साळुंखे चाळुक्य राजांच्या निर्मितीतील
सागरेश्वराचा प्राचीन मंदिर समूह
-------------------
........................✍️
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
सागरेश्वर या ठिकाणापासून कोसोदूर समुद्र असला तरी या ठिकाणाला सागरेश्वर म्हणावे हे विशेष वाटते. या ठिकाणाच्या सागरेश्वर अशा नावामुळे या ठिकाणाचा इतिहास कमी आणि दंतकथाच जास्त ऐकायला मिळाव्यात हे इतिहासातील एक दुर्दैव म्हणावे वाटते.
सांगली जिल्ह्यातील कुंडल हे एकेकाळी बादामी साळुंखे चाळुक्यांच्या राजधानीचे ठिकाण होते, हे खूपच थोडक्या लोकांना माहिती असावे. येथील साळुंखे चाळुक्य राजा पुलकेशी दुसरा याची राज्यातील त्याच्या गुणांवरूनची ओळख 'सत्याश्रय' अशी बनलेली होती. विशेष म्हणजे आजही दीड हजार वर्षानंतर सुद्धा कुंडल भागातील पुलकेशी राजाची ओळख 'सत्याश्रय' अशीच बनून आहे.
कराड येथून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारे सागरेश्वर हे मंदिर समूह ठिकाण कृष्णा खोऱ्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांजीनी नटलेल्या निसर्गरम्य भागातील एक अविकसित पर्यटन स्थळ म्हणावे लागेल. येथील मंदिर समूहातील सागरेश्वर हे मुख्य मंदिर असून याठिकाणी ४५ ते ५० मंदिरांचा समूह असल्याचे सांगितले जाते. मात्र काही मुर्त्या आणि सागरेश्वर मंदिर व एखाददुसरे मंदिर सोडले तर या ठिकाणी असलेली इतर मंदिरे तेवढी प्राचीन वाटत नाहीत.
सागरेश्वर मंदिर समूह ठिकाणावर प्राचीन ओवऱ्या असून त्या सातव्या शतकाशी साधर्म्य ठेवतील एवढ्या प्राचीन दिसतात. संख्येने खूप जास्त असलेल्या या ओवऱ्यांची रचना धान्य साठविण्याच्या कोठारासारखी वाटते. यावरून पूर्वीच्या काळी हे ठिकाण म्हणजे दोन समुद्रांना जोडणारा व्यापारी मार्ग तर नसावा अशी शक्यता वाटते. शिवाय यामुळेच या ठिकाणाला सागरेश्वर म्हणत असावेत अशीही शक्यता वाटून जाते. मात्र याविषयीची या ठिकाणी रूढ असलेली दंतकथा ही सांगितली जाते की सागराच्या कृपेने याठिकाणी गंगेचा वास असल्याने या ठिकाणाचे नाव सागरेश्वर आहे. याठिकाणी असलेल्या प्राचीन ओवऱ्या अत्यंत सुंदर घडीव जोडी कातळ दगडांनी बांधलेल्या असून यातील बहुतेक ओवऱ्या नष्ट झालेल्या असाव्यात हे या ओवऱ्यांना पाहिल्यानंतर लक्षात येते. तर पर्यटकांचे खास आकर्षण ठरत असलेल्या या ठिकाणच्या उर्वरित ओवर्या देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्याचे संवर्धन होणे जरुरी वाटते.
या ठिकाणची अजून दुसरी एक आख्यायिका ही सांगितली जाते, की कुंडलचा राजा सत्याश्रय यास ऋषी शापाने जखमा झाल्या आणि त्याने सागरेश्वर येथील झऱ्यात आंघोळ केल्याने या जखमा बऱ्या झाल्या म्हणून या राजाने याठिकाणी मंदिराची उभारणी केली. मात्र ही सांगितली जाणारी दंतकथा पौराणिक पद्धतीची वाटते. या ठिकाणाचा आणि पौराणिक काळातील व्यास व त्यांचे एक सूत यांच्या कथेचा मेळ देखील या ठिकाणाशी जोडलेला दिसून येतो. सुताने पृथ्वीतलावरील अनेक तीर्थे पाहिली मात्र त्याचे समाधान न झाल्याने या सुताने व्यासास समाधान होईल असे एखादे तीर्थ सुचविण्यास सांगितले. तेव्हा व्यासांनी मोठा कथाकार असलेल्या या सूतास समुद्रेश्वराचे अर्थात सागरेश्वराचे मंदिर हे ठिकाण सांगितले. त्यानंतर ऋषींनी या ठिकाणी तप केल्यानंतर ही भूमी पावन बनली. पुराणातील या कथेला सत्य मानायचे ठरवले तर व्यासांचा काळ महाभारत काळातील असून सागरेश्वर मंदिर आणि सत्याश्रय राजाचा काळ चौदाशे ते पंधराशे वर्षाचा येतो. त्यामुळे या पौराणिक कथा नंतरच्या काळात चिकटवलेल्या असल्याचा संशय निर्माण होतो.
विजयादशमी आणि महाशिवरात्रि अशा वर्षातून दोन वेळा याठिकाणी सागरेश्वर देवाचा पालखी महोत्सव असतो. वर्षभर येथे श्रद्धाळू आणि पर्यटकांची संख्याही बरीच मोठी असते. विशेष करून श्रावण महिन्यात हा परिसर भक्तांच्या गर्दीने फुललेला असतो. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी येथे देवाची मोठी यात्रा भरते. सागरेश्वरकडून देवराष्ट्रेकडे जाताना एक प्राचीन तलाव लागतो त्याची निर्मिती कुंडलचा राजा साळुंखे चाळुक्य नरेश पुलकेशी दुसरा अर्थात सत्याश्रय राजाने केल्याचे सांगितले जाते. सागरेश्वर मंदिर समूहामध्ये कार्तिकेय, गणपती, लक्ष्मी, आंबादेवी, रामेश्वर, त्रिंबकेश्वर, काशीविश्वेश्वर, सोमेश्वर, भीमेश्वर, वीरभद्रेश्वर, सत्येश्वर, नंदिकेश्वर, केदारेश्वर, धोपेश्वर, सिद्धेश्वर, विठ्ठल-रुक्माई आणि अन्य देवतांची मंदिरे याठिकाणी बघण्यास मिळतात.
टीप : पोस्टला लावलेले मंदिर छायाचित्र सत्याश्रय राजाच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या कुंडल येथील कपिलेश्वर मंदिराचे आहे. या मंदिराचे निर्माण सत्याश्रय, पृथ्वीवल्लभ, दक्षिणापथेश्वर पुलिकेशी साळुंखे राजाने केलेले आहे.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
प्रा. डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
@........✍
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉 एम. ए. इतिहास,
बी.एड्., बी.पी.एड्.
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:
Post a Comment