विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 8 June 2021

चाळुक्य अर्थात साळुंखे राजांची निर्मिती लिंपणगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर....

 


चाळुक्य अर्थात साळुंखे राजांची निर्मिती


लिंपणगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर....
--------------------------
@
मराठा चक्रवर्ती सम्राट, 'सत्याश्रय', 'श्री पृथ्वी वल्लभ, राजाधिराज महाराज' राजा पुलकेशी चाळुक्य अर्थात साळुंखे (दुसरा) या राजाने इ.सन ६०९ ते ६४२ या कालावधीत लिंपणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे श्री.भगवान सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराचे बांधकाम पुलकेशी राजाने अतिशय सुंदर, रेखीव व मनमोही पद्धतीने केलेले आहे....
लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिराचे काम मराठा चक्रवर्ती सम्राट, 'सत्याश्रय', 'श्री पृथ्वी वल्लभ, राजाधिराज महाराज' राजा पुलकेशी चाळुक्य अर्थात साळुंखे (दुसरा) या राजाच्या अप्रतिम स्थापत्य कलेतून साकारलेला एक अद्भुत असा नमुना आहे. या मंदिराच्या समोर आणि आतील बाजूंनी दगडातल्या कोरीवकाम केलेल्या विविध शिल्पांमुळे मंदिराचे आकर्षण टोकावरचे वाटते. या मंदिराचे निर्माण करतांना चाळुक्य उर्फ साळुंखे राजांना पुरेसा अवधी मिळाला असावा असे वाटते.
लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिराचे निर्माण करताना चाळुक्य राजांनी त्यांच्या नेहमीच्या स्थापत्य शैलीनुसार उंच जोत्यावर मंदिराची प्रतिस्थापना केलेंली असावी, मात्र हे जोते जमिनीखाली गाडले गेल्याचा संभव आहे. काळ्या कातळाच्या घडीव दगडी शिळांना एकमेकांच्या खाच्यात अडकवून त्यावर विविध शिल्पांचे कोरीवकाम केलेले सिद्धेश्वर मंदिर बघतच राहावे असे आहे. हे मंदिर निर्माण चाळुक्यांच्या अफलातून स्थापत्य शैलींचे एक अद्भुत प्रदर्शन असून, या मंदिराचे निर्माण चाळुक्य उर्फ साळुंखे राजांनी स्टार फिश आकारात केले आहे.
लिंपणगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर निर्माणाचे बाबतीत काही चुकीचे इतिहास ऐकण्यात येत होते. चाळुक्यांनी बांधलेल्या या मंदिरांना कोणीतरी हुशार(!) अभ्यासकांनी 'अमुक कालीन मंदिरे' असल्याचे लोकांमध्ये कथन करून मंदिर निर्माण काळ तब्बल सात आठशे वर्षांनी पुढे सरकावला होता. त्यामुळे लिंपणगाव आणि परिसरातील लोकांत सुद्धा या मंदिरांची ओळख 'अमुक कालीन मंदिरे' अशीच होती. या मंदिराचे नेमके निर्माण कोणी केले असेल, याचा खरा इतिहास जाणून घ्यायची माझी सुद्धा खूप दिवसांपासूनची इच्छा होती.
ही इच्छा शेवटी सफल झाली आणि २०१७ या सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी चाळुक्य अर्थात साळुंखे राजवंशातील पूर्वज राजांनी बांधलेल्या या अनमोल वास्तूला भेट देवून ही वास्तू नजरेखालून घालण्याचा योग मी मुद्दामच जुळवून आणला. यावेळी मी एक अभ्यासक म्हणून लिंपणगाव गावातील सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आणि परिसराला नजरेखालून घातले. लिंपणगाव येथील रस्त्याच्या लगतच्या पूर्वेकडील बाजूला हे मंदिर आहे. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून मी मंदिर कंपाउंड दरवाजातून मंदिराला अर्ध वेढा घालून सिद्धेश्वराच्या मंदिरात पोहोचलो.
