विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 April 2023

#महाराणी_येसूराणी

 


#महाराणी_येसूराणी
ईश्वराने निर्माण केलेले दुःख बहुतांशी दुःखमय असते हे तर खरेच पण एक व्यक्ती जेव्हा स्वतःच्या सुखदुःखांना तिलांजली देऊन समर्पणाच्या भावनेतून राष्ट्रकल्याणासाठी स्वतःला झोकून देते तेव्हा त्या व्यक्तीचे महत्त्व ईश्वरापेक्षाही कमी नसते.छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन घडवताना जिजामातेने आपल्या संस्कारांमधून त्यांच्या मनात जो स्फुलिंग पेटवला तो त्या काळाशी सुसंगत होता. स्वतःचा देश म्हणून घेण्याइतकी आमच्याकडे वितभर भूमी नव्हती. आपण परक्यांच्या गुलामगिरीच्या चिखलात पडत असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.स्वतःच्या धर्माच एक स्वतंत्र राष्ट्र असावे असे स्वप्न पाहणारा कुणी वीर त्याकाळी जन्मला नव्हता. आणि याच एका इर्षेपोटी राजमाता जिजाऊंनी शिवाजी राजांना एक धैर्यशाली वीर पुरुष बनवण्याचा विडाच उचलला होता,शिवबाला घडवायला जिजाऊंना अवधी होता, त्या काळात आता इतके अस्थैर्य न्हवते म्हणूनच तर छत्रपती शिवरायांच्या हातून स्वतंत्र हिंदू राष्ट्राच्या अस्तित्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली परंतु येसूबाईंचे काय????
आपण आपल्या सासूबाईंच्या इतके महान बनु शकतो याचा क्षणिक विचारही त्यांच्या मनात आला नसावा किंबहुना तो विचार करणे इतका वेळही त्यांना मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात फार मोठी स्थित्यंतरे घडत होती आपापसातील कलहातून संभाजी राजांना दगा,त्यातून औरंगजेबाच्या हातून घडलेली त्यांची हत्या त्यामुळे येसूबाईंवर कोसळलेल्या आपत्तीला पारावार उरला नव्हता.इकडे सारा महाराष्ट्र घशात घालण्याच्या इर्षेने मोगलांचा महाराष्ट्रभर हैदोस चालला होता.अशा भीषण परिस्थितीत राजमाता जिजाऊं सारख स्वतंत्र राज्याच स्फूलिंग येसूबाईंना आपल्या मुलात पेटवता आल नाही हा काही त्यांचा दोष नव्हता.
तो एक नियतीचा आघात होता परंतु अशाही परिस्थितीत विचलित न होता त्यांनी मराठ्यांमध्ये स्वातंत्र्याची व आपल्या छञपती संभाजी राजांच्या अमानुष हत्येबद्धल चिड निर्माण करून मराठ्यांना आपल्या कर्तव्याची आणि स्वाभिमानाची जाणीव करून दिली.येसूबाईंचे हे मौलिक कार्य इतिहासाला नजरेआड करता येणार नाही.
स्त्रीची पूजा घरातच होते,नशिबी असेल तर नवरा, मुलगा कुणी ना कुणी तिला भक्तीने फुल वाहतो परंतु घराबाहेर तिच्या वाटेला काटेच असतात.ज्या जिद्दीने छत्रपती शिवरायांनी या हिंदू राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली तेवढ्याच वेगाने ते छिन्नविच्छिन्न होऊ पाहत होते त्याला सावरण्याचं महान कार्य येसूबाईंनी केलं.देश विघटनाच्या मार्गाला लागला होता.औरंगजेबाने रायगडाला वेडा घातला अस्तित्वाची शाश्वती उरली नव्हती.