा लागतो. पायऱ्या उतरताना खाली नजरेसमोर पसरलेली दाट झाडी. कल्पनासुद्धा मनाला शिवत नाही की खाली काही असेल. पण तो छोटासा पूल ओलांडला की अचानक उजवीकडे ढाल-तलवार अन् भगवा झेंडा असं स्मारक सामोरं येतं. इथून पुढे सुरू होते पावनखिंड.

इथे जवळच कासारी नदीचं उगमस्थान आहे. ओढय़ाच्या रूपानं ती पुढे वाहात जाते. सध्या खिंडीत उतरण्यासाठी लोखंडाच्या दोन शिडय़ा बनवल्या आहेत. २५-३० फूट खाली उतरताना आपली चांगलीच तारांबळ उडते. खिंडीमध्ये जागोजागी मोठमोठे खडक, शिळा पडलेल्या आढळतात. पुढे जाऊ तसं खिंडीची रुंदी आणि खोली वाढत जाते, पण तरीही जास्तीत जास्त रुंदी सुमारे पंधरा फुटापर्यंत असावी. खिंडीत जमीन अशी दिसतच नाही.

 सगळीकडे शिळांचा खच पडलेला. दीड-दोनशे मीटरनंतर खिंड काटकोनात वळून डावीकडे जाते. शेवटपर्यंत लांबी सुमारे पाचशे मीटरपर्यंत असावी. असं सांगतात की खिंड पूर्वी एवढी रुंद नव्हती. कालौघात पाण्याच्या प्रवाहामुळे शिळा कोसळून ती अधिक रुंदावली आहे. आजही पावनखिंड जंगलांनी अशी आच्छादली आहे की भर दुपारीसुद्धा सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. मग चारशे वर्षांपूर्वी काय स्थिती असेल याचा विचारसुद्धा करवत नाही.

हे सारे पाहता-पाहताच तो इतिहास अंगावर उभा राहू लागतो. त्या भयाण रात्री, कोसळत्या पावसात ती मंडळी कुठल्या निष्ठेने लढली असतील असे वाटू लागते. नतमस्तक व्हायला होते.
शंभूसिंह जाधवराव ,बाजी बांधल,फुलाजी बांदल
, फुलाजीप्रभू,शिवा काशिद, बांदलसेना व ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...