विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 May 2021

करवीर संस्थान-

 Aakanksha BhosaleMaratha Empire🚩 


करवीर संस्थान-
मराठा राज्यसंघातील चार प्रमुख घटक राज्यांपैकी एक कोल्हापूर उर्फ करवीर रियासत होते. मुंबईपासून ३७५ कि.मी. अंतरावर असलेले कोल्हापूर सध्या जिल्ह्याचे ठिकाण आहे. बडोदा, ग्वाल्हेर आणि इंदूर ही बाकीची तीन महत्त्वाची प्रमुख मराठा घटक राज्ये. कोल्हापूर संस्थानाविषयी लोकांच्या मनात कमालीचा आदरभाव आहे तो दोन महापुरुषांमुळे. एक छत्रपती शिवाजीमहाराज आणि दुसरे छत्रपती राजर्षी शाहूमहाराज!
कोल्हापूर शहराची प्राचीन काळातील नावे होती.- कोल्लपूर, कोल्लागिरी, कोल्लाडीगिरीपट्टण वगैरे. 'कोल्ल' म्हणजे दरी. दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश म्हणजे कोल्लपूर किंवा *कोल्हापूर. देवी- भागवत पुराणांमध्ये कोल्हापूरला कोल्लाम्मा देवीचे पूजेचे स्थान म्हटलेय. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक समजले गेलेल्या कोल्हापूरात देवी लक्ष्मीचे वसतिस्थान आहे, असे समजले जाते. हरिपुराण आणि करवीर माहात्म्यात असा उल्लेख आहे, कि प्रलयकाळात महालक्ष्मीने कोल्लपूरला आपल्या हातांनी उचलून दुसरीकडे सुरक्षित ठेवले आणि म्हणून या नगराचा उल्लेख काही ठिकाणी 'करवीर'असाही केला. या नगरात महालक्ष्मीचे भव्य मंदीर बांधल्यानंतर करवीर हेच नाव अधिक प्रचलित होते. काही धार्मिक साहित्यामध्ये या नगराला 'ब्रह्मपुरी' , 'करवीरपीठ' असेही म्हटले आहे.
कोल्हापूर संस्थानाच्या वैभवशाली इतिहासाचे मूळ या शहराच्या इ. स. २२५ ते इ. स. १२१० या कालखंडातील इतिहासात सापडते. इ. स. २२५ ते ५५० या काळात या प्रदेशात वाकाटक, कदंब, शुद्रक आणि मौर्य या राजघराण्यांचे राज्य होते. इ.स. ५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. चालुक्य घराण्यातील राजा कर्णदेव याने येथील विख्यात महालक्ष्मी मंदीराच्या उभारणीस इ.स. ६३४ मध्ये प्रारंभ केला. चालुक्य राजे कोल्हापूरास 'दक्षिण काशी' किंवा महातीर्थ असे संबोधीत. इ.स. ७५३ ते ८५० या कालखंडात राष्ट्रकूट आणि इ.स. ८५० ते १२१० या काळात येथे शिलाहारांची सत्ता होती. या घराण्यातील राजा गंदरादिव्य याने महालक्ष्मी मंदीराचे बांधकाम पुर्ण केले. इ.स. नवव्या शतकात महालक्ष्मी मंदिराची प्रतिष्ठापना झाल्यावर त्याच्या पंचक्रोशीतल्या ब्रम्हपुरी, रंकाळा, पद्माळा, रावणेश्वर यासारख्या अलग-अलग वस्त्या एका प्रबळ धर्मकेंद्राने एकत्र बांधल्या गेल्या.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...