ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याची नाणी ,
भाग ७ वा -
पोस्तसांभार :: प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते .
-----------------------------------------------
राणोजीराव , महादजीराव आदी शिंदेकुलोत्पन्न वीरांनी मध्य हिंदुस्थानात रुजवलेले मराठेशाहीचे रोपटे आता बदलत्या परिस्थितीनुसार दिवसागणिक बळिवंत होत चाललेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कलाप्रमाणे चालत होते . पेशवाई कालखंडाचा १८१८ मध्ये झालेला अस्त आणि सातारा तथा करवीर या हिंदवीस्वराज्याची मध्यवर्ती सत्ताकेंद्र देखील सामर्थ्यशाली राहिली नव्हती .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
बायजाबाई शिंदेंशी अखेर दावा मांडून दत्तकपुत्र जनकोजीराव शिंदेशाहीचे सत्ताधीश झाले खरे परंतु मुळातच ते राज्यशकट हाकण्यास कमजोर होते . त्यांच्या दरबारात आपसातील वैर अखंड सुरु असायचे आणि त्यांचे सैन्य देखील कायम बंडाच्या पवित्र्यात असे अशा नोंदी आहेत . सुरुवातीच्या काळात बायजाबाईसाहेब या राज्यकारभार करण्यास उत्सुक आणि समर्थ असल्याकारणे त्याच जनकोजीरावाच्या सर्वाधिकारी / Regent म्हणून १८३२ पर्यंत शिंदेशाहीचा कारभार बघत होत्या . मात्र आता त्याला स्वतंत्र राज्यकर्ता म्हणून गादीवर येण्याची आकांक्षा वाढली होती . याचमुळे त्याने अखेर ब्रिटिश रेसिडेंट च्या मदतीने बायजाबाईंना पदच्युत करून राज्यकारभार हाती घेतला . बायजाबाईसाहेब अटक टाळण्यासाठी ग्वाल्हेरच्या बाहेर निसटल्या . जनकोजीरावांनी सुमारे १० वर्षे राज्यकारभार केला . ते इसवीसन १८४३ मध्ये निसंतान अवस्थेत मृत्यू पावले . मात्र त्यांनी बासौदा , बुरहाणपूर , ग्वाल्हेर फोर्ट , ईसागढ , जावद , लष्कर , सिप्री , उज्जैन आदी अनेक टांकसाळीत पाडलेली चांदीची , तांब्याची नाणी उपलब्ध आहेत . त्यांच्या या नाण्यांवर पर्शियन भाषेतील मजकुराप्रमाणेच देवनागरी भाषा देखील आढळून येते . यातील काही नाण्यांवर " जनकुजी " असे लिहिलेले आहे . तसेच त्रिशूळ/भाला , झाडाची छोटी फांदी / tree leaf , उर्ध्व आणि अधो बाजूला बाणाचे टोक असलेले धनुष्य , सोबत तलवार , देवनागरी लिखावटीत " ज " , " जे " आदी अक्षरे , चवरी , भाल्याचा फाळ , त्रिशूळ , साप / नाग , फुल , वळलेल्या मुठीची तलवार अशी अनेक चिन्हे जनकोजीरावांच्या नाण्यांवर आढळून येतात .
७ फेब्रुवारी १८४३ ला जनकोजीराव फक्त १० वर्षे कारभार करून मरण पावले . त्यांना पुत्रसंतान नसल्यामुळे त्यांच्या १३ वर्षीय विधवा पत्नी राणी ताराबाईनी भगीरथराव नामक ८ वर्षाच्या मुलाला दत्तक घेतले आणि हे पुढे " जयाजीराव " शिंदे या नावाने प्रसिद्ध झाले . ताराबाई तसेच जयाजीराव हे तसे अल्पवयीन असल्याने ग्वाल्हेर संस्थानचा कारभार चालवण्यासाठी एका राजमंडळाची निर्मिती केली गेली . अखेर जानेवारी १८५३ मध्ये जयाजीराव शिंदे यांनी स्वतंत्र पणे राज्यशकट हाती घेतले . जयाजीरावांच्या कारकीर्दीत हिंदुस्थानातील इंग्रज सत्तेविरूद्धचे सुप्रसिद्ध असे १८५७ चे स्वातंत्र्यसमर उद्भवले . परंतु धूर्तपणे जयाजीरावांनी स्वतःला यापासून दूर ठेवले होते . या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अस्त होऊन आता भारताचे शासनसूत्र ब्रिटन ची सम्राज्ञी महाराणी Victoria Empress हिच्या हाती आले . जयाजीराव शिंदेंच्या सुमारे ४२-४३ वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत ग्वाल्हेर राज्य आधुनिकीकरणाकडे वळू लागले होते .
