शिलाहार राजवंश
भाग ४
कोल्हापूरचे शिलाहार :
राजकीय पटलावर कोल्हापूरच्या शिलाहारांचा उदय तसा उशिराच झाला. यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राष्ट्रकूटांची सत्ता उतरणीला लागली होती आणि बदामीच्या चालुक्य-चोलांबरोबरच्या सततच्या युद्धांमुळे कमजोर झाली होते. १०व्या शतकाच्या मध्यावर तेव्हा कर्हाचड-कोल्हापूर प्रांतावर राष्ट्रकूटांचा महासामंत सेंद्रक (सिंद) राजा आदित्यवर्मन सत्तेवर होता. त्याच्या एका दानपत्रात इंद्रायणीच्या जवळील कान्हे गावाचा आणि तिथल्या लेण्यांचा उल्लेख आहे. बहुधा नजीकची भामचंद्र डोंगरावरची ही लेणी असावीत.
राष्ट्रकूटांची मध्यवर्ती सत्ता अतिशय कमजोर झाल्याने याच काळात शिलाहार घराण्याचा राजा जतिग (दुसरा) याने कर्हा डवर स्वारी करून आदित्यवर्मनच्या उत्तराधिकार्याला सत्तेवरून खाली खेचले व कोल्हापूर शिलाहार घराण्याची स्थापना केली (इ.स. १०००). कोल्हापूर प्रांतावर जरी यांची सत्ता उशिरा स्थापन झाली, तरी ह्या घराण्याच्या सुरुवातीच्या पिढ्या कर्नाटकात सामंतपदावर होत्या. जतिग (पहिला) हा ह्या शाखेचा मूळ पुरुष (इ.स. ९४०-९६०) हा स्वतःला गोमन्थ दुर्गाचा स्वामी म्हणवतो. हा गोमन्थ दुर्ग म्हणजे हल्लीचे गोवे नसून कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील चंद्रगुप्ती. याच्या नंतरच्या पिढ्यांतील नायिमांक, चंद्रराजा ह्या पिढ्यासुद्धा कर्नाटकातच नांदल्या. आदित्यवर्मनचा पराभव करून जतिग (दुसरा) याने आपली राजधानी कर्हायड येथे वसवली व तिथूनही लवकरच त्याने ती कोल्हापूरला हलवली. लगेचच त्याने पन्हाळा (पर्णालक) किल्ला जिंकला आणि कोल्हापूर प्रांताचा विस्तार केला. यांच्या साम्राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव येथपर्यंतच्या प्रांताचा समावेश झाला व यांनी बहुत काळ स्वतंत्रपणे राज्य केले. हे राजे जरी राष्ट्रकूट/चालुक्यांचे पूर्णपणे मांडलिक नसले, तरी त्यांच्या कलाने राज्यकारभार हाकत त्यांनी आपले राज्य संपन्न बनवले. चालुक्यांच्या असंख्य मोहिमांमध्ये कोल्हापूर शिलाहार घराण्याने त्यांना मदत केली.
जतिग (दुसरा) याचा नातू मारसिंह हा एका दानपत्रात जतिगाचा उल्लेख पन्हाळ्याचा सिंह असा करतो. तर आणखी एका दानपत्रात तो आपला पिता गोंकल याचा उल्लेख कुरहाट कुंडी (कर्हााड-बेळगाव), मिरिंज देश (मिरज) आणि दक्षिणचा कोक़णचा स्वामी असा करतो.
जतिग (पहिल व दुसरा) गोंकल, गूवल, चंदरादित्य, मारसिंह, भोज (पहिला व दुसरा) गंडरादित्य, विजयादित्य हे या घराण्यातील प्रमुख राजे.
हे घराणे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे भक्त होते. मूळच्या देवी स्थानाचा त्यांनी जीर्णोद्धार करत प्रशस्त अशा मंदिराची निर्मिती केली. त्यांच्या कित्येक ताम्रशासनांत महालक्ष्मीला वंदन केलेले आढळते.
