शिलाहार राजवंश
भाग ५
शिलाहार घराण्यातील एक प्रमुख राजा गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट - शके, १०३७
शिलाहार घराण्यातील एक प्रमुख राजा गंडरादित्य ह्याचा कोल्हापूर येथे सापडलेल्या ताम्रपट खूप महत्वाचा असून ह्या घराण्याच्या वंशावळीबद्दल, तसेच घराण्याचा एकूण कारकिर्दीबद्दल ह्या ताम्रपटात विस्ताराने लिहिले आहे. याबद्दल पुढे काही लिहिण्याआधी ताम्रपट म्हणजे नेमके काय ते समजून घेणे महत्वाचे ठरावे.
ताम्रपट किंवा ताम्रशासन:
ब्राह्मी लिपीची अक्षरे उभ्या, आडव्या, तिरप्या अशा रेषांची मिळून बनलेली असल्याने शिळांवर ती कोरणे तुलनेने सोपे जात असे. पण नंतर देवनागरीसकट इतर लिप्यांचा उगम होऊन अक्षरांना सौष्ठ्व प्राप्त झाले. त्यामुळे शिळांवर अक्षरे कोरणे वेळखाऊ आणि किचकट काम बनले. तसेच शिळांचे वजन जड असल्याने त्या इकडून तिकडून नेण्यावर मर्यादा पडू लागल्या. त्यामुळे राजांची दानपत्रे धातूच्या पत्र्यांवर कोरण्याची प्रथा निर्माण झाली. हे धातूचे पट शक्यतो तांब्याचे वापरले जात, तर क्वचित चांदीच्या किंवा सोन्याच्या पत्र्याचाही वापर केलेला आढळतो. पत्रावर लिहिणे तुलनेने सोपे जाऊ लागले. तसेच ते टिकाऊ, वजनाने हलके असल्याने इकडून तिकडे सहज नेता येऊ लागले.
सर्वसाधारणपणे ताम्रपटाचे तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची पहिली बाजू व शेवटच्या पत्र्याची मागची बाजू कोरीच असे. पहिल्या पत्राची मागची बाजू, दुसर्या व तिसर्यात पत्र्याच्या दोन्ही बाजू व तिसर्या पत्र्याची पहिली बाजू यावर लेख लिहिले जात. तिन्ही पत्र्याच्या उंचावलेल्या कडा व मधल्या खोलगट बाजूमुळे अक्षरांचे घर्षण न होता ती सुरक्षित राहत. तीनही पत्र्यांच्या कडेला छिद्र पाडून त्यात धातूची तार ओवली जाई व तिची टोके एकत्र करून त्यावर राजमुद्रा अंकित करून ते दानपत्र (अथवा ताम्रशासन) दात्याला दिले जाई. हा एक कायदेशीर दस्तऐवज असे.
गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट - शके, १०३७ :
शिलाहार राजा गंडरादित्य याने त्याचा सामंत निगुंब वंशातला नोळंब यास वंशपरंपरेने दिलेल्या गावाच्या दानाचा उल्लेख यात आलेला आहे. कोल्हापूरजवळील वळेवाड या गावातल्या शिबिरातून हे दान दिले गेले.
कोल्हापूर येथील श्री. र. न. आपटे यांजकडून पुणे येथील डेक्कन कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉ. काशीनाथ बापूजी पाठक यांच्याकडे हा ताम्रपट वाचनार्थ आला. त्यांनी त्याचे प्रथम वाचन केले. नंतर श्री. ग. ह. खरे यांच्याकडून एकदा आणि म.म. वा. वि. मिराशी यांच्याकडून दोन वेळा असे एकंदरीत चार वेळा ह्या ताम्रपटाचे संपादन झाले आहे.
ताम्रपटवर्णन :
ताम्रपटाचे तीन पत्रे असून ते एका जाड कडीत ओवलेले आहेत. कडीवर शिलाहार राजवंशाची खूण म्हणून सर्पधर गरुडाची मूर्ती कोरलेली आहे. पहिल्या व शेवटच्या पत्र्याची सुरुवातीची आणि शेवटची बाजू अलिखित असून दुसरा पत्रा दोन्ही बाजूंनी लिहिलेला आहे. पत्र्यांच्या कडा चारही बाजूंनी उंचावलेल्या असल्याने अक्षरे शाबूत आहेत.
