विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 March 2021

साताऱ्याच्या इलाख्यात रुस्तुमखानाचा पराभव

 



साताऱ्याच्या इलाख्यात रुस्तुमखानाचा पराभव

असल्या धांदलीच्या दिसात सुध्दा संताजीरावांनी आपल्या अंगमेहनती कडं कदी दुर्लक्ष केलं नाय.रोज पहाटेच्या वक्ताला उठून चार-पाचशे जोर बयटका मारून शेर भर निरश्या दुधाची चरवी रिचवीत.देवपूजा न्याहारी उरकून संताजीं आपल्या बीचव्यात आलेले खलिते नजरं खाली घालीत हुते.पाहऱ्यावरील हशमानी आता येऊन मुजरा करीत रायप्पा आल्याची वर्दी दिली.पत्रावरील आपली नजर तशीच ठेवत पेश येउद्या म्हणून जाब दिला.
रायप्पा बीचव्यात प्रवेश करता झाला.मुजरा करून अदबीनं आपल्या धन्या मोहरं उभा राहिला जणू सह्याद्रीचा काळा भोर ताशीव कडाच भासावा असा तो.
साठी पार केलेला पण अजून सुद्धा तरण्या पोराला बी
लाजवील असा तगडा गडी.लांब पल्लेदार पांढऱ्या घोट गल मिशा.तशी लांब लचक दाढी.कपाळी त्या परम परमेश्वर महादेवाच्या भस्माचे रेखीव आडवे तीन पट्टे.
त्याच्या बरोबर मध्यभागी चंदनाचा गोल गरगरीत ठिळा
डोक्यावर कर्नाटकी माटाची पगडी.अंगात सखलादी फतू
अनं गुडघ्या पातूर काचा मारलेलं धोतार.पाटीवर सधा अडकवलेली त्याची आवडती ठासनीची बंदूक.
रायप्पा म्हंजी बक्कळ लढाया खेळलेला अनुभवी धारकरी. रायप्पा अजून सुध्दा दिसाला तीस-चाळीस कोस अंतर सहज तोडीत हुता.कारण संताजीराव म्हणलं की धावपळ आलीच. रायप्पाच नशीब बी थोर की त्याला
या वक्ताला संताजी घोरपडे नावाच्या समशेरीची जोड लाभली हुती.म्हालोजी बाबा कर्नाटक प्रांती असताना त्यांनी नाद करून हे बर्कदाच पथक तयार केलं हुत.रायप्पाला आपल्या पारख्या नजरनं हेरून त्यांनी त्या पथकाची जबाबदारी रायप्पावर सोपिऊली हुती.अनं तो बी ती जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडीत हुता.चांगला
पाच-सात हजाराचा जमाव होता रायप्पाच्या दिमतीला.
आपुन आल्याच धन्याचा लक्षात नसावं म्हणून रायप्पानं
डाव्या हातातील वरच्यावर पेलून धरलेली आपली बंदूक
मुदामून थोडी सईल सोडली.तशी ती भुईवर अदळी. गपकन आपली नजर उचलीत संताजीरावांनी वर नजर दिली तर मोहरं रायप्पा उभा हुता.अरं आप्पा कवा आलासा म्हणतं इकुडच्या-तिकुडच्या गप्पा हणल्या अनं मुख्य मुद्याला हात घातला.आप्पा आज रातच्याला निघायच हाय सोबत रखमाजी मोहिते,विठोजी चव्हाण अनं सात हजार घोडा हाय उद्या दिवस फुटायच्या आता
पाटण अनं कोयना पार करून सडावाघापूरच्या पटांगणात इसावा घ्या.हुल मात्र खटाव वर चालून जायची द्या. दुसऱ्या दिवशी रातीच्या पहिल्या प्रहराच्या आधी आम्ही तुला गाठू.जी म्हणीत रायप्पा बीचव्यातनं बाहेर पडला.दिस बुडाला तसा सात हजार घोडा अनं पाच हजार बर्कदाजांनी पाटणची वाट धरली.
