विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 May 2021

*शंभूछत्रपतींच्या हत्येचा बदला घेणारे सरसेनापती संताजी घोरपडे आणि छत्रपती शंभूराजेंना कैद करणारा मुकर्रबखान.*


 *शंभूछत्रपतींच्या हत्येचा बदला घेणारे सरसेनापती संताजी घोरपडे आणि छत्रपती शंभूराजेंना कैद करणारा मुकर्रबखान.*


छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पेशवाई आली आणि तब्बल १३० वर्षांनंतर म्हणजे १८१८ साली शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेण्यात आला अशी अनैतिहासिक माहिती खोडसाळपणा करत सोशल मीडियातून पसरवली जात आहे. एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतरच्या काळातील अनेक पराक्रमी लोकांच्या तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या इतिहासावर अन्याय करण्याची मानसिकता रूजली असताना आता हे चळवळ, विद्रोह इत्यादी गोंडस नावाखाली बुद्धीभेदाच्या माध्यमातून नवीन फॅड डोक्यात भरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असो मुख्य विषयाकडे वळूयात..

छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे प्रवास करत असताना इकडे मराठ्यांनी मोगलांच्या द्विधा अवस्थेचा आणि राजाराम महाराजांच्या मुत्सद्दीपणाचा फायदा घेत विशाळगडापासून पाटणपर्यंतचा भाग काबिज केला, मराठे कोल्हापुर भागात पसरलेले असताना शेख निजाम अर्थात मुक़र्रबखान मराठ्यांवर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणारा हाच तो मुकर्रबखान. यावेळी सेनापती संताजी घोरपडे हे पन्हाळगडावर होते ही बातमी कळताच सेनापती संताजी घोरपडे ऑक्टो-नोव्हें १६८९ मध्ये पन्हाळगड सोडला आणि कोल्हापुर भागावर चालून आलेल्या मोगल सैन्यावर हल्ला चढवला.

मोगल आणि मराठे यांच्यात जोरदार चकमक उडाली पण सेनापती संताजी घोरपडे आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारापुढे मोगल सैन्यानी कच खाल्ली आणि मोगल रणांगण सोडून वाट दिसेल दिसेल तिकडे पळू लागले. मुकर्रबखानाला तलवार आणि भालाच्या जखमा झाल्या पण त्याचे नशीब तो सेनापती संताजी घोरपडे यांच्या तावडीतून कसाबसा वाचला. पुढे या मुकर्रबखानचे नाव कुठेही आढळत नाही कदाचित लढाईत झालेल्या जखमेने त्याचा मृत्यू देखील झाला असण्याची शक्यता आहे. मुकर्रबखानचा मुलगा खानेआलम हा देखील या युद्धात जबर जखमी झाला होता. या लढाईत मराठ्यांचे ७०० तर मोगलांचे ४०० जण कामी आले पण मराठ्यांनी मोगलांचा दारूण पराभव केला..

छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर काही दिवसातच मराठे पेटून उठले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांची ११ वर्ष, महाराणी ताराबाईसाहेब सरकार यांची ७ वर्ष त्यानंतर छत्रपती थोरले शाहू महाराज यांची तब्बल ४२ वर्ष अशी मराठा राज्यकर्ते म्हणून दैदिप्यमान कारकीर्द आहे. विशेष म्हणजे नंतरच्या काळात दिल्लीचा बादशहा कोण असावा हे देखील मराठे ठरवत.

संदर्भ - १) डॉ जयसिंगराव पवार, मराठा सत्तेचा उदय
२) महेश तेंडुलकर, रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे

Repost - @maratha_riyasat
https://instagram.com/aamhi_itihas_vede/
@aamhi_itihas_vede
#aamhi_itihas_vede

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...