विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 11 August 2021

श्रीक्षेत्र वाई

 





श्रीक्षेत्र वाई
(इतिहासवाटा - ७५)
श्रीक्षेत्र वाई इतिहासकालीन सातारा इलाख्यातील कृष्णेच्या तीरावर वसलेले निसर्गसंपन्न असे ठिकाण आहे. कृष्णेचा प्रवाह पसरणीचा घाट व पांडवगड यांच्यामधून पश्चिमेकडून पूर्वेस वाहत आहे. इ.स.१४२९ मधे बाहामणी राज्याच्या सुभेदार असलेल्या 'मलिकउलतुजा' याने वाई आपल्या ताब्यात घेतली मात्र ती कोणाकडून घेतली याची माहिती उपलब्ध होत नाही. या घटनेनंतर जवळजवळ वीस वर्षे वाईवर बाहामणी सुलतानाचा अमल होता.
त्यानंतर पुढे कधीतरी विजापूरच्या अदिलशाहीची सत्ता वाई परगण्यावर सुरू झाली असावी. विजापूरी सरदार थोरला रनदौलाखानाकडे अनेक वर्षे मुकासा असलेला वाई परगणा त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रहमतखान याच्याकडे अल्पकाळासाठी आला. या रहमतखानाच्या नावावरून कुमठे बुद्रुक या गावाला रहिमतपूर हे नाव मिळाले असावे. लवकरच म्हणजे इ.स.१६४८ अफजलखान याच्याकडे वाई परगणा मुकासा म्हणून आला. इ.स.१६६९ मधे वाईचा सुभेदार असलेल्या अफजलखान यांस प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपति शिवाजी महाराजांनी त्यास मृत्यूलोकचा रस्ता दाखविला. प्रतापगड रणसंग्रामात जरी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांनी विजय मिळविला तरी वाई भागावर मुलकी अधिकार स्थापित होण्यास काही वर्षांचा अवधी लागला. छत्रपति संभाजी महाराजांच्या निघृण हत्येनंतर मोगलांनी इ.स.१६९० मधे वाईवर हल्ला चढविला परंतु त्यांना वाई जिंकून घेता आले नाही कारण स्वराज्याच्या सैन्याने संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना कडवा प्रतिकार करून अपयशाचे धनी केले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांच्या कैदेत असलेल्या छत्रपति संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांना काही शर्तीवर मुक्त केले पण त्यावेळी स्वराज्याच्या गादीवर राजाराम महाराजांच्या पत्नि ताराराणी होत्या. साहजिकच स्वराज्याच्या गादीच्या वारसा हक्कासाठी त्यांच्यात यादवी सुरू झाली. शाहू महाराजांनी इ.स.१७०८ मधे स्वराज्याची राजधानी सातारा येथे केली. मोगलांनी स्वराज्याची फार हानी केली होती व शाहू महाराजांची आर्थिक बाजू सशक्त नव्हती. अशावेळी रास्ते घराण्यातील भिकाजी शामराव नाईक व सदाशिव शामराव नाईक या दोन्ही बंधूनी सातारा येथे सावकारी करण्यास सुरूवात केली.
त्यावेळी राज्याचा कारभार चालविण्यास व युद्धकर्मास लागणारा पैसा राजेलोकांना सावकारापासून कर्जाऊ घेण्याचा प्रसंग वारंवार येत असे. शाहू महाराजांनी रास्ते बंधूंना पाच हजार दोनशे रुपयेचा सरंजाम दिला होता. तेव्हा सदाशिव शामराज हे सातारा येथे राहू लागले तर महाराजांनी भिकाजी शामराव व रामाजी दामोदर गाडगीळ यांना वाई येथे वाडा बांधण्यासाठी जागा दिली व ती दोन्हीहि कुटुंबे वाई मधे वाडा बांधून राहू लागली. शाहू महाराजांशी आर्थिक देवाणघेवाणीतून रास्ते कुटुंबाचा घरोबा वाढला व पुढे महाराज रास्तेच्या घरी दिपावली फराळासाठी आले असताना भिकाजीची मुलगी गोपिकाबाई त्यांच्या दृष्टीस आल्या. महाराजांनी थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांच्या विवाहाचा प्रस्ताव रास्ते यांचेकडे मांडला व तो त्यांना मान्य होऊन लवकरच वाई मुक्कामी नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
रास्ते हे कित्येक पिढ्यांचे गर्भश्रीमंत कुटुंब मूळ कोकणातील गुहागर जवळ असलेल्या वेळणेश्वर येथील रहिवासी. ते गर्भश्रीमंत असल्याने विजापूरच्या अदिलशाही काळापासून सावकारी करीत होते. कोकणप्रांताची रसद विजापूरला पोहचविण्याची जबाबदारी ते चोखपणे करीत. त्यांच्या घराण्यातील एका पुरुषाने वेळणेश्वर भागातील लाखो रुपये किंमतीची बेवारस मिळकत जप्त करून विजापुरच्या बादशाहकडे पावती केली. त्यांची ही कृती बादशाहास रास्त वाटल्याने बादशाहाने त्यांस रास्ते ही पदवी दिली. बादशाहाने दिलेली रास्ते ही पदवी इतकी नावारुपाला आली की त्यांचे मूळचे गोखले हे आडनाव जाऊन तेथे रास्ते हे रूढ झाले.
