स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे नाव सध्या चांगलच गाजू लागलंय कारणही तसंच सिने अभिनेते प्रवीण तरते यांनी हंबीरराव मामांच्या पराक्रमावर चित्रपट काढला आणि सर्वांना हंबीराव मोहित्यांविषयी आदर निर्माण झाला.आज आपल्या मनात असलेले मोहिते घराणे हे 15 व्या शतकापासून महाराष्ट्र राज्यात आपल शौर्य,धाडस,नेतृत्वआणि कर्तृत्व गाजवत होत.
रतोजी मोहिते नावाचा एक खूप धाडसी सरदार अहमदनगरच्या निजामाच्या दरबारात आपली तलवार गाजवत होता.1584 च्या सुमारास निजामाच्या दरबारातील काही सरदार मंडळी निजामाच्या विरोधात गेली आणि बंड करू लागली.निजाम पुरता घाबरून गेला पण रतोजी मोहित्यांनी आपल्या प्रतिष्ठेच्या आणि मनगटाच्या जोरावर बंड मोडून काढलं आणि निजामाच राज्य वाचवलं.निजामशहा मोहित्यांवर खुश झाला त्यांनी रतोजी मोहित्यांनी 'बाजी' हा किताब दिला.बाजी म्हणजे विजेता.तिथून पुढ रतोजी चे वंशज स्वतःला बाजी मोहिते म्हणू लागले पुढं लोकांच्या मुखी सुद्धा बाजी मोहिते हे नाव येऊ लागले.रतोजी मोहित्यांनी तळबीड ची पाटीलकी मिळवली आणि मोहिते तळबीड ला राहायला आले.या रतोजीला 2 मुलं आणि 1 मुलगी.
संभाजी,धारोजी आणि उमाबाई.
संभाजी मोहित्यांचे लग्न घाटगे घराण्यातील मुलीशी आणि धारोजी च लग्न घोरपडे घराण्यातील मुलीशी झाल.घाटगे आणि घोरपडे आदिलशाही सरदार होते त्यांच्या शिफारशी मूळे संभाजी आणि धारोजी आदिलशाहीत सरदार झाले.
शहाजी राजे भोसले हे निजामशाहीत होते ते निजामशाहीतुन नाराज होऊन आदिलशाहीत आले.आदिलशहा ला शहाजी राजांचा पराक्रम माहीत होता.आदिलशहा ने शहाजी राजांना सरलष्कर 'किताब दिला आणि सुपा,पुणे प्रांताची जहागिरी दिली.निजामाचा एक सरदार साबाजी अनंत याच्याविरुद्ध शहाजी राजांच्या सोबत संभाजी आणि धारोजी मोहित्यांनी चांगलाच पराक्रम गाजवला.शहाजी राजे भोसले आणि संभाजी मोहिते हे एकत्र आले आणि त्यांच्यात मैत्रीपूर्व स्नेह निर्माण झाला,पुढं संभाजी मोहित्यांनी बहीण उमाबाई यांचा विवाह शहाजी राजांसोबत झाला.
इतिहास वाचताना नेमका इथं घोळ होतो शहाजी राजांच्या आईसाहेब मालोजी राजांच्या पत्नी यांचं नाव सुद्धा उमाबाई होतं पण त्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या आणि शहाजी राजांच्या पत्नी उमाबाई ह्या मोहिते घराण्यातील.नावात साम्य असल्यामुळे इतिहास अभ्यास करताना नीट लक्ष न दिल्यास गैरसमज होतो.
संभाजी मोहिते शहाजी राजांचे मेहुणे झाले,शहाजी राजांची शिफारशी आणि मोहित्यांच्या तलवारीवर खुश होऊन आदिलशहाने संभाजी आणि धारोजी यांना तळबीड आणि बालाघाटाची देशमुखी दिली.संभाजी मोहिते आणि धारोजी मोहित्यांचे पराक्रमा मूळे आदिलशहाने त्यांचे कौतुक केल्याचे अनेक दाखले आदिलशाही फर्मानात पहायला मिळतात.
शहाजी राजे भोसले कर्नाटक प्रांतात जायच्या वेळी सुपा परगण्याचा कारभार संभाजी मोहिते यांच्याकडे सोपवला.शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा विचार अमलात आणायचा विचार केला,कार्यवाही चालू झाली त्या वेळी त्यांना संभाजी मोहिते मामाची अडचण जाणवू लागली.तेव्हा शिमग्याच्या सणाला शिवरायांनी संभाजी मोहित्यांनी कैद करून शहाजी राजांकडे कर्नाटक मध्ये पाठवून दिले.
