विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 June 2023

पेडगावच्या विठ्ठल मंदिराला मालोजीराजे भोसलेंनी दिली 75 एकर जमीन

 


पेडगावच्या विठ्ठल मंदिराला मालोजीराजे भोसलेंनी दिली 75 एकर जमीन
इतिहास संशोधकांकडून दानपत्राचे दस्तावेजांवर प्रकाश
लेखन :अरविंद अर्खाडे
महाराष्ट्राच्या इतिहासात विविध ठिकाणच्या देवांच्या दिवाबत्ती पासून रोजच्या नित्य सेवासोयीसाठी राजे महाराजे यांनी दानपत्र, इनाम दिले आहेत. असेच जुने इनाम कायम करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी आपल्या जहागिरीतील पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील एक चावर म्हणजे सुमारे 75 एकर जमीन येथील श्री विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थेसाठी अकोवा गोसावी, बिन गोदोबा गोसावी, बडवे ,पुजारी यांना इनाम दिली होती. ही बाब इतिहास संशोधकांनी उजेडात आणली आहे.
याबाबत नुकतेच इतिहास अभ्यासक प्रवीण भोसले आणि आशुतोष बडवे पाटील यांनी अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे. श्रीगोंदा तालुक्याला हजार वर्षांचा इतिहास आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा नगरच्या निजामशाहीतील प्रमुख सरदार, कारभारी होते. मालोजीराजे भोसले यांचे वडील बाबाजी राजे भोसले यांच्यापासून जहागीर असलेला श्रीगोंदे म्हणजे तत्कालीन चांभारगोंद्याचा परिसरात मालोजीराजे भोसले यांच्या काळात ऐतिहासिक महत्त्व आले. इथला आखीव रेखीव विकास आणि इमारती, धार्मिक स्थळ, तटबंदी उभारणीपासून इथल्या राजकारभाराची व्यवस्था त्यांनी लावली.
तसेच पेडगाव येथील पांडे पेडगावचा भूईकोट किल्लाही मालोजीराजे यांच्या जहागिरीत असल्याने तिथेही अनेक व्यवस्था उभ्या करण्यात भोसले घराण्याचा वाटा राहिला आहे. मालोजीराजे भोसले यांनीच संत श्री शेख महंमद यांना श्रीगोंदे येथे आणून एक मठ बांधून दिला तसे इनाम आणि मकरंद पेठ वसवली असल्याचे कागद उपलब्ध आहेत. भोसले घराणे हे मातब्बर घराणे असल्याने या घराण्याचे तुळजापूरची भवानी आणि पंढरपूरचा विठ्ठलावर विशेष श्रद्धा होती. तसेच आपल्या जहागिरी असलेल्या जागृत देवस्थानवरही भोसले घराण्याची श्रध्दा होती.
स्वराज्यांचे छत्रपती घराण्यापासून पुढे पेशवे, होळकर, शिंदे सरदार यांनी अनेक देवस्थानाच्या दिवाबत्ती नित्यसेवेसाठी जमीन इनाम दिल्याच्या नोंदी इतिहासात दिसतात. अशीच एक महजर म्हणजे जुना दस्तावेज उपलब्ध असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी दिलेल्या दानपत्रात पेडगावच्या विठ्ठलाच्या नित्य सेवा व्यवस्थेसाठी मालोजीराजे यांनी त्याच्या वडिलांनी दिलेले इनाम कायम ठेवल्याचा उल्लेख आहे.
यात पेडगावमध्ये विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थेसाठी 31 डिसेंबर 1596 रोजी दिलेले पत्रामध्ये एक चावर अठरा गज जमिनीचे दानपत्र दिले आहे. यात पेडगावतर्फे मधील तत्कालीन बाबाजी चिकलठाणा (चिखलठाणे) आणि नामाजी चिकलठाणा यांना एक पत्र आणि मंदिराचे पुजारी यांना एक पत्र दिलेले असून यात बाबाजी आणि नामाजी यांची प्रत्येकी चावर निम म्हणजे दोघांनी अर्धी अर्धी जमीन या मंदिराचे इनाम म्हणून विठ्ठलाच्या नित्यव्यस्थेसाठी अकोवा गोसावी, बिन गोदोबा गोसावी, बडवे पुजारी यांना देणे बाबतीत हे पत्र आहे.
असे आहे दानपत्र
31 डिसेंबर 1596 चे हे पत्र फारसी सन जमादिलावल सब तिसैन तिसामयाही रोजीचे पत्र असून यावर फारसीत दोन शिक्के आहेत. अज रख्तखाने राजे श्री मालोजी राजे दामदौलत मी बजानी हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानि कसबे पेडिगाऊ कस पा. मजकुर विदानद साचा तिसैन व तिसा मैया (1596-97) अकोवा गोसावी पुजारी बिन गोदोबा गोसावी बडवे पुजारी यांना. इनाम बदल सदकोवाची जमीन चावर एक 18 गज सरायनी प्रजा. बाबाजी चिकलठाणा नामाजी चिकलठाणा चावर निम - चावर निम असा पत्रात उल्लेख आहे.

