महाराणी ताराबाई - वेगळी युद्धनीती
पोस्तसांभार :: आदित्य गोखले
राजाराम महाराजांच्या निधनानंतर (३ मार्च १७००) स्वराज्याची सगळी सूत्रे त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई ह्यांनी ताब्यात घेतली. आपला ५ वर्षाचा पुत्र शिवाजीला तख्तावर बसवून सगळा कारभार त्यांनी स्वतःकडे घेतला. तो काळ अतिशय महाकठीण आणि निर्वाणीचा होता. औरंगजेब स्वराज्याचा कायमचा अंत करण्यासाठी इरेला पेटला होता. अशा परिस्थितीत पुढच्या ५ ते ६ वर्षांची हकीकत बघितली तर ह्या काळात मराठा फौजेनी थोडी वेगळी युद्धनीती अवलंबली होती असे लक्षात येते.
औरंगजेबाची किल्ले मोहीम
इसवी सन १७०० मध्ये राजाराम राजेंच्या निधनाच्या वेळी सातारा किल्ल्याला वेढा पडला होता.औरंगजेबाच्या किल्ले जिंकणे मोहिमेची ही सुरुवात होती. ह्या मोहिमेत तो स्वतः सैन्याबरोबर प्रत्येक वेढ्यात सामील होऊन सैन्याचे संचालन करत होता. स्वराज्याचा आत्मा असलेले हे किल्ले घेऊन स्वराज्य संपवण्याचा त्याचा इरादा होता. सातारा किल्ल्याला डिसेंबर १६९९ मध्ये वेढा पडल्या पासून किल्ल्यावरच्या फौजेनी प्राण पणाला लावून ४-५ महिने लढा दिला. मोगलांनी अनेक प्रयत्न केले - बुरुजाखाली सुरुंग लावून बुरुज उडवले, चौफेर हल्ला चढवला तरी किल्ला काही काबीज होईना. शेवटी परिस्थिती निकराची झाली तेव्हा महाराणींच्या धोरणानुसार किल्लेदाराने मोगलांशी तहाची बोलणी उघडली आणि अखेर २१ एप्रिल १७०० ला किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला
तिथून मोगलांचा मोर्चा वळाला तो साताराच्या जवळच्या परळीच्या किल्ल्याकडे(सज्जनगड). परशुराम त्रिंबक प्रतिनिधींनी किल्ला जमेल तेवढा वेळ लढवून अखेर रक्कम घेऊन बोलणी करून किल्ला मोगलांच्या हवाली केला. असे २ किल्ले घेई पर्यंत पाऊस चालू झाला आणि मोगल फौज माघारी माणदेशात छावणीस आली (माणदेश-खटाव - साताऱ्याच्या पूर्वेला)
पाऊस संपल्यानंतर औरंगजेबाचा मोर्चा वळाला अतिशय महत्वपूर्ण आणि बेलाग अशा पन्हाळगडाकडे !!! पन्हाळा-पवनगडाला वेढा पडला. खुद्द औरंगजेब, रुहुल्लाखान, शाहजादा बेदरबख्त, जुल्फिकारखान असे मातब्बर ह्या वेढ्यात शामिल होते. गडावरून जशास तसे उत्तर दिले जात होते. विठोजी केसकर, त्र्यंबकजी इंगळे इत्यादी सरदार वेढ्यातला मोगलांना चांगला चोप देत होते. भुयार खणणे, सुरुंग लावणे, तर्बीयत खानाचा तोफखाना ह्यापैकी कुठलीही युक्ती किल्ल्यातल्या मराठी फौजेपुढे चालेना. त्यात वेढ्यातल्या फौजेवर बाहेरून वारंवार हल्ले चढवण्यात येऊ लागले. मोगलांच्या छावणीत हेवे-दावे, कुरबुरी चालू झाले होते. शेवटी शाहजादा कामबक्ष आणि तर्बीयत खानाला पुढे घालून औरंगजेबाने बोलणी चालू केली - २८ मे १७०१ ला शेवटी ५५ हजार रुपये घेऊन पन्हाळा-पावनगड मोगलांच्या स्वाधीन करण्यात आला
पुन्हा पावसाळा - पुन्हा विश्रांतीनंतर ह्यावेळी औरंगजेबाने मोठी मोहीम काढली - सह्याद्रीच्या ऐन कुशीत वसलेल्या विशाळगडला वेढा घालायच्या इराद्याने त्याने कूच केली. त्यावेळी महाराणी ताराबाई आणि छोटे शिवाजी राजे विशाळगडला होते - त्यांनी लगेच विशाळगडहून आपला मुक्काम प्रतापगडला हलवला. पन्हाळा जिंकताना एवढे कष्ट घेतलेल्या मोगली फौजेला विशाळगड म्हणजे तर अशक्यच कामगिरी होती. ह्या वेढ्यात मराठा फौजेनी, सह्याद्रिनी आणि पावसानी मोगली फौजेचे अतोनात हाल केले. विशाळगडाची फौज परशुरामपंतांच्या नेतृत्वाखाली मोगलांना काहीच दाद देईना. सह्याद्रीच्या त्या रौद्र भागात वेढ्यातल्या फौजे वर बाहेरून छुपे हल्ले करून त्यांची दाणादाण उडवण्यास सुरवात झाली. ह्या भागात अडकलो आणि पाऊस चालू झाला तर एकही माणूस परत छावणीला परत जाणार नाही हे औरंगजेबने ओळखले असणार. कित्येक महिने जाऊनही किल्ला घेण्यात अपयश आल्यावर औरंगजेबाने शाहजादा बेदरबख्त मार्फत वाटाघाटी चालू केल्या. २ लाख रुपये घेऊन परशुराम पंतांनी किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला(२ जून १७०२). एवढे महिने मराठ्यांचा तडाखा खाल्लेली मोगली फौज जेव्हा विशाळगड घेऊन छावणीकडे निघाली तेव्हा मधेच त्यांना सह्याद्रीच्या प्रलयंकारी पाऊसाने गाठले !!!! पावसाळ्यात नद्या-ओढे पार करताना मोगलांचे खूप मोठे नुकसान झाले. किती तरी उंट, घोडे, सैनिक, रसद, कपडे, मौल्यवान वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेले. ह्या पावसातही मराठा फौजेनी अधून-मधून हल्ले करत मोगल सैन्याला हैराण करून सोडले होते.

No comments:
Post a Comment