चाळुक्यांच्या स्थापत्य शैलीत तयार झालेले हे मंदिर बघतच राहावे असे अफलातून आहे. या सुंदर आणि नेत्रदीपक पद्धतीने निर्मिलेल्या मंदिराचे काम चाळुक्यांनी काळ्या कातळांच्या मोठमोठ्या लंबकोनिय दगडी शिळांना एकमेकांवर ठेवून केलेले आहे. चाळुक्यांच्या स्थापत्य शैलीनुसार त्यांच्या कारागिरांनी सर्वप्रथम काळ्या कातळांच्या या मोठमोठ्या लंबकोनिय दगडी शिळांना घडवून, त्यांना बांधकाम योग्य बनवले आणि या घडीव दगडांचे थर एकावर एक मांडून या मंदिराचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.
विशेष म्हणजे हे मंदिर बांधताना चाळुक्यांनी कुठेही चुण्याचा वापर केलेला दिसत नाही. मंदिर बांधणीसाठी तयार केलेल्या मोठमोठ्या शिळांना खाची पाडून आणि या दोन दगडी शिळांच्या खाची एकमेकिंमध्ये अडकवून चाळुक्यांनी या मंदिराचे निर्माण केले आहे. सिद्धेश्वर मंदिरात आतल्या आणि बाहेरील समोरच्या बाजूने चाळुक्यांनी शिल्पांची अगदीच रेलचेल केलेली आपल्याला पहावयास मिळते. चाळुक्यांची मंदिरातील आणि मंदिराबाहेरील केलेली ही शिल्पकला अगदीच मनाला भुरळ पाडणारी आणि मोहित करून जाणारी अशीच आहे.
अगदीच सांगायचे झाले तर मंदिरातील ही शिल्पकला शिल्पप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच ठरणारी आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील बाजूला चाळुक्यांनी अधिक संख्येने शिल्पे कोरलेली आहेत. यामध्ये विविध देव-देवतांची देखील शिल्पे आहेत. लिंपणगाव येथील सिद्धेश्वराचे हे मंदिर पूर्वमुखी स्थित आहे. मुख्य २६ आणि मंदिर निर्माणानंतर बसवलेले ७ खांब असे एकूण ३३ खांबावर हे मंदिर टेकलेले आहे.
नंदी मंडप, प्रवेश मंडप, सभामंडप (नवरंग मंडप), दर्शन मंडप आणि गर्भगृह अशा विभागवार रचनेतील राजा पुलकेशी चाळुक्य अर्थात साळुंखे (दुसरा) या राजाने ऐसपैस जागेवर वेळ देवून बांधलेले हे मंदिर आहे. मंदिर आवारात वीरगळींचा दिसणारा खच आणि मंदिरात प्रचंड मोठ्या शिलेवर शिलालेखासहित कोरून ठेवलेला सती हात, यामुळे मंदिर परिसराचा भाग हा राजा पुलकेशी चाळुक्य अर्थात साळुंखे (दुसरा) या राजासमवेत कोण्यातरी राजाचे युद्ध झालेले हे युद्धक्षेत्र असावे असे वाटते.
चाळुक्यांनी सिद्धेश्वर महादेव मंदिरात त्यांचे राजचिन्ह आणि कुळाच्या इतर देवता ठेवण्यासाठी मंदिरात आठ छोटेखानी मंदिरवजा देवड्यांची निर्मिती केलेली आहे. मात्र या देवड्यांमध्ये ठेवलेल्या चाळुक्यकालीन मूर्ती काळाच्या ओघात नष्ट झाल्या असाव्यात असे वाटते. सद्यःस्थितीत या देवड्यांमध्ये ग्रामस्थांनी अलीकडच्या काळात गणपतीच्या आठ मूर्त्या ठेवून त्यांना अष्ट विनायकांची नावे दिलेली दिसून येतात.
मंदिरात विविध देव-देवतांची पौराणिक कालीन शिल्पे कोरलेली आहेत. त्याचबरोबर सर्प (नाग) शिल्पे, कीर्तीमुख शिल्पे, रांगोळी शिल्पे, हंस शिल्पे, कमळ शिल्पे, कलश शिल्पे, मैथुन शिल्पे, नृत्य शिल्पे, युद्ध शिल्पे, आणि इतर अशा अनेक शिल्पांची येथे अगदीच रेलचेल केलेली आहे. मंदिराच्या आतील बाजूला चाळुक्यांनी अधिक संख्येने शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराची सप्त स्तरीय रचना आणि त्याच्या वरच्या बाजूला दगडी शिळावर पूर्ण मंदीरांवरील कोरलेले तोरण शिल्प अप्रतिम वाटते.
सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचे म्हटल्यास आपला प्रवेश सर्वप्रथम नंदी मंडपातूनच होतो. नंदीचा हा मंडप प्रशस्त आणि खास असून, तो चार रेखीव दगडी खांबावर उभा आहे. नंदिच्या निवाऱ्याची सोय म्हणून उभ्या केलेल्या या चार दगडी स्तंभावर चाळुक्यांनी दगडी टोप टाकून नंदीच्या छताचे कैलाश मंडपात रुपांतर केले आहे. आकाराने प्रशस्त ठेवलेल्या नंदी मंडपात भक्तांना निवांतपणे विसावा घेण्यासाठी बसता यावे म्हणून नंदी मंडपाच्या चारही बाजूंनी चाळुक्यांनी दगडी मीर्गासनाची (सिंहासन) सोय केलेली आहे.
सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरातील नंदी मंडपातून पुढे गेल्यावर आपला प्रवेश सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेश मंडपात होतो. सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या प्रवेश मंडपाच्या समोर सभामंडपाला असलेल्या दगडी दरवाजाच्या उंबऱ्यावर चाळुक्यांनी दोन कीर्तीमुख कोरलेले आहेत. दगडी दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूला चाळुक्यांनी त्यांची नित्त्याचि गणेशपट्टी देखील कोरलेली आहे. शिवाय या दरवाजावर दोन्ही बाजूंनी चाळुक्यांनी त्यांच्या खास शैलीतील द्वाररक्षक पट्टिका कोरलेली आहे. या दोन्ही पट्टिकांवर द्वाररक्षक जय -विजय यांचेसोबतच काही नृत्यांगना देखील कोरलेल्या आहेत.
दरवाजाच्या चौकटिला अनेक रांगोळी शिल्पे कोरुन चाळुक्यांनी या दरवाजाला आणखीनच आकर्षक बनवले आहे. प्रवेश मंडपातून सभागृहात अर्थात सभामंडपात दाखल होण्यासाठी सुंदर अशा रेखीव दगडी दरवाजातूनच आत गेल्यानंतर आपण सभामंडपात पोहोचतो. मंदिराचा सभामंडप चाळुक्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने म्हणजे नवरंग मंडपात कन्व्हर्ट केलेला आहे. सिद्धेश्वर महादेव मंदिराचा हा सभामंडप सोळा दगडी खांबावर टेकलेला असून, चाळुक्यांनी या सभा मंडपाचे त्यांच्या नित्याच्या शैलीनुसार नऊ खणात (नऊ कैलाश मंडप) विभाजन केलेले आहे.
सिद्धेश्वर महादेवाचा प्रवेश आणि सभामंडप आणि एकूण अठरा रेखीव दगडी खांबावर टेकलेले असून, ते एकंदरीत दहा छोट्या छोट्या नक्षीदार दगडी घुमटाचे (कैलाश मंडप) बनलेले आहेत. अशा या प्रशस्त सभामंडपातून आपला प्रवेश सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनमंडपात (अंतरंग मंडप) होतो. देवाचा दर्शनमंडप चार रेखीव खांबावर उभा केलेला आहे. देवाच्या या दर्शन मंडपाचे रुपांतर देखील चाळुक्यांनी कैलाश मंडपात केलेले आहे. देवाच्या दर्शनमंडपातून गर्भगृहात होणारा आपला प्रवेश एका सुंदर रेखीव आणि नक्षीदार अशा दगडी दरवाजातून होंतो.
