विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 22 October 2020

रणमार्तंड रणधुरंदर संताजी घोरपडे

रणमार्तंड रणधुरंदर संताजी घोरपडे

 


कासीमखान हा बादशहाचा एक हुशार सरदार . मराठ्यांच्या हालचाली वर सक्त नजर ठेवण्याचा त्याला शाही हुकुम होता . कासीमखानास एकट्याने हे निभावणार नाही म्हणून बादशहाने त्याचे भरवशाचे सरदार खानजादखान , सफशिफनखान , महंमद मुराद खान यांना कर्नाटकात पाठवले . त्यांचे सोबत स्वतः चे खास संरक्षक सैन्य ही भरपूर दिले . हे सर्व जण कासीमखानास सामील झाले . खानजादखान हा बादशहाचा बक्षी रूहुल्लाखान याचा पुत्र आणि उमराव . त्याचे आदर सत्कारास उणेपणा राहू नये म्हणून कासीमखानाने अडोणीच्या किल्ल्यातून राहण्यासाठी तंबू , भोजणाचे भारी सामान आणले . स्वागतासाठी जागा तयार केली . गुप्त हेरांचे कडून संताजी घोरपडे यांना या खबरा कळत होत्या . त्यांनी हाताखालच्या सैन्यांच्या तीन तुकड्या केल्या . कासीमखान मुक्कामावर दाखल होण्यापुर्वी मराठ्यांनी दिवस उगवताना मौल्यवान तंबूस आग लावली . कासीमखानास बातमी लागताच लगबगीने तयार होऊन मराठ्यांच्या तुकडीवर तो चालून गेला . खानजादखान हा बडा बादशाही उमराव यावेळी झोपला होता . तो ही गडबडीने जागा झाला . आणि कासीमखानाच्या साहाय्यास धावून गेला . मराठ्यांबरोबर लढाईस तोंड लागले . तो पर्यंत संताजी घोरपडे यांच्या दुसऱ्या राखीव तुकडीने मुक्कामाच्या भागावर धाड घातली . या भयंकर घटनेची खबर खानजादखान आणि कासीमखान यांना लागताच आपला पराभव होणार हे त्यांच्या लक्षात आले . त्यांनी जवळच असलेल्या दोड्डेरीच्या गढीचा आश्रय घेतला . तेथे पाण्याची सोय होती . लढत लढत हे दोघे उमराव तेथे पोच झाले . पण ती गढी अगदीच लहान असल्याने तेथील अंमलदाराने त्यांना आत घेतलेच नाही . रात्र झाली . मग पुन्हा संताजींच्या फौजेने त्यांना गढी बाहेर वेढून गोळ्यांचा वर्षाव केला . मोगल सैन्य बहुतेक मारले गेले . भयंकर प्रसंग पाहून दोघे खान चोर दरवाज्याने गढीत गेले .
संताजीनां बातमी लागताच दोड्डेरीच्या गढीस मराठ्यांनी वेढा घातला . तेथुन आतील फौजेचे हाल सुरू झाले . आत अन्न नव्हते . भुकेने फौजेचा जीव कासावीस झाला . कासीमखानास अफुची चटक ती त्याला मिळेना . अफुविना तो तडफडू लागला . त्याच स्थितीत त्यास 20 ऑक्टोबर 1695 रोजी मृत्यु आला . अशी स्थिती पाहून खानजादखानाने संताजींकडे माणसे पाठवली . प्राणांची याचना केली . संताजीनीं वीस लाख रूपये दंड व जवळचे मौल्यवान सामान घेऊन एक घोडा व अंगावरील वस्त्रानिशी खानास व त्याच्या लोकांना सोडून दिले . या वेळी एकूण पन्नास साठ लाखाचा ऐवज संताजी घोरपडे यांना मिळाला . खानजादखानास संताजी घोरपडे यांनी स्वतः चे खास पहारेकरी देऊन बादशहा कडे पोच केले .
 यांचा विजय असो .
🙏🚩🚩

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...