विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 April 2021

राजा समुद्रगुप्त याचे अश्वमेध प्रकारातील नाणे!

 


राजा समुद्रगुप्त याचे अश्वमेध प्रकारातील नाणे!
मागील तीन दिवस आपण चंद्रगुप्त राजाची तीन विविध प्रकारची नाणी पाहिली. या चंद्रगुप्ताचा पुत्र होता समुद्रगुप्त. याने साधारण इ. स. ३४४ ते इ.स. ३७८ पर्यंत राज्य केले होते. आज आपण समुद्रगुप्त याचे 'अश्वमेध प्रकार' चे नाणे पाहणार आहोत.
प्राचीन काळी राजांतर्फे विविध यज्ञ केले जायचे. अश्वमेध यज्ञही त्यातला एक महत्वाचा यज्ञ. केवळ बलवान राजाच हा यज्ञ करू शकत असे. हा समारंभ वर्षभराच्या कालावधीत होत असे. सामर्थ्य व वैभव प्राप्त करणे आणि आजूबाजूच्या बाकी छोट्या मोठ्या राज्यांना हरवून त्यांच्यावर वर्चस्व स्थापित करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट होते. वर्षाच्या शेवटी मुख्य राणी हा यज्ञ सोहळा पार पाडत असे. यात घोड्याला स्नान घातले जाई. या यज्ञाचा भाग म्हणून घोड्याच्या पूर्ण शरीरावर तेल ओतले जाई आणि त्यानंतर त्याची कत्तल केली जाई.
समुद्रगुप्ताने आपल्या अश्वमेध यज्ञाच्या स्मरणार्थ हि नाणी अश्वमेध प्रकारची पाडलेली होती. या नाण्यावर पुढील बाजूनी घोडा डावीकडे असलेल्या यूप कडे तोंड करून उभा असून घोड्याच्या पायांमध्ये ब्राह्मी अक्षर 'सि' आहे जे कि 'सिधं' शब्दाचे द्योतक आहे. नाण्यावर कडेने 'राजाधिराज: पृथ्वीमं विजित्य दिवं जयत्यह्रितवाजिमेध:' असा ब्राह्मी लिपीतील लेख आहे ज्याचा अर्थ 'राजांचा राजा (समुद्रगुप्त) ज्याने अश्वमेध यज्ञ केला आहे, तो पृथ्वी वर विजय मिळवून स्वर्ग जिंकणार आहे'. तर मागील बाजूवर कमळाच्या पाकळ्यांवर 'राज्यलक्ष्मी' देवी डावीकडे तोंड करून उभी असून तिच्या उजव्या हातात चौरी आहे. देवी च्या समोर एक सजवलेला भाला उभा आहे. काही अभ्यासकांच्या मते तो 'सूची' आहे जो अश्वमेध यज्ञाचा भाग असतो तर काहींच्या मते ते शक्ती चे रूप दर्शवण्यात आले आहे. तर देवीच्या डाव्या बाजूला 'अश्वमेधपराक्रम:' असा ब्राह्मी लेख आहे.
या प्रकारातील नाण्यांमध्येही काही उपप्रकार आहे. जसे काही नाण्यांवर 'अश्वमेधपराक्रम' च्या ऐवजी 'हयमेधपराक्रम' असा लेख आहे. संस्कृत मध्ये 'हय' चा अर्थ घोडा होतो. असे आणखी काही छोटे बदल आपल्याला या प्रकारच्या नाण्यांवर पाहायला मिळतात. असे आहे हे समुद्रगुप्त राजाचे नाणे!
भेटूया उद्या पुन्हा एका नवीन गुप्त नाण्यासोबत!
Coin Courtesy- google
Editing©- Ashutosh Patil
Reference- Treasures of Gupta Empire
- आशुतोष सुनील पाटील.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...