विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 October 2020

उक्कडगाव येथील सतराव्या शतकातील निर्मित 👇 श्रीमंत सरदार महादोजीराजे तौर-ठाकुर यांचा पुरातन राजवाडा

 


उक्कडगाव येथील सतराव्या शतकातील निर्मित
👇
श्रीमंत सरदार महादोजीराजे तौर-ठाकुर यांचा पुरातन राजवाडा
-------------------------
सतीशकुमार सोळंके-देशमुख
---------.....✍️
@
श्रीमंत सरदार महादोजी राजेतौर-ठाकुर यांच्या पूर्णपणे भग्न झालेल्या राजवाड्याचे अवशेष आजही उक्कडगाव, ता. घनसावंगी येथे पहावयास मिळतात. पांडव वंशीय राजेतौर-ठाकुर-जहागीरदार यांच्या साडेबावीस गाव जहागिरीतील थोरले गाव म्हणून उक्कडगाव या गावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. काही पितरांसाठीचे पाहुणे आणि थोड्याबहुत इतर जातीय आडनावांना सोडले, तर गावात राजेतौरांचे अस्तित्व बहुसंख्येने आहे. लोकसंख्येत बोलायचे झाल्यास उक्कडगाव प्रमाणेच तौरांच्या बाकी सगळ्या गावांची सुद्धा हीच स्थिती आहे. उक्कडगाव येथे थोरला, मधला असे काही तौरांचे तरफ म्हणजे वाडे आहेत. राजे लखुजी जाधवराव यांच्या पलटणीमध्ये श्रीमंत सरदार राजे महादोजी ठाकूर यांचे आणि त्यांच्या पराक्रमाचे जे वर्णन अभ्यासायला मिळते, ते महादोजी उक्कडगाव येथील राजे तौरांच्या मोठ्या वाड्याचे पूर्वज होत. तौरांच्या थोरल्या तरफातील वंशजांनी जतन करून ठेवलेल्या वंशावळीमध्ये महादोजी यांचे नाव बघायला मिळते. या पराक्रमी महापुरूषाची समाधी गावातील उत्तरेश्वर मंदिराच्या समोर असल्याचेही तौरांच्या थोरल्या तरफातील आजच्या वंशजांतून सांगण्यात येते. सरदार महादोजी यांनी रणांगणे गाजवलेली तलवार, दोनपाती तलवार, भाले, कट्यार, बिचवे, फरशी कुर्हाड आदी शस्त्रे तसेच त्या काळातील पुरातन धातूची अनमोल भांडी महादोजी यांच्या उक्कडगाव येथील वंशजांनी आजही जतन करून ठेवलेली पहावयास मिळतात.

सरदार महादोजी यांचा भग्न, पडक्या अवस्थेतील राजवाडा आणि त्याचे अवशेष उक्कडगाव येथे पहावयास मिळत असले तरीही महादोजी यांच्या पूर्वजांची म्हणजे राजा मानसिंग तंवर यांचा मुलगा राजा केशरसिंग आणि नातू मानसिंग यांनी चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण केलेली गढी आहे. राजेतौर हे त्याकाळी खूप सहिष्णू असावेत म्हणून त्यांनी या किल्लेवजा गढीवर गावातील हरिजन, मातंग व इतर जातीयांनाही स्थान दिलेले दिसते. आता मात्र ही गढी नजरेला जाणवत असली, तरी त्यावर सर्व जाती-धर्मियांचे अगदी अलीकडच्या काळातील नवीन छोटी छोटी घरे नजरेस पडतात. राजे केशरसिंग आणि उदयसिंग यांच्यानंतर तिनशे वर्षांनी या वंशात जन्मलेल्या महादोजी राजेठाकुर यांनी त्यांच्यासाठी गढीवर वाड्याची निर्मिती न करता, ती गढी खालील भागात मुद्दामच दक्षिणाभिमुख केलेली असावी असे वाटते. या वाड्याच्या लगत बैलांचा आणि घोड्यांच्या पागेचा वाडा आहे. त्यालगत गुरांचा वाडा, त्यातील दुभत्या जनावरांसाठीची केलेली स्वतंत्र व्यवस्था कोणालाही अचंबित करून जातील अशा वाटतात. महादोजीराजे यांच्या मुख्य रहिवास असलेल्या वाड्याच्या अगदी समोरच त्यांच्या कचेरीचा वाडाही लक्ष वेधून घेईल असाच वाटतो. कचेरीच्या वाड्यात आल्या-गेलेल्या लोकांसाठी अनेक दालने, गुप्त चर्चा करण्यासाठीच्या खोल्या कोणालाही विचारी बनवायला लावतील अशा आहेत.