Wednesday, 28 June 2023

बडोदा संस्थानचे सेनापती भाऊ शिंदे यांचा मुळगाव देवरगांव ता. चांदवड येथील जहागिरदार वाडा

 

बडोदा संस्थानचे सेनापती भाऊ शिंदे यांचा मुळगाव देवरगांव ता. चांदवड येथील जहागिरदार वाडा
नाशिक जिल्ह्यातील राजधानी असलेले होळकरांचे चांदवड एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर.... चांदवड हे नाशिक धुळे महामार्गावरील नाशिक पासून ६० कि.मी. अंतरावर आहे व चांदवड पासून देवरगांव साधारणपणे १४ कि.मी. असेल... या गावाला अध्यात्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड सरकार यांचे दरबारी भाऊ शिंदे मोठे लष्करी अधिकारी होते. एके दिवशी सकाळी सकाळी ते आपल्या वाड्यातनं लगबगीने दरबारी निघालेच होते तो दारावर एक साधू भिक्षा मागण्यासाठी आले. भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना भिक्षा देत दरबारी आले. आज दरबारात महत्त्वाचा निर्णय होणार होता. सरसेनापतींची नियुक्ती होणार होती. महाराजांच्या खास व्यक्ती म्हणून भाऊ शिंदे यांना पदोन्नती थेट सरसेनापती पदी झाली. सकाळी आलेल्या संताच्या आशीर्वादामुळेच आपणांस पदोन्नती मिळाल्याची भावना त्यांच्या मनात प्रकटताच भाऊंनी त्या साधूचा शोध घेतला त्यांना आपले गुरू केले. त्यांचे नाव विंचू बाबा...
चांदवड तालुक्याच्या देवरगाव ची शिंदेंना जहागिरी मिळाली त्यामुळे या त्यांच्या मुळगावी शिंदेंनी भव्य जहागिरदार वाडा बांधला. या वाड्यात विंचूबाबांचे वास्तव्य काही दिवस होते... हा परिसर सोडून जाते वेळी त्यांनी आपले शिष्य हरेकृष्ण बाबा यांना कराड तालुक्याच्या म्हसूर गावाहून बोलावून घेतले.... व याच वाड्यात त्यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते. ते सद्गुरू साई बाबांचे समकालीन संत होते. त्यांनी देवरगावातच संजीवन समाधी घेतली.
हा जहागिरदार वाडा साधारणतः २०० वर्ष जुना वाडा आहे. आज वाड्यात त्यांची चौथी पिढी वास्तव्याला आहे. केशव ऊर्फ भाऊसाहेब शिंदे ( पप्पा ) यांना दत्तक घेतले असल्याने त्यांची ही चौथी पिढी आहे. काही वर्षापूर्वी बडोद्याचे सत्यजीत राजे गायकवाड यांनीही या भव्य वाड्याला भेट दिली आहे.
जाहगिरदार वाडा भव्य आहे संपूर्ण बांधकाम दगडी घडीव चिरे व सागवानी लाकडांचा वापर करून बांधले आहे. वाड्यातील दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अरूंद दगडी जीना आहे. वरच्या दलनात सुंदर भित्तीचित्रे रेखाटली आहे. सद्गुरू हरेकृष्ण बाबा यांची ध्यानाला बसण्याची खोली आहे. एव्हढा भव्य वाडा जिर्ण होतोय त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हा आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे सोपविलेला दिव्य वारसा जोपासने व जतन करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. वाड्यातील अनेक खोल्या बंद स्वरूपात आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सेनापतींच्या या वाड्याला एकवेळ अवश्य भेट द्या...
लेखन ::संजय पाडवी , चांदवड
( स्थळ - जहागिरदार वाडा , देवरगाव ता. चांदवड जि












. नाशिक . )

!! सरसेनापती धनाजीराव / धनसिंह शंभुसिंहराव जाधवराव !!

