सिंहगड व जसवंतसिंग!
शके १५८६ च्या ज्येष्ठ शु. ६ रोजी जसवंतसिंगाने सिंहगडचा वेढा उठविण्याचे ठरवून सिंहगडावर डागलेल्या तोफा खाली आणिल्या.
शाहिस्तेखानाचा समाचार घेऊन शिवराय सिंहगडास परतले. पहांट झाल्याबरोबर मोंगली फौजा त्वेषाने सिंहगडावर चाल करून आल्या. मोंगल अगदी नजीक आल्याबरोबर वरून शिवाजी राजांनी तोफांचा मारा सुरू केला. बरेच लोक जखमी झाले. खान मोठया विचारांत पडला. - वेढा घालून बसावें तरी पुढे पाऊसकाळ नजीक आला ; शिवाजी दगेबाज आहे, तोफखाना आल्याशिवाय यशप्राप्ति नाही ; बरें तोफखाना आणावा तरी अडचणीच्या जागेत मराठे सहज त्याचाच नाश करतील, या चिंतेत खान असतांच किल्ल्यावरील गोळ्याने त्याचा हत्ती ठार झाला. शाहिस्तेखान नाउमेद झाला. आपली उरलीसुरली फौज घेऊन शिवाजी राजांच्या जवळ राहणे ठीक नाही असे समजून औरंगाबाद येथे छावणीत जाऊन राहिला. त्यानंतर जसवंतसिंगाने सिंहगडास वेढा घातला. हा जसवंतसिंग औरंगजेबाचा मोठा सरदार होता. सहा महिनेपर्यंत जसवंतसिंगाने पुष्कळ यत्न केला. दारूगोळा आणि माणसे यांची फारच हानि झाली आणि येत चाललेल्या अपयशाबद्दल इतरांना दोष देऊन त्याने कोंडाण्याचा वेढा उठविला. अर्थात् कोणत्याहि प्रकारचा फायदा त्याला झाला नाही.
जसवंतसिंग हा मारवाडच्या गजसिंहाचा धाकटा मुलगा. तो जसा शूर होता तसा उत्तम लेखकहि होता. 'आनंदविलास', 'अनुभवप्रकाश', 'अपरोक्षसिद्धांत', 'सिद्धातबोध', 'भाषाभूषण' वगैरे ग्रंथ याने लिहिले आहेत. हिंदी साहित्यांतील तो मुख्य आचार्य होता. 'भाषाभूषण' नावाचा ग्रंथ पाठ्य पुस्तक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगजेब बादशहाची मर्जी याजवर फार होती. काबूलच्या स्वारीत त्याने चांगलाच पराक्रम केल्यावर बादशहाने त्याला 'राजा' ही पदवी दिली. शेवटी औरंगजेबाचे व त्याचे पटेना. तेव्हा त्याची रवानगी दूर काबूल येथे झाली. तेथेच जमरुद येथे त्याचा अंत झाला. जसवंतसिंगाने आपल्याजवळ गुहिलोत चतुराजी या कृषिविद्याविशारदास ठेवले होते. त्याच्याच संमतीने याने काबूलचे डाळिंब मारवाडांत आणले.
--२० मे १६६४

No comments:
Post a Comment