औरंगजेबाचा दरबार भरला होता,एका उंच आसनाकडे दाढी कुरवाळत आणि हातातले माळेचे मणी मोजत तो दिल्लीचा महत्वकांक्षी बादशहा अबुल मुजजफ्फर मुहीउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर म्हणजे औरंगजेब शांत मनाने येत होता होता.त्याच्या शेजारी एका मखमली पडद्याआड एक 50 ची स्त्री त्याची मूलगी झीनत बसली होती.साधारण 80 च्या पुढं गेलेला वृद्ध झालेला तो आलमगीर आपल्या पांढऱ्या-सोनेरी दाढीवरून हात फिरवत सज्ज झाला.डोक्यावर पडलेलं टक्कल चांगलच चमकत होत.आपल्या मनसबदार,सरदारांचे कुर्निसात त्याने मंजूर केले काही पराक्रम गाजवणाऱ्यांना खिल्लती वाटल्या जात होत्या.
त्याच वेळी येसूबाई आणि बालशिवाजी यांना दरबारात हजर करण्यात आलं.येसूबाईंनी पाहताच औरंगजेब आपली बैठक ताठ करत सावध बसला.सौभाग्यवतीच्या कुंकवाने भरलेलं ते कपाळ आज पांढऱ पडलं होत.पांढरीपण भरजरी साधी नेसलेल्या येसूबाईदेवी सारख्या भासत होत्या,रायगड हातात आला पण मराठ्यांचा राजा सापडू दिला नाही याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.येसूबाईंच्या चेहऱ्यावर किंचितही भय न्हवत.ते तेज पाहून औरंगजेबाने सुद्धा नजर झुकवली. समोर सात आठ वर्षाच कोवळं लेकरू आपली नजर खाली करत पायाच्या अंगठयांन जमिनीशी खेळत होत.अंगावर भरजरी वस्त्र,कमरेला छोटी तलवार,डोईवर रेशमी मोत्यांच्या तुऱ्याचा राजेशाही फेटा,आई जगदंबेची छोट्याशा कवड्यांची माळ अधिकच उठून दिसत होती,गळ्यात मोठ्याच्या माळा त्याच्या छोट्याशा छातीभोवती गुंडालेल्या छोट्याशा रेशमी शेल्यात एक भरजरी वस्त्र आणि सोन्या-मोत्यांनी सजवलेली कट्यार,कानात कर्णफुले,हातात सोन्याचं कडं आशा रूपातील तो बालशिवाजी तितकाच रुबादर आणि देखणा दिसत होता.
"नाम क्या है तुम्हारा?"
औरंगजेब त्या छोट्याशा मुलाकडे पाहत मोठ्या गुर्मीत धमकावत विचारता झाला.क्षणाचा ही विलंब न करता बालशिवाजी ची नजर वर गेली ती थेट औरंग्याच्या डोळ्यात,हाताच्या मुठी आवळत तो युवराज नजर रोखून त्या आलमगीर औरंगजेबकड पाहत होता,त्याला कसलीच भीती वाटत न्हवती.औरंगजेब थरारला,थोडासा सावरला.तीच नजर,तसाच साज आणि अशाच बुलंद छातीचा संभाजी याच खेळण्या बागडण्याच्या वयात दिल्ली च्या दरबारात असाच दिल्लीच्या मुघल तख्तावर बसलेल्या आलमगीर औरंगजेबाला डोळ्यात डोळे घालून रोखत उभा होता.तो प्रसंग औरंगजेब अजून विसरला न्हवता. शिवाजीनं माझी खैरात उधळून लावली होती,सारा दरबार भयभीत होता पण असाच याचा बाप संभाजी आपल्या समोर छाती फुगवत उभा होता.औरंगजेबाला विश्वास बसत न्हवता पण हा नियतीनं घडवलेला योगायोग होता.इतिहासान पुन्हा एकदा मराठ्यांच्या लेकराचं रुद्र रूप त्याला दाखवलं होत.
"सुना नहीं हमने क्या पुछा,नाम क्या है तुम्हारा?"
औरंगजेब स्वतःला सावरत पुन्हा गरजला.
"शिवाजी संभाजीराजे भोसले" आपल्या शरीरातीलसगळी ताकद एकवटत बाळ शिवाजीनं आपलं नाव सांगितलं.औरंगजेबाला नीट ऐकू गेलं न्हवत तो पुन्हा रोखून म्हणला."जरा ठिकसे नाम बताना,अब तो हमेशा मुझे आपको बुलाना पडेगा" हसत औरंगजेब म्हणाला.