भिकाजी रास्ते यांची मुलगी गोपिकाबाई व नानासाहेब पेशवे यांचा विवाह झाल्यामुळे रास्ते कुटुंबियांचा प्रवेश पेशव्यांच्या दरबारी होऊन त्यांचे जेष्ठ चिरंजीव मल्हारपंत यांस सरदारकी मिळाली. भिकाजींना एकूण सात पुत्र होते ते अनुक्रमे मल्हारपंत, गणपतराव, आनंदराव, लक्ष्मणराव, गंगाधर, रामचंद्रराव व जीवनराव. मल्हारराव भिकाजी हे पेशव्याकडे सरदारकी करीत असताना पेशव्यांनी कर्नाटकातील सावनूरच्या नबाबवर स्वारी केली तेव्हा ते पेशव्यांच्या बरोबर मोहिमेवर होते. यावेळी पेशव्यांनी बागलकोट किल्ला मल्हाररावांच्या स्वाधीन करून तेथील बंडाईचा बंदोबस्त करण्यास सांगितले. सरदार मल्हाररावांनी आपल्या तोफखाना, पायदळ यांच्या साह्याने बंडाई लगाम लावला व आल्लीखानचा बदामी किल्ला राजकारण करून घेतला. त्यांचे कर्तृत्व पाहून पेशव्यांनी त्यांना तीन हजार फौजेची सरदारकी देऊन दौलतशिक्क्यासह बढती दिली व कापडबाबसह २१,०२०० रुपयेची तैनाती दिल्या. मल्हाररावांच्या निधनानंतर त्यांना पुत्र नसल्याने त्यांचे बंधू आनंदरावांना यांना त्यांच्या कर्तृत्वावर पेशव्यांनी सरदारकी बहाल केली. आनंदराव भिकाजी रास्ते व त्यांच्या बंधूंच्या कारकीर्दीत त्यांनी मोठमोठी बांधकामे केली आहेत. अनंतपूर येथे एक लाख रुपये खर्च करून मोठा किल्ला बांधला व पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सातारा, तासगांव, अनंतपूर, अथनी, पंढरपूर, तालीकोट व वाल्हे येथे मोठे वाडे बांधले. ह्या सर्व बांधकामांना सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.
भिकाजी रास्ते यांच्या मुलांनी श्रीक्षेत्र वाईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असून मंदिरे, घाट व गावकोस, वेशी इ. निर्माण केले असल्याचे इतिहासाने पाहिले आहे.
रास्त्यांनी श्रीक्षेत्र वाई येथे श्री महाविष्णु, लक्ष्मी, गणपति काशीविश्वेश्वर, गंगा रामेश्वर व पंचायतन ही देवालये व कृष्णानदीस भव्य घाट बांधले आहेत. धर्मपुरी ही नवी पेठ निर्माण करून बावन्न ब्राम्हणांना तेथे घरे बांधून दिली तर गंगापुरीत ब्राम्हणांना घरे बांधण्यास अर्थसाह्य केले. खांबाटकी घाटापासून वाईपर्यत दगडी बांधकामातील पाट बांधला व परिसरात मंदिरे बांधली, विहिरी खोदल्या. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आमराई निर्माण केल्या आहेत.
