चालुक्य घराणे :
पोस्त सांभार :मराठी विश्वकोश
बादामीचे चालुक्य : ---२
मंगलेशाने आपल्या मागून आपल्या पुत्रास गादी मिळावी, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. राज्याचा खरा वारस द्वितीय पुलकेशी याला ते सहन न होऊन त्याने देशत्याग केला आणि इतर नृपतींचे साहाय्य मिळवून मंगलेशावर स्वारी केली. या कलहात मंगलेशाचा पराजय होऊन तो मारला गेला आणि द्वितीय पुलकेशी ६१०-११ च्या सुमारास गादीवर आला. द्वितीय पुलकेशी हा या घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय. त्याने लाट (दक्षिण गुजरात), मालव व उत्तर गुजरातचे गुर्जर यांना आपले मांडलिक बनविले. उत्तर भारतातील हर्षाच्या आक्रमणास पायबंद घातला. उत्तर आणि दक्षिण भारताच्या या दोन बलाढ्य नृपतींचे नर्मदातीरी घनघोर युद्ध होऊन त्यात गजसैन्याचा नाश झाल्यामुळे हर्षाचा पराभव झाला. याचे वर्णन ऐहोळे शिलालेखात ‘युधि पतितगजेन्द्रानीकबीभत्सभूतो भयविगलितहर्षो येनचाकारि हर्षः ।’ अशा शब्दांत केले आहे. यानंतर पुलकेशीने परमेश्वर ही पदवी धारण केली.
यानंतर ऐहोळे शिलालेखात पुलकेशीच्या नव्याण्णव हजार गावे (गव्यूति लांबरुंद) असलेल्या तीन महाराष्ट्रांवर सत्ता स्थापन केल्याचा उल्लेख आहे. अशा रीतीने नर्मदा नदी ही त्याच्या राज्याची उत्तर सीमा झाली.
यानंतर दक्षिण कोसल व कलिंग यांच्या राजांनी त्याचे स्वामित्व कबूल केले. पुढे त्याने पिष्टपुराच्या (पीठापुरम्च्या) राजाचा पाडाव केला. नंतर पुलकेशीने कुनाल तलावाजवळ वेंगीच्या विष्णुकुंडिन् वंशी राजाचा घनघोर युद्धात पराजय करून कांची (सध्या कांजीवरम्) या पल्लव राजधानीला वेढा घातला, पण त्याला ते नगर काबीज करता आले नसावे.
पुलकेशीने इराणचा राजा द्वितीय खुसरौ (खुस्रव) यास नजराणा व हत्ती पाठवून त्याच्याशी ६२५ च्या सुमारास राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, अशी समजूत आहे. उत्तरेस नर्मदेपर्यंत त्याचे राज्य पसरल्यामुळे त्याने नासिक येथे आपली दुसरी राजधानी केली असावी. ६४१-४२ मध्ये चिनी यात्रेकरू यूआन च्वांग त्याच्या दरबारी आला. तेव्हा त्याचा मुक्काम नासिकला असावा कारण यूआन च्वांग त्याला महाराष्ट्राचा अधिपती म्हणतो.
पुलकेशीच्या कांचीनगरीवरील आक्रमणाने उत्पन्न झालेले चालुक्य पल्लवांचे वैर कित्येक पिढ्या चालले आणि त्यात या दोन्ही राजवंशांचे अपरिमित नुकसान झाले. ६४२ मध्ये पल्लव नृपती नरसिंहवर्मा याने चालुक्य राज्यावर आक्रमण करून वातापिपूर काबीज केली. तेथील युद्धात पुलकेशी ठार झाला असावा. नरसिंहवर्म्याने नंतर वातापिकोंड (वातापि घेणारा) ही पदवी धारण करुन चालुक्यांचे राज्य तात्पुरते खालसा केले.

No comments:
Post a Comment