खोकरी घुमट -
कोकणात आणि भारताच्या आरमारी इतिहासात लढाऊ वृत्ती आणि दर्यावर्दी कौशल्याने आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या सिद्दी घराण्याचा दबदबा मोठा होता. अबिसीनिया म्हणजेच इथियोपियातून आलेल्या आणि सुरुवातीला गुलामी करून यथावकाश आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उत्कर्ष साधलेल्या सिद्दींनी उत्तर कोकणावर वर्चस्व प्रस्थापित केले. अभेद्य आणि अजिंक्य असा जलदुर्ग जंजिरा त्यांची राजधानी होता. मुरुडवरून म्हसळा येथे जाताना अंदाजे चार किमीवर एका टेकाडावर असलेल्या खोकरी या ठिकाणी मशिदीसारख्या वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. परंतु मशिद समजून आपण तिथे जाण्याचे टाळतो. पण प्रत्यक्षात त्या मशिदी नसून मुरुड संस्थानचे सिद्दी यांच्या शाही कबरी आहेत.
खोकरी येथील तीन दगडी कबरी सुमारे ४५० वर्षे जुन्या आहेत. दगडाचे बांधकाम असलेले इंडो-सारसेनिक पद्धतीत बांधलेली ही थडगी आहेत.
सगळ्यात मोठी कबर सिद्दी सुरूल खान याची आहे. सन १७०७–१७३४ या काळात जंजीऱ्याची सत्ता याच्या हातात होती. सुरूल खानाची कबर त्याच्याच हयातीत बांधण्यात आली असे सांगितले जाते. सुरूल खानाची कबर एका उंच चौथऱ्यावर बांधलेली आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. कबरीच्या भिंतीवर दगडात कोरलेली जाळ्या आहेत, तसेच छोटीछोटी कोष्टक पण बनवलेली आहेत. कबरीत सर्वत्र फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. कबरीच्या अंतर्भागात सुरूल खान आणि त्याच्या गुरुचे थडगे आहे.
दुसऱ्या दोन लहान कबरींपैकी एक कबर सन १६७७-१६९६ या काळात मोगली सत्तेच्या नौदलाचा प्रमुख सिद्दी कासीम याची आहे. जनमानसात सिद्दी कासीम हा याकुत खान नावाने ओळखला जात होता. याने सन १६७०-१६७७ आणि पुन्हा सन १६९७-१७०७ अशी सत्ता उपभोगली.
तिसरी कबर याकुत खानाचा भाऊ खैरीयत खान याची आहे. दंडा-राजापुरी प्रांताचा सन १६७०-१६७७ या काळात खैरीयत खान प्रमुख होता. सन १६७७-१६९६ या काळात खैरीयत खान जंजिऱ्याचा प्रमुख होता. याकुत खान आणि खैरियत खान यांच्या कबरीच्या प्रवेशद्वारावर अरबी शिलालेख कोरलेले आहेत. या शिलालेखांनुसार खैरीयत खान याचा मृत्यू हिजरी ११०८ (सन १६९६) आणि याकुत खान याचा मृत्यू ३० जमादिलवल हिजरी १११८ (सन १७०७) मध्ये झाला.
ह्या तीन कबरींच्या आजूबाजूला अनेक कबरींचे दगड पसरले आहेत. कबरींच्या परिसरात मशिदसुध्दा आहे. तसेच रस्त्याच्या पलीकडे अजून एक कबर आहे, पण ती कोणाची आहे हे माहिती नाही.
पूर्वी सावली मिठागर आणि दोडकल वगैरे गावांच्या महसूलातून काही रक्कम या मकबऱ्यांच्या देखरेखीसाठी खर्च केली जात होती. आजही या ठिकाणी उरूस भरतो. या वास्तूंच्या घुमट आणि कमानींतील प्रमाणबद्धता पाहण्यासारखी आहे. थडग्यातील खिडक्या जाळीचे म्हणजे लॅटिस वर्क असलेल्या आहेत आणि त्यातून प्रकाशाचे कवडसे येताना पाहणे एक खास अनुभव असतो.
No comments:
Post a Comment