सिद्धेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला असलेल्या या दरवाजाच्या वरच्या बाजूला चाळुक्यांनी त्यांच्या आराध्यदेवी सप्तमातृका देवींची प्रतीकात्मक मंदिरपट्टी देखील कोरलेली नजरेस पडते. दर्शनमंडपातून आपला प्रवेश या दरवाजातूनच देवाच्या गर्भगृहात होतो. मंदिराच्या या दगडी दरवाजातून थोडे वाकून आणि साडेसात पायऱ्या उतरून आत जावे लागते. गर्भगृहात उतरल्यावर सर्वप्रथम सिद्धेश्वर महादेवाचे भव्य शिवलिंग आपल्या दॄष्टीस पडते. गर्भगृहातील सिद्धेश्वर महादेवाची साळुंका चाळुक्यांनी उत्तर दिशेला जलवाहिणी असलेली ठेवलेली आहे. सिद्धेश्वर महादेवाचे गर्भगृह प्रशस्त ठेवलेले आहे.
सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या गर्भगृहातील कैलाश मंडप (गर्भगृहाच्या वरील घुमट) चाळुक्यांनी खूप सुंदर आणि सुरेख पद्धतीने निर्माण केलेला आहे. त्यांनी तो काळ्या कातळ खडकातिल मोठमोठ्या लंबकोनीय दगडी शिळा वापरून बनवला आहे. या कैलाश मंडपाच्या लंबकोनीय दगडी शिळांना रेखीव बनवण्यात आलेले आहे. हा कैलाश मंडप अतिशय सुंदर आणि मनाला मोहहून ठेवणारा असाच आहे. मंदिराच्या गर्भगृहाचा हा कैलाश मंडप मंदिराला असलेल्या सोळा कैलाश मंडपापैकी मुख्य कैलाश मंडप आहे. त्यामुळे सिद्धेश्वर महादेवाच्या गर्भगृहाचा कैलाश मंडप हा चाळुक्यांनी प्रशस्त ठेवलेला आहे.
सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या समोरील भागावर चाळुक्यांनी अनेक शिल्पे कोरलेली असून, यात काही मैथुन शिल्पे देखील दिसून येतात. मंदिर परिसरात भग्न वीरगळ आणि मूर्त्यांचे प्रमाण देखील अधिक वाटते. सिद्धेश्वर महादेव अख्या लिंपणगाव भागातील जनतेचे आराध्यदेव आणि श्रद्धास्थान असल्याने येथे नेहमीच भक्तांचा रातबा आसतो. श्रावण महीन्यात आणि महाशिवरात्रीला तर येथे भक्तांची मोठीच रेलचेल बघायला मिळते.
मराठा चक्रवर्ती सम्राट, 'सत्याश्रय', 'श्री पृथ्वी वल्लभ, राजाधिराज महाराज' राजा पुलकेशी चाळुक्य अर्थात साळुंखे (दुसरा) या राजाने त्यांच्या काराकीर्दित जेवढी मंदिरे बांधली त्यापैकी लिंपणगाव येथील हे मंदिर जास्तीचा वेळ देवून बांधलेल्या प्रकारात मोडते. कारण हे मंदिर बांधताना चाळुक्यांनी ते आकाराने मोठे आणि सुंदर बनवलेले दिसते. शिवाय मंदिरात आणि बाहेरून त्यांनी असंख्ये शिल्पे कोरलेली आहेत. यावरून हे मंदिर निर्माण करण्यासाठी चाळुक्यांनी जास्तीचा वेळ दिलेला असावा असे वाटते. चाळुक्यांनी त्यांच्या नित्याच्या शैलीनुसार सिद्धेश्वर महादेव मंदिराचे छत समतल प्रकारातील ठेवलेले होते मात्र ग्रामस्थांनी अलीकडे या मंदिरावर शिखराचे काम केले आहे.
मराठा चक्रवर्ती सम्राट, 'सत्याश्रय', 'श्री पृथ्वी वल्लभ, राजाधिराज महाराज' राजा पुलकेशी चाळुक्य अर्थात साळुंखे (दुसरा) या राजाने लिंपणगाव येथे सातव्या शतकात बांधलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराला चौदाशे वर्ष उलटून गेली आहेत. तरी सुद्धा अनेक उन्ह, वारा आणि पावसाला झेलत हे मंदिर चाळुक्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आज देखील दिमाखात उभे आहे.
(अपूर्ण)
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉94 222 41 339,
👉99 222 41 339,
👉86 05 68 3333,
👉88 05 68 3333.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...