विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 May 2021

चालुक्य घराणे भाग १०















 चालुक्य घराणे

भाग १०
सांस्कृतिक प्रगती :
चालुक्यांच्या राज्यात विद्येला व कलांना उदार आश्रय होता. विजयादित्याच्या एका लेखात वातापिनगरी चौदा विद्यांत (चार वेद, सहा वेदांगे, पुराण, मीमांसा, न्याय आणि धर्मशास्त्र यांत) प्रवीण असलेल्या हजारो विद्वानांनी भूषित असल्याचे वर्णन आहे. जयसिंह धराश्रयाच्या नासिक येथील लेखात हरपार्वतीय नाटकाच्या योगे विख्यात झालेल्या एका भिक्षू कवीचा उल्लेख आहे. द्वितीय पुलकेशीचा श्वशुर व मांडलिक गंग नृपती दुर्विनीत याने शब्दावतारनामक संस्कृत व्याकरण, भारवीच्या किरातार्जुनीय काव्याच्या पंधराव्या सर्गावर टीका, बृहत्कथेचे संस्कृत रूपांतर वगैरे ग्रंथ रचले होते पण ते आता उपलब्ध नाहीत. ऐहोळे शिलालेखाचा कर्ता रविकीर्ती हा आपण आपल्या काव्याने कालिदास आणि भारवी यांसारखा कीर्तिमान झाल्याचे सांगतो. त्याने त्या लेखात अनेक ठिकाणी या प्राचीन कवींची बरोबरी केली आहे, यात संशय नाही. द्वितीय पुलकेशीचा पुत्र चन्द्रादित्य याची राणी विजयभट्टारिका ही राजशेखराने वर्णिलेली कर्णाटराजाप्रिया विजया असावी, असा तर्क आहे. तिची अनेक उत्कृष्ट सुभाषिते सुभाषित संग्रहात आढळतात. जैनेन्द्र व्याकरण रचणाऱ्या पूज्यपाद या जैन आचार्याला विजयादित्य याने रक्तपुर (प्राचीन किसुवोळल्‌, आधुनिक पट्टदकल) येथील शिबिरातून ग्रामदान दिले होते.

संस्कृतप्रमाणे कन्नड भाषेतही त्या काळी बरीच ग्रंथरचना झाली होती. पूज्यपाद, समंतभद्र आणि कविपरमेष्ठि हे बादामी चालुक्यांच्या काळातील प्रख्यात कानडी कवी होते. पण त्यांचे ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. उपर्युक्त दुर्विनीत याने उत्कृष्ट कन्नड गद्यकाव्य रचल्याचा उत्तरकालीन कविराजमार्ग या कन्नड अलंकार ग्रंथात उल्लेख आहे. श्रीवर्धदेव याने तत्त्वार्थ महाशास्त्रावर चूडामणि नावाची ९६,००० श्लोकांची उत्कृष्ट टीका लिहिली होती. ती सतराव्या शतकापर्यंत उपलब्ध होती. त्याचाच समकालीन श्यामकुन्दाचार्य याने प्राकृत, संस्कृत आणि कन्नड या तीन भाषांत ग्रंथरचना केल्याचा उल्लेख आहे.

चालुक्यांच्या वेळी पूर्वापार चालत आलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रचलित होती. श्रुतिस्मृतींना अनुसरून धार्मिक जीवन व्यतीत करणे, हे आदर्श समजले जाई. यज्ञयाग, विविध प्रकारची दाने, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, देवालयनिर्मिती ही पुण्यप्राप्तीची साधने मानीत. जीविताला कंटाळल्यामुळे जलसमाधी घेऊन किंवा जैन धर्मात सांगितल्याप्रमाणे सल्लेखना विधीने (आमरणान्त उपोषणाने) किंवा हल्लीप्रमाणे सत्याग्रह करून प्राणत्याग करण्याचा प्रघात होता. त्याची काही उदाहरणे कोरीव लेखांत येतात. पतिव्रता स्त्रिया सती गेल्याचीही उदाहरणे आहेत.

काही स्त्रिया राज्यशासनात तर इतर काही प्रत्यक्ष युद्धात भाग घेताना आढळतात. षष्ठ विक्रमादित्याची राणी लक्ष्मीदेवी ही आपल्या पतीप्रमाणे राज्यकारभारात निपुण होती. त्याची दुसरी राणी केतलदेवी हिने आपल्या विद्वत्तेने आणि संगीतनैपुण्याने कीर्ती मिळविली होती. देवालयांत स्थापत्य, शिल्प, गीत, नृत्य इ. कलांना आश्रय मिळे. काही देवालयांना दिलेल्या दानांचे तीन भाग करून त्यातील एक देवतेच्या पूजेअर्चेकरिता, दुसरा तपस्वी-यती वगैरेंच्या अन्नसत्राकरिता आणि तिसरा विद्यादानाकरिता लावून दिलेले आढळतात.