भोजराजा शिलाहाराने किंवा ह्या शिलाहार घराण्याने सातारा-कोल्हापूर प्रांतात असंख्य किल्ले बांधले. विशाळगड, अजिंक्यतारा, चंदन-वंदन, रोहिडा, वैराटगड, पांडवगड, केंजळगड, कमळगड, परळी (सज्जनगड) असे बलदंड दुर्ग ही यांचीच निर्मिती. तर गंडरादित्याने खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर बांधायला सुरुवात केली. या मंदिराच्या कामात पुढच्या जवळजवळ दोन पिढ्या खर्ची पडल्या. कोपेश्वराबरोबरच गंडरादित्याने अनेक हिंदू मंदिरांबरोबरच जैन आणि बुद्ध मंदिरेसुद्धा बांधली. गंडरादित्याची पत्नी कर्णावती जैन धर्माचे आचरण करणारी होती.
साधारण १२व्या शतकाच्या मध्यावर देवगिरीचे यादव आणि द्वारसमुद्राच्या (हळेबीडू) होयसाळाबरोबर चाललेल्या युद्धामध्ये परास्त होऊन चालुक्य राजा सोमेश्वर (चौथा) याने गोव्याच्या कदंबांकडे आश्रय घेतला. कलचुरींनी गोव्यावर स्वारी केली, तेव्हा शिलाहार राजा विजयदित्याने गोव्याच्या मदतीसाठी धाव घेऊन कलचुरी अहवमल्लाचा सरदार चंडुगीदेव दंडनायकाचा पराभव केला व गोव्याचे राज्य पुन:स्थापित करण्यास मदत केली. या विजयादित्याचा पुत्र भोजराजा (दुसरा) हा ह्या शाखेचा शेवटचा उत्तराधिकारी. हा अत्यंत पराक्रमी असून स्वतःला महामंडलेश्वर, राजाधिराज, परमेश्वर, परमभट्टरक, पश्चिमचक्रवर्ती अशी बिरुदे लावत असे. ह्याने अनेक दाने दिली. महालक्ष्मीचा हा परमभक्त होता. तिची पूजा आणि नैवेद्य यासाठी याने दानपत्रे लिहून दिली. लवकरच याने स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. देवगिरीच्या यादवांना याची वाढती सत्ता सहन न झाल्यामुळे बलाढ्य सिंघण यादवाने कोल्हापूर शिलाहारांवर आक्रमण केले. कृष्णा आणि दूधगंगा ह्या दोन नद्यांच्या मधल्या प्रदेशात खिद्रापूरनजीक हे युद्ध झाले. यात भोजाचा सेनापती मारला गेला. कोपेश्वर मंदिराजवळ त्याच्या पराक्रमाचा वीरगळ आहे. हे युद्ध जिंकल्यावर त्याने पन्हाळ्यावर स्वारी करून राजा भोजाला बंदिवान बनवले आणि पन्हाळ्यावरच कैदेत टाकले. एका शिलालेखात सिंघणाचा पक्षिराज (सर्पांना चिरडणारा गरूड) असा उल्लेख येतो, जे शिलाहार सत्तेवरील विजयाचे प्रतिक आहे.
कोपेश्वर मंदिरात सिंघणाने एक शिलालेख कोरविला. आणि कोल्हापूरच्या वैभवशाली शिलाहारांचे राज्य खालसा झाले (इ.स १२१२).
ह्याच शिलाहार घराण्यातील एक प्रमुख राजा गंडरादित्य ह्याचा कोल्हापूर येथे सापडलेल्या ताम्रपट खूप महत्वाचा असून ह्या घराण्याच्या वंशावळीबद्दल, तसेच घराण्याचा एकूण कारकिर्दीबद्दल ह्या ताम्रपटात विस्ताराने लिहिले आहे. याबद्दल पुढे काही लिहिण्याआधी ताम्रपट म्हणजे नेमके काय ते समजून घेणे महत्वाचे ठरावे.





No comments:
Post a Comment