कवी कलश :- व्यक्तिवेध
लेखन ::श्री नागेश सावंत
मराठ्यांच्या
इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांचा परममित्र कवी कलश म्हणजे एक
रहस्यमयी न उलगडलेले कोडेच. कवी कलशविषयी मराठी साधनातून स्वराज्य
बुडवल्याचा व मोगली साधनातून तो मोगलांचा हेर असल्याच्या नोंदी आढळून येतात
. शाक्तपंथीय वामाचाराच्या साधनेतून सिधी प्राप्त झालेला कवी कलश मराठा
इतिहासात अधिकार गाजवताना दिसतो. शाक्तपंथी मार्ग म्हणजे “ मद्य, मत्स्य,
मांस, मुद्रा, मैथुन या विधीने अनुष्ठान करणे.” छत्रपतीसोबत अनन्वित हाल
सोसून मरणाला समोर जाणारा कवी कलशाच्या आयुष्याचा मागोवा घेण्याचा एक
प्रयत्न.
उत्तर
भारतातून आलेंला शाक्तपंथीय तांत्रीक कनोजी ब्राम्हण म्हणजे कवी कलश
.परंतु कवी कलशाचा स्वराज्याशी व छत्रपती घराण्याशी संबंध कधी आला हे
निश्चितपणे कळत नाही.
मोगल
इतिहासकार काफिखान लिहितो आग्र्याच्या कैदेतून महाराज निसटले त्यावेळी
त्यांनी संभाजीराजेना भोसले घराण्याचे कुलोपाध्याय कब कलस नावाच्या
ब्राम्हणास घरी काही द्रव्य देवून ठेवले. कब कलस याने संभाजीराजेंच्या
मृत्युच्या अफवेनंतर संभाजीराजाना सुखरूप महाराष्ट्रात आणले .
परंतु
सभासद बखर बखरीतील नोंदीनुसार मथुरेतील कृष्णाजीपंत व काशीराम व विसाजीपंत
त्रीमल बंधू ब्राम्हण यांनी संभाजीराजांचा सांभाळ करून स्वराज्यात सुखरूप
परत आणले. छत्रपती शिवाजी महाराजांनी याबद्दल ब्राम्हण कुटुंबास सनद दिलेली
आहे उत्तरेत भोसले घराण्याचे कोणतेही कुलोपाध्याय असल्याची नोंद आढळून येत
नाही. त्यामुळे काफिखानाची माहिती ही खोटी ठरते.
राजस्थानी
पत्रातील पत्र क्रमांक ३३ परकलदास याने कल्याणदास यास लिहिलेल्या
पत्रातील नोंदीनुसार “कवी कलश कविसुर सेवा को थौ व कईथ एक सकसोणा सेवा का
चाकर मुसाहीन था / सुवौ दौणौ पकडी बेड्या भऱ्या थे / बदीवान दीयौ थौ / अर्थ
:-“ शिवाजी महाराजांचा कवी कवी कलश व एक चाकर कायस्थ सक्सेना या दोघांना
पकडले व बेड्या घातल्या. सदर पत्रावरून कवी कलश आग्रा भेटीत असल्याचे संकेत
मिळतात
परंतु
पत्र क्रमांक ६१ च्य नोंदीनुसार “ जो परमानंद कवी सूरइंद्र कविसुर महै
ऐठे सेवाजी बाबती अटकनो थे / पाछै थी जी को लिखो आयो जो ईन छोडी दिजौ /
अर्थ :- शिवाजींच्या बाबतीत परमानंद कवी सुरेंद कवीश्वर जे अटकेत होते
त्यांना सोडण्याचा हुकुम देण्यात आला.
राजस्थानी
इतर पत्रातुन शिवरायांचे कवी परमानंद यांचा उल्लेख कवीश्वर , कविसर ,
कविसुर या नावानी आदळतो त्यामुळे पत्र क्रमांक ३३ ,मधील नोंद हि कवी कलशाची
नसून कवी परमानंद यांची आहे. कवी कलश हे नाव नसून ती पदवी असावी.
