विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

#एका_हरणाची_गोष्ट #चंद्रसेन_जाधव

 


#एका_हरणाची_गोष्ट
दमाजी थोरात आणि उदोजी चव्हाण या दोघांनी शाहूंच्या विरोधात बंड केलं होतं. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शाहूराजांनी चंद्रसेन जाधव आणि बाळाजी विश्वनाथ यांना पाठवलं या दोघांच्या सैन्याचा तळ एका ठिकाणी पडलेला होता बाळाजी कडे जे सैन्य होत हूजरातीच सैन्य होतं.राजाच्या रक्षणार्थ ठेवलेली जी फौज होती त्या फौजेला हुजरातीची फौज असं म्हणायचे आणि त्या हुजरातीच्या फौजेच नेतृत्व प्रधान म्हणजे बाळाजी विश्वनाथ कड होत. या हुजरातीच्या सैन्यामध्ये पिराजी राऊत नावाचा एक सरदार होता अशीच छावणी निवांत पडली होती म्हणून पिराजीने त्या ठिकाणी जंगलात जाऊन शिकारीचा बेत केला काही लोक गोळा केले,हाकारे आले आणि रानात ते सावज शोधू लागले,बराच वेळ शोधूनही काही सापडेना,हाकारी जीवाच्या आकांताने हाकाट्या पिटत होते,भांड्यांचा आवाज करून सावज हुसकावत होते.परंतु सावज काही केल्या हाती लागेना आणि नेमकं हकारी मंडळींच्या आवाजाने एक हरीण भांबवलेल्या अवस्थेमध्ये पिराजी रावताला दिसलं.पिराजी राऊत सावध झाला.भाला सज्ज झाला,शिकारीचा पवित्र घेतला आणि पिराजी भाला मारणार तोच हरीण उड्या मारत पळत सुटलं.काही करून हरीण मारायचं म्हणून पिराजी घोड्यावरून भाला सावरत धावू लागला.पळता पळता ते हरीण चंद्रसेन जाधवांच्या सैन्यतळात शिरलं आणि घाबरून ते एका राहूटीमध्ये घुसलं.आता ही राहूटी चंद्रसेन जाधवांच्या कारकुनाची म्हणजे व्यासराव या ब्राह्मणाची होती. हरणाच्या माग माग पिराजी त्या व्यासरावाच्या राहूटी जवळ आला. व्यासरावाकडे हरिण मागू लागला तर व्यासरावांनी स्पष्ट सांगितलं.
"आम्ही ब्राह्मण लोक आमच्या आश्रयाला आलेल्याच रक्षण करणार हरीण तुम्हाला मिळणार नाही"
हे व्यासरावांचे शब्द ऐकून पिराजी संतापला.
"हरीण माझी शिकार आहे ते मला द्या असा पवित्रा घेतला."
व्यासराव काही करून देत नव्हते,शेवटी वैतागून पिराजींनी हरणाच्या दिशेने भाला फेकला आणि व्यासराव मध्ये येऊन तो भाला व्यासरावांच्या हाताला लागला. व्यासराव जखमी झाले आता ही गोष्ट व्यासरावांनी चंद्रसेन जाधव यांना सांगितली. पिराजी घाबरला तोही बाळाजी कडे धावत गेला आणि घडला प्रसंग बाळाजी ला सांगितला.
"पिराजीने मारलेला भाला हा हरणाच्या शिकारीसाठी मारला होता त्यात व्यासराव मध्ये आला त्याला भाला चुकून लागला म्हणून त्याची शिक्षा त्याला आम्ही देऊ"
असं बाळाजी म्हणत होता तर
"चंद्रसेन जाधवांच्या कारकुनाला त्याच्या राहुटीत जाऊन पिराजीनी भाला मारला आणि त्या पिराजीला बाळाजी विश्वनाथ याने आश्रय दिला."
