विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 18 November 2020

आंग्रे घराण्याची ग्वाल्हेर शाखा

 


आंग्रे घराण्याची ग्वाल्हेर शाखा

कुलाबकर सरखेल आंग्रे यांची एक शाखा मूळ संस्थापक कान्होजी यांचे चिरंजीव येसजी यांच्या वेळेपासून ग्वाल्हेरास आहे. येसजींची मुलगी मैनाबाई ही त्या वेळी शिंदे घराण्यात दिली होती.
हे शिंदे पुढे ग्वाल्हेरात संस्थानाचे अधिपती झाली. त्या वेळी सरखेलपद मिळण्याची संधी आपणास नाही असे पाहून येसजींचे मुलगे मावजी व बाबुराव हे बहिणीकडे जाऊन राहिले. बाबुरावांनी आपल्या सेनेसह शिंदे ह्यांना अनेक लढायांत मदत केली म्हणून आंग्र्यांना भोरासा, नेओरी आणि पानविहार हे भाग जहागीर म्हणून मिळाले. शिवाय सर्व लवाजमा व ‘वजारत-माब-सरखेल’ ह्या किताबात ‘सवाई’ हा आणखी एक किताब बहाल करण्यात आला.
बाबुरावांस संतती नसल्यामुळे त्यांनी मावजी ह्या आपल्या भावाचा संभाजी हा मुलगा दत्तक घेतला व ते अलिबागेस परतले. ह्या वेळी माळव्यात अनेक उचापती व लूटमार चालू होती. ती संभाजींनी थांबवून ग्वाल्हेर संस्थानास हरएक प्रकारे मदत केली. म्हणून शिंद्यांनी आणखी काही मुलूख त्यांस दिला.
संभाजींसही मुलगा नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा मुलगा अप्पासाहेब (बाबुराव) हा १८३९ मध्ये दत्तक घेतला. संभाजी १८४६ मध्ये मरण पावले. बाबुरावांनी संस्थानात अनेक हुद्द्यांच्या जागांवर काम केले. त्यांनाही मुलगा नसल्यामुळे त्यांनी अलिबागकर आंग्रे घराण्यातील ‘त्र्यबकराव’ नावाचा मुलगा दत्तक घेण्याचे ठरविले, तथापि ते १८९१ मध्ये दत्तक घेण्यापूर्वी मृत्यू पावले. तेव्हा त्यांनी ठरविलेला दत्तक पुढे १८९२ साली घेण्यात येऊन त्याचे नाव ‘संभाजी ’ ठेवण्यात आले. त्यांना १८९६ मध्ये मुलगा झाला. हे चंद्रोजीराव व त्यांचे चिरंजीव संभाजीराव सध्या विद्यमान असून चंद्रोजीराव हे विद्वान, अभ्यासू व समाजकार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.
संस्थानिकांच्या राजकारणात त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते.
संदर्भ : 1. ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल, अलिबाग, १९३९.
देशपांडे, सु. र.
Photo - Sambhaji Rao Angre (d. 1848)
By Muhammad Baksh, Gwalior, 1876

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...