 



!! सरसेनापती धनाजीराव / धनसिंह शंभुसिंहराव जाधवराव !!
जन्म = इ स 1649-50 च्या सुमारास झाला. म्रुत्यु = 27 जुन 1710.
धनाजीराव हे राजेलखुजीराव यांचे द्वितिय पुत्र राजेअचलोजी यांचे पणतु होत. परंतु यांची शाखा यांचे आजोबा सृजनसिंह/संताजीराव यांच्यापासुन राजमाता जिजाऊ साहेबासोबतच होती.
पुञ = 4 पतंगराव,संताजीराव,चंद्रसेनराव व शंभुसिंह.
कारकिर्द = यांचे युद्ध प्रशिक्षण प्रतापराव गुजर यांच्या हाताखाली पुर्ण झाले.परंतु शिवरायांची नजर यांच्या शिक्षणावर होती.त्यामुळेच शिवरायांची लढण्याची रीत व कावे धनाजीरावानी पुर्णपणे उचलले होते.
1) इ स 1672 मध्ये प्रतापराव पराभव पाऊन पडल्यावर मागील पथकातील धनाजीराव यानी पराभुत सैन्यास धिर देऊन धनाजीराव ,संताजी घोरपडे व हंसाजी मोहिते यानी बहलोलखानावर हल्ला चढवुन पराभव केला.त्यावेळपासुन धनाजीराव याना स्वतंञ सरदारकी व हंसाजी मोहिते याना "हंबिरराव" किताब शिवरायानी दिली.
2) इ स 1674 मध्ये मोगल व आदिलशहा हे एकञ येऊन स्वराज्य बुडवण्याचा कट केला त्यावेळी शिवरायानी त्यांच्या प्रत्येक सरदारावर आपले कडील सैन्य पाठवुन पराभव केला.यात धनाजीराव यानी खुप पराक्रम केला .
3) सावनुरची लढाई = यावेळी यांचे वय 20 ते 25 दरम्यान होते.स्वतंञपणे लढाई देण्याचा त्यांचा पहिलाच प्रसंग होता.या लढाईत हंबीरराव मोहिते,धनाजीराव व संताजी घोरपडे यानी विजापुरकराची लंगडेतोड करुन विजय मिळवला.यात धनाजीराव यांच्या हालचाली विद्युतवेगाच्या होत्या. एवढ्या वयात एवढे मोठे जबाबदारीचे कार्य केल्यानंतर धनाजीराव आण्णाजी रंगनाथ मालेकर सोबत शिवरायाना भेटण्याकरिता रायगडावर गेले असता शिवरायानी त्यांची प्रशंसा केली व म्हणाले,"ही मनुष्य प्रतिसृष्टी निर्माण करतील.आम्ही येथे नसता बादशहाशी स्पर्धा करुन मुलुख घेऊन गर्वरहित केला.आम्हाशी बोलण्यास त्यास ऊरुज न राहिला,यांचे उतराई कोठे व्हावे? असो.आमच्या साह्यार्थ हे देवलोकाहुन मनुष्य रुपी निर्माण झाले असेच वाटते.जाधवराव 25 ते 30 हजार मुसलमान फौजेशी लढाई 6 ते 7 हजार माणसानिशी कशी केली?"
4) पुढे शिवरायांच्या मृत्युनंतर संभाजी महाराजाच्या कारकिर्दित औरंगजेबपुञ अजिम ने बागलाणात जाऊन साल्हेरचा किल्ला घेतला.त्याजवर सेनापती हंबिरराव,धनाजीराव व संताजी याना संभाजी महाराजानी पाठवले.या तिघांचा पराभव करुन मोगलानी सातार्यापर्यँत त्यांचा पाठलाग केला.यावेळी धनाजीरावानी मोगल अस्ताव्यस्त पाहुन माघारी तोँड फिरवले त्यामुळे मोगल मराठ्यांचे तावडीत सापडले .तिघानी तिन्हीकडुन हल्ला करुन पराभुत केले.
5) संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्याकडे धनाजीराव जाधवराव व संताजी घोरपडे हे दोन विशेष अनुभविक यौद्धे मराठ्यांकडे होते.इतर मराठे सरदार यांच्याच तंञाने वागत.धनाजीरावानी मुलुखाची नासाडी करुन मोगल सरदारास जेरिस आणले.त्यांच्यासमोर जो कोणी येई तो मरण पावे अगर त्यांच्या हातात तरी सापडे.एखादा कोणी निभावलाच तर कफल्लक होऊन परत जाई.मी मी म्हणणारे मुस्लिम यौद्धे यांच्यापुढे जाण्यास चळचळ कापत.त्यांच्याशी टिकाव धरणारा एकही योद्धा मोगलांपाशी नव्हता हे ऐकुन औरंगजेबाची पाचावर धारण बसली.इतका विलक्षण दरारा धनाजीरावांचा होता.तसेच त्याना "जयसिँगराव" हा किताब छत्रपतीनी त्यांचा पराक्रम पाहुन दिला होता.
