चालुक्य घराणे :
पोस्त सांभार :मराठी विश्वकोश
बादामीचे चालुक्य : ---३
चालुक्यांच्या प्रदेशात पल्लवांचा अंमल बारा वर्षे टिकला. या अवधीत पुलकेशीचा पुत्र प्रथम ⇨ विक्रमादित्य याने दीर्घ परिश्रमाने सैन्याची जमवाजमव करून पल्लवांच्या राज्यावर स्वारी केली आणि कांची हस्तगत करून पल्लव नृपती परमेश्वर वर्मा याचा पराजय केला. या युद्धात अनेक चकमकी घडून त्यात कधी पल्लवांचा, तरी कधी चालुक्यांचा जय होई. शेवटी विक्रमादित्याला काही प्रदेश न जिंकता परत फिरावे लागले.
या युद्धात विक्रमादित्याला त्याचा पुत्र विनयादित्य याचे मोठे साहाय्य झाले. त्याने पल्लवांचे मांडलिक चोल, पांड्य व केरल राजांचा पाडाव केला. इकडे त्याचा पुत्र विजयादित्य याने आपल्या राज्यातील शत्रूंचा बीमोड करून सर्वत्र शांतता प्रस्थापित केली.
विक्रमादित्याने आपला धाकटा भाऊ धराश्रय जयसिंह याची उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात व उत्तर कोकण या प्रदेशावर नेमणूक केली. जयसिंहाचा ताम्रपट नासिक येथे सापडला असून त्याचा एक पुत्र श्रयाश्रय शिलादित्य याचे ताम्रपट दक्षिण गुजरातेत व दुसरा मंगलरस याचे ताम्रपट कोकणात मिळाले आहेत. जयसिंहाने मही आणि नर्मदा या नद्यांमधील प्रदेशात वज्जडनामक बलाढ्य नृपतीचा पराभव केला. या विजयाचा उल्लेख पुलकेशीच्या हर्षावरील विजयाबरोबर ‘श्रीहर्षवज्रटविभेदविधानदक्षम्’ असा करण्यात येतो. हा वज्जड किंवा वज्रट कोण याची निश्चित माहिती नाही. तथापि उपलब्ध पुराव्यावरून तो काठेवाडात वलभी येथे राज्य करणारा तृतीय शिलादित्य असावा, असे दिसते.
प्रथम विक्रमादित्याचा पुत्र विनयादित्य हा ६८१ मध्ये गादीवर आला असावा. याने उत्तर भारतावर स्वारी करून तेथील बलाढ्य नृपतीचा पराभव केला. या युद्धात विजयादित्य याने विशेष पराक्रम केला. त्याने शत्रूची गंगायमुनांकित राजचिन्हे व पालिध्वज काबीज करून ते आपल्या पित्याला नजर केले. शत्रूशी लढत असता तो पकडला गेला. पण वत्सराज उदयनाप्रमाणे त्याने युक्तीने आपली सुटका करून घेतली आणि स्वराज्यात परत येऊन सर्व बंडाळी मोडून काढली.
विजयादित्यानंतर द्वितीय ⇨विक्रमादित्य ७३३-३४ मध्ये गादीवर आला. त्याच्याही कारकीर्दीत पल्लवांशी युद्ध चालूच होते. विक्रमादित्याने पल्लव नृपती नन्दिपोतवर्म्याचा पराभव करुन त्याचा खट्वांगध्वज व हत्ती आणि सुवर्णरत्नांच्या राशी हस्तगत केल्या. त्याने तीन वेळा कांची जिंकून तेथील राजसिंहेश्वरादी देवतांना दाने दिली आणि नंतर पांड्य, चोल, केरल व कळभ्र राजांचा पराभव करून दक्षिण समुद्रतीरी आपला जयस्तंभ उभारला.
या विक्रमादित्याच्या कारकीर्दीत अरबांनी गुजरातवर स्वारी केली. ७११ मध्ये अरबांनी सिंधमध्ये आपली सत्ता स्थापन केली व नंतर सैंधव, कच्छेल, चावोटक, सौराष्ट्र, मौर्य, गुर्जरादी नृपतींचा पराजय करुन ते दक्षिण भारत जिंकण्याच्या उद्देशाने नवसारीपर्यंत येऊन पोहोचले पण तेथे धराश्रय जयसिंहाचा पुत्र अवनिजनाश्रय पुलकेश याने प्राणपणाने लढून अरबांचा पुरता मोड केला आणि दक्षिण भारताला त्यांच्या टोळधाडीपासून वाचविले. विक्रमादित्याला या विजयाने निरतिशय आनंद होऊन त्याने अवनिजनाश्रय पुलकेशीला ‘अनिवर्तकनिवर्तयिता’ (दुर्जय शत्रूचा पाडाव करणारा) इ. उपाधींनी गौरविले. या विजयाचे रोमहर्षक वर्णन ७४० च्या नवसारी ताम्रपटात आले आहे.

No comments:
Post a Comment