पूर्वी प्रतिस्पर्धी आक्रमणे आणि दरोडे पडण्याची भीती यामुळे जकातीचा आणि उत्पन्नाचा पैसा ठेवण्यासाठी असलेला नक्षीदार दगडी रांजण भिंतीच्या व मोठ्या देवळीसमोरच्या भागात आणि सहजासहजी कोणाच्याही लक्षात येऊ शकणार नाही, अशा अंडरग्राऊंड जागेवर ठेवलेला दिसतो. त्यावर घाण्यातून मळलेले गुळ, चुन्याच्या लगद्याचे लिंपण टाकण्याची सोय होती. यामुळे वाईट प्रसंगातून सुद्धा हा रांजन सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नसावा. राजेतौर-ठाकुर-जहागीरदार हे राजवंशातील असल्याने या घराण्यातील स्त्रिया पूर्वी घोशात असायच्या. त्यामुळे महादोजी राजांनी निर्मित केलेल्या या वाड्यामध्ये वायव्य कोपर्यात स्त्रियांसाठी शौचालय बांधलेले होते. उक्कडगाव हे गोदावरी नदीच्या काठावर असल्याने आणि ऐंशी फुटांपर्यंत काळी माती असल्याने शौचालयाखाली खोल पेव खोदून त्यात मैला साठवण्यासाठी सोय केली होती. वाड्याच्या इर्द-गिर्द धान्यसा ठविण्यासाठीचे जमिनीखाली अंडरग्राऊंड पेव होते. मराठवाडा मुक्त होईपर्यंत या वाड्याचे वैभव शिखरावर होते. जहागीरदारी वाड्यातील थाटाच्या दिमतीला त्याकाळी अरब-रोहिल्यांचा सुद्धा राबता होता. उक्कडगाव येथील अशा वाड्यासारखे मोठमोठे वाडे राजे तौरांच्या इतर साडेबावीसीच्या गावातून देखील दिसून येतात, मात्र त्यांचा काळ थोडा नंतरचा वाटतो.

सरदार महादोजी ठाकुर यांचा उक्कडगाव येथील वाडा भग्न झालेला असला तरीही त्यातील अवशेष आजही बघण्याजोगे आहेत. येथे नमूद करण्याजोगी अजून दुसरी विशेष बाब म्हणजे, उक्कडगाव येथील प्रथम पुरूष राजा केशरसिंग व केशरसिंग यांचे चिरंजीव राजे उदयसिंग यांच्यात आणि त्यांचे वंशज सरदार महादोजी ठाकुर यांच्यात तब्बल तिनशे वर्षाहून जास्तीचे अंतर आहे.

