सरंजामापुर्वी वतने असत . वतन म्हणजे वंशपरंपरेने मिळणारे अधिकार , हक्क ,
नेमणूक , उत्पन्न व मिळकत . उत्पन्नाची शाश्वती हा वतनदारीचा गाभा . गावकारभार नीट चालावा म्हणून त्यास राजमान्यता मिळाली .
वतनदारीचे दोन प्रकार . राजाला आवश्यक असेल त्याकाळी लष्करी किंवा इतर मदत देण्याच्या अटिवर जी वतने दिली जात ती सरंजामी वतने आणि गावकामगारांना जी वतने गावकीकडून मिळत ती ग्रामव्यवस्थेच्या नेहमीच्या विशिष्ठ कामासाठी असत .
यादवकाळात ही व्यवस्था होती , तीच पुढे चालू राहिली . पण मुसलमानी अंमलात या व्यस्थेचा जाच वाढला .
छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारांची मनमानी संपविण्याचे ठरवले .वसूल
गोळा करण्यासाठी त्यांनी देशमुख , देशपांंडे या जुन्या वतनदारांवर अवलंबून न
राहता कमाविसदार ,
महालकरी , सुभेदार असे पगारी अधिकारी
नेमले . त्यामुळे वतनदारांच्या शिरजोरीस वाव राहिला नाही . जुनी वतने राहू दिली पण त्यावर
निर्बंध आणले . कारण मुलुखगिरी करण्याचा खर्च सरदारांच्या वतनातून परस्पर
भागविणे सोयीचे होते . सरंजाम सुरु राहिले पण नियंत्रीत व्यवस्थेत .
छत्रपती शाहु महाराजांनी शिवरायांची हिच व्यवस्था पुढे चालू ठेवली . त्याचबरोबर शिवरायांनी नाकारलेली पण छत्रपती राजाराम
महाराजांनी दिलेली वतनेही चालू राहू दिली . स्वराज्य विस्तार महत्वाचा
होता व जास्तीत जास्त सरदार बरोबर असणे हे धोरणात्मक दृष्ट्या योग्य होते .
आणि ही निती उपयुक्त ठरली .
सैन्याच्या खर्चासाठी तसेच किल्ल्याच्या बंदोबस्तासाठी इनामी जमीन ,सरंजाम म्हणून मिळत असे , त्याप्रमाणेच सरकारकडून पालखी वगैरे मानमरातब दिला गेला , की त्याच्या खर्चासाठीही अशा इनामी जमिनी देत , तिलाही सरंजाम म्हणत .
सरंजामी सरदारांनी युध्दाच्या प्रसंगी आपली सेना सरकारच्या मदतिला पाठवावी , असा करार केला जाई . तशी सेना न ठेवल्यास सरंजामाचे उत्पन्न सरकारकडे जमा करावे लागे . मध्यवर्ती सत्ता प्रबळ असे . सरंजामी सरदार कराराची कलमे पाळून सेवा करीत . शाहु काळात सरंजामीच्या जोरावर, अनेक सरदारांनी मुलुखगिरी करुन मराठा साम्राज्याचा विस्तार केला .
सरंजामी सरदारांची त्यांच्या सरंजामाच्या गावांवर बव्हंशी अनिर्बंध सत्ता असे , राज्यकारभारात त्यांना स्वायत्ता होती पण ते मराठा साम्राज्याचाच एक भाग असत , कारण त्यांचे स्वतंत्र राज्य नसे . शाहुकाळात ते पूर्णपणे मध्यवर्ती सत्तेच्या नियंत्रणात होते . छत्रपती शाहु महाराजांनी तो निकष कटाक्षाने पाळला .
अठराव्या शतकात देशाचा मोठा भुभाग मराठा साम्राज्यात समाविष्ट झाला . सतराव्या शतकातले मुघल साम्राज्य आता मराठा साम्राज्य बनले होते .
या मोठ्या भूभागावर योग्य नियंत्रण व प्रशासन प्रस्थापित होण्यासाठी काही
अपरिहार्य बदल होत गेले . प्रामुख्याने ' जहागीर ' व ' मनसब '
यांचा
एकत्रित विचार होऊन ' सरंजामी ' पध्दत उदयास आली . पण मनसबदारीपेक्षा
सरंजामीचा आवाका मोठा होता व ती जहागीरदारीच्या अंगाने जाणारी होती .
अशा प्रकारची पध्दत अंमलात आणण्यामागचा कार्यकारणभाव स्पष्ट होता . मोठ्या जहागीरीचे उत्पन्नही मोठे असल्याने , मोठे सैन्य उभारणे शक्य असायचे , युध्द व नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मध्यवर्ती सरकारला मदतही होत असे. जहागीर टिकावी म्हणून लोकांचे भलेही साधावे लागे .
सरंजामी सरदारांना आपल्या उत्पन्नाचा ठराविक
भाग मध्यवर्ती सरकारला द्यावा लागे . या पध्दतीमुळे छत्रपती शाहु
महाराजांना मराठा साम्राज्याचा खर्च सांभाळणे व दौलत नियंत्रणात ठेवण्यात
यश आले .
अर्थात या पध्दतीमुळे जहागीरदार , सरदार बलीष्ठ झाले , पण छत्रपतींची सत्ता संपविण्याचा प्रयत्न कोणी केला नाही .
याउलट इंग्लंडमधे सरंजामदारांनी मध्यवर्ती सत्ता संपुष्टात आणून संसदिय पध्दत स्विकारली ,
पण मराठा सरंजामदारांनी
कायम मध्यवर्ती सत्तेची पाठराखण केली . यातून ब्रिटिश व मराठा
सरंजामदारांच्या मानसिकतेतील फरक स्पष्ट दिसतो आणि मराठा सरदारांची व
मराठा सरंजामदारांची स्वामी निष्ठा प्रकर्षाने जाणवते व उठूनही दिसते .
हे केवळ शाहुनितीचे यश आहे .

No comments:
Post a Comment