नारायणराव पेशवे
नारायणराव हे पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब व त्यांची धर्मपत्नी गोपिकाबाई याचे सर्वात धाकटे चिरंजीव.
वयाच्या ५ व्या वर्षी त्यांनी पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर आपल्या तीर्थरूपांना गमावले. मुळात पानिपतच्या युद्धातच त्यांचे सर्वात ज्येष्ठ बंधू व पेशवेपदाचे वारस विश्वासराव मारले गेल्यामुळे त्यांचे दुसरे वडील बंधू माधवराव पेशवे झाले (१७६१).
माधवरावांच्या काळात त्यांचे आपल्या मातोश्री गोपिकाबाईंशी खटके उडाल्याने गोपिकाबाई पुणे सोडून गंगापूरला निघून गेल्या (१७६३). तेव्हा नारायणरावचा सांभाळ त्यांची चुलती व सदाशिवराव भाऊसाहेबांची विधवा पार्वतीबाईने केला. तसेच माधवराव व त्यांच्या पत्नी रमाबाई यांना मुलबाळ न झाल्याने त्यांनी नारायणरावांना आपला उत्तराधिकारी म्हणून नेमले.
थेऊर येथे माधवरावांस राजयक्ष्म रोगाने देवाज्ञा झाली (१८ नोव्हेंबर १७७२). माधवरावांनी जाताना नाना फडणवीस व सखारामबापू बोकील यांना नारायणरावांचा सांभाळ व मार्गदर्शन करत पेशवाईचा कारभार पाहण्याची आज्ञा दिली , तसेच त्यांनी आपले चुलते रघुनाथराव दादासाहेब (राघोबादादा) यांना देखील त्यास अनुकूल राहण्याची विनंती केली होती.
माधवरावांच्या शेवटच्या काळात गोपिकाबाई पुण्यात परतल्या होत्या. नारायणराव पेशवे झाल्यावर त्यांनी माधवरावांच्या काळात नाईलाजाने थांबविलेला राजकारणातील हस्तक्षेप पुन्हा सुरू केला. यातच नारायणराव गोपिकाबाईंच्या सल्ल्याने कारभार करू लागल्याने नाना फडणवीस व सखारामबापू बोकील हे वचकून व थोडे अलिप्त राहू लागले.
नारायणरावांचा स्वभाव खूप तापट होता. माधवराव तापट असले तरी चूक झाल्यास मोठ्या मनाने ती स्वीकारत व म्हणून सर्व त्यांना वचकून होते पण नारायणराव मात्र याविरुद्ध दरबारात कुणाचाही अपमान करून बसायचे. त्यांनी कायस्थ प्रभूंच्या विरोधात निर्णय देऊन त्यांना देखील दुखावले होते.
राघोबादादाने सखारामबापूंकरवी नारायणरावास धरावे अश्या मजकुराची चिठ्ठी तुळया पवार व सुमरेसिंह , खरकसिंह यासारख्या गारद्यांनाली , पण रस्त्यातच त्या पत्रातील मजकूर बदलून त्याचे नारायणरावास मारावे असा मजकूर राघोबादादाच्या पत्नी आनंदीबाईने केला अशी वदन्ती आहे. अर्थात याला ऐतिहासिक आधार नसून त्या चिठ्ठीतच मुळात मारावे असा मजकूर होता असेही अनेक इतिहासकारांचे मत आहे.
गारद्यांनी आपला डाव साधला व नारायणरावांना मारायला धावले तेव्हा ते पहिले पार्वतीबाईंकडे व त्यांच्याच सांगण्याने मग राघोबादादाकडे मदतीस धावले पण उपयोग झाला नाही. त्यांची 'काका मला वाचवा' ही किंकाळी व्यर्थ गेली व त्यांची हत्या झालीच.....
©maratha_riyasat

No comments:
Post a Comment