अखेर परंपरेने चालून आलेले राज्याचे स्वामित्व न घेता येसूबाईंनी महाराष्ट्राच्या सिंहासनावर राजारामाराजांची स्थापना केली.जीवनाच्या प्रत्येक मूल्यांची किंमत चुकवल्याशिवाय त्याला श्रेष्ठत्व येत नाही. येसूबाईंनी स्वराज्यासाठी यवनांचे पारतंत्र स्वीकारले व आपल्या मुलासह त्या औरंगजेबाच्या छावणीत 29 वर्षे खितपत पडल्या.ज्या काळात स्त्री चे जीवन अंकुरते, फुलते अशा काळात हर्ष उल्हासाच्या काळात या महान स्त्री ने पारतंत्र्याच्या नरकवासाला आपलंसं केलं.
येसूबाईंनी केलेला हा त्याग महान होता.मानवी जीवन जेव्हा तत्त्वांच्या सहाणेवर झिजते तेव्हा आदराचे चंदन निर्माण होते. येसूबाईंचे जीवन यापेक्षा वेगळे नव्हतं.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा निर्वाणीची वेळ आली तेव्हा येसूबाईंनी आपल्या मुलाच्या सुटकेच्या बदल्यात तीस वर्षे मुगलांच्या पारतंत्र्याच्या श्रृंखलेत स्वताला अडकून घेतले.आपला मुलगा कर्तुत्ववान आहे, तो स्वतंत्र झाल्यावर या पारतंत्र्यातुन आपली सुटका करेल या आशेवर त्या दिल्लीत दिवस काढत होत्या. काळ हा सर्वभक्षक ही नाही आणि सर्व रक्षकही नाही तो एक द्रष्टा आहे.सृष्टीत चाललेल्या घडामोडींचा यथार्थ वर्णन करणारा तो निःपक्षपाती इतिहासकार आहे.
महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेला भद्रकाली,महिषासुर मर्दिनी म्हणलं जात,तर येसूराणी स्वार्थत्यागाची मूर्तिमंत सगुण मूर्ती संयमी आणि धीरोदत्तता धारण करणारी एक धैर्यशालिनी शांता दुर्गा म्हणून इतिहासाच्या सर्वोच्च स्थानावर पोहचल्या आहेत.
येसूबाईंनी दाखवलेल्या महान त्यागाचा तो साक्षीदार आहे.वीरकन्या,वीरपत्नी, वीरमाता म्हणून येसूबाईंचे कर्तुत्व महान आहे,तिने सर्व संकटांचा अनुभव घेतला होता तिने राज्य स्थापनेतील सर्व आंदोलनांचाही लहानपणापासून बारकाईने अभ्यास केला होता. केशव पंडितांच्या वर्णनाप्रमाणे "ज्वलज्वलन तेजस" असे संभाजी राजे यांनी तिला "राज्ञी" पदाचा समान हक्क प्रत्यक्षात देऊन, तिच्या कारभारावर विश्वासून राहावे असं कर्तृत्व होत. सम्राट औरंगजेबानेही तिच्या कर्तुत्वाचा गौरव करावा इतकी राजकारण कुशल स्त्री होऊन गेली होती.असे इतिहासकार सांगतात "न्यू हिस्टरी ऑफ दि मराठाच" या पुस्तकात रियासतकारांनी या माय-लेकरांबद्दल पुढील गौरवोद्गार काढले आहेत.
"शिवाजी-जिजाऊ प्रमाणेच शाहू आणि येसूबाई"
हे नाव महाराष्ट्राच्या मनात कायम कोरले गेले आहे ते वर्णन सर्वस्वी यथार्थ वाटतं परंतु एका गोष्टीची शोकांतिका वाटते पेशव्यांच्या इतिहासात अनेक कर्तुत्वान आणि बेईमान माणस जन्मली आणि मेली त्यांच्या जन्ममरणाच्या वेतनवार नोंदी पेशवे दप्तरात सापडतात. परंतु तिच्या त्यागामुळे महाराष्ट्राने नतमस्तक व्हावे,असे एका थोर स्त्रीची जन्मतारीख उपलब्ध नसावी याच्या पेक्षा मोठी शोकांतिका आणि दुर्दैव कोणतं?.
संदर्भ ग्रंथ- छत्रपती थोरले शाहू महाराज सातारा.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...