(Shivaji’s visit to Aurangjeb at Agra )
केळदिनृपविजय
या उत्तरकालीन इ.स. १७५० कानडी काव्यातील नोंदीनुसार कवी कलश हा
औरंगजेबाच्या चाकरीत असून त्याला शिवाजी महाराजांकडे शिधा सामग्री इत्यादी
सर्व प्रकारचा सांभार पाठवून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी कब्जी असे
प्रतीनाम असलेला कवी कलश याला नेमले व चौकी पहारे बसवले. शिवाजी महाराजांनी
युक्तीने कवी कलशास वश करून घेतले. ( शिवचरित्र वृत्र संग्रह १ )
मोगल
इतिहासकार ईश्वरदास नागर लिहितो “ कब कलश औरंगजेबाच्या नोकरीत होता व
त्याचे नाव कब कलस असल्याची नोंद करतो . १६५८ साली झालेल्या औरंगजेब व
दाराशुकोह यांच्यातील युद्धात औरंगजेबाच्या बाजूने संदेश पोहचवण्याचे काम
करत असल्याची नोंद करतो. ईश्वरदास नागर १६६६ साली शिवाजी महाराजांच्या
आग्र्याच्या भेटीवेळी लिहितो महाराज गोकल नावाच्या ब्राम्हण पुरोहिताच्या
घरी राहिले. या पुरोहितास महाराजांनी “ कवी कलश “ अशी पदवी दिली.
मोगल
इतिहासकार ईश्वरदास नागर कवी कलशाबद्दल परस्परविरोधी विधान करतो. १६५८
साली कब कलश अशी नोंद करतो परंतु कवी कलश हि पदवी १६६६ शिवाजी महाराजांनी
दिल्याचे सांगतो.
चिटणीस
बखरीतील नोंदीनुसार :- कवी कलुषा कबजी म्हणोन कनोजा ब्राम्हण बहुत विद्वान
मंत्रशास्त्र विद्या आगम त्यास बहुत गम्य असे होते. त्याची स्त्रीही चतुर
होती. त्यांनी महाराजांस वश करावे म्हणून वशीकरणमंत्र प्रयोग करून
महाराजांची जवळीक व कृपा संपादून अगोदर समीप राज्याभिषेकापूर्वी होतेच
भट
पेशवे घराण्याची हकीगत :- छत्रपती संभाजी महाराजांना केशवभट कबजी म्हणोन
कोणी हिंदुस्थानी ब्राम्हण मांत्रिक होता त्याने वश केले त्याने सांगेल
त्याप्रमाणे करावे असा प्रकार जाहला
वरील
सर्व बाबींचा विचार करता कवी कलश हा औरंगजेबाच्या पदरी असावा. कवी कलश व
संभाजीराजे यांची भेट ही आग्रा भेटी दरम्यान झाली असावी. कवी कलशाचे
संपूर्ण नाव त्याचे मूळ ठिकाण याविषयी खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. मराठ्यांच्या
इतिहासाची साधने खंड ८ च्या प्रस्थावनेत राजवाडे लिहितात “ फारशी व
उर्दूत कलुशा म्हणजे कुंटण असा अर्थ आहे. कविकलश ह्या नांवांतील कवि
हीं अक्षरें गाळून कलश ह्या शब्दाचा कळुशा असा उच्चार थट्टेखोर व
मत्सरग्रस्त लोक करूं लागले. “
छत्रपती
शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेस निघाले त्यावेळी रायगडावर गृहकलह चालू
होता. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कर्नाटक मोहिमेत सोबत न घेता
शृंगारपुरला पाठविले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार :- कार्तिक शुद्ध षष्टी ६
रविवार १ नोव्हेंबर १६७६ संभाजीराजे शृंगारपुरास जाऊन राहिले. शृंगारपुरी
शाक्तपंथिय कवी कलश यांच्याशी संभाजीराजांची घनिष्ठ मित्रता झाली . कवी
कलशाने संभाजीराजांस २३ मार्च १६७८ रोजी कलशाभिषेख करविला. अनुपुराणाच्या
मते शिवाजी महाराजांचे निधन , संभाजीराजांचा राज्याभिषेक या घटना कवी कलशास
आधीपासून माहित होत्या. संभाजीराजांनी केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ व
यज्ञाची प्राप्ती म्हणून शाहू राजांचा झालेला जन्म या मागची प्रेरणा कवी
कलश होता.
