चाळुक्यांनी बांधलेले उक्कडगावचे उत्तरेश्वर मंदिर
- - - - - - - - - - - -
सतीशकुमार सोळंके-देशमुख
------------------------- .........✍️
पोस्टसांभार :विकी पाटील
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दंडकारण्याचा एक प्रमुख भाग असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शिवाची अनेक पुरातन कालीन शिवालये असून, त्यापैकी एक म्हणजे घनसावंगी तालुक्यातील उक्कडगाव, जि. जालना येथील भगवान उत्तरेश्वराचे पूर्वमुखी जलवाहिनी असलेले त्रिकूटपंथी महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर निर्माण चालुक्य(सोळंके) नरेश विक्रमादित्य (सहावा) उर्फ हेम्माडी या राजाने केले आहे. येथे शेकडो वर्षापासून महाशिवरात्री अथवा श्रावणी सोमवारा निमित्ताने भव्य यात्रा देखील भरते.
चालुक्य (साळुंखे/सोळंके) नरेश विक्रमादित्य चालुक्य (सहावा) यांनी आपल्या राजकीय कार्यकाळातील बाराव्या शतकातील पूर्वार्धात दण्डकारण्याचा भाग असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर अनेक मंदिरे बांधली आहेत. प्रभू रामचंद्रांनी जेथे जेथे वास्तव्य करून भगवान शिवाची उपासना केली आणि या ठिकाणांना पुनीत केले. तसेच नंतरच्या काळात ही सर्व ठिकाणे तीर्थ म्हणून प्रसिद्धीस आली; अशा प्रसिद्धी पावलेल्या सर्व ठिकाणांचा विक्रमादित्य चालुक्य यांनी शोध घेऊन तिथे भगवान शंकराची हेमाडपंती शिवालये बांधून पूर्ण केली. विक्रमादित्य चालुक्यांनी आपल्या कारकीर्दीत हेमाडपंती प्रकारात बांधलेले असेच एक शिवालय म्हणजे उक्कडगाव येथील भगवान उत्तरेश्वराचे (शंकराचे) एक मंदिर आहे.
या मंदिराचे निर्माण राजा विक्रमादित्य चालुक्य (सहावा) यांनी केलेले आहे. चालुक्य मंदिर निर्माण कार्याच्या जेवढ्या खुणा (टोटेम) असतील, त्यातील बहुतेक सर्व खुणा या मंदिरात असल्याने, हे मंदिर निर्माण चालुक्य नरेश विक्रमादित्य चालुक्य (सहावा) यांनी बाराव्या शतकात केले आहे. यावरून या मंदिराची स्थापत्य आणि निर्माण शैली ही विक्रमादित्य चालुक्य (सहावा) याची असून, ज्याला विक्रमादित्य चालुक्य सहावा उर्फ़ हेमाडपंती (हेम्माडी) अशी ओळख आहे. ज्या विक्रमादित्यांनी (सहावा) तब्बल एक्कावन वर्षे महाराष्ट्रासहित निम्म्याधिक भारतावर स्थिर शासन करताना आपले अधिराज्य गाजवले होते.
तोमर (तौर) राजांकडून मंदिर जिर्णोद्धार!
- - - - - - - - - - - - - - -
भगवान उत्तरेश्वराच्या या सुंदर आणि देखण्या मंदिराचे निर्माण इ. सनाच्या
बाराव्या शतकाच्या पूर्वार्धातील आहे. या मंदिराचे निर्माण कार्य चालुक्य
नरेश विक्रमादित्य चालुक्य यांनी बाराव्या शतकात बांधून पूर्ण केले आहे.
तोमर (तौर) राजांनी तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात गोदावरी नदीच्या काठावर
आपल्या वसाहती निर्माण करण्या अगोदर या मंदिराचे निर्माण चालुक्यांनी
केल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर विक्रम संवत 1294 नंतर राजे तोमर (तौर)
यांनी उत्तरेश्वराच्या मंदिर परिसरात आपली पहिली छावणी टाकली. आणि त्यानंतर
आपल्या गावांची व्याप्ती वाढवून नंतरच्या काळात ती तेवीस गावे बसवून
(निर्माण करून) वाढवली. तेराव्या शतकाच्या पुढील काळात तोमर (तौर) राजांनी
या भागात सरदार घराणे म्हणून आपली ओळख निर्माण केली.
तोमर राजवंशाचे पुढे तौर असे अपभ्रंशीत आडनाव झाल्यावर हा घराणा या भागातील एक नामी सरदार घराणा म्हणून उदय पावला. पुढील काळात या घराण्यात रणांगणे गाजवणारी सरदारांची एक मोठीच फळी निर्माण झाली. मात्र इतर मराठा घराण्यांप्रमाणे इतिहास न लिहून ठेवण्याची कीड या घराण्याला सुद्धा लागल्याने, सरदार महादजी तौर ठाकूर, सरदार मेघाजी तौर ठाकुर, सरदार त्र्यंबकराज तौर ठाकूर, सरदार दत्तराज तौर ठाकूर खेरीज इतर सरदारांची नावे अथवा इतिहास तौरातील कोणालाही ठावे नसावा, हे विशेष आहे! पुढे तेराव्या अथवा चौदाव्या शतकात तोमर(तौर)राजे उदयनसिंगजी तौर-ठाकूर यांनी उक्कडगाव येथील उत्तरेश्वराच्या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे उल्लेख सापडतात. राजे उदयनसिंगजी तौर-ठाकूर हे अजमेर येथील राजा मानसिंग तोमर (तौर) यांचे नातू असून, उक्कडगाव परिसरातील समस्त तेवीस गाव जहागिरीतील आणि तौर परिवारातील प्रथम व्यक्ति राजा केशरसिंग तौर-ठाकूर यांचे चिरंजीव होत.
