चालुक्य घराणे
भाग ९
राज्यव्यवस्था :
चालुक्यांनी अनेक देश जिंकले आणि त्यावर आपल्या नातेवाईकांची किंवा मांडलिकांची नेमणूक केली पण सर्वत्र एकाच पद्धतीची राज्यव्यवस्था सुरू केली नाही. पूर्वीपासून आलेली पद्धतीच चालू ठेवली. कोरीव लेखांत सामान्यत: सामन्तविषयपती (जिल्हाधिकारी), ग्रामभोगिक (गावचा पाटील याला कानडी प्रदेशात ग्रामगंड – गावुंड म्हणत) इ. अधिकाऱ्यांचा उल्लेख येतो. ग्रामव्यवस्थेत महत्तर (गावातील अनुभवी प्रतिजातीय वयस्कर पुढारी) औद्योगिक व व्यापारी वर्गांचे (श्रेणींचे) प्रतिनिधी (त्यांना कानडी भाषेत नगर अशी संज्ञा असे) इत्यादिकांस महत्त्व असे. स्थानिक लोकांत तंटेबखेडे झाल्यास राजा आचारव्यवस्था ठरवून देई. त्याप्रमाणे राजपुरुष (अधिकारी) अंमलबजावणी करीत. प्रतिवर्षी देशाधिपतींना वैशाखात आणि श्रेणींना कार्तिकात कर द्यावे लागत. ब्राह्मणांना दिलेल्या अग्रहारांना सर्व करांची सूट असे. चोरी आणि राजद्रोह करणाऱ्यांस पकडण्याशिवाय अन्य कारणास्तव प्रवेश करण्यास चाट (पोलीस) सैनिक यांस प्रतिबंध असे.
नगर व गाव यांनी विविध कर द्यावयाचे असत. जमिनीवरच्या साऱ्यास क्लप्त अशी संज्ञा असे. याशिवाय अनेक किरकोळ कर असत. त्यांना उपक्लप्त म्हणत. तेल, साखर, विड्याची पाने वगैरे जीवनोपयोगी वस्तू विकणाऱ्या दुकानांवर कर असत. एका लेखात राजाज्ञेने मिठावरच्या कराची सूट दिल्याचा उल्लेख आहे. अनेक ताम्रपटांत हे कर देवालयांस त्यांच्या खर्चासाठी लावून दिल्याचे उल्लेख आढळतात.
चालुक्यांनी सम्राटपदनिदर्शक समस्तभुवनाश्रय, श्रीपृथिवीवल्लभ, महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक अशा पदव्या धारण केल्या होत्या. त्यांना किसुवोळल् (सध्याचे पट्टदकल) येथे राज्याभिषेक होत असे. त्यांचे लांछन वराह होते. त्यांचे सामन्त साम्राज्याच्या विविध भागात राज्य करीत असत. सम्राटाला नियमितपणे खंडणी दिल्यास, त्यांना आपापल्या प्रदेशात स्वतंत्रपणे राज्य करण्यास मुभा असे. राज्यात अनेक मंत्री असत पण त्या सर्वांचे मिळून एक मंडल असे. राजा प्रत्येक महत्त्वाच्या बाबीत त्यांचा सल्ला घेई, असे दिसत नाही.
कल्याणीच्या चालुक्यांचे वेळी राज्याचे शासनव्यवस्थेकरिता राष्ट्र, विषय, देश, नाडु, कंपण आणि ठाण असे विभाग केले होते. त्यावर राष्ट्रपती, विषयपती, नाडरस इ. अधिकारी नेमलेले असत. विषय म्हणजे सध्याचा जिल्हा विभाग. यालाच नाडु अशी कन्नड संज्ञा होती. नाडूच्या नावापुढे ३,००,८०० यासारख्या संख्या असत. त्यांचा अर्थ विवादास्पद आहे. नाडूच्या विभागास कंपण म्हणत. ठाण हा सर्वांत लहान प्रादेशिक विभाग होता.
नाडूत नाडरस व नाडगावुंड असे दोन अधिकारी असत. नाडगावुंडाकडे त्या त्या प्रदेशातील सारा वसूल करण्याचे काम असे, तर नाडरसाकडे हल्लीच्या कलेक्टरप्रमाणे सामान्य प्रशासनव्यवस्था असे. कंपणात नगर, पट्टण, पुर, ग्राम यांचा अंतर्भाव होत असे. नगरांत अनेक महाजनसंस्था असत. त्यांच्याकडे विविध प्रकारची कामे सोपविलेली होती.
प्रत्येक गावात देवालय, ग्रामशिक्षक, त्याचे विद्यार्थी, कारकून, नाविक, तपस्वी लोकांसाठी घातलेली अन्नसत्रे इत्यादिकांकरिता जमिनी लावून दिलेल्या असत. गावातील व बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना विकलेल्या मालावर विशिष्ट कर सार्वजनिक कार्याकरिता द्यावा लागे.
गावाच्या संरक्षणाकरिता लहानशी आरक्षक (पोलीस) तुकडी असे. तिच्या मुख्याला तलारि म्हणत. त्यांना न आवरणारे संकट आल्यास, विषयाधिपतीकडून सैन्याची मदत मागवत. पण सामान्यत: गावाचे संरक्षण हे त्यात राहणाऱ्या लोकांचे कर्तव्य समजण्यात येई आणि तेही ते करण्यास सदैव सज्ज असत.

No comments:
Post a Comment