विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 18 November 2020

गंगाधर शास्त्री हा बडोद्याच्या गायकवाडांचा कारभारी.

 गंगाधर शास्त्री हा बडोद्याच्या गायकवाडांचा कारभारी.

गंगाधर शास्त्री हा त्याच्या आरंभीच्या काळात पुण्यास फडक्यांच्या कुटुंबात नोकर होता.
गंगाधर शास्त्री हा फार चलाख असून बोलण्यात हुषार होता. पुढे जाऊन गंगाधर शास्त्री याने बडोद्याच्या गायकवाडांकडे नोकरी धरली.
गायकवाडांच्या दरबारी असलेल्या इंग्रज रेसिडेंटला आपले हेतू पार पाडण्याच्या कामी गंगाधर शास्त्री पासून बरीच मदत झाली होती.
ले. वॉकर (Alexander Walker) याचा गंगाधर शास्त्रीवर पूर्ण विश्वास होता. बडोद्याच्या गायकवाडांकडील बाबाजी दिवाण जेंव्हा मरण पावला आणी सिताराम दुर्वर्तनी निघाला तेंव्हा फत्तेसिंग गायकवाडांच्या आणी ब्रिटिश रेसिडेंटच्या शिफारशींमुळे मुख्य कारभार्याचे सर्व अधिकार लवकरच ह्या गंगाधर शास्त्रीच्या हाती आले.
गंगाधर शास्त्री हा उलट्या-सुलट्या इंग्रजी चालीरीतींचे अनुकरण करी, मोडकेतोडके इंग्रजी बोले आणी तुरतुर चाले. गंगाधरशास्त्री हा गर्विष्ट, संस्कृतज्ञ व बुद्धिमान होता.
इ.स. १८१४ मध्ये गंगाधर शास्त्रीस शनिवारवाड्यातील भट प्रधान व गायकवाड यांच्यामधील देण्या-घेण्याच्या व अहमदाबाद वगैरेंच्या मुलखाचा गायकवाडांच्या नावाने कायमचा इजारा करून घेण्याच्या निकालासाठी पुण्यास पाठविण्यात आले होते.
गंगाधर शास्त्रीस पुण्यास पाठविण्यापूर्वी गायकवाडांनी गंगाधर शास्त्रीच्या जिवास अपाय होणार नाही अशी इंग्रजांकडून हमी घेतली होती असे म्हणतात.
गंगाधर शास्त्री पुण्यास आल्यावर बाजीरावाने "गंगाधर शास्त्री हा फडक्यांच्या पदरी कारकून असताना त्याचे आपल्याशी उद्धटपणाचे वर्तन होते.." अशी सबब सांगून गंगाधर शास्त्रीची भेट घेण्याचे नाकारले.
गंगाधर शास्त्री सांप्रतहि इंग्रजांच्या बळावर शनिवारवाड्यातील बाजीराव भटावर चढेलपणाने वागत असे. ह्याशिवाय गंगाधर शास्त्री हा शनिवारवाड्यातील भटास उपमर्दकारक भाषेने संबोधित असे.
बडोद्याचा जुना कारभारी सिताराम रावजी यास गंगाधर शास्त्र्याविषयी मत्सर वाटत असे. कारभारी सिताराम रावजी याने "गंगाधर शास्त्री हा सर्वस्वी इंग्रजांच्या वतीचा मनुष्य आहे" असे बाजीरावास सांगितले.
पुण्यास बोलणी करण्यासाठी पुष्कळ दिवस राहूनहि गंगाधर शास्त्री याचा उद्देश सफल न झाल्यामुळें गंगाधर शास्त्री याने ब्रिटिश रेसिडेंटचा सल्ला घेऊन असे ठरविले की; गायकवाड व शनिवारवाड्यातील भट यांच्यामधील वादग्रस्त प्रश्न तडजोडीने सोडविण्याचे काम इंग्रजांकडे सोपवून आपण स्वतः बडोद्यास परत जावे.
गंगाधर शास्त्री ह्याचा हा विचार बाजीराव भट आणी सेनापती त्रिंबकजी डेंगळे यांस समजला तेंव्हा गंगाधर शास्त्रीने आपले बडोद्यास परत जाणे लांबणीवर टाकावे म्हणून सेनापती त्रिंबकजी डेंगळे यांनी गंगाधर शास्त्री याचे मन वळविण्यास सुरवात केली.
तेव्हां बाजीराव भटाच्या मुख्य कारभार्याची जागा गंगाधर शास्त्री मागू लागला.
बाजीरावाने आपली मेहुणी गंगाधर शास्त्र्याच्या मुलास देऊ केली आणी गंगाधर शास्त्र्यानें सुचविलेली मुलुखाच्या देण्याघेण्यासंबंधानें तडजोडहि बाजीरावाने कबूल केली.
परंतु गंगाधर शास्त्र्याने आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बाजीरावाच्या मेहुणीचे लग्न आपल्या मुलाशी करण्याचे तहकूब केले.
