ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याची नाणी ,
भाग ६ वा -
बायजाबाई शिंदे .
पोस्तसांभार :: प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते
मराठेशाहीच्या इतिहासात कर्तबगार राजस्त्रिया राज्यकर्त्यांची नावे घ्यायची झाली तर शिवछत्रपतिंच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब , शिवस्नुषा शंभुपत्नी महाराणी येसूबाईसाहेब , शिवस्नुषा राजारामपत्नी आणि करवीर संस्थानच्या संस्थापिका ताराराणीसाहेब , इंदोर संस्थानच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहेब , मध्य भारतातील झाँशी संस्थानच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर आणि ग्वाल्हेरच्या महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे यांची नावे ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळपदी विराजमान आहेत .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शिकस्तीने काम स्त्रियाही करतात हे वारंवार सिद्ध झालेले आहे . सरलष्कर महाराजसाहेब शहाजीराजे हे आदिलशाहीच्या वतीने बँगलोर येथे वास्तव्यास असताना महाराष्ट्रदेशी पुणे सुपे जहागिरीचा कारभार जिजाऊसाहेबांनी बालशिवबास घेऊन समर्थपणे सांभाळला , वाढवला . शंभाजीमहाराजांच्या ज्वलज्वलनतेजस् वृत्तीला येसूबाईसाहेबांनी नंदादीपाच्या स्निग्ध प्रकाशागत साथ देऊन पतीच्या निर्घृण हत्येनंतर धोरणीपणाने निर्णय घेऊन मराठेशाहीचा अंगार पेटता ठेवला . पती राजाराममहाराजांच्या अवेळी झालेल्या निधनानंतर ताराराणीने औरंगजेब आलमगीराशी उभा दावा मांडून झुंज दिली आणि करवीर संस्थानाची स्थापना ही केली . झाँशीच्या महाराणी लक्ष्मीबाईंचे तेजस्वी उद्गार - " मेरी झाँशी नही दूँगी "- जसे इतिहासात दगडावरील रेषेप्रमाणे कोरले गेलेत तसेच ताराराणीसाहेबांचे पुढील उद्गार - " यवनाधमाचा ( औरंगजेबाचा ) हिसाब ( भीती ) तो काय राखायचा ?" - हे देखील अनन्यसाधारण महत्वपूर्णच आहेत . पती खंडेराव , पुत्र मालेराव , श्वशुर मल्हारराव पहिले , कन्या मुक्ता आणि जावई यांचे वेळीअवेळी मृत्यू डोळ्यासमोर होऊनही पुण्यश्लोक अहिल्याबाई रायगडाच्या अविचल वृत्तीने समाजहितासाठी आजन्म कार्यरत राहिल्या . याचप्रमाणे शिंदेशाहीचे बलवत्तर नेतृत्व आणि आपले श्वशुर महादजी शिंदे तसेच पती दौलतराव शिंदे यांच्या पश्चात धीराने , हिंमतीने मध्य हिंदुस्थानात शिंदेशाहीचा पर्यायाने मराठेशाहीचा डोलारा सांभाळणाऱ्या " महाराणी बायजाबाई शिंदेसाहेब " यादेखील मराठेशाहीच्या इतिहासात अजरामर झाल्या .
बायजाबाई या देखील अहिल्याबाईंप्रमाणे महाराष्ट्रकन्या . कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला होता . वडील सर्जेराव घाटगे हे परशुरामभाऊ पटवर्धन यांचे पदरी होते . पटवर्धनांच्या वतीने आणि नाना फडणवीसांच्या आग्रहामुळे ते पंतप्रधानपेशव्यांच्या पुणे दरबारात राजनैतिक कामांसाठी उपस्थित असत . याचप्रमाणे महादजींचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे हे देखील ग्वाल्हेर संस्थानच्या वतीने सुरुवातीला पुणे दरबारात राजनैतिक घडामोडी सांभाळण्यासाठी असत . दुसऱ्या बाजीरावांनी दौलतराव आणि बायजाबाई यांच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला आणि मार्च १७९८ मध्ये हा विवाह संपन्न झाला . कालांतराने सर्जेराव घाटगे हे दौलतरावांचे अतिशय विश्वासपात्र ठरून स्वपराक्रमाने त्यांच्या सेनेचे अधिपतीही झाले . बायजाबाईसाहेब देखील ग्वाल्हेरला आल्यानंतर दरबारी कामकाजात लक्ष घालत असत . बंदूक चालवणे , भाला फेकणे , घोडेस्वारी करणे अशा कलांमध्ये ही त्या पारंगत झाल्या होत्या . मात्र इसवीसन १८१० मध्ये दरबारी वर्चस्वाच्या लढाईत सर्जेरावांची हत्या झाली . यानंतर सर्जेरावांचा मुलगा आणि बायजाबाईसाहेबांचा भाऊ हिंदुराव उर्फ जयसिंहराव हा ग्वाल्हेरला दौलतरावांकडे रूजू झाला . कालांतराने १८२७ मध्ये दौलतराव वारले आणि ते निपुत्रिक असल्याने स्वाभाविकच वारसाहक्काचा प्रश्न उद्भवला . तत्कालीन पुरुषीवर्चस्ववृत्तीच्या राजकीय सगेसोयऱ्यांना एक महिला आपल्यावर राज्य करते हे रुचेना म्हणून धूर्त इंग्रज अधिकाऱ्यांच्या स्वार्थी सहमतीने बायजाबाईंनी शिंदेकुलोत्पन्नांपैकीच एक " मुकुटराव " नामक मुलास दत्तक घेतले . हा पुढे " जनकोजीराव " अथवा " जनकुजीराव " ( नाण्यांवर असलेले नाव ) या नावाने प्रसिद्ध झाला .
