विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 June 2021

चाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी बांधलेले पणदरे येथील अम्बाई देवी मंदिर

 चाळुक्य अर्थात साळुंखे राजांनी बांधलेले


पणदरे येथील अम्बाई देवी मंदिर ------------- या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ ------------------ @ पणदरे, ता. बारामती या गांवात चाळुक्य अर्थात साळुंखे (सोळंके) राजांनी सातव्या शतकात देवीची दोन मंदिरे बांधलेली आहेत. यांतील आंबाई देवीचे मंदिर गावातच बांधलेले असून, गावाच्या पश्चिमेकडील डोंगरवजा टेकडीवर अस्माई देवीचे अजून दुसरे एक सुंदर मंदिर बांधलेले आहे. बारामती- नीरा रस्त्यावर माळेगावच्या पुढे निघाल्यावर पणदरे हे गाव लागते. बारमाही वाहणाऱ्या कालव्यांनी अक्षरशः जाळे विणलेल्या भागात पणदरे हे गाव स्थित असल्याने सधन लोकवस्ती असलेले आणि लोकसंख्येने मोठे असलेले गाव म्हणून त्याची ओळख आहे. गांवात स्थित असलेल्या अंबाई देवीच्या पुरातन मंदिराकडे पणदरे येथील ग्रामस्थांची अजिबात मेहेरनजर राहिलेली नसतानाही उन्ह, वारा आणि पावसाला झेलत हे मंदिर चौदाशे वर्षानंतर देखील दिमाखात उभे आहे. पणदरे येथील लोकांच्या मते गावातील स्थित असलेले हे पुरातन मंदिर रेणुकादेवीचे आहे. मात्र मंदिरातील मूर्ति प्रत्यक्षात पाहिल्यानंतर देवीच्या हातातील आयुधावरून ही मूर्ति अंबाई देवीची असल्याचीच खात्री होते. या मंदिराकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष वाढलेले जाणवत असल्याने मंदिर परिसराला अवकळा आली आहे. देवी मंदिराच्या अगदी दरवाजासमोरच ग्रामस्थांनी पहिलवानांची तालीम सुरू केल्याने मंदिराकडे येणाऱ्या देवी भक्तांची संख्या रोडावत चालली आहे. तर गावाच्या पश्चिमेकडील डोंगरवजा टेकडीवर स्थित असलेल्या आणि चाळुक्य अर्थात साळुंखे (सोळंके) राजांनी सातव्या शतकात बांधलेल्या अस्माई देवीचा मंदिर परिसर अगदीच चकाचक दिसत आहे. त्यामुळे अस्माई देवी मंदिराची देखरेख चांगली होतं असावी असे वाटते. पणदरे येथील अंबाई (की रेणुका) देवीच्या या पुरातन मंदिराला एक अभ्यासक म्हणून दि. 11 सप्टेंबर 2017 रोजी सकाळीच भेट देण्याचा योग आला, त्यावेळी मंदिर परिसरात गावातील अनेक लोक प्रात:र्विधीची मजा लूटत असलेले दिसत होते. ग्रामस्थांची ही प्रात:र्विधी मंदिर परिसरा बरोबरच देवी मंदिराच्या भिंतीलगत देखील होतं असलेली पाहून वाईट वाटले. ग्रामस्थांनी देवी मंदिर परिसराला हागणदारी बनविल्याने मंदिराचे पावित्र्य संकटात सापडले आहे. मंदिर परिसरात गवत, वेड्या बाभूळ आणि इतर लहानमोठ्या वृक्षांनी दाटी केल्याने मंदिराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येणाऱ्या काही काळांत या मंदिराकडे बघण्याचा ग्रामस्थांचा दृष्टीकोन असाच राहिल्यास हे मंदिर लवकरच नेस्तनाबूत होण्याचा धोका वाढला आहे. एक विशेषत्वाने सांगण्याजोगी बाब म्हणजे पणदरे या गांवात सातव्या आणि अकराव्या शतकात चाळुक्यांनी बांधलेली मंदिरे आहेत. बादामी चाळुक्य अर्थात साळुंखे आणि कल्याणी चाळुक्य अर्थात साळुंखे (सोळंके) यांनी अनुक्रमे सातव्या व अकराव्या शतकात बांधलेली समूह मंदिरे पणदरे गांवात बघायला मिळावीत हे विशेष वाटते. अंबाई देवी, आस्माई देवी आणि आदलेश्वर महादेव मंदिर ही तीन मंदिरे बादामी चाळुक्यांनी (साळुंखे) सातव्या शतकात बांधलेली मंदिरे आहेत. तर सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि आदलेश्वर महादेव मंदिरासमोरील नंदी मंडप कल्याणी चाळुक्यांनी (साळुंखे) अकराव्या, बाराव्या शतकात बांधलेला आहे. पणदरे येथे अजून लान्डेश्वर, सोमेश्वर आणि अजून काही पुरातन मंदिरे होती, मात्र ती काळाच्या ओघात नष्ट झाली असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. नवरात्री हे एक प्राचिन काळापासून चालत आलेले हिंदू पर्व आहे. नवरात्री हा एक संस्कृत शब्द असून, ज्याचा अर्थ 'नऊ रात्री' असा होतो. नवरात्रीच्या या नऊ रात्री आणि दहा दिवस चालणाऱ्या या पर्वात देवीच्या नऊ शक्ति रूपाची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा या नावाने प्रसिद्ध असतो. नवरात्रिच्या नऊ रात्री महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गा या तिन्ही देवतांच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, ज्यांना नवदुर्गा असे म्हटले जाते. दुर्गा या शब्दाचा अर्थच जीवनातील दु:खांना समाप्त करणारी असा आहे. नवरात्रि हा हिंदूंचा एक महत्वपूर्ण आणि प्रमुख सण मानला जातो, ज्याला संपूर्ण भारत देशात उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात देवीची 108 नावे असून तिची एकंदरीत 52 शक्तिपीठे आहेत टिप : ------- चाळुक्य अर्थात साळुंखे (सोळंके) हे मल्ल वंशीय राजे जसे भगवान शिवाचे उपासक आणि पूजक होते, तेवढेच ते देवीच्या आदिमाया आणि आदिशक्ति रुपाचेही पूजक घराणे होते. या घराण्यातील राजांनी ज्याप्रमाणे मध्य भारतापासून दक्षिणेतील संपूर्ण राज्यातल्या अनेक गावांतून जशी महादेव आणि इतर देवतांची हजारों मंदिरे बांधली अगदी तशीच त्यांनी देवींची देखील खूप मंदिरे बांधली आहेत. चाळुक्य अर्थात साळुंखे (सोळंके) या घराण्यातील राजांनी देशातील अनेक भागांतून बांधलेल्या देवी मंदिरांचा आढावा आपण यावर्षी आजपासून सुरू झालेल्या नवरात्रा निमित्ताने रोज घेणार आहोत. यामुळे अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात देवीच्या आदिमाया आणि आदिशक्ति रूपाची पूजा व आराधना होतं होती हे सिद्ध होते. @ सतीशकुमार सोळंके-देशमुख, मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC, 9422241339, 9922241339.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...