अक्षरे कन्नड लिपीमध्ये असून भाषा मात्र गद्यपद्य संस्कृतात आहे, तरीही काही कानडी शब्द त्यात आले आहेत. शके १०३७, मन्मथ संवत्सर कार्तिक शुक्ल पक्ष, अष्टमी, बुधवार असा दान केल्याचा काळ आहे.
ताम्रपटाची मूळ संस्कृत संहिता:
पत्रा पहिला, बाजू दुसरी
१) स्वास्ति | जयत्याविष्कृतं विष्णोव्वाराहं क्षोभितार्ण्ण्वं दक्षिणोन्नतदंष्ट्राग्रविश्रा
२) न्तभुवनं वपु: || [१] जयति जगति रूढो राजलक्ष्मीनिवासः प्रविजितरिपु
३) वर्ग्गः स्वीकृतोत्कृष्टदुर्ग्गस्सकळसुकृतवासो वीरलक्ष्मीविळासो जनितसुजन
४) रागः श्रीशिळाहारवंशः [२] श्रीमत्शिळाहारनरेंद्रवंशे श्रीकीर्त्तिकान्ता: कमनी
५) यरूपा: विख्यातशौर्या बहवो नृपेंद्रा: संपाळयामासुरिमां धरि
६) त्रीं [३] तद्दृंशे नृपातिर्ब्बभूव जतोगो गोमन्थदुर्ग्गाधिपो | भूमः (पः) श्रीवनितापतिस्सु
७) चरितो गंगस्त पेर्मानडेस्तस्याभूत्तनयप्प्रतापनिळया (यः) श्रीनायिमां
८) को नृपः कर्ण्णाटीकिचकुंकुमांकिततनुर्व्विद्याधराधीश्वरः [४] तस्यात्म
९) जरसुपरिवर्द्वितराज्यलक्ष्मी प्प्रादुर्ब्बभूव समुपाजिंतपुण्यपुंजः
१०) चंद्राहृदयो जगति विश्रुतकीर्तिकान्तरस्यागार्ण्णवो बुधनुतो नयनाभि
११) रामः [५] तस्स्यापि पुत्रो जतिगो नरेंन्द्रो जातः प्रवीरो गजयूथनाथः तस्स्या
१२) त्मजौ गोंकलगूवलाख्या जातावुभौ वैरिकुळाद्रिवजौ [६] तदगोंकलस्य तनुजो रिपुदन्ति
१३) सिंहः श्रीमारसिंहनपतिर्म्मरूवक्कशर्प्पः प्प्रादुर्ब्बभूव समरांगणसूत्र
१४) धारो विख्यातकीर्तिरिह पंडितपारिजातः [७] तस्स्याग्रसूनुर्ज्जगदेकवीरो वी
१५) राजनाबाहुलतावगूढः | कीर्तिप्रियो गूवलदेवनामा बभूव भूपाळ
१६) वरो नरेंद्रः [८] तस्स्यानुजस्सकळमंगळजन्मभूमिरासीन्नृपाळतिलको भुवि भोज
१७) देवः प्रोत्तुंगवीरवनिताश्रयबाहुदण्डश्वण्डारिमण्डळशिरो गिरिवज्रदण्डः [९]
पत्रा दुसरा, बाजू पहिली
१८) श्रीमत्कदंबांबरतिग्मरश्मेश्शिरस्सरोजं खळु शान्तरस्य पूजां प्रचक्रे स च चक्रवर्त्तिशीविक्र
१९) मादित्यनृपेन्द्रपादे [१०] किं वर्न्न्य (र्ण्य)ते जगति वीरतरः प्रसिद्धः कोपात्तु कोंगजनृपोपि
२०) पपात यस्य सूर्य्यान्वयांबररविस्स च बिज्जणोपि चक्रे गृहं सुरपतेर्ब्भुवि य
२१) स्य कोपात् [११] यत्प्रतापप्रदीपेस्मिन् कोक्क्लस्सलभयितः पलायिता न गण्यन्ते सोयं
