विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 July 2020

वेल्लोर किल्ला

२ जुलै इ.स.१६७८🚩
वेल्लोर किल्ला म्हणजे मद्रास कर्नाटकातील जिंजीच्या खालोखाल महत्वाचा किल्ला होय.जिंजी येथील राजकारण यशस्वी करून आणि जिंजी ताब्यात घेउन छत्रपती शिवाजी महाराज वेल्लोर किल्ला जिंकायला स्वतः जातीने दाखील झाले होते. किल्ल्याला वेढा घालून सुद्धा किल्ला सहजा-सहजी हातात येणार नाही आणि ह्यात वेळ बराच जाणार आहे असे समजल्यावर किल्ल्याच्या समोरील डोंगरावर शिवाजी महाराजांनी साजरा व गोजरा हे दोन किल्ले बांधले.
त्यांनी रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांच्यावर वेल्लोरची कामगिरी सोपवली. पूर्ण किल्ल्याला चारही बाजूने खोल खंदक असून सुद्धा हा किल्ला मराठ्यांनी जिंकला.हा किल्ला जिंकायला जवळपास दीड वर्षाचा कालावधी लागला.
तामिळनाडू मधील वेलोरचा किल्ला हंबीरराव, रघुनाथपंत व आनंदराव मकाजी यांनी जिंकला ती तारीख होती २२जुलै १६७८.

🚩२२ जुलै १६७८🚩
किल्ले वेल्लोर स्वराज्यात दाखल केला. २५ मे १६७७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोर किल्ला वेढला. किल्ला अब्दुलखान हबशीच्या ताब्यात होता. त्याला देखील राजांनी तह करून किल्ला देण्याची मागणी केली. परंतू त्या हबशाने ती धुडकावून लावली. तो कोट होता देखील तसाच कडक, बेलाख.
सभासदाने किल्ल्याचे केलेले वर्णन - येळूरकोट यामध्ये इदलशाई ठाणें होते. तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटांत जीत पाणियाचा खंदक. पाणीयास अंत नाही असें. उदकांत दाहा हजार सुसरी. कोटाचे फांजीयावरून दोन गाडिया जोडून जावें ऐशी मजबुती. पडकोट तरि चार चार फेरीयावरी फेरे. ये जातीचे कोट.
जिंजीचा ताबा कुत्बशाहास न दिल्याने तो नाराज झाला व राजांच्या मदतीला दिलेले सैन्य माघारी गेले वेळप्रसंगी अपेक्षित अशी तोफखान्याची मदत न मिळाल्याने किल्ल्याला वेढा देऊन आतील किल्लेदारास जेरीस आणण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, आणि म्हणूनच राजेंनी नरहर रुद्र या अधिकाऱ्यास २ हजार घोडदळ व ५ हजार पायदळ देऊन हा वेढा दिला. व राजे शेरखान लोदिच्या समाचारास पुढे निघून गेले.
वास्तविक वेढे देणे हे काम मराठ्यांना कधी माहितच नव्हते. कारण वाघाचा फक्त एकच खाक्या झटपट झटापट मार झडप की कर गडप ४ महिने, ६ महिने वर्षे दीड वर्षे खेळत बसणे ही मराठ्यांची युद्धनीती देखील नव्हती पण स्वराज्यापासून लांब त्यात तोफखान्याची मदत न मिळाल्याने वेढा देणे भाग पडले.
मराठ्यांचा विळखा अगदी अजगराप्रमाणे पडला १४ महिने कसबसा किल्ला लढवून अब्दुलखान पुरा वैतागला होता. मराठ्यांच्या चिवटपणाची चव त्याने चाखली. अखेरीस किल्ल्यात साथीचा रोग पसरला. विजापूरहून देखील. मदत मिळेना. त्यामुळे रघुनाथपंतांकडून ५० हजार होन घेऊन अब्दुल्लाखानाने वेल्लोरचा किल्ला त्यांना देऊन टाकला. शके १६००, कालयुक्त संवत्सरात श्रावण शुद्ध चतुर्दशीला म्हणजेच दि. २२जुलै१६७८ वेल्लोरचा बलदंड गड स्वराज्यात दाखल झाला. यावेळी राजे रायगडी होते.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...