दुसऱ्या दिसाच्या रातीला सडावाघापूरचा इलाखा मराठयांच्या माणूस मेळानं फुलून उठला.इशाळ गडावरनं
रामचंद्र पंत,शंकराजी नारायण आपल्या जमावा सकट
येऊन ठेपल.संताजी घोरपडे,धनसिंगराव जाधव,मानाजी मोरे अनं इतर सरदार आपल्या जमावानिशी अलं.बघीत बधीत पंचवीस हजाराचा माणूस मेळ जमला.धनसिंगराव अनं संताजीरावांनी ताबडतोब जमलेल्या फौजेच्या तीन फळ्या केल्या दहा हजाराची डावी फळी त्यांनी धनसिंगरावांच्या ताब्यात दिली.दुसरी दहा हजाराची फळी त्यांनी पंत अनं सचिवांच्या ताब्यात देऊन त्यासनी उजव्या बगलला ठिवलं.मानाजी मोरे यांच्या ताब्यात सात
हत्ती दिले.संताजींनी स्वतः पाच हजार घोडा सोबत ठिवला.एक दोन कोसाचा अंतर ठेऊन तिन्ही फळ्या जलद गतीनं साताऱ्याच्या दिशेनं सरकू लागल्या.
तारळे गाव वलडून तारळे नदी पार करून फौजा
उरमोडी नदीच्या तीरावर आल्या.पण रातीच्या काळुख्यात नदी तीरावर मराठयांची हालचाल रुस्तुमखानाच्या जिलेब पथकाच्या( गस्ती पथक ) हशमांनी टिपली.नक्की मराठे असणार याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती.पण कितीच्या पटीत ह्यात हे ते बघीत हुते.त्यासनी फकस्त पाच एक हजार घोडाच दिसला.अनं
या पाच हजार घोड्यांनी मोगलांची फसगत केली.त्यांना वाटलं फक्त पाच-सहा हजार घोडा हाय म्हणून.त्यामुळं
रुस्तुमखानाचा बी हीशेब चुकला. त्यांनी ताबडतोब रस्तुमखानाला खबर देण्यासाठी आपली घोडी मुख्य छावणी कडं पिटाळी.तवर मराठे नदी पार करून सोणगाव अनं शहापूरच्या रानात आले होते.
शहापूर डाव्या अंगाला ठेवून अनं सोणगाव उजव्या अंगाला ठेवून बरोबर समोर साताऱ्याचा किल्ला नजरस पडत हुता.धनसिंगराव जाधवांना शहापूरच्या बाजूला अनं
पंत,सचिवांना सोणगावच्या बाजूला ठेवलं.स्वतः संताजीराव एक सात- आठ कोस लांब रुस्तुमखानाच्या छावणी वर चाल करून गेले.
आता मला वाटतं.आपणहून आपल्या लोकांचा काय महिमा वर्णावा.जर मोगली इतिहासकारच मराठ्यांच्या
कर्तृत्वा बद्दल लिहीत असेल तर काय वाईट.
साताऱ्याच्या लढाईची जवळपास सर्वच हकीकत मोगली इतिहासकर ईशवरदास नागरनं लिहिली आहे ती पुढील प्रमाणे.
मोगली इतिहासकार ईशवरदास नागर लिहितो :-
" मराठे सरदार संताजी घोरपडे व धनाजी जाधव,पारखे इत्यादी आपल्या प्रचंड सैन्यासहित रस्तुमखानावर चालून आले.रुस्तुमखानानं आपला मुलगा गालिबखान याजबरोबर पाच हजार सैन्य व पाच हत्ती देऊन त्याला आपल्या सैन्याच्या आघाडीवर ठेविले.अजून युद्धाला तोंड लागले नव्हते तोच मराठयांच्या बर्कदाजांनी.( बंदूक चालविणारि ) मोगल फौजेवर खच्चून बंदुकींचा मारा केला. मोगली सैन्याच्या आघाडीला हत्ती उभे करण्यात आले होते.बंदुकीच्या गोळ्यांचा त्याच्यावर मारा होताच ते