२२) भोजनृपाळकः [१२] वेणुग्रामदवानळो विजयते वैरिभकंठिरवो गोविंदप्रळयान्त
२३) कः शिखरिणो वज्रः कुरंजस्य च भोजः स्वीकृतकोंकणो भुजबळात्तद्भिल्लमोद्बंध
२४) कृत्सोयं कर्न्नदिशापटो रिपुभृद्दोर्द्दण्डकण्डूहरः [१३] तस्यानुजातो गुणराशि
२५) रासितबल्लाळदेवो जितवैरिभूपः जीमूतवाहान्वयरत्नदीपो गंभीर
२६) मूर्त्तिर्भ्भुविशौर्यशाली [१५] अजनि तदनुजातास्तिग्मरश्मिप्रतापो दिविजपतिवि
२७) भूतिस्सर्व्व्लक्ष्मीनिवासः कृतरिपुमदभंगो राजविद्याप्रसंगो भुवनवि
२८) नुतमूर्त्तिर्ग्ग्ण्डरादित्यदेवः [१५] चक्रे चाळुक्यक्रेशो विक्रमादित्यवल्लभः निश्शं
१९) कमल्ल इत्याख्यां गण्डरादित्यभूपते: [१६] धन्यास्ते मानवास्सव्वें धन्याश्च्मृगजात
३०) यः देश्स्स्फला यत्र गण्डरादित्यभ्पते: [१७] यखंगाभ्दुततीव्रघा
३१) तचकितस्तत्कुण्डिदेशोधिपो दण्डब्रह्मन्रुपो जगाम सदनं संसेव्यमानं सुरै
३२) स्त्यक्त्वा राष्ट्रमतीवरम्यतुळां लक्ष्मी भुजोपार्जितां सोयं गण्डरदेवमं
३३) ण्डळपतिस्संशोभते भूतळे [१८] रत्नानि यत्नेन ददाति तस्मै रत्नाकं
३४) रो भंगभयाज्ज्डात्मा आपूर्य्य सम्यक्सततं बहित्रं सूक्ष्माणि
३५) वासांसि हयांश्व तस्मै [१९] किमिह बहुभिरूक्तैरल्पगर्ब्भैर्व्वचिभिर्भुवन
पत्रा दुसरा, बाजू दुसरी
३६) विदितवीरः क्रूरसंग्रामधीरः अपरनृपतिकोशं देशमत्यंतशोभं यदिकुपितचित्तः
३७) कारयत्यात्मकीयं [२०] समधिगतपन्चमहाशब्दमहाण्डळेश्वरः तगरपुरा
३८) धीश्वरः शिळाहारनरेंद्रः | जीमूतवाहनान्वयप्रसूतः सुवर्ण्णगरुड
३९) ध्वजःमरूवक्क्शर्पः | अय्यनसिंहः रिपुमण्डळिकभैरव: विद्विष्टगजकंठी
४०) रवः | गणिकामनोजः | हयवच्छत्स राजः | शौचगांगेयः | सत्यराधेय
४१) इडुवरादित्यः | रूपनारायणः | कलियुगविक्रमादित्यः | शनिवार
४२) सिद्धो: | गिरिदुर्ग्ग्लंघनः | श्रीमन्महालक्ष्मीलब्धवरप्रसादादि समस्तराजाव-
४३) ळीविराजितः श्रीमन्महामण्डळेश्वरः श्रीगण्डरादित्यदेवः श्रीमद्वळय
४४) वाडशिबिरे सुखसंकथाविनोदेन राज्यं कुर्व्वाणः | सप्तत्रिंशदुत्तरसह
४५) स्त्रेषु श कवर्षेषु १०३७ अतीतेषु मन्मथसंवत्सरे कार्त्तिकमासे शुक्लपक्षे |
४६) अष्टम्यां बुधवारे मिरिंजे देशे | मिरिंजे गम्पणमध्ये | अंकु
४७) लगोब्याप्पेयवाडैतिग्रामद्वयं आदगोनाम ग्रामस्य प्रविष्टं कृत्वा तद्ग्रा