6) छत्रपती राजाराम महाराजाच्या कारकिर्दित धनाजीराव व संताजी घोरपडे यानी स्वराज्य वाचवुन मोगलावर मराठ्यांची वचक बसवली त्या अतुलनिय पराक्रमास तोड नाही.त्यामुळेच राजाराम महाराजानी त्यांचा पराक्रम पाहुन दोन गावे मौजे पाडळी व मौजे बोरगाव (बारामती) इनाम दिले व ती गावे वंशपरंपरागत म्हणुन ईनाम दिले.तसेच खुद्द धनाजीरावानी पिराजी बीन चंडोजी,नरसोजी बीन जयताजी व महादजी बीन आबाजी यादव देशमुख परगणे व तर्फ उंब्रज व तारगाव परगणे मजकुर याजकडुन 5 गावचे (नागठाणे,अतीत,इंदोली,कसबे पाली व हिँगनोळे) देशमुखी वतन 2700 रुपयास खरेदी केले.राजाराम महाराजानी 1000 रुपये नजराणा घेऊन 5 गावचे देशमुखीचे वतनाबद्दल वंशपरंपरागत दुमालपञ करुन दिले.याशिवाय राजाराम महाराज वारल्यानंतर पिराजी बीन चंडोजी ,पदाजी बीन आबाजी व गिरजोजी बीन मुधोजी यादव देशमुख परगणे कराड याजकडुन 138 गावची देशमुखी खरेदी करुन घेतली,त्याबद्दल सरकारात नजराणा 5000 रुपये भरुन देशमुखीबद्दल कबुलायत करुन घेतली.धनाजीराव यांच्या अधिकाराखाली राजाराम महाराजाच्या निधनानंतर मुलकी व लष्करी ही 2ही सेवा होत्या परंतु यानी या स्वराज्याकरिता एवढी मोठी कामगिरी करुन 10-15 लाखाचा मुलुख तोडुन घेण्याऐवजी स्वार्थत्याग करुन फक्त 2 गावे इनाम घेतली व 138 गावे स्वतःच्या कमाईवर विकत घेतली.म्हणजे खरोखरच छञपती शिवराय महाराजांच्या विचाराच्या मुशीतुन घडलेले मावळेच.
7)राजाराम महाराजाच्या निधनानंतर मुलकी व लष्करी कार्य यांच्याच अधिकाराखाली होती व त्यानी ती लिलया पार पाडुन मोगलावर एक विलक्षण वचक बसवला कि मोगलांचे घोडे पाणी पिईनातसे झाले तर मोगल त्यास म्हणत,"क्योँ पानी पिता नही? पानिमे धनाजी नजर आता है क्या?
😎 तसेच धनाजीराव यांचे आणखी एक वैशिष्ठये आढळते ते म्हणजे स्वराज्यातील बंडखोर बेरड नाईक लोकाना देखिल स्वराज्याच्या कार्यात सामावुन घेतले होते.
9) औरंगजेबाने मरतेवेळी धनाजीराव व मराठे याविषयी असे उद्गार काढले कि," आपण स्वतः दक्षिणेत येऊन 25 वर्श याजबरोबर युद्ध चालविले ही आपली फार मोठी चुक जाहली.धनसिँग जाधवराव ये कुछ इन्सान नही है,सैतान है.हमारे सायप्याज खाके आजतक लडता है और हमारी पातशाही यह छीन लेगा ऐसा हमे मालुम पडा है ".आणी असे बोलुन प्राण सोडला.
10) धनाजीराव यानी शिवराय महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराज व शाहु महाराज या प्रत्येक छञपतीँच्या अधिकाराखाली अतुलनीय पराक्रम करुन खरोखरच या स्वराज्यासाठीच जन्मले आहेत हे सार्थ करुन दाखवले. धनाजीराव यांच्या मृत्युनंतर देखिल त्यांच्या वंशजानी या स्वराज्यासाठी प्राणपणाला लावला परंतु पेशव्यानी मात्र त्यांच्या वंशजाना स्वराज्य सोडण्यास भाग पाडले....
११) वंशजशाखा - माळेगांव बुद्रुक , मांडवे व बोरगाव!!!
सरसेनापती धनाजीराव जाधवराव याना पावनस्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा...... ......^.........