"आप हमारा नाम कभी भुलेंगे नहीं, क्योकी मेरा नाम मेरे दादाजी के नाम से रखा है,शिवाजी संभाजीराजे भोसले" मोठ्या विजयी तोऱ्यात बाल शिवाजी ने आपला परिचय खड्या आवाजात करून दिला.शिवाजी नाव ऐकताच तख्तावर बसलेला औरंगजेब ताडकन उभा राहिला.सारा दरबार हादरला होता, झटपट मुजरे जडले,कुर्निसात पडले. आपलं तख्त सोडून तो आलमगीर खाली आला. अगदी बालशिवाजी च्या जवळ आला.शिवाजीनं आईचा हात घट्ट पकडला.एकदा येसूबांईंकडे पाहिलं आणि बाल शिवाजी कड पाहून तो विचार करु लागला.याचा आजा शिवाजी असाच आपल्या दरबारात खिल्लत उधळून लावला दरबाराचा अपमान केला होता,मुघलांच्या हातावर तुरी देत कैदेतून गायब झाला होता.अजून एक शिवाजी त्याचा समोर उभा होता उमर कमी होती पण रुतबा तसाच होता.औरंगजेब तडफडत होता पण काहीच करू शकत न्हवता. "शिवाजी नामसे हमे नफरत है,हम आपका नाम बदलेंगे" औरंगजेबाचा आवाज गंभीर होत होता.छोटासा बाळ शिवाजी सुखावला होता.आपल्या आईने सांगितलेल्या आजोबांच्या पराक्रमी कथा त्याला खऱ्या वाटू लागल्या होत्या.
"तुम्हारा दादा शिवाजीने हमारी पुरी सलतनत को परेशान किया था, सैतान जैसा शिवाजी हमे छलता रहा....लेकिन मै तुम्हे सच्च आदमी बनाउंगा" हसत हसत औरंगजेब बोलत होता.
येसूबाई आणि शिवाजी सोबत मराठी लोकांचं लक्ष औरंगजेबकडं होत. बालशिवाजी च नाव त्यानं साव ठेवलं,साव म्हणजे शांत,सच्चा.पुढं साव च शाहू झालं आणि शंभूपुत्र शिवाजीचा शाहू झाला होता. औरंगजेबान तहात ठरवल्याप्रमाने कैदी केलेल्या मराठी स्त्रियांना सुरक्षेची हमी दिली,शाहू राजांना स्वतंत्र राजा म्हणून मान्यता दिली,आता शाहू राजे कैदेत होते पण राजे होते कैदेतील 600 मराठा सेवक शाहूंच्या सेवेला हजर होती.शिवाय काही मराठी सरदार मंडळी शाहूंच्या सोबत देत सात हजारांची मनसब शाहूराजांना दिली.आता शाहू राजे मुघलांचे मांडलिक होते पण कैदेत होते.शाहूंच वय कमी असल्याने त्यांची जहागिरी सभाळण्याचं काम येसूबाई करायच्या 'येसूबाई-ए-वालिद-शाहू-सन-अहद' आशा शिक्का येसूबाईंना दिला.शाहूंना औरंगजेबाने आपल्या छावणीत कैद केले होते.सोबत झीनत म्हणजे औरंगजेब याची मुलगी असायची तिला हा छोटासा शाहू खूप आवडायचा.कारण औरंगजेब च्या छावणीतील वातावरण कायम दुखवट्या सारख असायचं,सैनिकांचे आणि सरदारांचे अपमानाने पडलेले चेहरे पाहण्यापेक्षा टवटवीत आणि आकर्षक शाहू राजाचा सहवास कोणालाही आवडणार होता,झीनत च लग्न झालं न्हवत त्यामुळे मूलबाळ नसल्यानं ती शाहूंना मुलासारखा जपत होती.शाहू अतिशय शांत होते पण जिज्ञासू होते. जोत्याजी केसरकर शाहूंना युद्ध शिक्षण देत होते तर येसूबाई जिजाऊंच्या रूपांन पुन्हा एकदा एक शिवाजी घडवीत होत्या.शाहू सुद्धा हळू हळू सगळ्या कसोटीत उतरत यशस्वी होत होते.औरंगजेबाच्या अगदीच जवळ असल्याने त्यांचं लक्ष प्रशासनावर जास्त होत,ती प्रशासनाची पद्धत ते आपल्या मनात साठवत होते.पण दुर्दैवाने ते कैदेत होते.
(टीप - सदर प्रसंग हा काल्पनिक असून खालील संदर्भ सुचीच्या आधारावर मांडला आहे.)
संदर्भ- थोरले शाहू महाराज चरीत्र-आसाराम सैदाणे,
छत्रपती राजाराम महाराज-वा सी बेंद्रे,
छत्रपती संभाजी महाराज उत्तरार्थ-वा सी बेंद्रे.

No comments:
Post a Comment