४८) मारूवणं त्यक्त्वा तत्रत्यनार्ग्ग्वुण्डो यदि नायकत्वं कुर्वन्ति तेषां शरी
४९) रजीवितार्त्थ सुवर्ण्ण न ददाति यदि नायकत्वं नेच्छन्ति स्वेच्छया तिष्ठन्ति त
५०) दा कोदेवणं नास्ति | एवमनेन क्रमेण | श्रीमत्पवित्रेत्र निगुंब
पत्रा तिसरा बाजू पहिली
५१) वंशे जातः पुमान् हारिमनामधेयः कीर्त्तिप्रियः पुण्यधनः प्रसिद्धः श्री
५२) जैनसंघांबुजतिग्मरश्मि: [२१] तस्यात्मजोभूदिह बीरणाख्य स्तस्यानुजोभू
५३) दरिकेसरीति तद्वीरणस्यापि तनुभवोयं बभूव कुंदातिरिति प्रसिद्धः || [२२]
५४) तस्यानुजस्सुपरिपाळितबन्धुवर्ग्गः श्रीनायिमा जिनमतांबुधिचं
५५) द्रयेषः | त्यागान्वित सुचरितस्सुजनो बभूव प्रख्यातकीर्तिरिह धर्म्मप
५६) रः प्रसिद्ध [२३] तस्यापि वीरः सुजनोपकारी नोळंबनामा तनयोबभूव
५७) श्रीग्ण्डरादित्यपदाब्जभृंगो धर्म्मान्वितो वैरिमतंगसिंहः [२४] तस्मै
५८) समस्तगुणगणाळंकृताय निगुंबकुळकमळमार्तण्डाय | सुवर्ण्ण
५९) मत्स्योरगेन्द्रध्वजविराजिताय सम्यक्तत्त्व रत्नाकराय म पद्मावती देवीलब्धवर
६०) प्रसादाय नोळंबसामन्ताय सर्व्वनमस्यं सर्व्वबाधापरिहारं पुत्र
६१) पौत्रकमाचन्द्रार्क्क दत्तवान्
मराठी भाषांतरः
पत्रा पहिला, बाजू दुसरी
स्वस्ति, ज्याने समुद्र क्षुब्ध केला आहे व ज्याच्या उजव्या दाढेवर जग विश्राम पावत आहे, त्या वराहरूपी विष्णूचा जय असो.
या जगात जो प्रसिद्ध आहे, जो राजलक्ष्मीचे निवासस्थान आहे, ज्याने शत्रुवर्गाला जिंकले आहे, ज्याने सर्वोत्कृष्ट किल्ले आपल्या ताब्यात आणिले आहेत, ज्याच्या ठिकाणी सदैव सर्व सुकृतांचा वास आहे, जो वीरलक्ष्मींचे ठायी विलास करितो, सुजनांच्या ठिकाणी ज्याने प्रेम उत्पन्न केले आहे अशा शिलाहार वंशाचा जय असो.
या शिलाहार राजांच्या वंशात जे लक्ष्मी आणि कीर्ती यांचे मालक बनले आहेत, जे रूपसुंदर आहेत, ज्यांचे शौर्य विख्यात आहे अशा पुष्कळ राजांनी या धरित्रीचे पालन केले आहे.
त्या वंशात 'पेर्मानडी गंगाचा' गोमंथ नामक किल्ला धारण करणारा, ऐश्वर्यस्त्रीचा पती, उत्तम आचरणाचा असा 'जतिग' नावाचा राजा झाला. त्याला प्रतापाचे आश्रयस्थान, कर्नाटकी स्त्रीच्या स्तनाच्या कुंकवाने ज्याचे शरीर चिन्हित झाले आहे व जो विद्याधरांचा स्वामी आहे, असा 'नायिमांक' नावाचा मुलगा होता.