उक्कडगाव येथील राजेतौर-ठाकुर-जहागीरदार यांनी जतन केलेल्या वंशावळीची सुरुवात गावच्या स्थापनेपासून म्हणजे इ. सन १२९४ पासूनची असून त्याची सुरुवात राजस्थानच्या तोरावाटी येथील राजा मानसिंग ठाकुर यांचेपासून होते. त्यांचा मुलगा राजा केशरसिंग आणि केशरसिंगाचा मुलगा उदयसिंग हे उक्कडगावचे प्रथम पूर्वज पुरूष ठरतात. राजा केशरसिंग आणि उदयसिंग यांच्या वंशात पुढे तीनशे वर्षांनी सरदार महादोजी ठाकुर या महापराक्रमी सरदाराचा इतिहास वाचायला मिळतो. राजेतौरातील काही लोक राजे उदयसिंग तौर आणि मुंगी(पैठण), येथील राजकुमारी यशोधरा भोसले यांच्यात विवाह झाल्याचा दावा करताना दिसतात; मात्र या दाव्यात काहीही तथ्य नसावे असे वाटते. कारण राजे उदयसिंग यांचा उक्कडगाव येथे स्थिरावण्याचा काळ इ.स.१२९४ नंतरचा धरला तर भोसले यांचा मुंगी भागात स्थिरावण्याचा काळ हा सतराव्या शतकातील आहे. कारण मुंगी येथील भोसले हे स्वतःला शहाजीराजे भोसले यांचे चुलते विठोजी राजेंच्या एका मुलाचे वंशज असल्याचे मानतात.
---------
चौकट :
---------
उक्कडगाव येथील उत्तरेश्वर मंदिर परिसरात महंत १००८ श्रीकृष्ण पुरी नामक महाराजांचा वास आहे. ते येथे आपले मूळ नाव बदलून रहात असल्याची चर्चा असून ते कोण्या साधू आखाड्याशी संलग्न असल्याचेही भाविकांना सांगतात. त्यांनी आयुर्वेद वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेतलेले असल्याचेही भक्तांतून सांगण्यात येते. त्यांच्या डिग्रीची संबंधित विभागाने पडताळणी केल्यास काय ते सत्य बाहेर येईलही ! नुकत्याच तौरांच्या जहागिरीतील गावातून गोदावरी परिक्रमा संपन्न झाली, त्यात तौर इतिहास जागृतीला मंहंतांनी मुद्दामच बगल दिल्याचा चर्चेला तौर साडेबावीसीतून उधाण आलेले आहे. महाराजांची यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी काही ग्रामस्थांसोबत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दूरवरून इलाजासाठी आलेल्या रूग्णांच्या गर्दीला थोडे थांबवत महंत पुरी यांनी थेट परिक्रमा या विषयावरच बोलणे सुरू केले.
"माझा आणि राजेतौर यांच्या इतिहासाचा काय संबंध? मी परिक्रमा काढणे अयोग्य थोडेच होते?"
महंतांनी आम्हाला हा प्रश्न उपस्थित करताच, राजे तौरांना अलिकडे त्यांचा खरा इतिहास समजल्याने त्यांच्यात एक ऐतिहासिक जागृती निर्माण झाली आहे, हे तुम्ही नाकारता का? या जागृतीमुळे साडेबावीस गाव जहागिरीतील तौरांनी त्यांचे महासंमेलन आयोजित केले, या संमेलनात तुम्ही परिक्रमा कार्यक्रमाचे नियोजन केले नाही का? ही परिक्रमा तौरांच्या एकोणीस गावांना नजरेत ठेऊन, त्याच पंचक्रोशीतून तुम्ही गोदावरी परिक्रमेचे आयोजन केले नाही का? परिक्रमेचा उद्देश फक्त धार्मिक पुण्य कमवण्यापुरताच मर्यादित होता, तर ही परिक्रमा आपण तौरांच्या रहिवास नसलेल्या भागातून का काढली नाही? अशा काही विचारलेल्या प्रश्नांमुळे थोडे ओशाळल्यागत होत, महंतांनी उत्तर देण्यास टाळाटाळ करत माझ्याकडे रुग्ण संख्या जास्त आहे, त्यांना मी तपासू का, असे म्हटले. याचा अर्थ महाराज आम्हाला जायला सुचवत असल्याचे लक्षात येऊन आम्ही जायला निघालो, तेव्हा पुढच्या वर्षी सुद्धा मी राजे तौरांच्या इतिहासाचा कुठेही उल्लेख न करता त्यांच्याच साडेबावीसीतून पुन्हा अशीच गोदावरी परिक्रमा करून दाखवितो, हे चॅलेंज द्यायलाही श्रीकृष्ण पुरी विसरले नाहीत !

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...