Saturday, 24 June 2023

पेशवे पदासाठी काका पुतण्याचा ‘हा’ संघर्ष मराठी सत्तेला सुरुंग लावून गेला.भाग १

 

पेशवे पदासाठी काका पुतण्याचा ‘हा’ संघर्ष मराठी सत्तेला सुरुंग लावून गेला.
लेखन :कोस्तुभ शुक्ल (InfoBuzz)

भाग १
मराठे सरदार, राजे, पेशवे यांनी शत्रूशी दिलेल्या लढ्याबद्दल आपण ऐकत आलोय परंतु आपला इतिहास निरखून बघितला असता हे देखील आपल्या नजरेस येते कि आपलेच नातेवाईक, आप्तस्वकीय बरेचदा आपल्याच विरुद्ध काही शुल्लक कारणांमुळे विरोधात जातात आणि आपल्यासाठी आणि पर्यायाने आपल्या राज्यासाठी धोका निर्माण करतात. याची इतिहासाने अनेक उदाहरणे दिली, यातच एक उदाहरण पेशवे (भट) घराण्याचे देखील आहे.
पेशवा माधवराव (१) व त्यांचे सख्खे काका रघुनाथराव उर्फ राघोबादादा यांच्यात सुरुवातीला जरी ऐक्य असले तरी नंतर मात्र याचे परिवर्तन मत्सरात होते आणि मत्सराचे परिवर्तन युद्धात. आज याच काका पुतण्यात झालेल्या लढाईबद्दल जाणून घेऊया.
कोण होते माधवराव व रघुनाथराव (Madhavrao and Raghunathrao Peshwa)
माधवराव भट हे मराठा साम्राज्याचे ४थे पेशवा होते. माधवराव (Madhavrao Peshwe) हे पेशवा बाळाजी बाजीराव यांचे पुत्र. पानिपतच्या युद्धकाळादरम्यान एकीकडे मराठ्यांनी आपले अनेक सैनिक व आप्तस्वकीय गमावले तर दुसरीकडे पेशवा बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब देखील वारले आणि मग वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी माधवरावांवर मराठा साम्राज्याच्या पेशवे पदाची सूत्रे सोपविली गेली. पानिपतच्या युद्धात झालेली वित्तहानी आणि अशा अनेक अडचणी माधवरावांनी मोठ्या हुशारीने दूर केल्या आणि म्हणूनच त्यांना सर्व पेशव्यांच्या पंक्तीत मोठे आदराचे स्थान दिले जाते.

#होळकर_छत्री

 