त्याचा मुलगा 'चंद्र' ज्याने राज्यलक्ष्मीची उत्तम वाढ केली, ज्याने पुण्यसंचय केला आहे, जो पृथ्वीवर प्रख्यातकीर्ती होता, जो त्यागाचा समुद्र, शहाण्यांनी स्तुती केलेला व डोळ्यांना आवडता असा होता.
त्याचा (चंद्राचा) मोठा, वीरहत्तींचे सैन्य बाळगणारा असा 'जतिग' या नावाचा मुलगा होता. त्याला शत्रुकुलरूपी पर्वतांना वज्रासमान असे 'गोकल' व 'गूवल' नांवाचे दोन मुलगे झाले.
त्या गोकलला शत्रुरूप हत्तींना सिंहाप्रमाणे समरांगणसूत्रचालक, विख्यातकीर्ती व पंडितांना प्रिय असा 'मारसिंह' नावाचा मुलगा झाला.
त्याचा थोरला मुलगा जगदेकवीर, राजसस्त्रियांच्या बाहूरूपी वेलींच्या विळख्यात असलेला, कीर्तिप्रिय, राजश्रेष्ठ असा 'गूवल' नावाचा राजा होता.
त्याचा धाकटा भाऊ 'भोज' हा सर्व मंगलांचे जन्मस्थान, नृपतिलक, सुंदर वीरपत्नींनी आलिंगलेला, भयंकर शत्रूंचे शिरोरूपी पर्वत असलेल्यांना वज्रासमान असा होता.
पत्रा दुसरा, बाजू पहिली
याने (भोज) कदंब वंशरूपी आकाशातील सूर्य असा जो 'शांतर', त्याच्या शिरकमलाने चालुक्य चक्रवर्ती 'विक्रमादित्य' याच्या पायांची पूजा केली.
या जगप्रसिद्ध योद्ध्याचे वर्णन काय करावे? याच्या कोपामुळे 'कोंगज' राजा पडला आणि सूर्यवंशरूपी आकाशाचा सूर्य असा जो 'बिज्जण', हा देवाघरी गेला.
याच्या प्रतापदीपावर 'कोक्कल' पतंग बनला (नाश पावला) व पळून गेलेल्यांची गणतीच नाही.
तोच हा 'भोजराजा', ज्याने वेणूग्राम (बेळगांव) जाळले, जो शत्रुरूपी हत्तींना सिंहासारखा होता, ज्याने 'गोविंदाचा' नाश केला, 'कुरंज'रूपी पर्वताला जो वज्रासमान झाला, ज्याने कोकण ताब्यात आणिले व बाहुबलाने 'भिल्लम' याची मुक्तता केली. हा (राजा भोज) शत्रुराजांची बाहूंची कंडू शमन करणारा असा होता.
त्याचा धाकटा भाऊ 'बल्लाळदेव' हा ज्याने शत्रुराजांना जिंकले, जो जीमूतवाहन वंशांतील रत्नदीप, जो गंभीर स्वरूपाचा व भूवरी शौर्यशाली असा होता.
त्याच्या (बल्लाळदेवाच्या) पाठीमागून सूर्यासारखा प्रतापी, इंद्रासारखा ऐश्वर्यवान, सर्व लक्ष्मींचे निवासस्थान, शत्रूंच्या मदाचा भंग केलेला, राजविद्येची गोडी असलेला, जगाने ज्याची स्तुती केली आहे, असा 'गंडरादित्य' झाला.
याच्या साहाय्याने चालुक्य 'विक्रमादित्य' याने 'नि:शंकमल्ल' ही पदवी धारण केली.
ज्या ठिकाणी 'गंडरादित्य' राजा होता तेथील मानव, पशू व तो देश हे सर्व धन्य होत.
ज्याच्या तलवारीच्या तीव्र आघाताने भ्यालेला 'कुंडी'देशाचा राजा 'दंडब्रह्म' अतिशय रम्य राष्ट्र व स्वहस्ते मिळवलेले ऐश्वर्य टाकून देवाघरी गेला. तो हा गंडरादित्य' भूतलावर शोभायमान होत आहे. जड असा जो समुद्र तो स्वत:च्या भंगाच्या भयाने यास नेहमी रत्ने, तलम वस्त्रे आणि अश्च देतो.