१)श्री गणपति मंदिर - हे मंदिर ज्या घाटावर आहे तो घाट आनंदराव रास्ते यांनी बांधलेला असून त्याच्यावर गणपतराव रास्ते यांनी इ.स.१७८० मधे दीड लाख रुपये खर्च करून गणपति मंदिर निर्माण केले आहे. हा घाट काशी येथील घाटाच्या धर्तीचा असून गणपति मूर्ती कर्नाटकातील मूर्तीप्रमाणे विशाल आहे. या विशाल मूर्तीमुळे यास " ढोल्या गणपति " या नावाने संबोधले जाते. ही गणपति मूर्ती पाहताना बंगलोरचा गणपति व बसवण्णा यांच्या विशालपणाची नक्कीच आठवण झाल्याशिवाय राहत नाही. घडीव दगडी बांधकामातील पूर्वाभिमुखी गणपति मंदिर प्रेक्षणीय आहे. ३० चौरस फूटाच्या गाभाऱ्यात ७ फूट उंच व ६ फूट रुंदीची विशाल गणपति मूर्ती ज्या चौथ-यावर आहे तो चौथरा १-४| उंच, १२-८|| लांब व ११-११ फूट रुंद आहे. ज्या दगडी प्रभावळी टेकून श्री गणपति मूर्ती आहे, ती प्रभावळ १०-२ फूट उंच व १- ५ फूट रुंद अशी आहे. गाभा-यास पुर्वाभिमुख तीन दरवाजाची उंची समान असून ती ९-३ फूट आहे मात्र रुंदीमधे मधील दरवाजा काहीसा मोठा आहे. गाभाऱ्यास असलेल्या दक्षिणोत्तर दरवाजाची उंची ७-५|| व रुंदी ४-९ फूट इतकी असून गाभाऱ्याची उंची सुमारे २५ फूट असावी. पूर्वाभिमुख गाभारा दरवाजाबाहेर ६४ फूट लांब, ३८ फूट रुंद व १५ फूट उंचीचा मोठा सभामंडप असून उत्तरेस ५, दक्षिणेस ५ व पूर्वेस तीन अशा साधारणतः १० फूट उंचीच्या व ६-८ फूट रुंदीच्या कमानी आहेत. या सर्व तेरा कमानीचे दहा मच्छ व सभामंडपास आठ दगडी खांब आहेत. श्रीक्षेत्र वाई मधील सर्वात उंच शिखर हे श्री गणपति मंदिराचे असून त्याची उंची सुमारे ७५ फूट असावी. कृष्णानदीच्या घाटावर हे मंदिर असल्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे पाण्यात असते. पावसाळ्यातील महापूराच्या पाण्याला फार वेग असल्याने मंदिरास नुकसान होऊ नये म्हणून मंदिराच्या पाठीमागील बाजूस दगडी बांधकामातील मजबूत कोन केला आहे.
२)श्री काशिविश्वेश्वर मंदिर - काशीविश्वेश्वराचे पूर्वाभिमुख मंदिर आनंदराव भिकाजी रास्ते यांनी इ.स.१७५७ मधे बांधले असून सभोवतालच्या भक्कम दगडी तटबंदींची उंची पंधरा फूटाची असून एकूण लांबी सुमारे २१६ फूट व रुंदी ९५ फूट आहे. बहुतेक मंदिरांची तटबंदी मजबूत केली जायची कारण परचक्र आल्यावर मंदिरातील देवदेवतांचे चांदी सोन्याचे दागिने, मुखवटे व मूर्ती सुरक्षित राहाव्यात हा हेतू असावा, याला श्रीक्षेत्र वाई मधील श्री काशीविश्वेश्वर मंदिर देखील अपवाद नाही. पुरातन काळात संपत्ती व देवतांचे रक्षण करण्याकडे विशेष कल असल्याचे दिसून येते. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या तीन कमानीच्या तटबंदीवर नगारखाना असून नगारखान्यात जाण्यासाठी उत्तरेच्या बाजूने पूर्वतटास लागूनच एकोणीस पायऱ्यांचा जिना आहे. आतमधे यती, ब्रम्हचारी, प्रपंच विरक्त कर्ममार्गींना निवासासाठी दक्षिण - उत्तर ओव-या बांधलेल्या आहेत. आतील संपूर्ण भागात फरसबंदी असून ५० × २७ फूटांच्या चौथ-यावर काशीविश्वेश्वराचा गाभारा, सभामंडपासह देवालय आहे. सभामंडपासमोर एका दगडी चौथरा असून चौफेर कमानी बांधकामात अतिशय प्रेक्षणीय भव्य नंदी विराजमान झालेला आहे. नंदीच्या गळ्यात घातलेले अलंकार, माळा, साखळ्या तर पाठीवर झुल पांघरलेली आहे. नंदीच्या तोंडात व पायातील साखळ्या इत्यादींचे कोरीव काम अतिशय सुरेख आहे. याच्या शेजारीच चौरस चौथ-यावर १६ खांबी व २४ कमानीचा " कुंड मंडप " आहे.कुंडमंडपाच्या दक्षिणेस व उत्तरेस अष्टकोनी चौथ-यावर सुमारे २३ फूट उंचीच्या दोन दगडी दीपमाळा आहेत. दक्षिण बाजूच्या तटावर जाण्यासाठी जिना असून तटाजवळ आतील बाजूला एक पायविहीर आहे. या देवालयास एकूण १४ शिखरे असून त्यातील सर्वात उंच काशीविश्वेश्वराचे आहे तर त्याच्या खालोखाल घंटाघराचे व सभामंडपाचे आहे. मंदिराच्या पाठीमागे तुलसीवृंदाव असून उत्तरेस फरसबंदीत चंडीचा दगडी पुतळा आहे. काशीविश्वेश्वराचा सभामंडपाच्या दक्षिण उत्तर भिंतींना दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्याचे दरवाजास लागूच घंटाघर असून येथे भली मोठी घंटा आहे. गाभाऱ्यात श्रीकाशीविश्वेश्वर बाणाचा व्यास पाच फूट तर उंची आठ इंच इतकी आहे. गाभाऱ्यात प्रकाश येण्यासाठी दक्षिणेस दगडी जाळी असून त्या जाळीत तत्कालीन कारागीराने अतिशय कल्पकतेने दोन नाग कोरलेले आहेत.
३ ) श्री महालक्ष्मी मंदिर - हे पश्चिमाभिमुख मंदिर इ.स.१७७८ मधे सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी २,७५,६३० रुपये खर्च करून बांधले. या मंदिराच्या सभोवती १८ फूट उंच व ५ फूट उंचीचा चिरेबंदी तट आहे. पश्चिम पूर्व तटाची लांबी १४५ फूट तर दक्षिण उत्तर तट सुमारे १०० फूटांचा आहे. आतील भागात संपूर्ण फरसबंदी असून हिच्यावर ३ फूट उंच, ६८ फूट लांब व ३५ फूट रुंदीच्या चौथ-यावर श्री महालक्ष्मी मंदिराची पडवी, सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यात जाण्यासाठी तीन पायऱ्या चढून जावे लागते. गाभाऱ्यातील दक्षिण उत्तर भिंतींना प्रकाश व हवा येण्यासाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यातील सुमारे पावनेतीन फूट उंचीच्या दगडी सिंहासनावर ३ फूट उंचीची काळ्या पाषाणाची चतुर्भुज श्रीमहालक्ष्मीची मूर्ती आहे. गाभाऱ्यासमोर ३६ फूट लांब, २४ फूट रुंद व १३ फूट उंचीचा सभामंडप असून सभामंडपाचे दुसऱ्या कमानीत पावणेतीन फूट चौरस हौदात कारंजा आहे. सभामंडपास पडवीसह दहा खांब व अठ्ठावीस कमानी आहेत. या मंदिरास उत्तर व दक्षिण तटास मिळून दोन दरवाजे आहेत. मंदिराची सुमारे उंची पंचवीस फूट असून शिखर ५० फूटाचे आहे. श्रीमहालक्ष्मीचे दैनंदिन पुजारी ओक उपनामाचे आहेत. देवीच्या पूजा, नैवेद्य व वार्षिक उत्सवाचे खर्चासाठी श्रीमंत पेशवे सरकार यांनी गुळुम हे गाव देवस्थानला इनाम करून दिले होते.