उद्योगधंदे आणि व्यापार श्रेणींच्या हाती होते. व्यापारी स्थल व जलमार्गाने दूरदूरच्या देशांशी व्यापार करून अमाप संपत्ती मिळवीत. त्यात अय्यवोळेपुरांतील पाचशे वीरबणंजूंची श्रेणी मुख्य होती. तिच्या शाखा द्वारवतीपुर (हळेबीड), बेल्लारी जिल्ह्यातील कुरुगोडू वगैरे ठिकाणी होत्या.

पूर्वीच्या सांगली संस्थानातील तेरदाळ येथील ११२३ च्या कोरीव लेखांत नागरी जीवनाचे रम्य चित्र रेखाटले आहे. तेरदाळच्या संरक्षणार्थ बारा गावुंड नेमले होते. सभोवार तट असून पलीकडे खंदक होता. नगरात अनेक उद्याने व तलाव होते. बुद्ध, माधव, आदित्य, शंकर व जिन यांची देवालये होती. नगरात सर्व वर्गांच्या लोकांची शेकडो सुंदर घरे होती. त्यात शूर तसेच विद्वान व सुसंस्कृत लोकांची वसती होती. गावुंडांच्या शासनात विद्वत्तेला, तत्त्वज्ञानाला तसेच कलाकुसरीला भरपूर आश्रय मिळे. त्या नगराचा व्यापार अनेक प्रदेशांशी भरभराटीत असल्यामुळे ते जणू काय धनपती कुबेराला हसत होते.

कल्याणीच्या चालुक्यांच्या काळात अनेक संस्कृत ग्रंथ निर्माण झाले. जैन कवी वादिराज याने पार्श्वनाथ चरित्र आणि यशोधन चरित्र ही सुंदर काव्ये रचली. धनंजय कवीने एक द्विसंधान काव्य रचले होते. ते राघवपाण्डवीय असावे. यात रामायण व महाभारत यातील राम व पांडव यांची कथा श्लेषअलंकार करुन त्याच त्या श्लोकांनी वर्णिली आहे. शिलाहार नृपती मुम्मुणिराज याचा आश्रित सोड्‌ढल कवी याने बाणाच्या कादंबरीशी स्पर्धा करणारी उदयसुन्दरी कथा रचली होती. ती प्रकाशित झाली आहे. काश्मीरी कवी बिल्हण याला षष्ठ विक्रमादित्याने आपल्या दरबारात विद्यापती नेमून नीलच्छत्राचा मान दिला होता आणि त्याच्या दारी मात्र हत्ती झुलत ठेवला होता. त्याने लिहिलेले विक्रमांकदेवचरित काव्यगुणांत उत्कृष्ट असून तत्कालीन इतिहासासही उपयुक्त आहे. विक्रमादित्याच्या सभेतील दुसरा पंडित विज्ञानेश्वर याची याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीका मिताक्षरा ही भारतातील अनेक प्रांतात हिंदू कायद्यांकरिता प्रमाणभूत मानली जाते. त्याच स्मृतीवरची कोंकणचा शिलाहार नृपती अपरार्क याची अपरार्कटीका हीही सुप्रसिद्ध आहे. तिचा प्रसार दूरच्या काश्मीर प्रदेशात झाला होता. भासर्वज्ञाच्या न्यायसारावर अपरार्काची टीका न्यायमुक्तावलि हीही सुप्रसिद्ध आहे.

चालुक्य वंशातील राजा तृतीय सोमेश्वर याच्या नावावर मानसोल्लास अथवा अमिलषितार्थचिंतामणि हा विश्वकोशाच्या धर्तीवर रचलेला बृहद्‌ग्रंथ आहे. त्यात राजकीय विषयांबरोबरच क्रीडा, रत्नपरीक्षा, वैद्यक पशुचिकित्सा, पूजन, गायन, नर्तन, भोजन, जादूटोणे इ. विविध विषयांचे विवेचन आहे.

संस्कृत ग्रंथांप्रमाणे अनेक कन्नड ग्रंथही या काळात रचले गेले होते. विशेष उल्लेखनीय गोष्ट ही की, त्यापैकी काही चालुक्यांच्या सांधिविग्रहिक, अर्थाधिकारी यांसारख्या अधिकाऱ्यांनी रचले होते. वनवासीचा अर्थाधिकारी शांतिनाथाचे सुकुमार चरित्र हे चंपूकाव्य सध्या अपूर्णावस्थेत उपलब्ध आहे. सांधिविग्रहिक नागवर्माचार्य याचे चन्द्रचूडामणिशल्क हेही काव्यगुणांमध्ये सरस आहे.