पत्रा दुसरा, बाजू दुसरी
याची अल्प स्तुती करून काय उपयोग ! जो जगप्रसिद्ध वीर भयंकर संग्रामातही धैर्यशाली असा हा रागावला तर दुसर्या राजांचे खजिने आणि सुंदर प्रदेश आत्मसात करितो.
ज्याने पाच महाशब्द मिळविले आहेत, असा महान मंडळांचा स्वामी (महामंडळेश्वर- महान मांडलिकांचा ईश्वर), तगरपुराचा स्वामी, शिलाहार राजा जीमूतवाहनाच्या वंशात उत्पन्न झालेला, सुवर्ण गरुडाचा ध्वज असलेला, मरूवक्कसर्प, आयाळ असलेला सिंह, रिपुमंडळाला भयंकर, शत्रुरूपी हत्तींना सिंह, गणिकांना मदनासारखा, घोड्याला वत्स राजासमान, शुद्धतेंत जणू भीष्मच, खरेपणात कर्ण, अंधाराला आदित्य, रूपाने विष्णू, कलियुगातला विक्रमादित्य, शनिवार सिद्धी, गिरिदुर्गांचे ओलांडून जाणारा, 'महालक्ष्मी'चा प्रसाद व सर्व राजांमध्ये शोभायमान असा गंडरादित्यदेव श्री 'वळयवाड' शिबिरात सुखसंभाषण व विनोद यांनी युक्त होऊन राज्य करीत असता, याने शक १०३७, मन्मथ संवत्सर, कार्तिक शुक्ल अष्टमी, बुधवार या दिंवशी 'मिरज' देशातील 'मिरज' विभागातील 'अंकुलगे' '(अक्कलखोप) आणि 'बोप्पयवाड' (आंबेवाडी) ही गावे 'अदगो' नावाच्या गावाचा त्यातच समावेश करून व त्यातील अंकुलगे व बोप्पयवाड या गावांचा कर (आरूवण) माफ करून त्या नगरांतील प्रमुख व्यापारी (नार्ग्गावुंड) सावकारी करतील त्यांना सुवर्णनाण्याचा कर लागेल व जे सावकारी करणार नाहीत त्यांना कोदेवण (राजक्षत्रावरील कर) लागणार नाही, अशी ही गावे (अधोलेखित 'नोळंब' सामंताला) देता झाला. 'निगुंब' वंशात कीर्तिप्रिय, पुण्यधन, जैनसंघरूपी कमळाला सूर्याप्रमाणे व प्रख्यात असा 'हारिम' नांवाचा मनुष्य झाला.
पत्रा तिसरा, बाजू पहिली
त्याचा (हारिम) मुलगा 'बीरण', त्याचा धाकता बंधू ' अरिकेसरी'. त्या बीरणांचा मुलगा प्रसिद्ध कुंदाति.
त्याचा (कुंदातिचा) धाकटा भाऊ 'नायिम'. याने बंधुवर्गांचे उत्तम पालन केले. हा जिनमतरूपी समुद्राला चंद्राप्रमाणे झाला. तसेच हा त्यागयुक्त, सुचरित, सुजन, प्रख्यात व धर्मपर असा होता.
त्याचा (नायिमाचा) सज्जनांना उपकारक, वीर, गंडरादित्याच्या पदकमलांच्या ठिकाणी भुंग्यासारखा, धर्मयुक्त व वैरीरूप हत्तींना सिंहासारखा असा 'नोळंब' नांवाचा मुलगा होता.
सर्व गुणसमुदायांनी अलंकृत, 'निगुंब' कुलकमलाला सूर्यासारखा, सुवर्ण मत्स व सर्प यांच्या ध्वजेने विराजमान, समुद्र व पद्मावती देवीचा वरप्रसाद मिळालेला, अशा त्या 'नोळंब' सामंतास सर्वमान्य व कुठलाही त्रास नसलेले असे वरील ग्रामद्वय पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने जोवर सूर्य चंद्र आहेत, तोवर दिले आहे.