भगवान उत्तरेश्वराच्या मंदिराचे निर्माण अगदीच गोदा काठी असून, या मंदिराचे बांधकाम त्रिकूटपंती (हेमाडपंती) स्वरुपातील करण्यात आलेले आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूंनी (दक्षिण सोडून) दरवाजे आहेत. यावरून या वास्तू प्रकाराला त्रिकूटपंती (हेमाडपंती) प्रकारातील मंदिर निर्माण संबोधले जाते. मंदिर परिसरातील पुष्करणी बारव ही चालुक्य (सोळंके) स्थापत्य कलेची ओळख करून देणारा एक ठोस पुरावा मानला जातो. चालुक्यांच्या स्थापत्य कलेनुसार मंदिर परिसरात पूर्वेला चालुक्य नरेश विक्रमादित्य (सहावा) यांनी पुष्करणी बारवेचे निर्माण केलेले आहे. मात्र सदरील बारव काळाच्या ओघात नष्ट झाला आहे, जमिनीखाली गाडला गेला आहे. आज त्याच्या खुणा तेवढ्या दिसून येतात.
उक्कडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना येथील मंदिराचे सर्व डिझाईनच विक्रमादित्य चालुक्य (सहावा) यांच्या स्थापत्य कलेतील असल्याचे दिसून येते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरातील भव्य दर्शनी सभागृह आणि कोरीव दगडी खांब आपले चटकन लक्ष वेधून घेतात. मंदिर बांधकाम हेमाडपंती प्रकारातील असल्याने मनाला मोहीत करून जाते. मंदिरातील प्रत्येक दगडी खांबावर चालुक्यांनी त्यांच्या स्थापत्य कलेनुसार विविध शिल्पांचे कोरीव काम केले आहे. कोरलेल्या या प्रत्येक शिल्पांमधून त्या काळातील अर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीची जाणीव होते.
उत्तरेश्वराच्या मंदिरातील दर्शनी सभागृहातून मुख्य गाभाऱ्यात जाणारे जे प्रवेश द्वार आहे, त्याच्या उंबरठ्यावर वरच्या बाजूला गणेश पट्टी आहे. यावरून हे मंदिर चालुक्यांनीच बांधलेले असल्याचे आणखी एक लक्षण आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूस कोष्टीका कोरलेल्या आहेत, ही चालुक्य स्थापत्य कलेची अजून एक साक्ष आहे. सभागृहातील उंबरठ्यातून गर्भगृहात थोडे वाकूनच जावे लागते. आत प्रवेश केल्यानंतर गर्भगृहातील विस्तीर्ण शिवलिंग दृष्टीस पडते. हे शिवलिंग पूर्वमुखी (तीर्थी) आहे. हे या मंदिराचे अजून एक खास वैशिष्ठ्य आहे. असे पूर्व मुखी शिवलिंग या भागात बहुदा दुसरे नसावे.!
उक्कडगाव या
गावाच्या नावातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आमचे मार्गदर्शक इतिहासकार,
पीएचडी गाईड आणि पुरातन वास्तू विशेषज्ञ असलेले डाॅ. नीरज साळुंखे (Neeraj
Salunkhe) सर यांच्या मतानुसार उक्कडगाव या शब्दाचा अर्थ 'hi agriculturist
Village' असा होतो. उक्कड हे नाव ओक्काळी या नावाचे अपभ्रंशीत रूप आहे.
उक्कड अथवा ओक्काळी म्हणजे, ही दक्षिणेतील 'agriculturist Village
assembly' अशा अर्थाने घेतला जाणारा एक शब्द आहे.
'There are many
linguist rules. Sanskrut - Kannada groups of letters etc etc.
Linguistics is allied branch in especially ancient India.'
ओक्काळी (Okkali) या शब्दापासून ओक्काळगे (Okkalage) अर्थात ओक्काडगे (Okkadage) गे चे अधुनीक रूप म्हणजे गाव (ge = gaon) म्हणजेच या अशा सर्व गोष्टीतून Ukkadgaon (उक्कडगाव) हा शब्द प्रचलित झाला. या वरील बाबीचा विचार केला, तर तौर- जहागीरदारांच्या साडेबावीस गाव समूहातील उक्कडगाव हे प्रमुख गाव असावे असे वाटते. शिवाय सरदार राजे तौर-जहागीरदार यांच्या जहागिरीतील साडेबावीस गावांची मोजदाद उक्कडगाव येथूनच करावी लागते. उक्कडगाव या गावाला सर्व साडेबावीस गावातील तौर जहागीरदारांचे थोरले गाव अशीच ओळख आहे.
दरम्यान महा शिवरात्री असो वा श्रावणातील सोमवार! या निमित्ताने उक्कडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना येथे भगवान उत्तरेश्वराची (महादेव) भव्य यात्रा भरते. यात्रेला दूरवरून हजारो भाविक सहभागी होतात. प्रत्येक श्रावणी सोमवाराचे दिवशी येथे शिवभक्तांची मोठीच रेलचेल पाहावयास मिळते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तर गावात सात दिवसाचा सामुहिक जपानुष्ठानचा भव्य कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाची सांगता महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर करण्यात येते.

No comments:
Post a Comment