बिथरून मागे फिरले आणि आपल्याच सैन्यात पळू लागले.मोगलांचे काही सैनिक आधीच मराठयांच्या बंदुकीच्या माऱ्यानं जखमी झाले होते.मागे पळत सुटलेल्या आपल्या हत्तीच्या पायाखाली कित्येक मोगल सैनिक चिरडले गेले.हे पाहून रस्तुमखान आपल्या सैनिकांसहित पुढे धावला.इतक्यात मराठ्यांच्या सैन्यातील गजदलाने मोगल सैन्यावर चाल केली.याचा परिणाम असा झाला की मोगल स्वरांचे घोडे घाबरून उधळले.मोगल स्वरांनी त्यांना आवरून मराठ्यांशी लढावे असा प्रयत्न केला.पण काही केल्या घोडी मैदानात टीकेनात.असे असले तरी रस्तुमखान हा आपल्याबरोबर
राहिलेल्या सैनिकांना घेऊन शत्रूशी लढत राहिला. मराठयांची आघाडीवर असलेल्या पथकावर पांगलेले सैन्य पुन्हा एकत्र करून खानानं जोरदार हल्ला चढवला. या मुख्य आघाडीच्या सैन्यात संताजी घोरपडे व पारखे हे होते.मोगलांच्या हल्ल्याने मराठयांचे सैन्य पळू लागले. "
हातघाईची लढाई आइन रंगात आली हाय.अनं खान पुरता पेटलाय हे हेरून संताजींनी अचानक माघारीचा हुकूम दिला.घोडदळानं लगेच काढता पाय घेतला.तसा
खान चेकाळून उठला अनं मराठ्यांच्या माघ लागला. त्याला अनं त्याच्या पोराला हे ध्यानी आलंच नाय की
मुख्य छावणी किती माघ पडलीया ती.बऱ्याच लढाईचा
अनुभव असलेला अनं कसलेला सरदार त्यो.पण मराठ्यांनी लावलेल्या सापळ्यात आपुन घावणार हाय हे त्यालाबी समजल नाय.त्याला वाटलं मराठे पळाले.म्हणून
त्योबी पिसाळल्यागत माघ लागला.ज्याठिकाणी संताजींनी मुख्य फौज पेरून ठेवली होती.तीत पातूर
खानाला त्यांनी बरोबर आणून सोडला.अनं मराठ्यांनी पुन्हा जोरदार हल्ला चढवला.
धनसिंगराव जाधवांनी खानाला घेरून नेटानं कापाकापी
सुरु केली.दुसऱ्या बगलेला रामचंद्रपंत अनं शंकराजी नारायण यांच्या पथकांनी मुगलांवर घेमार करीत चढाई केली.आणि मध्यभागीचा कसला हा संताजीराव,जावजी पारटे,मानाजी मोरे आधी सरदारांनी अंगावर घेतला. रायप्पाच्या बर्कदाजांनी तर कमालच केली.
पुढे ईशवरदास लिहितो :-
" या सुमारास मराठयांच्या दुसऱ्या तुकडीने मोगलांवर जबर हल्ला केला.या हल्ल्यामुळे मोगल सैनिक खस्त झाले.मराठयांनी मोगलांचे झेंडे हस्तगत केले.त्यामुळे चिडून रसतुमखानानं आपला हत्ती मराठ्यांच्या कळपात घातला.याच सुमारास मराठयांच्या बर्कदाजांच्या गोळीबारामुळे रुस्तुमखानाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला.मराठयांचे कर्नाटकी-बर्कदाज सैन्याच्या आघाडीला होते.ते मोगलांच्या पिछाडीवर जाऊन तुटून पडले आणि त्यांनी मोगलांची छावणी लुटण्यास सुरवात केली.यामुळे मोगलांचा धीर सुटून ते पळू लागले. रुस्तुमखानाला बाणाच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या
जखमा होऊन तो बेशुद्धावस्थेत आपल्या हत्तीवरून खाली जमिनीवर पडला.मराठे सरदार मानाजी मोरे याने
रस्तुमखानाला पकडून मराठा फौजेत नेले.रुस्तुमखानाचा
मुलगा गालिबखान याने आपल्या सैन्यासहित मराठयांवर
हल्ला केला.या युद्धात बाणांच्या व भाल्यांच्या जखमा लागून गालिबखान हा मैदानात पडला.त्यावेळी मोगल सैन्यातील दोन हजार शिपाई ठार झाले.मराठ्यांची पण अनेक माणसे पडली."