थोडेसे स्पष्टीकरण :
वरील ताम्रपटात शिलाहार आणि गंडरादित्याचा सामंत नोळंब याच्या निगुंबवंशाची वंशावळ आली आहे.
कोल्हापूर शिलाहार वंशावळ (गंडरादित्यापर्यंत):
१) जतिग(प्रथम)
२) नायिम
३) चंद्र
२) जतिग (द्वितीय) - गूवल (प्रथम) आणि गोकल ही दोन मुले
३) गोकल - मारसिंह
४) मारसिंह - गूवल (द्वितीय), भोज (प्रथम), बलाळ आणि गंडरादित्य ही चार मुले
५) गंडरादित्य
निगुंब वंशः
१) हारिम - बीरण आणि अरिकेसरी ही दोन मुले
२) बीरण - कुंदाति आणि नायिम ही दोन मुले
३) नायिम - नोळंब
४) नोळंब
या ताम्रपटाच्या प्रारंभीच विष्णूच्या वराहावताराचा 'जयत्याविष्कृतं विष्णोव्वाराहं ...' हा श्लोक येतो. चालुक्य राजवटीचे राजचिन्ह 'वराह' हे असल्याने शिलाहार हे चालुक्यांचे नाममात्र का होईना, पण मांडलिक होते हे स्पष्ट होते.
यानंतर शिलाहार राजा भोज (पहिला) याच्या पराक्रमाचे बरेच वर्णन आले आहे.
भोजाने कदंब नृपती शांतर, कोंगजनृपती, सूर्यवंशी बिज्जण, कोक्कल, गोविंद, कुरुंज यांचा पराभव केला, वेणुग्राम जाळले तर भिल्लमाची मुक्तता केली. हा शांतर म्हणजे कदंबराजा शांतिवर्मन असावा. तर कोंगज, कोक्कल, कुरूंज यांचा पत्ता लागत नाही, गोविंद मौर्यवंशातील असावा. भिल्लम बहुधा यादवकुळातला असावा. सेऊणचंद्र यादवाने गोविंदाच्या मदतीने भिल्लमाला कैदेत टाकून गादीवर आला असावा. वेणुग्रामात (बेळगावात) सौंदत्तीच्या रट्टांचे राज्य होते. ही सर्व युद्धे भोजाने चालुक्य विक्रमादित्यासाठी केली असावीत. भोजाचे विक्रमादित्याची नातेसंबंधसुद्धा होते. विक्रमादित्य (सहावा) याची पत्नी चंद्रलेखा अथवा चंदलादेवी ही भोजाचा पिता मारसिंह याची कन्या होती.
यानंतर गंडरादित्याच्या पराक्रमाचे वर्णन ताम्रपटात आले आहे.
गंडरादित्याच्या साहाय्यानेच विक्रमादित्याने नि:शंकमल्ल ही पदवी धारण केली आणि त्याने कुंडी देशाचा राजा दंडब्रह्म याचा उच्छेद केला. यावरून गंडरदित्यानेसुद्धा अनेक मोहिमांमध्ये विक्रमादित्याला मदत केली असावी असे दिसते. गंडरादित्याला मरुवक्कसर्पाचीही उपमा दिलेली आहे. मरूवक्क हे सुगंधी वनस्पती मरवा याचे कन्नड रूप. मरव्याजवळ साप येत नाहीत, अशी समजूत आहे. मरूवक्कसर्प म्हणजे ज्या प्रमाणे मरव्याजवळ साप येत नाहीत, त्याचप्रमाणे गंडरादित्यासमोर सापांसारखे दुष्ट मनुष्य येत नाहीत.
ज्या शिबिरात बसून गंडरादित्याने हे दान दिले, ते वळयवाड कोल्हापूरच्या पूर्वेस २/३ मैलांवर असलेले वळेवाड असावे. तर निगुंबवंशी सामंत हे जैन धर्माचे अनुयायी दिसतात.
असा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा कोल्हापूर ताम्रपट, शिलाहारवंशावर बराच प्रकाश तर टाकतोच शिवाय त्यांच्या पराक्रमाचीही माहिती पुरवतो.



No comments:
Post a Comment