म्हणून चंद्रसेन जाधव संतापला.चंद्रसेन बाळाजी कडे पिराजी ची मागणी दलागला पण बाळाजी पिराजी ला लपवू लागला.
चंद्रसेन जाधवला हे सहन झालं नाही त्यांनी बाळाजी विश्वनाथ वर हल्ला केला. बाळाजी कडे फौज कमी होती त्यामुळे तो त्याचा मुलगा बाजीराव,चिमाजी,पिराजी यांना घेऊन पळून गेला.त्याच्यासोबत आबाजी पुरंदरे सुद्धा होते.चंद्रसेन जाधव 3000 सैन्य घेऊन बाळाजी च्या मागे लागला होता. पुरंदर किल्ल्यावर शाहूंचे सचिव होते तिथे बाळाजी पोहोचला व त्यांच्याकडे आश्रयाला राहू लागला.चंद्रसेन जाधव यांनी सचिवांना खलिता पाठवला.
"बाळाजीला जर तुम्ही आश्रय दिला तर मी तुमचा मुलुख उध्वस्त करेल".
चंद्रसेन जाधव यांनी ठरवलं होतं की काहीही करून बाळाजी चा खात्मा करायचा त्यामुळे त्यांनी पुरंदरावर आक्रमण केलं पण पिलाजी जाधवराव आणि नाथाजी धुमाळ यांनी 500 मावळे एकत्र केले आणि बाळाजी विश्वनाथ ला परिंचे मार्गे पांडवगडला घेऊन जाऊ लागले.
रस्त्यातच निरेजवळ चंद्रसेनाने यांना गाठलं तिथं थोडी चकमक उडाली,मोठ्या हुशारीने पिलाजी जाधवांनी शाहू राजांचे सासरे कान्होजी शिर्के यांच्या मदतीने बाळाजी आणि त्याच कुटुंब पांडवगड किल्ल्यावर पोहचवल.चंद्रसेन जाधव याने पांडवगड ला वेढा दिला.पांडवगड स्वराज्यात असून स्वराज्याच्या सैन्याच्या वेढ्यात,स्वराज्याच्या सैन्याच्या मदतीने लढत होता.
बाळाजी ला कळून चुकलं की आता छत्रपती शाहू राजे सोडून कोणीच आपल्याला या संकटातून सोडवणार नाही,अंबाजी पुरंदरे याने गुप्तपणे घडलेला प्रसंग शाहू राजांच्या कानावर पोहचवला.
शाहू राजांनी मोठ्या आशेने चंद्रसेन आणि बाळाजी यांना दमाजी थोरताचा आणि उदोजी चव्हाण यांचा बंदोबस्त करायला पाठवलं होत पण आपआपसातच क्षुल्लक कारणाने वाद झाला व त्याच रूपांतर मोठ्या लढाईत झालं त्यामुळे शाहू राजे प्रचंड संतापले.
शाहू राजांनी बाळाजी ला अभय दिलं आणि चंद्रसेन आणि बाळाजी यांना साताऱ्याला बोलावून घेतलं.चंद्रसेन मात्र जास्तच संतापला.त्यांनी शाहू राजांना निरोप पाठवला.
"बाळाजी विश्वनाथ माझा गुन्हेगार आहे त्याला आश्रय दिला तर मी तुम्हाला सोडून जाईल"
सेनापती असून चंद्रसेन उद्धामपणे शाहू राजांना फिरून बोलू लागला शाहू राजे प्रचंड संतापले होते,पण शाहू राजे हे खूप संवेदनशील होते.त्यांनी खंडोजी बल्लाळ यांना वाद मिटवायला चंद्रसेन कडे पाठवून दिले.
चंद्रसेन जाधव पुरता अपमानाच्या आगीत होरपळत होता.बाळाजी हा चंद्रसेन यांचे वडील धनाजी जाधवांकडे कारकून होता.बाळाजी आपल्या लाघवी बोलण्याने समोरच्याला वश करायचा आणि त्याला आपल्यात सामील करून ग्यायचा.