मराठयांनी इकडे रणभूमीवर दोन्ही खानांचा फडशा पाडला असता.तिकडं मातूर हंबीरराव मोहिते (दुसरे) यांनी सातारच्या किल्ल्याचा दरवाज्या आपल्या मर्द मावळ्यांसाठी सताड उघडाच ठिवला.हंबीरराव अनं मावळे गडउतार झाले.खानाच्या मुख्य छावणीवर ते बेधडकपणे चालून गेलं.आपल्या तळपत्या तलवारीची धार त्यांनी मोगली छावणीवर धरली.जणू मोगली रक्ताची रंगपंचमीच खेळत हुते.
या ही हकीकतीचे वर्णन ईशवरदासनं केलं आहे.तो लिहितो :-
" हे होत असताना हंबीरराव हा पाच हजार स्वार व पायदळ घेऊन सातारच्या किल्ल्यातून बाहेर पडला.त्याने मोगलांच्या फौजेवर हल्ला केला.रस्तुमखानाच्या बायका आणि कुटुंबातील इतर स्त्रियांनी हे संकट पाहून खंजीर हातात घेऊन आत्महत्या करण्याचा बेत केला,पण हंबीररावाने ओरडून सगीतलं की," रस्तुमखान जिवंत आहे.मी तुमच्यावर हल्ला करीत नाही.तुम्ही आत्महत्येचा
विचार करू नका." हे बोलणे चालू असतानाच मराठयांची एक तुकडी रस्तुमखानाच्या छावणीत घुसली.त्यांनी रस्तुमखानाची आई,बायको आणि मुलगी यांना पकडून साताऱ्याच्या किल्ल्यावर घेऊन गेले."
मात्र या गडबडीत खानाच्या कबील्यातील काही लोक बतावणी करून निसटले त्याची माहिती ईशवरदासनं
दिली आहे तो लिहितो :-
" मराठयांनी रुस्तुमखानाच्या छावणीवर हल्ला केला त्या वेळी या बायका आणि मुले यांनी जुने कपडे अंगावर घालून आम्ही रस्तुमखानाच्या दासदासी आहोत असे मराठ्यांना सगीतले.त्यामुळे मराठे त्यांच्या वाटेस गेले नाहीत.मग संधी साधून ती माणसे पळून रानावनात लपून
राहिली.रात्र झाल्यावर त्यांनी फकीराचा वेष केला आणि रात्रंदिवस रानावनातून प्रवास करीत ते शेवटी बादशाही मुलुखात पोहोचले."
रुस्तुमखानाची ही बायका-मुले बादशाही छावणीजवळ
आल्याचे समजताच बादशहाने त्यांना आणण्यासाठी आपला हुजऱ्या मीर हसन यास पालखी व चार घोडे यासह पाठीवले आणि मराठयांच्या कैदेत असणाऱ्या खानाकडे निरोप पाठीवला," तुझ्या दोन बायका आणि दोन मुलेही छावणीत पोहोचली आहेत.त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.तुझी सुटका करण्यासाठी फौजा तैनात करण्यात आल्या होत्या.मातूर बादशाहाला हे माहीत नव्हतं की मराठ्यांनी खानाला पचवून ढेकर दिली हुती.
बादशहाच्या निरोपाचा लखुटा वाट चालीत हुता.तवरच खानानं मराठयांना एक लाख होन खंडणी कबूल केली.
खंडणीची रक्कम वसूल होईस्तोवर खानानं आपल्या
आईला म्हंजी आपलं अम्मी जाणला अनं आपल्या बेट्याला मराठयांनकडं ओलीस म्हणून ठिवलं. मराठ्यांना
मुजरा करून खान साताऱ्यासनं निघाला अनं मजल दर मजल करीत संगोल्यास पोहोचला.आपली मराठयांनी केलेली दुर्दशा अनं बेकारी रुस्तुमखानानं बादशहाला
कळीवली.स्वतःच्या सुटके साठी खानानं खंडणी कबूल केली ही गोष्ट बादशहाला कळल्यावर मातूर बादशहा
खानावर लय भडाकला.बादशाहानं पुन्हा रुस्तुमखानाला पत्र पाठीवल.की " सध्या तुम्ही आहात तेथेच रहा. "
जेधे शकावलीच्या नोंदी प्रमाणे मराठ्यांच्या हाती चार हजार घोडी,हत्ती व उंट पकडल्याचे व रुस्तुमखानाकडून लाख रुपये मराठयांनी घेतल्याचे म्हटले आहे.