संभाजी मोहिते यांना सोयराबाई आणि अनुबाई ह्या दोन मुली त्यातील सोयराबाई यांचा विवाह शिवाजी राजांसोबत तर अनुबाई यांचा विवाह व्यंकोजी राजांशी लावून दुसऱ्यांदा भोसले-मोहिते घराण्याचा संबंध जुळून आला,दोन्ही घराणी एकमेकांशी निष्ठा बाळगून होती.
शिवाजी राजांचे स्वराज्याचा विचार आणि स्वराज्यप्रति प्रयत्नांना यश येऊ लागले तसं तसं मोहिते घराणं शिवाजी राजांच्या सोबत तलवार गाजवू लागलं.संभाजी मोहिते कर्नाटकात होते तर त्यांचा मुलगा हंसाजी मोहिते प्रतापराव गुजर यांच्या सोबत तलवार गाजवत होते.नेसरीच्या खिंडीत प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले ही वार्ता ऐकून मराठी सैन्य सैरावैरा झालं पण हंसाजी मोहित्यांनी सर्व सैन्यात पुन्हा जोश भरून बहलोलखानावर चाल केली आणि त्याला विजापूर ला पळवून लावलं.हंसाजी यांनी केलेल्या या धाडसामुळे शिवाजी राजांनी त्यांना 'हंबीरराव' हा पराक्रमाचा 'किताब' दिला.त्यांना सरसेनापती पद दिलं.सन १६७४ साली हंबीराव मोहिते स्वराज्याचे सेनापती झाले,14 वर्ष ते सरसेनापती पदावर होते.सरसेनापती म्हणून हंबीररावांची निवड वंशपरंपरेने न होता गुण निकषावर झाली होती.हंबिररावांच्या आधी नेताजी पालकर आणि प्रतापराव गुजर हे मोठे सेनापती होते.ते मोठं पराक्रमी होतेच.पण नुसता पराक्रम असून चालत नाही.सरसेनापती या ठिकाणी पराक्रमासोबत डोक्याचा थंडपणा,सबुरी असायला हवी. मागच्या सरसेनापती च्या बाबतीत महाराजांची झालेली चूक महाराजांनी ध्यानात घेतली.महाराजांनी हंबीरराव यांना सारसेनापती पद देताना पराक्रम,शहाणपण,व्यवहार चातुर्य,राजकारणातील कौशल्य,स्वभावातील मृदुपणा व सबुरी या गुणांमुळे राजांनी त्यांची निवड सरसेनापती पदासाठी केली होती.दक्षिण दिग्विजयात हंबीर रावांनी आपली तलवार चांगली गाजवली.व्यंकोजी राजांचा पराभव करून मोठ्या मनाने स्वराज्य धन्याचा भाऊ आहे म्हणून सोडून दिलं.हंसाजी मोहीते (हंबीरमामा) यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी राजांच्या काळात त्यांना मोलाची साथ दिली आणि स्वराज्य अबाधित ठेवत स्वराज्य वाढीस आपली तलवार गाजवली.मुघल सरदार सर्जाखानासोबत वाईत झालेल्या युद्धात तोफेचा गोळा लागून हंबीराव धारातीर्थी पडले.त्यांच्या मागे त्यांच्या मुलीचा ताराराणींचा विवाह शिवपुत्र राजाराम यांच्याशी स्वतः संभाजी राजांनी लावून दिला.
एका गोष्टीची खंत वाटते ती म्हणजे हंबीररावांसारख्या एवढ्या मोठ्या सेनानी चा इतिहास मात्र काळाच्या आड अजूनही लपून आहे त्याच्यावर प्रकाश पडण्याचा विचार वंशज म्हणून घेणाऱ्याच्या मनात का आला नसावा. हंबीररावांच्या इतिहासाचा उलगडा करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न आम्ही करतच आहोत पण अजून कोणाकडे काही संदर्भ असतील तर संपर्क करावा.
संदर्भ- शिवचरित्रातून आपण काय शिकावे,मराठ्यांच्या इतिहासाची साधने,महाराणी ताराराणी.

No comments:
Post a Comment