ताराराणींनी शाहूंच्या पक्षातील काही लोक स्वतःकडे वळवून घेऊन पन्हाळा किल्ला घेतला होता त्यामुळे शाहूंनी आपले मंत्री मंडळ बदलून टाकले त्यात त्यांनी प्रधान म्हणून बाळाजी ला नेमले आणि हुजरातीच्या सैन्याचे सेनाकर्ते पद बाळाजी ला दिलं. वरून चंद्रसेन जाधवांकडे असलेलया जमाबंदीचा खर्च बाळाजी ला सोपवला होता त्यामुळे चंद्रसेन ची कामे करणारा बाळाजी आता चंद्रसेन ला काम सांगू लागला म्हणून चंद्रसेन बाळाजी चा प्रचंड द्वेष करू लागला.हा बाळाजी शाहू राजांना गोड बोलून फसवणार आणि राज्य बुडवणार अस चंद्रसेन ला वाटायचं.म्हणून तो बाळाजी वर विशेष लक्ष ठेऊन असायचा.
चंद्रसेन ला बाळाजी वर सूड उगवायचा आयती संधी मिळाली होती,ती गमवायची न्हवती म्हणून चंद्रसेन पांडवगड ला वेढा देऊन होता.चंद्रसेन अहंकाराच्या आगीत छत्रपती शाहू राजांशी अद्धमवागू लागला.हैबतराव निंबाळकर यांना चंद्रसेन जाधवला पकडायची जबाबदारी शाहू राजांनी दिली.हैबतराव नगर ला होता तिथून तो निघाला हैबतराव येत असल्याचे समजताच चंद्रसेन पळून गेला आणि जेऊर ला जाऊन राहिला.बाळाजी चा मुलगा बाजीराव च्या आयुष्यातली ही पहिलीच लढाई होती.
शाहू राजांनी मोठ्या मनाने चंद्रसेन ला पत्र पाठवले की,
"सरकाराशी अवज्ञा करणं तुम्हाला शोभत नाही,सरकारी फौज फितवून सरकारच्या फौजेत कलह निर्माण करणं आपला सेवधर्म नाही,घडला प्रसंग विसरून सलोखा करा".
तरी पण चंद्रसेन ऐकत न्हवता त्याची आस्था ही पहिल्यापासून ताराराणी शी होती.शेवटी हैबतरावांनी हुजरातीच्या फौजेच्या मदतीने चंद्रसेन वर हल्ला केला.पराभूत होऊन चंद्रसेन निजामाला जाऊन मिळाला.आपल्या पराक्रमी पूर्वजांचा वारसा चंद्रसेन ला निष्ठेने सांभाळता आला नाही.
जिजाऊंच्या घराण्यातील अचलोजी यांचा मुलगा संताजी जाधव याला जिजाऊंनी आपल्या सोबत ठेवलं होतं.त्या संताजी चा मुलगा शंभूशिंग जाधव हा मोठा पराक्रमी होता.पिसाळलेल्या हत्तीला वंश करायचं कौशल्य त्याला होत पण तो पावनखिंड मध्ये लढवतात कामी आला.त्याचा मुलगा धनाजी जाधव आणि धनाजी जाधवांची चंद्रसेन आणि शंभूशिंग.चंद्रसेन कायम कधी निजाम,कधी ताराराणी,कधी मुघल असा फिरत राहिला.चंद्रसेन चा भाऊ शंभूसिंग हा शाहू राजांसोबत प्रामाणिक राहिला.शाहू राजांनी त्याला बारामती ची जहागिरी दिली.सेनापती पद सुद्धा दिलं होतं.
संदर्भ- छत्रपती थोरले शाहू महाराज चरित्र,
छत्रपती थोरले शाहू महाराज चिटणीसाची बखर,
शेडगावकर भोसले घराण्याची बखर,शाहू राजांची रोजनिशी.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...