कावेरी आणि गोदावरी या नद्यांमधील प्रदेशात कन्नड भाषेपैकी पुलिगेरे (लक्ष्मेश्वर), कोपणपुर (कोप्पळ), किसुवोळल्‌ (पट्टदकल), पोन्कूंद (हुनगुंद) व मुदुवोळल (मुधोळ) या प्रदेशातील कन्नड भाषा उच्च प्रतीची समजत. या प्रदेशात अनेक उत्कृष्ट कन्नड ग्रंथकार होऊन गेले. तैलपाच्या दरबारातील रन्न याला कविचक्रवर्ती पदवी होती. त्याचे अजितपुराण व गदायुद्ध ही चंपूकाव्ये सुप्रसिद्ध आहेत. श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराचा प्रचंड पुतळा उभारणारा गंग सेनापती चामुंडराय याच्या आश्रयास असलेल्या नागवर्म कवीने बाणाच्या कादंबरीवर आधारलेली चंपूपद्धतीची कर्नाटक कादंबरी रचली होती. याशिवाय अभिनव पंपाचे पंप रामायण, नागचन्द्राचे पम्पुपुराण, नयसेनाचे धर्मामृत, कर्णपार्याचे द्विसंधान पद्धतीचे नेमिनाथ पुराण इ. कन्नड काव्ये सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय अलंकार, व्याकरण व कोश इ. विषयांवरही ग्रंथरचना झाली होती.

धार्मिक जीवन : चालुक्यांच्या राज्यात वैदिक धर्माप्रमाणे बौद्ध व जैन धर्मही भरभराटीत होते. यूआन च्वांगने बहुधा नासिक येथे असलेल्या अशोकनिर्मित पाच स्तूंपाचा उल्लेख केला आहे. त्याने पर्वतात खोदलेल्या विहारांचेही वर्णन कले आहे. ते अजंठ्यास अनुलक्षून असावे असा तर्क आहे. चालुक्य नृपती आणि त्यांच्या राण्या या हिंदुधर्मी असल्याने, त्यांनी अनेक श्रोतयाग केले. देवतांची बादामी येथे उत्कृष्ट लेणी कोरविली आणि पट्टदकल वगैरे ठिकाणी सुंदर देवालये बांधली. ती अद्यापि सुस्थितीत असून तत्कालीन कलानैपुण्याची साक्ष देतात. चालुक्यांच्या राज्यात बौद्ध व हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्माचाही बराच प्रसार होता. द्वितीय पुलकेशीचा आश्रित रविकीर्ती याने ⇨एहोळे येथे जिनाचे देवालय बांधले होते. गुडिगेरे येथे राणी कुंकुमदेवीने असेच देवालय बांधले होते. द्वितीय कीर्तिवर्म्याचा कारकीर्दीत जैन गामुंड कलियम्म याने अग्निगेरे येथे जैन चेदिय निर्माण केले होते. चालुक्य राजांपैकी कोणीही जैनधर्मी नव्हता. तथापि त्यांचा जैन धर्मास व विद्वानांस उदार आश्रय असे.

शिव, विष्णू, कोल्हापूरची महालक्ष्मी, कार्तिकेय ही प्रमुख उपास्य दैवते होती. बौद्धांचे उल्लेख क्वचित आढळतात. पण कल्याणीच्या चालुक्यांच्या वेळी जैन धर्म मात्र भरभराटीत होता.

अनेक उत्कृष्ट देवालये कल्याणीच्या चालुक्यांनी बांधल्याचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. नागडू येथे १०६२ मध्ये सेनापती मधुसूदन याने भगवान विष्णूचे देवालय बांधले होते. त्यात नाटकादिकरिता नाट्यशाला, यतिमुनींच्या ध्यानधारणेकरिता अनुष्ठानभवन, वेद-वेदांगाच्या पठनपाठनाकरिता मठ इत्यादींचा अंतर्भाव होता. त्याशिवाय त्याची अनेक तोरणे व प्रासाद असून त्यांना सुंदर मूर्तींनी अलंकृत केले होते. समोर गरूडस्तंभ आणि सभोवार प्राकार (तट) होता. यांसारखी अनेक देवालये इतरत्र बांधल्याचे उल्लेख कोरीव लेखांत येतात.

चालुक्यकाळांच्या अखेरीस लिंगायत किंवा वीरशैव पंथाचा उदय झाला. त्या पंथाच्या अनके आचार्यांनी लिंगायत धर्माच्या प्रसारार्थ कन्नड भाषेत ग्रंथरचना केली.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.

2. Yazdani, G. Ed. The Early History of the Deccan, 2. Vol. parts I – XI, London. 1960.

मिराशी, वा. वि.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...