विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

#पाटेठाण_ऐतिहासिक_आणि_गौरवशाली_गाव

 


#पाटेठाण_ऐतिहासिक_आणि_गौरवशाली_गाव
भीमा नदीच्या तीरावर वसलेलं पाटेठाण हे छोटसं गाव.दौंड तालुक्याच्या टोकावर,शिरूर-हवेली च्या सीमेवर असणार आपल्या गतवैभवाची साक्ष देणारं छोटसं गाव.गावचा श्री नागेश्वर महादेव म्हणजे या गावच भूषण.पांडव वनवासात असताना या गावात पांडवांनी नागेश्वर महादेव मंदिर बांधले अशे गावकरी म्हणतात.अतिशय सुंदर आणि संपूर्ण दगडी बांधकाम असणारे हे एकमेव प्राचीन मंदिर गावाची शोभा वाढवत आहे.
मंदिराच्या परिसरात असणाऱ्या 7-8 विरगळी पहिल्या आपल्याला इतिहास आठवू लागतो.आपल्या भूमीत,आपल्या भूमीच रक्षण करताना,आपल्याच भूमीतील कोणी वीर धारातीर्थी पडला तर आपल्याच भूमीत त्याच्या शौर्याची गाथा सांगणारा माहितीपट म्हणजे वीरगळ.अशे 8-9 वीरगळ या पाटेठाण पाटेठाण च्या भूमीत आहेत.इथं गोधन वीरगळ आहे म्हणजे कृषी क्षेत्रात हे गाव नक्कीच अग्रेसर होत आणि आहे.शिवाय इथल्या मातीत जन्माला आलेली स्त्री शक्ती सुद्धा लढाऊ असल्याचा पुरावा इथल्या विरगळी मधून दिसून येतंय.दगडी बांधकाम करताना वापरल्या जाणाऱ्या चुन्याच्या घाण्याचा काही भाग इथं आढळून येतो,शिवाय पूर्वी मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्याचे 2 दगडी चाक सुद्धा गावात आढळून येतात.
पाटेठाण गावात 7-8 मोठमोठाले वाडे होते.बाबुराव हंबीर पाटलांची माडी हा सर्वात मोठा वाडा होता.बाबुराव पाटलांची बहीण गावडे घराण्यात दिल्याने त्यांचा पश्चात त्यांच्या बहिणीने गावची पाटीलकी चालवली नंतर पुन्हा ती तिच्या सुनेने म्हणजे कासाबाई गावडे यांनी गावातील रामराव हंबीर यांना जमिनीच्या बदल्यात विकत दिली.(कासाबाई गावडे यांची सहीची खूण नांगर असल्याचा पुरावा व सरकारी कागदपत्रांवर केलेल्या व्यवहारांची नोंद असलेले कागदपत्र कासाबाई गावडे यांचे पणतू मंगेश गावडे यांच्याकडे उपलब्द आहेत). सध्या गावची मुलकी पाटीलकी रामराव हंबीर पाटलांच्या मुलांकडे आहे.शिवाय गावात अजूनही बरेच जुने वाडे आपलं गतवैभव दाखवत पडलेल्या,उदवस्त अवस्थेत दर्शन देतात.गावातील एका वाड्यावर तर मोडी भाषेत लिहिलेला एक शिलालेख सुद्धा आढळून आला.त्याचे वाचन गावातील मोडी भाषा जाणकार मंगेश गावडे पाटील यांनी केलं असून त्यातून काही ऐतिहासिक माहिती समोर आली नाही.
पाटेठाण हे गाव लोकवस्ती आणि क्षेत्रफळाने लहान असल तरी गावाची रचना,गावातील पांढरी (जुन्या वस्तीतील) मध्ये असलेली वाड्याची 10-12फूट उंचीची जोती,गावाच्या जुन्या अवशेषांचे पांढऱ्या मातीतील ढीग,नदीतीरावरील पुरातन यादवीस्थापत्यशैली चे महादेव मंदिर,त्यासमोरील चुन्याची जाती आणि गाड्याची चाक तसेच मंदिरासमोरील विरगळी हे गावातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तू पाहून गावाला इतिहासात नक्कीच महत्वाचं स्थान असेल हे जाणवते पण तसा उल्लेख व पुरावे असल्याशिवाय त्या वस्तुंना व वास्तूंना मान्यता देता येत नाही.ह्या गोष्ठी चा शोध घेत मंगेश गावडे यांनी शोध मोहिमेतून गावाचे इतिहासात असलेले उल्लेख शोधण्यात यश मिळवले.
शालिवाहन शके 1699 साली जेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांची सत्ता महाराष्ट्र भर होती त्यांनी पाटेठाण ता.सांडस प्रांत पुणे हा गाव रामचंद्र नारायण यांच्याकडे होता तो राजश्री निळकंठ गोविंद गोसावी यांच्या ताब्यात दिला होता.तशा आशयाच पत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे प्रधान माधवराव नारायण यांच्या शिक्कानिशी आढळून आलं आहे.
श्रीमंत रायरीकर खाजगीवाले यांच्या पत्रव्यवहारांच्या मोडी कागडपत्रानुसार निळकंठ गोसावी यांनी 17व्या शतकाच्या सुमारास पाटेठाण गावच पुरातन श्री नागेश्वर महादेव मंदिर जे जीर्ण होत त्याचा जिर्णोद्दार करून सरकारी शिबंधी साठी एक वाडा आणि पागा बांधल्याचा उल्लेख आढळून आला आहे.
पुढं 1704 मध्ये तुकोजी होळकर यांनीं नीलकंठ गोसावी यांना पत्र पाठवून पाटेठाण गावात व परिसरात जो जकात,धान्य आणि वैरण गोळा केली होती ती त्या काळी असलेल्या मनाचीटी ( मनाचीटी गाव नक्की कोठे याचा शोध चालू आहे) इथे पोहचविण्याची सोय करावी आणि पाटेठाण गावाला कसलाच उपसर्ग म्हणजे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशी ताकीद दिल्याचं एक पत्र सुद्धा मोडीमध्ये आढळून आलं आहे.
जेष्ठ इतिहास तज्ञ राजवाडे यांनी ह्या पत्राची लिप्यांतर करून ठेवली आहेत.भारतीय पुरातन इतिहास मंडळ येथे ही पत्रे पहायला मिळतात.
काही लोकांना देवत्वाचा मान निसर्गाने दिलेला असतो,त्यांच्याकडून जगाच्या कल्याणाची व मानवाची हिताची कार्य करवून घेतली जातात.अशी लोक खुप दुर्मिळ असतात पण गणपतबाबा हंबीर,रामबाबा हंबीर,विठाबाई हंबीर अशी हंबीर घराण्यातील देवत्व मिळालेले महान महात्मे या भूमीत घडले आणि त्यांच्या आशिर्वादाने आजही पाटेठाण गाव अतिशय आनंदात आणि सुख समाधानाने नांदत आहे.गणपत हंबीर बाबांची समाधी व मोठा मठ गावात आहे.रामबाबा यांचं सुद्धा मोठं आकर्षक मंदिर गावात आहे शिवाय विठाबाई हंबीर यांच्या वाड्याच्या जागी त्यांचं सुद्धा मंदिर त्यांच्या वारसदारांनी बांधलं आहे.
शिवाय गावात असलेल्या भीमा नदीमध्ये आतिशय आकर्षक आणि नैसर्गिकरित्या तयार झालेले रांजण खळगे सुद्धा पाहायला मिळतात.निसर्ग,इतिहास,पर्यटन आणि शेती सर्व बाबतीत पाटेठाण गाव इतर गावांपेक्षा कितीतरी पटींनी अग्रेसर आहे यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...