विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 27 December 2020

स्वराज्याचे चलन




 स्वराज्याचे चलन -

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांपूर्वी घडविलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्य निर्माण होत असताना, आणखी एक गोष्ट रूप घेऊ लागली होती आणि ती म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन. महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरू करणे ही काही साधारण घटना नव्हती. पर्शियन भाषेचा प्रभाव झुगारून देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची नाणी ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती. राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती, त्यातील एकोणीसावे कलम होते, इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून, ही मागणी साफ नाकारली. यावरून महाराजांची दुरदृष्टी आपल्याला समजते. महाराज स्वतःचीच टांकसाळ काढून स्वतःचेच नाणे चालवणार असल्याने आपल्याला परवानगी मिळणार नाही, असे हेन्री ऑक्झिंडेन पत्रात सांगतो.
शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात सुरु केलेल्या तांब्याच्या नाण्यास शिवराई या नावाने ओळखल्या जाते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाच्या निमित्ताने १६७४ मध्ये सुवर्ण होन व तांब्याची शिवराई नाणी तयार केली होती. सुवर्ण होन केवळ राज्यभिषेकासाठी , तर शिवराई नाणी व्यवहारासाठी चलनात आणली होती. शिवाजी महाराजांनी सुरु केलेली ही नाणी संभाजी महाराज, पेशवे व ब्रिटीश राजवटीच्या सुरुवातीच्या काळातही चलनात होती. विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत शिवराई हा नाणे प्रकार अस्तित्वात होता. पेशव्यांच्या काळात तयार करण्यात आलेल्या शिवराई नाण्यांवर पुढील बाजूस श्री,राजा व मागील बाजूस छत्र, पती अशी अक्षरे अंकित आहेत. काही नाण्यांवर शमीपत्र, त्रिशुल, महादेवाची पिंड, बेलपत्र अशी विविध चिन्हे आहेत
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापासून आपली नाणीही चलनात आणली. त्याकाळी तो क्रांतिकारी निर्णय होता.
शिवराई -
'शिवराई' हे नाणे तांब्याचे होते. १६८३च्या एका पत्रात 'शिवराई'चा उल्लेख आलेला आहे. या नाण्याच्या पुढील बाजूस बिंदुमय वर्तुळामध्ये 'श्री/राजा/शिव' असे तीन ओळीत, तर मागील बाजूस 'छत्र/पती' असा दोन ओळीत मजकूर असतो. या नाण्यांचा आकार साधारणतः वाटोळा असून, अत्यंत सुबक अक्षरात या नाण्यांवर मजकूर असतो. ही नाणी ११ ते १३ ग्रॅम वजनात आढळतात. या शिवराईची त्याकाळात किंमत एक पैसा होती. ६४ शिवराई मिळून एक रुपया होत असे. १६७४ला पाडलेल्या 'शिवराई' आपण सुरुवातीच्या शिवराई म्हणून ओळखतो. जास्त वजन आणि सुबक अक्षरांवरून ही ओळख पटते. साधारणतः पूर्ण 'शिवराई' ११ ते १३ ग्रॅम वजनाची मानल्यास, अर्धी शिवराई ६ ते ७ ग्रॅमची असेल आणि पाव शिवराई ३-४ गॅमची. या विविध परिमाणांच्या शिवराईंचे अक्षर वळण साधारणतः सारखेच असून, त्या वरील लेख हा पुढील बाजूने तीन ओळींत 'श्री /राजा/ शिव' आणि मागील बाजूला 'छत्र/ पति' असा असतो.
शिवाजी महाराजांच्या अर्धी आणि पाव शिवराई दुर्मीळ आहेत. या शिवराईंखेरीज शिवराईचे विविध प्रकार आहेत, त्यावर विविध चिन्हही आढळतात, ते टांकसाळींचे चिन्ह असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. 'श्री/राजा/शिव ,छत्र/पति' या मजकुरा व्यतिरिक्त पुढील बाजूला 'श्री /राजा /शीव', 'श्री /राजा /सिव', 'श्री /राजा/ सीव' असलेल्या शिवराईदेखील सापडतात. काही शिवरायांवर मागील बाजूला असलेल्या 'छत्र/ पति' मधील 'ति' या अक्षराचा ऱ्हस्व आणि दीर्घ प्रकार पाहायला मिळतो.
शिवराई होन -
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोन्याच्या नाण्यास 'शिवराई होन' म्हणतात. शिवराई होन या नाण्यावर बिंदुमय वर्तुळात पुढील बाजूला तीन ओळींत 'श्री/राजा/शिव', तर मागील बाजूला दोन ओळींत 'छत्र/पति' असे अंकीत केलेले असून, या नाण्याचा आकार वाटोळा असतो. नाण्याचे वजन दोन मासे सात गुंजा म्हणजेच २.७ ग्रॅमच्या आसपास आढळते. नाण्याचा व्यास १.३२ से.मी असून सोन्याचा कस ९७.४५ असतो. राजधानी रायगडावरील टांकसाळीत फक्त 'शिवराई होन' पाडण्यात येत असत. रुका, तिरुका, सापिका आणि ससगणी ही नाणी इतरत्र पाडण्यात येत असल्याचे आप्पा परब त्यांच्या 'किल्ले रायगड स्थळदर्शन' या ग्रंथात १६४ क्रमांकाच्या पानावर नमूद करण्यात आले आहे.
हा शिवराई होन आज फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. होन दुर्मीळ का झाला, असा प्रश्न आहे. त्यावर वेगवेगळी मते आहे. काहींच्या मते शिवराई होन हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता; पण त्याची चोरी होऊन नंतर तो आटवला गेला. काही जणांच्या मते मोगली चलनाच्या असलेल्या वर्चस्वामुळे शिवराई होन जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...