पालीच्या खंडोबाला साक्षी ठेऊन मराठ्यांनी विजयाचा भंडारा उधळला.सातारा इलाख्यातील विजया मुळ मराठ्यांच्या दरारा अनं दहशत आपसुकच वाढली.या जबरदस्त विजयाच्या नावाखालीच आसपासच्या ठाणेदारांनी आपली ठाणी रिकामी केली.आता मराठयांचा सेनासागर तापल्या खांद्यानी थेट वाईच्या इलाख्यात घुसला.वाईचा कोट नुसता घेतला नाही.तर
त्यावर कब्जा मिळवून तो जमीनदोस्त केला.
" रस्तुमखान सातारेच्या वेढा घालून बैसले होते.त्यावरी गनीम संताजी घोरपडे व धनाजी जाधव नि ।। राजाराम भोसले यांनी स्वारी करून लढाई जाली.खाने अजमाचे
फौजे कुल बुडविली.त्यावरी गनीम वाईस गेले.वाईचा किल्ला पाडून टाकिले किल्लेदार लुटून सोडून दिले व जागा जागा ठाणी होती ती घेतली."
(मोगलांच्या जमाबंदी कागदातील नोंद)
वाईच्या विजयानंतर मराठे प्रतापगडाच्या इलाख्यात शिरले.पण गडाच्या मोगली किल्लेदारानं मराठ्यांना तलवारी उपसण्याची सवड दिलीच नाय. सातार अनं वाईच्या किल्लेदार,ठाणेदारांची जी गत केली मराठ्यांनी
तशी आपली होऊ नय म्हणून बीचाऱ्यानं आपसूकच
किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला.किल्ल्यावर पुनींदा
भगवा मोठ्या डवलानं फडकू लागला.आई भवानीची
महापुज्या बांधून.साडीचोळी अनं खणा-नारळानं ओटी
भरून मराठ्यांनी आपल्या तलवारीची पाती मावळ मुलुखावर रोखली.एका झडपेसरशी मराठ्यांनी राजगड
रोहीडा, तोरणा हे मावळ मुलूखातील गड दस्त करून
आपल्या कबज्यात घेतले.दर्याला उधाण यावं तशी पराक्रमाची प्रचंड लाट स्वराज्यात निर्माण झाली.नवा उत्साह,जोम मराठयांच्या मनात खेळू लागला होता.त्याचे सुभेदार,गडकरी अनं हवालदार खुशाल मनाने परस्परांना लिहू लागले. " अजी दोन वर्षे मोगलांची धामधूम आपल्या राज्यात होत आहे...हाली श्री कृपेने राज्याचा मामला थाटत चालला..." श्रींच राज्य पुन्हा नव्या जोमानं
उभारी घेत होतं.
एक वर्तुळ पूर्ण करून मराठे पुन्हा सातार भागात आले.
सर्व सरदारांना पुन्हा नव्यानं आपापल्या कमगिऱ्या नेमून
दिल्या.संताजीरावांनी आधीच कारागीर लोक पाठवून शंभुमहादेवाच्या (शिंगणापूर) डोगरात छावणी तयार करण्यास हुकूम दिला होता.त्यामुळं आता तो इलाखा त्यांना साद घालीत होता.या नव्या छावणी मुळं बराच
मोठ्या इलाख्यावर मराठयांची घारीनजर असणार होती
मराठे आता शंभुमहादेवाच्या डोगरात उतरल्यामुळे
सातार ते अकलूज आणि इंदापूर ते सांगोला भागातील
मोगली सरदार ठाणेदारांचे धाबे दणाणले.सातार हुन
दहा हजार पायदळ आणि चवदा हजार घोडा सोबत घेऊन संताजीरावांनी धुळीचे लोट उडवत शिंगणापूरची दिशा धरली.
लेखन समाप्त.
शेवटचा भाग.
प्रस्तुत लेखन सेवा सेनापती संताजी घोरपडे यांच्या चरणी अर्पण....!!
गणरायाचा उत्सव साजरा करतांना मराठयांनी सातार इलाख्यात मिळवलेल्या विजयाचा देखील उत्सव साजरा करूया....!! जय गणेश,जय भवानी
( इंद्रजीत खोरे )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...