सवाई माधवराव पेशवे-
१८ एप्रिल १७७४- २७ ऑक्टोबर १७९५
मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्या नारायणराव या पेशव्यांना गंगाबाई या पत्नीपासून पुरंदर किल्ल्यावर मरणोत्तर जन्माला आलेला पुत्र. त्यांचे बालपण पुरंदर किल्ल्यावर लष्करी बंदोबस्तात गेले. त्यामुळे या राज्यकर्त्यास योग्य असे शिक्षण त्याला मिळाले नाही.
पेशव्यांला वाढविण्याची जबाबदारी कारभाऱ्यांवर म्हणजे नाना फडणिसादींवर आली.साहजिकच लिहिणे-वाचणे, हिशेब ठेवणे, घोड्यावर बसणे, कसरत करणे याचे जुजबी शिक्षण त्यांस मिळाले; पण शहाण्यासुरत्या मुत्सद्यी माणसांच्या गाठीभेठी,राजकारण्याच्या वाटाघाटी, लष्करी मोहिम यांपासून पेशवा वंचित राहिला.
सवाई माधवरावांच्या वेळी पहिले इंग्रज-मराठे युद्ध (१७७४–८२), टिपूशी युद्ध (१७८६–८७), टिपूविरुद्ध केलेली श्रीरंगपट्टणची इंग्रज, निजामासह संयुक्त मोहीम (१७९०–९२), खर्ड्याचे युद्ध (१७९५), पाटीलबाबा शिंदे यांनी मोगल बादशाही ताब्यात घेऊन उत्तरेकडील राजेरजवाडे आणि मुस्लिमसंस्थानिक यांशी केलेली युध्दे (१७८४–१७९१) असे अनेक युद्धप्रसंग घडले आणि मराठ्यांनी अखिल हिंदुस्थानात पुन्हा नावलौकिक मिळविला.
सवाई माधवराव व गंगाबाई हे खासे आणि नाना व बापू कारभारी या चौघांनां कैद करण्याचा कट एकदा राघोबाच्या पक्षाने केला पण तो फसला. तेव्हां इंग्रजांच्या मदतीने राघोबानें पेशव्यांशी भांडण सुरू केले, आणि मराठी साम्राज्यांत दुसऱ्या अनेकांनी बंडाळी केली, पण त्या सर्व संकटांचा परिहार नाना फडणवीसांनी सवाई माधवराव पेशवेंकरवी केला.
सवाई माधवराव स्वतः कर्तबगार वा सुज्ञ नव्हते, तरी त्यांच्या अस्तित्वाने मराठ्यांची सत्ता एकवटून राहिली होती. त्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईत परस्परातील हेवेदावे, वैयक्तिक स्वार्थ आणि सत्तेसाठी रस्सीखेच सुरु झाली व विघटनवादी प्रवृत्तीला ऊत आला. त्यानंतर २०-२२ वर्षांत दुसर्या बाजीरावाच्या काळात इंग्रजांनी मराठ्यांची सत्ता नष्ट केली.

No comments:
Post a Comment