संभाजी
महाराज दिलेरखानास मिळाले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अथक
प्रयत्नाने ते स्वराज्यात पन्हाळगडी दाखल झाले . ३ एप्रिल १६८० साली शिवाजी
महाराजांचे निधन झाले त्यावेळी गृह्कलह व राजकीय घडामोडी घडून आल्या व
संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. स्वराज्याचे मंत्री व छत्रपती
संभाजीराजे यांच्यात अविश्वास दिसून येतो . त्यामुळे संभाजीराजे कवी कलश
यांच्यातील जवळीक वाढली व त्यांची मैत्री दृढ झाली. २७ ऑगस्ट १६८० रोजी
बाकरे शास्त्रींना दिलेल्या दानपत्रात कवी कलशचा उल्लेख आढळतो .” कवी
कलशाच्या प्रोत्साहनामुळे ज्याच्या डोळ्यात लाली आली आहे. “
सोयराबाई
, अण्णाजी दत्तो व इतर मंत्र्यांनी स्वराज्याविरोधात कारस्थान केले या
आरोपाखाली मंत्र्याना हत्तीच्या पायी देण्यात आले. जेधे शकावलीत कवी
कलशाच्या बोलण्यावरून मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिले अशी नोंद आहे “
भाद्रपद मासी संभाजी राजे यांनी कवी कलश्याच्या बोले मागती आणाजी दत्तो
सचिव यांजवर इतराजी करून मार दिल्हा. त्या माराने राजश्री आनाजीपंत व बाळ
प्रभू व सोमजी दत्तो व हिराजी फर्जंद परळीखाली कैद करून मारिले.
जेधे
शाकावलितील नोंदीनुसार डिसेंबर १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कवी कलशास
कुलएखत्यार नेमले. कुलएखत्यार झाल्यावर कवी कलशाची मुद्रा २२ मार्च १६८५
च्या पत्रात पुढीलप्रमाणे आढळते “विधीरर्थीमनीषीणामवधीर्नयामवर्तमना /
वैशधी: कार्यसिद्धीना मुद्रा कलशहस्तगा // अर्थ – “सर्व याचकांची इच्छा
पूर्ण करणारी, राज्यव्यवहाराचे नियंत्रण करणारी व कार्यसिद्धीचा ठेवा
असणारी ही मुद्रा आता कलशाच्या हातात आहे “ ( पेशवे दफ्तर खंड ३१ )
कवी
कलशाची मुद्रा देखील गर्विष्ठ व अचंबित करणारी आहे. कारण इतर
मंत्रीगणाच्या मुद्रेत आपणास छत्रपतीविषयी आदर व छत्रपतींचे नाव आढळून
येते.
कवी
कलशाने त्याच्या नावामागे अनेक उपपद लावलेली आढळून येतात “ आज्ञापत्र
धर्माभिमान , कर्मकांडपारायण , दैवतैकनिष्ठाग्राहीताभीमान ,सत्यसंघ ,
समस्तराजकार्यधुरंधर , विश्वासनिधी रा.रा. कविकलश “
कवी
कलश व शिर्के यांच्यात वाद निर्माण झाला यासबंधी आपणास चिटणीस बखर, मराठा
साम्राज्याची छोटी बखर , पंतप्रतिनिधीची बखर , मासिरे आलमगिरी यात माहिती
मिळते.
त्यावेळी
संभाजीराजानी कवी कलशाची बाजू घेऊन शिर्क्यांचा पराभव केला. जेधे
शकावलीतील नोंदीनुसार “ शके १६१० कवी कलश याजवरी शिर्के पारखे जाले. कवी
कलश हा पळोन खिलनियावर गेला तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस
आले. समागामे स्वारी सिरकीयांसी युद्ध करून त्यास पळवून खळणीयास आले. “
मोगली
साधनातून कवी कलश मोगलांचा हेर असल्याच्या व फितुरीने संभाजी राजांस कैद
केल्याच्या नोंदी आढळून येतात . केळदिनृपविजय काव्य ग्रंथात , निकोलाय
मनुची , रॉबर्ट ऑम यांच्या लिखाणात “ कवी कलश हा औरंगजेबाचा हेर होता अश्या
नोंदी आदळतात.