#होळकर_छत्री
डेक्कन कॉलेजकडून होळकर पुलाकडे जाताना पूल सुरु व्हायच्या आधी बॉम्बे सॅपर्सच्या भिंतीशेजारून डाव्या हाताला एक छोटा रस्ता जातो. त्या रस्त्यावर समोरच देवी अहिल्याबाई होळकर ट्रस्टची पाटी दिसते. त्या जागेत #होळकर_छत्री आहे. हि जागा खाजगी मालमत्ता असल्यामुळे इथे मुक्त प्रवेश नाही. माळव्यातील रूढीनुसार समाधीस छत्री म्हणण्याचा प्रघात आहे.
इ.स. १७९५ मध्ये तुकोजीराव होळकरांचा मृत्यू झाला. तुकोजीरावांना मल्हारराव, विठोजी व यशवंतराव हे पुत्र होते. होळकरांची दौलत हडपण्याच्या उद्देशाने दुसऱ्या बाजीरावाने तुकोजीराव होळकरांचा मनोरुग्ण मुलगा काशिराव यास सरदारकी दिली. इ.स. १७९४ मध्ये महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर शिंदेशाहीची वस्त्रे दौलतराव शिंदे यास मिळाली. शिंदे-होळकर यांच्या वैमनस्यामुळे काशिरावाला सरदारकी मिळाल्यानंतर दौलतराव शिंद्यांनी होळकरांचा मुलूख ताब्यात घेण्यास सुरुवात केली. दौलतरावाच्या या कृत्यामुळे चिडून मल्हारराव होळकर फौज जमवून शिंदे व पेशव्यांच्या प्रदेशावर हल्ले करू लागला. १४ सप्टेंबर १७९७ मध्ये होळकरांच्या फौजेचा तळ पुण्यात भांबुर्ड्यात म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर परिसरात पडला होता. दौलतराव शिंद्यांनी या तळावर हल्ला करून मल्हारराव होळकरास ठार मारले. या हल्ल्याच्या प्रसंगी विठोजी व यशवंतराव होळकर निसटून पळून गेले. दुसऱ्या बाजीरावाने मल्हाररावाची पत्नी जईबाई व अल्पवयीन मुलगा खंडेराव यांना कैदेत टाकले. विठोजी होळकराने पेशव्यांचे बंधू अमृतराव यांच्यासमवेत बंडाचे निशाण उभारले व तो पेशव्यांच्या मुलखात छापे घालून लूटमार करू लागला. पेशव्यांनी विठोजीला पकडून अत्यंत निर्घृणपणे शनिवारवाड्यासमोरील पटांगणात हत्तीच्या पायी दिले. होळकरांनी मल्हाररावाची समाधी होळकर पुलाच्या पलीकडे बांधून तेथे एक शिवमंदिरही उभारले. या समाधीचे बांधकाम कधी झाले या संदर्भात ऐतिहासिक साधनांमध्ये उल्लेख आढळत नाही. इम्पिरियल गॅझेटियर व गायकवाडकृत पुणे वर्णनात ही छत्री विठोजी होळकर व त्यांच्या पत्नीची असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. परंतु दुसऱ्या पंतप्रधान शकावलीत या समाधीबाबत पुढील टिपण आढळते भाद्रपद वद्य ८, दौलतरावाकडील मुझफरखान याने तुकोजीचा पुत्र मल्हारराव यास मारले. त्याची छत्री खडकी पुलाजवळ आहे. पेशवाईची अखेर या ग्रंथावरून व होळकरांच्या ऐतिहासिक साधनांवरून ही छत्री मल्हाररावाची असल्याची पुष्टी मिळते.
पूर्वी या छत्रीभोवती नऊ फूट उंचीची तटबंदी होती, कालौघात बऱ्याच तटबंदीची पडझड झालेली आहे.तटबंदीच्या आत चिरेबंदी दगडाचे शिवमंदिर आहे. मंदिरात मागच्या बाजूला असलेल्या छोट्या दरवाजातून आत जावे लागते. मंदिराच्या समोर लाकडी खांबांवर उभा केलेला सभामंडप आहे. सभामंडपात काचेची हंड्या झुंबरे टांगलेली आहेत. सभामंडपात नंदी असून त्यापुढे भांबुर्ड्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला, मल्हारराव होळकरांचा अंगरक्षक लाख्या बारगिर (लाख रुपये पगारदार) याची पादुकासदृशः समाधी आहे. सभामंडपाच्या उजव्या बाजूस तुळशीवृंदावन असून त्या वृंदावनाच्या कोनाड्यात हनुमानाची दगडी मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या बाहेरीच्या बाजूस दगडी महिरप असून दोन्ही बाजूस कोनाडे आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग असून त्यावर एक स्फटिकाचा आणि एक दगडाचा बाण आहे. हे शिवलिंग आयताकृती काळ्या दगडाचे असून या शिवलिंगाचा आकार उजव्या बाजूस त्रिकोणाकृती निमुळता आहे. शिवलिंगाच्या मागच्या बाजूस मोठा कोनाडा असून तेथे पूर्वी होळकरांच्या तख्ताची जागा होती. त्यात अलीकडील काळातील साधाराण तीन फूट उंचीची रेखीव शिवमूर्ती आहे.
येथील शिवमंदिराचे शिखर तत्कालीन मराठा शैलीतील असून त्यावर नक्षीकाम केलेले आहे. या समाधीच्या परिसरात कालांतराने गोसावी लोकांनी वस्ती केली होती. या समाधीच्या वास्तूची वरीच पडझड झाली, तसेच येथे झाडे-झुडपे, गवत वाढले होते. इ.स. १९९५ मध्ये हा परिसर ग्वाल्हेरच्या भोसले कुटुंबियांनी भाड्याने घेतला. इ.स. १९९८ मध्ये या कुटुंबियांनी शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला. मूळ ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता अत्यंत काळजीपूर्वक शिवमंदिराची रंगरंगोटी व डागडुजी करण्यात आलेली आहे.
संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
तुम्हाला आमचा हा #आठवणी_इतिहासाच्या प्रकल्प कसा वाटत आहे हे नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला अशा काही पुण्याच्या आजूबाजूच्या वास्तूंबद्दल माहिती असेल ज्या भूतकाळात गेल्या आहेत, तर आम्हाला तिथे भेट द्यायला आणि त्याची माहिती गोळा करून तुमच्यासमोर आणायला नक्कीच आवडेल.
like करा, share करा आणि follow करा.

