विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 22 April 2023

#जोगवडीचे_राजे_भोसले #सुपा_परगणा_प्रमुख #थोरल्या_शाहूंचा_न्यायनिवाडा

 


#जोगवडीचे_राजे_भोसले
धर्मवीर संभाजी महाराजांचे पुत्र थोरल्या शाहू महाराजांनी आपल्या विलक्षण राजकीय प्रशासन कौशल्याने संपूर्ण भारतभर मराठे सरदार नेमून दिले आणि हिंदुस्थानवर सत्ता प्रस्थापित केली.1741 च्या गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉय च एक पत्र नुकतंच समोर आलंय त्यात तो अस लिहितो की 'आजच्या घडीला संपु्र्ण हिंदूस्तान महान मराठा राजा शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली आहे'.शाहू राजांनी एकाच मुलखात 3-4 प्रतिष्ठित सरदारांना पाटीलकी,देशमुखी आणि वतनदारी दिली त्यांच्यामुळे एक हाती सत्तेचा बिमोड झाला.एका मुलखावर एक वतनदार असेल तर तो रयतेला त्रास द्यायचा,मनमानी करायचा परंतु शाहू राजांनी एकाच मूलखावर अनेक वतनदार नेमल्याने सर्व जण मिळून मिसळून कारभार पाहू लागले.शाहू राजांनी दिल्लीच्या बादशहाकडून दक्षिणेतील सगळे सुभे स्वतःच्या ताब्यात घेतले होते.काही प्रदेश निजामाच्या ताब्यात होता.निजाम,मुघल यांच्या ताब्यातील प्रदेशाची जबाबदारी शाहू राजे आपल्या पराक्रमी सरदारांना द्यायचे.त्या प्रदेशावर ताबा ग्यायला पाठवायचे अस करत करत शाहू राजांनी सर्व भारतात आपले सरदार,सरंजामदार,मोकासदार तैनात केले.वतनदार आणि सरंजामदार यांच्यात कायम आपल्या कामाविषयी व मोकास,सरंजाम किंवा जमिनी वरून वाद व्हायचे ते वाद मिटवायच काम थोरले शाहू महाराज तक्ताच्या वाड्यातील सदरेवर करायचे.शाहू राजांच्या दरबारात झालेला एक न्यायनिवाडा आणि शाहू राजांनी दिलेला ताम्रपट विषयी आज आपण माहिती घेऊ.
सुपे परगणा हा प्रांत मालोजी राजे भोसले यांच्या काळापासून राजे भोसले घराण्याकडे होता.पुढं शहाजी राजांनी या प्रांताचा कारभार आपल्या मेहुण्याला संभाजी बाजी मोहिते यांच्या कडे सोपवला.हे संभाजी मोहिते म्हणजेच हंसाजी (हंबीरराव) मोहित्यांचे वडील.संभाजी मोहिते यांच्यामूळे स्वराज्य स्थापन्याच्या कार्याला अडथळा येऊ लागल्याने छत्रपती शिवाजी राजांनी त्यांना कर्नाटक मध्ये शहाजी राजांकडे पाठवून दिले आणि स्वतः शिवाजी राजे सुपा परगणा सांभाळू लागले.
छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर संभाजी राजांनी या मुलखावर लक्ष ठेवले, नंतरच्या काळात संभाजी राजांच्या नंतर शाहू राजांनी त्या परगण्यावर आपली माणसं नेमली.
सुपेपरगणा प्रांतात असलेल्या जोगवडी गावची पाटीलकी ही राजजी राजेभोसले यांच्याकडे होती.त्यांच्या घरातील एक भाऊबंद खेलोजी भोसले यानी सातारा दरबारात जाऊन शाहू राजांकडे तक्रार केली की,राजजी भोसले आणि साखरोजी भोसले हे दोघे माझी पाटीलकी खातात,तिच्यावर माझा अधिकार आहे.
शाहू राजांनी राजजी भोसले यांना दरबारात बोलावून घेतलं आणि त्या संबंधी विचारणा केली.राजजी आणि साखरोजी भोसले यांनी सादर केलेल्या पुराव्या वरून राजजी आणि साखरजी भोसले यांना शाहू राजांनी जोगवडी गावची पाटीलकी दिली.सोबत खेलोजी भोसले याचा पाटीलकी शी संबंध न्हवता पण नात्यातील असल्याने पाटलांचा वारस म्हणुन त्याला साडे सात चावर जमिनिपैकी दीड चावर जमीन खेलोजी भोसले याला द्यायची आज्ञा दिली.उरलेली 6 चावर पैकी 3 चावर साखरोजी आणि 3 चावर राजजी भोसले यांना वहिवाट करून समान अधिकार दिले.होळीच्या सणाला पोळी बांधायचा मान राजजी भोसले यांना दिला.सोबत पुरातन वतनाच्या सनदी जमा करून नवीन सनद ही ताम्रपट बनवून राजजी भोसले पाटील यांच्याकडे दिली.
