विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 9 November 2020

महाराजाधिराज यशवंतराव होळकर


 महाराजाधिराज यशवंतराव होळकर

एखादी व्यक्ती किती महान आहे हे तिच्या राष्ट्रनिष्ठेनेच समजले पाहिजे. केवळ वैयक्तिक हितासाठी केलेल्या लढाया आणि आपल्या मायभु स्वतंत्रतेसाठी केलेल्या लढाया या मध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. मात्र ज्यांनी उभी हयात इंग्रजा विरुद्ध च्या सशस्त्र लढाया मध्ये घालवली अश्या महान राष्ट्रवीरांना खलनायक भूमिकेत अडकवून त्यांच इतिहासातील कर्तुत्व नाकारण्याचा प्रयत्न काही नतद्रष्ट लोकांनी केला परंतु काळाच्या कसोटी वर खरे उतरलेल्या या राष्ट्रनायकाने आपल्या कर्तुत्वाने , पराक्रमाने आपल्यावरील सर्व आरोप धुवून काढले. प्रस्तुत पत्र नागपूरचे सेना साहेब सुभा रघुजी भोसले यांना लिहले असून त्या मध्ये इंग्रजांचा भारतीय राजकारणातील वाढता हस्तक्षेप यावर आक्षेप नोंदवला आहे. खुद्द ज्या भोसले यांनी यशवंतराव अज्ञातवासात असताना दुसऱ्या बाजीरावांच्या सांगण्यावरून त्यांना मदत न करता उलटपक्षी अटकेत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु ह्याबाबत मनात कोणतेही अढी न ठेवता शिंदे भोसले व होळकर हे त्रि वर्ग एकत्रित आल्यास महाराष्ट्रातील मराठे व उत्तर भारतातील राजपूत मुसलमान एकत्रित येण्यास वेळ लागणार नाही असा आणि ही एकत्रित 5-6 लाखाची फौज इंग्रजावर चालून गेली असता त्यांना भारतातून हाकलून लावणे तितकेसे अवघड जाणार नाही हा दुर्दम्य आशावाद ते या ठिकाणी बोलून दाखवतात. जर त्यावेळी शिंदे भोसले होळकर हे त्रिवर्ग यशवंतराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले असते तर आज निश्चितच भारताचा इतिहास वेगळ्या द्रुष्टीने लिहावा लागला असता. परंतु इतिहासात जर तर ला स्थान नसते हेच खरे. आपण जाणतो की उत्तर भारतात इंग्रजांच्या विरोधी सशस्त्र भूमिका 1857 चा लढाई पासून आरंभली परंतु मराठ्यांनी त्यांच्या आधीच ही मोहीम सुरू केली होती. आणि महाराजा यशवंतराव होळकर यांनी लिहलेले हे पत्र त्या स्वातंत्र्यसमराची साक्षच देते. अतिशय अभ्यासपूर्ण व वाचनीय असे हे पत्र महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राष्ट्रनिष्ठेवर शिक्कामोर्तब करते.
*श्री म्हाळसाकांत (इस 1803 नजिक देऊळगाव राजा. )*
*राजश्री रघुजी भोसले सेनासाहेब सुभा गोसावी यांसी सकलगुणलंकारण अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य स्नेहांकित यशवंतराव होळकर रामराम विनंती. उपरि येथील कुशल जाणुन स्वकीय लिहीत असावे. विशेष ... इंग्रजास स्वराज्याचा लोभ उत्पन्न होऊन चाल करावी या इराद्यात बहुत दिवस होतेच. प्रस्तुत श्रीमंत राव बाजीसाहेब अनुकूल हे निमित्तास कारण होऊन अलीकडेच चाल करून नगरचा किल्ला घेतला. आपल्या पाशी वकील होता तो न पुसता उठून गेला. नवाबा कडील फौज व तळ औरंगाबाद नजिक आहे. त्याची चाल पाहून आपण व दौलतराव शिंदे सडे होऊन भादोल्या च्या घाटावर त्याची आपली छेटी थोडी आहे म्हणून वर्तमान ऐकतो. त्यास आजपर्यंत फूट होती. त्यामुळे त्यांचा इतका प्रसार झाला. प्रस्तुत आपल्या त्रीवर्गा ची एकदिली झाली. तेंव्हा स्वराज्यातील सर्व लहान थोर सरदार मराठे मुसलमान सामने होतील. हिंदुस्थान प्रांतीचे राजेरजवाडे व राजश्री समशेर बहादुर बुंदेले , व समशेर बहादुर आदी करून छोटे मोठे अनुकूल होतील. एवढा भरणा पाहता पाच सहा लाख फौज व दहा कंपू होतील. दोन भाग करून चाल केली असता काही जड पडावे ऐसे नाही. कर्नाटक बंगाला अंतर्वेदी आदिवरूण त्यांचा मुलुख कोट्यावधीचा आहे.इतका आपल्या पोटी पडल्यावर आपले हित किती. त्याजला इकडिल मुलुखात येऊन नफा काय होणार हे विचार लावून पाहिल्यानंतर बळाबळ पक्ष इकडिल पडून कायल होतील , आपण उतावळी करून गांठ घालून ते हावभरी होऊन चाल करतील ऐसे न करावे. धमाकावुन पोक्त विचाराने पाऊल पडल्यास सहजात कायल होतील. त्यास त्याच बेतास लागावे. काही अवघड नाही. बहुत काय लिहावे हि विनंती.*
अतिशय वीररसाने ओथंबुन लिहलेले हे पत्र मात्र यशवंतराव यांच्या या पत्राचा फारसा उपयोग झाला नाही आणि यशवंतराव होळकर यांना एकट्यानेच इंग्रजांविरुद्ध ची ही मोहीम उघडावी लागली. भरतपुर डिग आणि इतर अनेक छोट्या मोठ्या लढाया करून जगज्जेता इंग्रजांना पुरते नामोहरम करून सोडले आणि भानपुरा येथे इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी तोफा ओतण्याचे काम सुरू असताना , इंग्रजाना भारताबाहेर हुसकावून लावणे ह्या वेडापायी अति ज्वर हा महाराजा अनंतात विलीन झाला त्यांच्या पवित्र स्मुर्तीस विनम्र अभिवादन ..💐💐
संदर्भ : मराठ्यांच्या ऐतिहासिक लढाया 1802 ते 1818.
शिवराम महादेव परांजपे पान क्रं 146 ते 147
संकलन
मधुकर हाक्के
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...