कमी जास्त होत होत अखेरीस ग्वाल्हेर राज्याच्या सीमा अधोरेखित झाल्या होत्या . मराठा - इंग्रज यामधील बरेचसे वादविवाद निवळले गेले होते . पिंढाऱ्यांच्या त्रासाचा बंदोबस्त झाला होता . बदललेल्या परिस्थितीप्रमाणे वागून शिंद्यांचे कारभारी दिनकरराव राजवाडे यांनी धूर्तपणा आणि हुशारी दाखवून इंग्रज सत्तेबरोबर चोख व्यवहार केला . याचा सन्मान ठेवून ब्रिटिश सत्तेने जयाजीरावांना अदमासे ३ लाख वार्षिक उत्पन्नाचा भूभाग प्रदान केला . तसेच जयाजीरावांना १८६१ मध्ये Counsellor of Empire या पदवीने आणि २१ तोफांच्या सलामीने गौरविले . पुढे १८७७ मध्ये त्यांना ब्रिटिश सेनेचे " General " पदवीने आणि " कम्पॕनियन अॉफ अॉर्डर अॉफ इंडियन एम्पायर " असेही सन्मानित केले . आधुनिक , प्रगतीशील विचारसरणीच्या जयाजीरावांच्या कार्यकाळात ग्वाल्हेर राज्यात रेल्वे , टपाल खाते , डाक-तार विभाग निर्माण झाले . महसुलीविभागात पुनर्रचना करण्यात आली . यामुळे ग्वाल्हेरात शेती , व्यापार उदीम , अर्थकारण यात मोठीच प्रगती झाली . अनावश्यक टांकसाळी देखील विचारविनिमय करून बंद करण्यात आल्या . तसेच टांकसाळ भवनाचे निर्माण करून आधुनिक तंत्रज्ञान , मशिनरी आयात करून मोठ्या संख्येने तसेच सुबक अशी नाणी पाडता येऊ लागली . महाराजा जयाजीराव शिंदे यांच्या कारकीर्दीत - भिलसा , बुरहाणपूर , दोहाद , ग्वाल्हेर फोर्ट , जावद , झाँशी , लष्कर , मंदसौर , राजोद , शेवपूर , उज्जैन अशा अनेक टांकसाळी कार्यरत होत्या ज्यांमधून चांदीची , तांब्याची नाणी पाडली जात होती .
जयाजीरावांच्या नाण्यांवर उर्ध्व तसेच अधोभागी रोखलेले धनुष्यबाण , तलवार , त्रिशूळ , साप / नाग , विविध प्रकारच्या झाडाच्या फांद्या / tree leaf varieties , फूल , तराजू , कट्यार , ध्वज / पताका , भाल्याचा फाळ , राजदंड , हनुमान , शिवलिंग , तोफा / Cannon , " जा , जी , आ , वा " इत्यादी अक्षरे अशी अनेकानेक चिन्हे आपणास बघावयास मिळतात . याचप्रमाणे हाती पाडलेली नाणी तद्वत मशिनद्वारे पाडलेली नाणी देखील उपलब्ध आहेत . विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जयाजीरावांच्या नाण्यांवर देवनागरी लिपीतील अक्षरांसोबत दोहाद येथे पाडलेल्या नाण्यांवर गुजराथी भाषेतील मजकूर देखील बघावयास मिळतो .
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते .







No comments:
Post a Comment