शहाजी राजांच्या सैन्याला सुपा प्रांतात असताना सुल्तानजी बिन मानाजी भोसले पाटील याने रसद पुरवली होती.जेवण घातले होते शिवाय शिबंदी पुरवून लढाईत मदत केली होती, त्यावर खुश होऊन सुल्तानजी भोसले पाटील यांना जोगवडी शिवारातील साडे सात चावर जमीन इनामात दिली होती.तिचा उपभोग राजजी भोसले,खेलोजी आणि साखरोजी घेत होते,साखरोजी ला नाव साखरखान म्हणायचे त्यामुळे खेलोजी भोसले ला वाटायचे की साखरोजी हा कोणीतरी दुसऱ्या धर्मातील असावा म्हणून त्याने राजजी भोसले यांनी विचारल्यावर राजजी भोसल्यांनी सांगितलं होतं की साखरोजी हा आपल्यातीलच आहे पण खेलोजी ला ते न पटल्यामुळे त्याने शाहू राजांकडे या गोष्टीचा निकाल लावायचा अर्ज केला होता.
सवाल जवाब झाल्यावर हे सिद्ध झालं की साखरोजी हा राजजी आणि खेलोजी चा भावबंध आहे म्हणून शाहू राजांनी तिघांना मिळून जमिनीची वाटणी करून दिली,पाटीलकी ही राजजी भोसले आणि साखरोजी भोसले यांनी दिली.शाहू राजांचा शासन आणि शाहू राजाचा न्याय हा सर्वांना मान्य असायचा,शाहू राजांनी न्यायनिवाडा केला तर फिर्यादी व वादी दोघांनाही समाधान होईल पण कोणावर अन्याय होणार नाही असा न्याय शाहू राजे द्यायचे.शाहू राजाच्या विरोधी बंड करणारे उदाजी चव्हाण,दमाजी थोरात,खटावकर या लोकांचा सुद्धा शाहू राजांनी त्यांच्या पूर्वजांच्या स्वराज्यवरील निष्ठा आणि गाजवलेल्या पराक्रमाचा विचार करुन योग्य तो सन्मान केला.नाईलाजास्तव बंड खोरांवर कारवाई करावी लागली.
शाहू राजांच्या नंतर च्या काळात ह्या राजजी भोसले यांच्या घराण्याकडे सुपा परगणा सभाळण्याची जबाबदारी मिळाली.ती आजवर राजजी भोसले यांचे वंशज सांभाळत आहेत सातारच्या राज गादीचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या वतीने श्री सुनील राजे भोसले सुपा परगणा प्रमुख म्हणून कारभार पाहत आहेत त्यांचे सातारा गादीशी सलोख्याचे संबंध आहेत,उदयनराजे त्यांना भावा सारखे वागवतात.श्री सुनील राजे भोसले हे व्यवसायाने एक यशस्वी उद्योजक आहेत.अमित इंडस्ट्रीज नावाने ते शेती उपयोगी मशिनरी उत्पादन करून शेती व्यवसाय यशस्वी रित्या चालना द्यायचं काम करतात.आजही त्यांच्या घराला होळीला पोळी बांधण्याचा मान आहे.
श्री सुनील राजेभोसले यांच्याकडे छत्रपती शाहू राजांनी 1733 साली दिलेला ताम्रपट उपलब्द आहे.भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे श्री राज मेमाणे यांनी लिप्यांतर करून दिलेले सवाल जवाबाचे कागदपत्र उपलब्द आहेत..सुरक्षा आणि संवर्धन ह्या दोन्ही गोष्टीमुळे ते ताम्रपट कोणाला दाखवत नाहीत.ताम्रपटाचे फोटो मात्र दाखवतात.तसेच श्री सुनील राजे भोसले ह्यांच्याकडे पुरातन शिवकालीन चलन शिवराई सह पुरातन ऐतिहासिक वस्तू आहेत
उपाध्यक्ष पुणे जिल्हा #अखिल_भारतीय_मराठा_महासंघ इतिहास परिषद
संदर्भ-श्री सुनील राजेभोसले यांच्याकडे छत्रपती शाहू राजांनी दिलेला मोडी लिपीतील ताम्र पट व सदर वादाचा सवाल जवाब.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...