पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मलठण या गावी दादोजी कोंडदेव कुलकर्णी यांचा वाडा आहे. गावात प्रवेश करतानाच तटबंदी असलेली वेस दिसते. तिथून आत आल्यावर उजव्या हातालाच दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालय अशी पाटी दिसते तोच म्हणजे दादोजींचा वाडा होय. मलठण हे गाव पुणे- सोलापूर महामार्गावरील भिगवण गावापासून १७ कि.मी. अंतरावर आहे. शाळेसाठी वापरात असल्याने वाड्याची तटबंदी आणि प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. आतमध्ये चौक आहे आणि वाड्याच्या बांधकाम पद्धत आणि ढाच्यावरून लक्षात येते की वाडा दुमजली होता. वाड्याबाहेर महादेवांचे मंदिर आहे तेथील नंदी एकदम विशिष्टपूर्ण आहे त्याचे डोके कोणत्याही दिशेला फिरवता येते. गावात जवळच जुना वाडा आहे त्याचे तट आहेत पण वाडा एकदम जीर्ण झाला आहे. जवळच एका रजपूतांच्या घोड्याची समाधी आहे.
लहानपणी छत्रपती शिवाजीराजे आपल्या वडिलांच्याबरोबर काही दिवस विजापूरला होते. पुण्यास आल्यावर त्यांना शहाजीराजांनी मावळ कार्यात पोट मुकासा म्हणून दिली. मावळ कर्यातीत छत्तीस गावे होती. पुणे परगण्यातील मुकाशांचा कारभार शहाजीराजांच्या वतीने दादोजी कोंडदेव नावाचा पाटस तरफेतील 'मलठण' गावचा कुलकर्णी पाहात असे. निजामशहाने इ.स. २५ जुलै १६२९ लखुजी जाधवराव यांचे अचलोजी व रघुजी हे दोन पुत्र, व यशवंतराव हे नातू यांची भर दरबारात कत्तल केली. शहाजीराजांनी निजामशाही सोडली व ते आपल्या पुण्याच्या जहागिरीत येऊन राहिले. पुणे परगण्याचा मुकासा मात्र त्यांनी आपल्या ताब्यातून सोडला नाही.
नंतर ते मोगलांच्या नोकरीत गेले. त्याच्या काही महिने अगोदर मुरार जगदेव याने पुण्यावर आक्रमण केले. पुण्यात येऊन पुण्याचा कोट पाडला. शहाजीराजांचे वाडेही जाळले. पुणे परगणा उजाड झाला. या सर्व उजाड मुलखाचे पुनर्वसन करण्याचे काम दादोजी कोंडदेवांनी केले. त्यासंबंधीचे एक पत्र उपलब्ध आहे ते असे....
“श्री शके १५५५ श्रीमुख नाम संवत्सरे मार्गशीर्ष वद्य १, पाडवा, बार बुधवार ते दिवशी (म्हणजे ४ डिसेंबर १६३३ रोजी) स्थळे मौजे भाववडी, तरफ कऱ्हेपठार, परगणा पुणे येथे सभेत उपस्थित असलेल्यांसमोर जाऊ पाटील घुला, मोकदम मौजे महंमदवाडी, परगणा पुणे याने लिहून दिले की
..बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलखास गेला. त्यावर वडील तो मेले. आम्ही वाचलो, सुकाळ झाला. यावर दादाजी कोंडदेव सुभेदार दिवण झाले. त्यांनी मुलूख लावला, देशमुख देशकुलकर्णी यांना ताकीद केली की, 'हा गाव पडला, पाटील आणऊन गाव लावणे.' असे फर्मावले. मग आपणास लेऊन कौल (म्हणजे शब्द, आश्वासन, अभय) देऊन गाव लागला. मग तू आपला भाऊ मागवडीस होतास. तुका आणावास एक-दोन वेळा आलो. त्यावर तू बोललास की, तुझे व आपले वडील जसे चालले (म्हणजे परस्परांशी वागत आले) तसेच चालशील तर मी गावावर येईन, दिवाणची कीर्दमामुरी करून असेन, आणि गोतासमोर कागद लिहून देशील, तर येईन. घसघसेने येणार नाही.' असे तू गोतासमोर बोललास... यावरून हे लक्षात येते की, दादोजी कोंडदेव सुभेदार म्हणून काम करीत होते व तसेच शहाजीराजांचा नोकर म्हणूनही काम करत होते.
दादोजी कोंडदेवांनी दिलेले निवाडे छ. शिवाजी महाराजांनी मान्य केले होते. 'दादोजी कोंडदेवांनी केले ते रास्तच' असा महाराजांना त्यांच्याबद्दलचा विश्वास होता.दादोजी कोंडदेवांचा मृत्यू इ.स.१३ जुलै १६४६ ते १९ जुलै १६४७ यमध्ये झाला. दादोजी कोंडदेव वारल्यावर छ. शिवाजीमहाराजांनी पुरंदरचा किल्लेदार महादजी नीळकंठराव यांना दिलेल्या एका पत्रात असे म्हटले आहे की...दादो कोंडदेव आम्हांजवळ वडिली ठेवून दिल्हे होते. ते मृत्यो पावले आता आम्ही निराश्रित झालो..
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment