विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 May 2021

महाराणी ताराबाई - वेगळी युद्धनीती भाग २

 महाराणी ताराबाई - वेगळी युद्धनीती

पोस्तसांभार :: आदित्य गोखले

भाग २
मोहिमेचा पुढचा टप्पा होता किल्ले कोंढाणा - डिसेंबर १७०३ ला कोंढाण्याला वेढा पडला. तोफांना ही न जुमानणारा हा किल्ला साध्या सैनिकांना घेणं अशक्य आहे ह्याची पूर्ण जाणीव औरंगजेबाला झाली. तेव्हा नेहमीच्या पद्धतीने त्याने तर्बीयत खान मार्फत वाटाघाटी चालू केल्या. भल्या मोठ्या रकमेच्या मोबदल्यात किल्ला ८ एप्रिल १७०३ ला मोगलांना सोपवण्यात आला. कोंढाण्यानंतर राजगडला विळखा पडला . इथे तर मराठ्यांच्या पराक्रमाची शर्थ झाली. शूर किल्लेदार संताजी सिलंबकर पडल्यानंतर सुद्धा शिबंदीने २ महिने शर्थीने किल्ला लढवला. शेवटी किल्ला झुंजवणे अत्यंत कठीण झाल्यावर वाटाघाटी चालू झाल्या. सर्व शिबंदीला सुखरूप वाट मिळण्याच्या अटीवर राजगड १६ फेब्रुवारी १७०४ ला मोगलांच्या हवाली करण्यात आला. राजगड घेतल्यावर थोडा ही वेळ न घालवता मोगल सैन्याचा मोर्चा तोरणाकडे वळला. तोरणा असा एकच किल्ला ठरला जो मोगलांनी युद्ध करून घेतला. राजगडानंतर एका महिन्याच्या आत १० मार्च १७०४ ला तोरणा मोगलांच्या हातात पडला. पुढे मोगलांनी लोहगड आणि राजमाची घेतल्याचा ही उल्लेख आहे
मराठा सैन्याच्या हालचाली व आघाड्या
ह्या गडांना वेढा पडलेला असताना ह्या परिस्थितीचा महाराणी ताराबाईंनी भरभरून फायदा उठवला. त्यांनी मोगलांचा प्रतिकाराची २ सूत्री योजना आखली होती असे स्पष्ट दिसते. मराठयांच्या छोट्या छोट्या तुकड्या ज्या किल्ल्याला वेढा पडला असेल त्या ठिकाणी मोगल फौजेवर बाहेरून हल्ला करून त्यांना वारंवार तडाखे देत होत्या. किल्ले घेण्यात येत असलेल्या अपयशाने हैराण झालेल्या फौजेवर असे जबरदस्त आघात होत होते. दुसरीकडे महाराणींनी आपले सरदार मोठ्या फौजेच्या तुकड्यांसोबत दक्खनच्या बाहेर मोगली सुभ्यांवर पाठवून अनेक नव्या आघाड्या उघडल्या !!!
विशाळगडाच्या वेढ्यासमयी महाराणींनी आपल्या फौजा औरंगाबाद आणि फोंड्याच्या दिशेने पाठवल्या. औरंगाबादच्या संरक्षणार्थ आलेल्या जुल्फिकारखानाला पळवून लावून मराठा फौज पुढे वऱ्हाड प्रांताकडे वळाली. फोंड्याच्या दिशेने बहिर्जी घोरपड्यांच्या नेतृत्वाखालची फौज भीमगड आणि फोंडा फत्ते करून परत आली. त्याच सुमारास अजून एक मोठी फौजेची तुकडी महाराणी ताराबाईंनी कृष्णाजी सावंत ह्यांच्या बरोबर थेट माळव्या वर धाडली. नर्मदेच्या पलीकडे धामधूम माजवून मोठी खंडणी घेऊन कृष्णाजी सावंत परत महाराष्ट्रात परतले.
अशीच एक मोठी मराठा फौज त्याच वेळी बुऱ्हाणपूर वर चालून गेली. मोगलांचे हे दक्षिणेतील प्रमुख शहर बेचिराख करून सुभेदाराला कैद करण्यात आलं. मोठी खंडणी घेऊन त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर मराठा फौजेचा मोर्चा वळाला भागानगर उर्फ गोवळकॊंड्याकडे. शत्रुसैन्याची ताकत व त्यांचा पराक्रम बघूनच गोवळकोंड्याचा मोगल सुभेदाराचे अवसान गळाले. मराठा सैन्याची खंडणीची धमकी लगेच मान्य करून शहराच्या संरक्षणासाठी त्याने मराठ्यांना खूप मोठी खंडणी देऊ केली.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...