त्यामुळे बाजीरावास या गोष्टीचा फार राग आला.
पुढे काही दिवसांनी बाजीराव पंढरपुरास गेला. तेंव्हा गंगाधर शास्त्रीही बाजीरावाबरोबर पंढरपुरास गेला.
शास्त्रीचा सल्लागार बापू मैराळ याने गंगाधर शास्त्रीस पंढरपुरास न जाण्याविषयी पुष्कळ सांगून पाहिले. परंतु गंगाधर शास्त्री हा आपल्याच तोर्यांत होता. त्याने ते मान्य न करता तो पंढरपुरला गेला.
जुलैच्या १४ ह्या तारखेस रात्री काही थोडीशी चाकर-माणसे बरोबर घेऊन गंगाधर शास्त्री विठोबाच्या देवालयात देवदर्शनास गेला. देवदर्शन केल्यावर बाजीराव भटाची गाठ घेऊन गंगाधर शास्त्री बाहेर पडला.
पण गंगाधर शास्त्री थोडा दूर जातो न जातो तोच काही मारेकर्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे तुकडे तुकडे केले. (जुलै १८१५).
मृत्यू समई "आई आई, मेलो मेलो.." असे गंगाधर शास्त्री ओरडला होता असे चिपळूणकर रुमाल दप्तर नं. ११ मधील एका पत्रात म्हंटले आहे.
प्रसिद्ध इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो की, "हे कृत्य रावबाजीने सेनापती डेंगळ्यांच्या मदतीने केले."
उलट काहींचे म्हणणे असे होते कि, सिताराम या दिवाणानेच गंगाधर शास्त्रीचा खून करविला. यावेळी सितारामाने धार येथे सैन्य जमविले होते.
थोड्याच दिवसांत सितारामास इंग्रजांनी अटकेत ठेवले यावरून या म्हणण्यास पुष्टि मिळते.
वॉलेस (General James Welsh) म्हणतो कीं, "गंगाधर शास्त्रीच्या खुनांत शनिवारवाड्यातील भटास काही फायदा होणार नव्हता. गंगाधर शास्त्रीचा खून जर बाजीराव भटाने केला असता तर गुजराथ बाजीराव भटाच्या हातातून गेले असते. म्हणून गंगाधर शास्त्रीला जिवंत ठेवण्यांतच बाजीराव भटाचा फायदा होता."
**
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
"सेनापती त्रिंबकजी डेंगळे मोठा कर्तृत्ववान, हुन्नरबाज आणि शूर मनुष्य असल्यामुळे हा अडसर दूर झाला म्हणजे मराठ्यांचे राज्य गिळायला सोपे.
राहिला रावबाजी.
त्याला गंडवायला असा कितीसा वेळ लागतो?" असा धूर्त विचार करून इंग्रजांनी ह्या खुनात सेनापती त्रिंबकजी डेंगळे ह्यांचे नाव पुढे केले आणी बाजीरावावर दबाव टाकून आपला मतलब पुरा केला.
**
गंगाधर शास्त्री ह्याने वरवर गायकवाडांची आणी आतून इंग्रजांची नोकरी वफादारीने केली. परंतु जेव्हा गायकवाडांच्या वतीने बोलणी करण्यास गंगाधर शास्त्री हा पुण्यास आला आणि बाजीरावाने त्याला गाजर दाखविले तेंव्हा एक वर्षाच्या पुणे मुक्कामातच गंगाधर शास्त्रीची इंग्रजांवरील आणी गायकवाडांवरीलही निष्ठा कमी होऊ लागली.
गंगाधर शास्त्री ह्याचे एकूण वर्तन पाहता 'खोबरं तिकडं चांगभलं' किंवा 'जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी' अश्या म्हणी नजरेस येऊ लागतात.
**
मग गंगाधर शास्त्री ह्याचा खून कोणी केला असावा?
सिताराम या दिवाणाने?
बाजीरावाने?
गायकवाडांनी?
कि इंग्रजांनी??
ह्या खुनाचा खरा सूत्रधार इतिहासात सापडत नाही.
पण धूर्त राजकारणी इंग्रजांच्या दबावामुळे शेवटी 'हो-नाही' करत करत काहीसे अनिच्छेने बाजीराव हा सेनापती त्रिम्बकजी डेंगळे ह्यांचा बळी देऊन मोकळा झाला.
ह्या खुनाचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला?
ह्या पेक्षा ह्या खुनाचा सगळ्यात जास्त फायदा कोणी घेतला??
तर तो इंग्रजांनी.
मग खून कोणी करविला असावा बरं?
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...