अंबाजी इंगळे
भाग १
अंबाजी इंगळे
- शिंद्यांचा एक सरदार. याच्या बापाचें नांव त्रिंबकजी. इ. स. १७८४ सालीं
महादजी पातशाहीचा बंदोबस्त करण्यासाठीं दिल्लींकडे आला तेव्हां हा उत्तर
हिंदुस्थानांत त्याजबरोबर होता. या प्रसंगी त्याच्या हातून कित्येक
जबाबदारीचीं कामें घडलीं. उदाहरणार्थ याच सालच्या जुलै- आगस्ट महिन्यांत
अंबाजी इंगळे व शीख सरदार याचा तह झाला; व पुढे ता. २ नोव्हेंबर रोजीं
अफरासियावखानाचा खून झाला तेव्हां यास फौजेसुद्धां मुसुलमानी लष्करांत
ठेवलें होतें. पण अंबाजीकडे केवळ लष्कराचा कारभारच सोंपविण्यांत येत होता
असें नाहीं. १७८७ च्या आक्टोबर नोव्हेंबर (आश्विन) महिन्यांत महादजीनें
खोडी पाटोडीहून गुलाम कादराच्या पारिपत्यास येऊं काय म्हणून पातशहास
विचारण्यासाठी अंबाजीची वकील म्हणून नेमणूक केली होती.
थोड्याच
वर्षांनीं अंबाजीस याहून जास्त स्वतंत्रतेनें कारभार करण्याची संधि
मिळाली. इ. स. १७९१ च्या सुमारास महादजीनें अंबाजीस उदेपूरच्या राण्याच्या
विनंतीवरून त्याच्या राज्यांतील चोंडावत सरदारांचें बंड मोडण्यासाठीं
कांहीं पलटणी देऊन पाठविलें. तेव्हां अंबाजीनें चोंडावतांचा मुख्य जो
साळुंब्रा त्यास राण्याची माफी मागावायास लावून त्याजकडून राण्यास वीस लक्ष
रुपये दंड देवविला; व राण्याची सत्ता प्रस्थापित करून बंडखोर सरदारांकडून
त्याच्या जमिनी सोडविल्या. शिवाय त्यानें तोतया राण्यास कमलमीरांतून हांकून
लावण्याचीहि राण्याची दुसरी एक कामगिरी बजाविलीत्र एवढ्या गोष्टी करावयास
अंबाजीस दोन वर्षें लागलीं. याशिवाय मेवाडच्या राण्यास अंबाजीकडून आणखीहि
कांहीं कामगिर्या
करून घ्यावयाच्या होत्या. शिवाय मेवाडच्या राण्यास चोंडावत सरदारांचेंहि
भय वाटत होतेंच. म्हणून त्यानें अंबाजीच्या सैन्याच्या खर्चाकरितां सालीना
आठ लाख रूपये उत्पन्नाचा मुलूख तोडून देऊन त्यास मेवाडांत ठेवून घेतलें.
अशा रीतीनें मेवाडच्या कारभाराचीं सर्व सूत्रें अंबाजीच्या हातीं येऊन तो
आपणास मेवाडचा सुभेदार म्हणवूं लागला.
No comments:
Post a Comment