औरंगजेबाच्या
दरबारातील इश्र्वरदास नागर फुतुहात –ए-आलमगिरी यात लिहितो “ कवी कलश हा
औरंगजेबाचा हेर होता कवी कलशाने संभाजी विरुद्ध फितुरी केली”. “ औरंगजेबाने
रायगडाची प्रतिमा कवी कलशाच्या मुलाच्या मदतीने बनवून घेतली” अशी नोंद
करतो.
औरंगजेबाच्या
दरबारातील खाफीखान लिहितो “मुकर्रबखानाने तीन हजार सैन्यासह अकस्मात हल्ला
केला असता कवी कलश एकनिष्ठ म्हणून प्रख्यात होता. तो काही सैन्यासह मोगली
सैन्याशी लढण्यास आला असता त्याच्या हाताला बाण लागून जखमी झाला. त्यावेळी
संभाजीराजे पळून जाण्यासाठी घोड्यावर स्वार झाले होते. कवी कलशाने त्यांना
आवाज दिला “ मी मागे राहिलो “ तो ऐकून संभाजीराजे घोड्यावरून खाली उतरले.
संभाजी
महाराज व कवी कलश यांना साखळदंडामध्ये कैद करून औरंगजेबासमोर आणण्यात आले.
औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला व जमनीवर डोके ठेऊन अल्ल्हाची पार्थना
करू लागला. त्यावेळी कवी कलश यांनी एक काव्य केले. ,"हे राजा (छत्रपती
संभाजी महाराज) तूला पाहिल्यानंतर बादशाह आलमगीराला आपल्या दिमाखदार आणि
ताकदवान असलेल्या त्याच्या सिंहासनावर बसणे अशक्य झाले आहे आणि तो तूला
सलाम करण्यासाठी आपले सिंहासन सोडून खाली आला आहे !
सदर
काव्य ऐकून औरंगजेबाने कवीकलशाची जीभ छाटण्याचा आदेश दिला. कवी कलशाने
केलेले काव्य कलशाची संभाजी महाराजांविषयीची एकनिष्ठता दर्शवते.
कवी कलशाची समाधी तुळापुर व वढूबुद्रुक येथे असून वढूबुद्रुक येथील समाधीवर खालील काव्यपंक्ती कोरण्यात आल्या आहेत.
यावन रावण कि सभा मे संभू बंध्यो बजरंग /
लहू लीसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग //
ज्यो रवी छबी देखतही खद्योत होत बदरंग /
त्यो तव तेज निःर्के तखत त्यजो अवरंग //
यवनरूपी ( औरंगजेब ) रावणाच्या सभेत बजरंगाप्रमाणेच संभाजीराजानाही
बंधनात आणण्यात आले आहे. रणरंग खेळल्यामुळे रक्ताळलेले संभाजीचे अंग
शेंदूर फसलेल्या हनुमंताप्रमाणेच दिसत आहे. आकाशात सुर्वोदय झाल्यावर
ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात. त्याप्रमाणे हे संभाजीराजा
तुझ्या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तख्ताचा ( सिंहासन ) त्याग केला आहे.
सदर समाधी कोणी व कधी बांधली याविषयी तत्कालीन नोंदी आढळून येत नाहीत .
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- जेधे शकावली , चिटणीस बखर , सभासद बखर , परमानंद काव्य ,
शिवचरित्र वृत्र संग्रह १ , पेशवे दफ्तर खंड ३१, मराठी दफ्तर रुमाल २
छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ :- जयसिंग पवार
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : -सदाशिव शिवदे
Shivaji’s visit to Aurangjeb at Agra
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८
छत्रपती संभाजी महाराज : -गोविंद सरदेसाई