बायजाबाई या कुशल प्रशासक होत्या . त्यामानाने जनकोजीराव हा वयाने , अनुभवाने लहान असल्याने त्यांनी समर्थपणे , धूर्तपणे ग्वाल्हेरचे राज्यशकट हाकायला सुरुवात केली . जनकोजीराव हे राज्यकारभारातही मानसिकदृष्ट्या तितके सक्षम नव्हते म्हणूनच चाणाक्ष ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासकांना ते आपल्या कह्यात रहावेत , जेणेकरून राज्याच्या नाड्या आपल्या हातात राहतील असा फासा टाकायचा होता . याचमुळे त्यांनी शिंद्यांच्या दरबारातील असंतुष्टांना हाती धरून , जनकोजीरावांना राज्यकारभार करण्यास न देणे आणि राज्यात अराजक माजवणे अशा आरोपांखाली बायजाबाईसाहेबांना ग्वाल्हेर च्या बाहेर निर्वासित केले . मात्र याच बायजाबाईंच्या राज्यकारभाराचं कौतुक समकालीन इंग्रजी लोकांनी अनेकदा केलेले आहे . १८३२ च्या इंडिया गॕझेट मधील नोंद सांगते - The Regentbaee ( बायजाबाई ) conducts the affairs of this state ( ग्वाल्हेर ) with great regularity , much better , I understand , than what was done in the time of late Maharaja ( दौलतराव ). मुंबई गॕझेटच्या पत्रकारांनी , बायजाबाईंचा कारभार बघता त्यांनाच आपला उत्तराधिकारी करण्याचा दौलतरावांचा निर्णय किती योग्य होता हे कळते , तसेच त्या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या असे १८३३ मध्ये लिहिले आहे .
परंतु दत्तकपुत्र जनकोजी ने अखेर १८३३ मध्ये बायजाबाईंच्या विरोधात बंड पुकारलं आणि खुद्द बायजाबाईसाहेबांना अटक होण्याची परिस्थिती आली असताना त्या भाऊ हिंदुराव याच्या आश्रयास गेल्या . त्यांनी ब्रिटिश रेसिडेंट कडेही मदत मागितली पण तरीही जनकोजीचे पारडे जड राहून नाईलाजास्तव त्यांना ग्वाल्हेरहून परागंदा व्हावे लागले . सुमारे ६-७ वर्षे त्या धोलपूर , अलाहाबाद , वाराणशी , फत्तेगढ अशा फिरत राहून अखेर नासिकला येऊन १८४० - १८४५ अशी पाच वर्षे त्या तिथे राहिल्या . शेवटी १८४३ मध्ये जनकोजीराव मृत्यू पावले आणि ते ही निपुत्रिक असल्याने त्यांच्या पत्नी ताराबाईने भगीरथराव नामक ८ वर्षे वयाच्या नात्यातील मुलाला दत्तक घेतले आणि तो
" जयाजीराव " या नावाने शिंदेशाहीचा कारभार बघू लागला . याच काळात बायजाबाई पुन्हा ग्वाल्हेरला परतल्या . पुढे १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात बंड करणाऱ्यांनी ग्वाल्हेरसह आपणही या संग्रामात सहभागी व्हावे अशी विनंती केली पण बायजाबाईंनी ती नाकारली . मात्र १८५८ ला राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे , पेशवे , बांदा संस्थानचे नवाब आदींनी हल्ला करून ग्वाल्हेर ताब्यात घेतले . खुद्द जयाजीराव आणि दिवाण दिनकरराव राजवाडे यांना आग्र्यास पळून जावे लागले . राजस्त्रियांना राजवाड्याबाहेर पडावे लागले . संपूर्ण खजिना त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या हाती लागला . मात्र लगेचच ब्रिटिशांनी ग्वाल्हेर जिंकून जयाजीराव आणि बायजाबाईंना पुन्हा प्रस्थापित केले . बायजाबाईसाहेब जयाजीराव शिंदे यांच्यासह राहू लागल्या . अखेर २७ जून १८६३ रोजी तब्बल ६ दशके ग्वाल्हेरची स्थित्यंतरे , चढउतार बघितलेल्या या महाराणी बायजाबाईसाहेबांचे निधन झाले .
बायजाबाईसाहेबांनी आपल्या कारकीर्दीत अजयमेरु उर्फ अजमेर , बुरहाणपूर , ग्वाल्हेर , लष्कर , शेवपूर , उज्जैन , सिप्री आदी टांकसाळीत आपली " श्री " चिन्हांकित नाणी पाडलेली आढळतात . अतिशय सुबक , ठसठशीत अशी ही चांदीची तसेच तांब्याची नाणी आहेत .
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते .

No comments:
Post a Comment