४)श्री महाविष्णु मंदिर - हे पूर्वाभिमुखी मंदिर सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांनी इ.स.१७७४ मधे २, १६,२५० रुपये खर्च करून बांधले आहे. पडवी, सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यातील ३ - ७ लांबीच्या २-१ रुंदीच्या सिंहासन चौथ-यावर ३-३ फूट उंचीची श्री महाविष्णुची व १-११ फूट उंचीची श्री लक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. गाभाऱ्यात दक्षिणेकडील भिंतीत दगडी जाळी बसविलेली आहे. ११ कमानीचा सभामंडप असून तीन कमानीच्या पडवीसमोर चौरस हौदात कारंजा आहे. सभामंडपाची उंची १६ फूट आहे तर समोर ६|| फूट चौरस चौथ-यावर गरूड आहे. सभामंडपाचे उत्तरेस इ.स.१८३९ मधे वासुदेवभटजी दिवेकर यांनी बांधलेला औदुंबर पार आहे. ईशान्य कोपऱ्यात विहीर असून नैऋत्य कोपऱ्यात बापूदीक्षित जोग यांची समाधि आहे. श्रीमंत पेशवे सरकार यांनी ह्या देवस्थानाच्या खर्चासाठी केंजळ गाव इनाम दिला होता. या इनाम सनदेतीलच सारांशाचे एक पत्र श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी, सरदार आनंदराव भिकाजी लिहले होते त्यातील विशेष मजकूर पुढीलप्रमाणे आहे,
" सनदेत नमूद केल्याप्रमाणे केंजळ गांव व धामणा डोंगर श्रीविष्णु व समस्त ब्राम्हण यांना नूतन करार करून भोगवटी यास आलाहिदा इनाम पत्रें करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली असे. तरी इनाम पत्राप्रमाणे तुम्ही मौजे मजकूर ऐवजाची व सदरहू डोंगराचे कुराणाची नेमणूक श्रीकडे व समस्त ब्राम्हणांस करून याचे दुमाला करून देऊन चालविणे" जाणीजे छ.११ जिल्हेज. हे पत्र सातारचे दप्तरी बुकास ५९६ नंबर नोंदिले ता.५/८/१८५४ इ.
५) श्रीउमामहेश्वर मंदिर - हे पूर्वाभिमुखी मंदिर गंगाधरराव भिकाजी यांनी इ.स.१७८४ मधे बांधले. तटबंदीयुक्त असलेल्या या मंदिराचे शिखर ४० फूट उंचीचे आहे. सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप असून सभामंडपासमोर चौफेर कमानी चौथ-यात नंदी विराजमान झालेला आहे. या मंदिराच्या तटबंदीच्या अंतर्गत भागात चारहि कोपऱ्यात लहान देवालये असून नैऋत्येस श्रीगणपति, वायव्येस श्रीलक्ष्मी, ईशान्येस श्रीविष्णु व अग्नयेस श्रीसूर्य आहेत म्हणून याला पंचायतनाचे मंदिर देखील म्हणतात.
याशिवाय वाई येथे असंख्य मंदिरे आहेत, त्यतील काहीचा फक्त नामोल्लेख
अ) श्रीदत्तमंदिर - २ फूट उंचीची तीनमुखी संगमरवरी श्रीदत्तात्रयाची मूर्ती असणारे मंदिर मुंबईला जवाहिराचा व्यापार करणाऱ्या नारो गोविंद यांनी बांधले.
ब) श्रीबहिरोबा मंदिर - हे लाकडी कामातील, काळ्या पाषाणातील दोन मूर्ती असलेले मंदिर गंगाधरपंत रास्ते यांनी बांधले आहे. मंदिराच्या पूर्व कोपऱ्यावर अतिशय चांगली विहीर देखील आहे.
क) श्री व्यकंटेश मंदिर - हे मंदिर नरगुंदकरीण बाईंने बांधले असून येथील पुजारी खरे उपनामाचे आहे.
संदर्भ - १) श्रीक्षेत्र वाई - वर्णन
लेखक - गोविंद विनायक आपटे
आवृत्ती - जानेवारी १९११
किंमत - आठ आणे पृ.संख्या - ९६
२) ) पेशवेकालीन महाराष्ट्र
लेखक - वासुदेव कृष्ण भावे
प्रथमावृत्ती - डिसेंबर १९३५
किंमत - ३ रुपये
पृष्ठ संख्या - ५५८
३) सातारा गॕझीटीयर
४) श्री राजा शिवछत्रपती
लेखक - गजानन भास्कर मेहेंदळे
© सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...