विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 25 July 2020

छत्रपती शाहु महाराजांचा दफ्तरखाना

पुणे दफ्तर : Pune Archives :-
छत्रपती शाहु महाराजांचा दफ्तरखाना
शाहु महाराजांचे लष्करी व प्रशासकीय नियंत्रण किती भक्कम होते व त्याची अंमलबजावणी किती काटेकोरपणे केली जात होती याचा पूर्ण इतिहास शाहू दफ्तरात बांधून ठेवला आहे. प्रशासकीय नेमणुका, लष्करी रणनीती, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र, व त्यानुषंगाने येणारे अधिकार, न्याय निवाडे व न्यायपध्दती, सरंजामी नेमणूका, या प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा सहभाग व पूर्ण नियंत्रण त्यांच्या प्रशासन कौशल्यावर प्रकाश टाकणारे आहे. एक खंबीर कुशल प्रशासक हे वास्तव नाकारण्याचा अनेकांचा प्रयास त्यापुढे केवळ केविलवाणा ठरतो.
छत्रपती शाहु महाराज सातारला आले, राज्यकारभारास सुरुवात केली. जुन्या नष्ट झालेल्या सनदा ऐवजी नवीन सनदा द्यायला सुरुवात केली. पत्रव्यवहार सुरु झाला. तसे त्यांनी राज्य कारभारासंबंधीची कागदपत्रे एकत्र जपून ठेवण्यासाठी खास व्यवस्था उभी केली. तो दफ्तरखाना. ही कागदपत्रे शाहु दफ्तर, सातारच्या राजाचे दफ्तर अथवा हुजूर दफ्तर या नावाने प्रसिध्द आहेत. यात छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीतील कागदपत्रांबरोबरच इ.स. १७०३ ते १८१८ या दरम्यानची कागदपत्रेही आहेत. हा महाराजांचा स्वत:चा दफ्तरखाना होता. हीच कागदपत्रे पुढे पुण्यात आली.
त्यास पुणे दफ्तर, Pune Archives हे अधिकृत नाव आहे . पेशवे दफ्तर नाही.
येथील व्यवस्थेनुसार , अनुक्रमाने शाहु दफ्तर प्रथम क्रमांकावर येते . म्हणजे पहिला विभाग शाहु दफ्तर आहे .
शाहु दफ्तरातील संपूर्ण कागदपत्रांची सुची उपलब्ध आहे. त्यानुसार कागद सहज शोधता येतात.
सामान्यपणे एकाच विषयासंबंधित कागदपत्रे एका रुमालात ठेवलेली असतात. या रुमालातील कागदपत्रांची संख्या, त्यातील विषय, कालखंड दर्शविणारी चिठ्ठी त्या रुमालासोबत असते. प्रत्येक कागदपत्रातील विषयाला प्राधान्य दिले आहे. सारांशही दिला आहे. आपल्याला आवश्यक ती कागदपत्रे सहज मिळतात.
ही कागदपत्रे विविध माहितीचे भांडार आहे.
रोजकिर्द अथवा रोजनिशी हे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेवर प्रकाश टाकणारे सर्वात महत्वाचे दस्तावेज आहेत. या नोंदी सर्वसमावेशक आहेत . त्या विशिष्ट दिवशी घडलेली प्रत्येक नोंद यात येते. रोजनिशीत नोंदविल्याशिवाय कोणतेही कागदपत्र जारी होत नसे. नोंद नसेल तर त्या कागदपत्राला किंमत नव्हती. कधीकधी या नोंदी पंचवीसेक पानापर्यंत असत. हे सर्वात अस्सल दस्तावेज आहेत . शाहु पर्वाची उकल होण्यासाठी ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत .
थोडक्यात प्रशासनातील प्रत्येक घटना छत्रपती शाहू महाराज यांच्या नजरेखालून जात असे . सर्वांना मान्यता घेणे बंधनकारक होते. त्यामुळे प्रशासन पूर्ण नियंत्रणात होते.
दुसरी महत्वाची गोष्ट या कागदपत्रांतून स्पष्ट होते ती म्हणजे सर्व प्रशासकीय नेमणुका. त्या सातारा येथून, शाहु महाराजांच्या मान्यतेने होत. प्रधान, प्रतिनिधी, सरदार, सरंजामदार यांना प्रशासकीय नेमणुकीचा अधिकार नव्हता.
याशिवाय सरंजामदारांवर लक्ष ठेवण्यासाठी दरकदार ( दिवाण, खासनीस, सबनीस, दफ्तरदार, चिटणीस, पारसनीस ) नेमले जात. याचा खर्च सरंजामातून त्यास करावा लागे.
सरंजामदारास लष्करी व मुलकी प्रशासक म्हणून काम करावे लागे व तो खर्चही त्यास सरंजामातून करावा लागे.
यात कसूर झाल्यास सरंजाम काढून घेतले जात.
वतन, इनाम, दत्तक विधान, भागीदारी, वाटणी, सिमानिश्चिती, सामाजिक हितसंबंध, धार्मिक हक्क आदी बाबतचे सर्व फौजदारी व दिवाणी खटले, याचे महाराज निर्णय घेत. छत्रपती शाहू महाराजांचा प्रशासन, न्याय व्यवस्था यातील प्रत्यक्ष सहभाग यातून अधोरेखित होतो. मराठा साम्राज्याची न्याय व्यवस्थेची कार्य पध्दती व विकासही यातून समजून घेता येतो.
प्रत्येकासाठी लष्करी रणनिती, कार्यक्षेत्र छत्रपती शाहु महाराज ठरवत. त्यात कोणाला निर्णय स्वातंत्र्य नव्हते. शाहु ठरवतील तशी अंमलबजावणी करावी लागे. त्यानुसार त्यांनी केलेली विभागणी :
प्रधान : खानदेश आणि बालाघाटचा काही भाग
सेनापती : बागलान आणि गुजरात
सेनासाहेब सुभा : बेरार, गोंडवण, आणि पुर्वेकडील भाग
सरलष्कर : गंगथडी आणि औरंगाबाद सुभा
प्रतिनिधी : निरा आणि वारणा यामधील जिल्हे
छत्रपती शाहु महाराजांनी प्रत्येकाचे क्षेत्र निश्चित केले होते, व त्यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. कोणीही आपल्या मर्जीनुसार वागण्यास मोकळा नव्हता . आज्ञा पालन न झाल्यास सरंजाम काढून घेतला जाई, निलंबन होई . बाळाजी बाजीराव हे त्याचे प्रमुख उदाहरण.
छत्रपती शाहु महाराजांच्या दफ्तरखान्यातील, म्हणजे पुणे दफ्तरातील, महत्वाच्या कागदपत्रांतील माहितीचे स्वरुप असे आहे.
याचा उपयोग करुन घेतला तर शाहु महाराजांच्या कारकीर्दीचा इतिहास स्पष्ट होईल.
#शाहूपर्व #जागर_इतिहासाचा #पुणे_दफ्तर #शाहु_दफ्तर

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...