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा भाग ४

 

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा
लेखन ::निखील पाटील (INFOBUZZ)


भाग ४
पेशव्यांविरुद्ध उमाबाई
सलोख्याचे सर्व प्रयत्न व विनंत्या धुडकारून लावल्याने आता उमाबाईंनी लढाईचा मार्ग स्वीकारला. आधीच ठरलेल्या करारानुसार ताराराणीसाहेब देखील त्यांच्या सोबत होत्या. पेशवा बाळाजी बाजीराव मुघल मोहिमेवर गेले असता अतिशय चलाखीने सुमारे १७५० साली ताराराणींनी छत्रपती राजाराम (दुसरे) यांना कैद केले. ताराराणींच्या मदतीला पुढे उमाबाईंनी आपले मराठा व गुजरात असे दुहेरी सैन्य दमाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाठविले. सुरुवातीला यश पदरी येत होते परंतु, पुढे परिस्थिती उलटी झाली आणि दमाजी जाळ्यात अडकले आणि कृष्णा नदीच्या नजीक दरीत फसले गेले.
दमाजी गायकवाडांना ताब्यात घेतले गेले आणि पेशव्यांशी करार करण्यास त्यांना दबाव टाकण्यात आला व करारानुसार गुजरातेतील अर्धा वाटा व या केलेल्या हल्ल्याची नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कमदेखील मागितली. दमाजींनी या मागणीला विरोध केला. पेशव्यांनी दमाजींना त्यांच्या परिवारासकट कैद केले, पाठोपाठ उमाबाई व त्यांच्या परिवारातील काही सदस्यांना देखील कैद केले गेले. परिणामस्वरूप दाभाडे घराण्याची जागीर परत घेतली गेली व त्यांचे सेनापती हे पद देखील हिरावले गेले.
२८ नोव्हेंबर १७५३ रोजी नाडगेमोडी, पुणे येथे उमाबाईंचा मृत्यू झाला. आजही तळेगाव येथे त्यांची समाधी आहे. पेशव्यांशी लढण्यात त्यांना यश आले नाही पण एक स्त्री म्हणून तेव्हाच्या काळात परिवारासोबत इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणे खरंच कठीण काम होते. या सगळ्या विरोधांना, संकटाना मात देत आपल्या पतीच्या पश्च्यात उमाबाईंनी जवळजवळ २० वर्षे आपली सत्ता सांभाळली. स्त्री शक्तीला कमी लेखणार्यांना उमाबाई दाभाडे हे नेहमीच एक उत्तम उदाहरण राहतील.

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा भाग ३

 

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा
लेखन ::निखील पाटील (INFOBUZZ)

भाग ३
उमाबाईंचा संघर्ष
पेशवा बाजीरावांमुळे उमाबाईंचा मोठा मुलगा मारला गेला होता त्यामुळे साहजिकच उमाबाईंचा बाजीरावांवर राग होता परंतु नाईलाजाने त्यांना बाजीरावांशी सोबत करणे भाग होते. छत्रपती राजाराम दुसरे यांच्या काळात पेशवा होते बाळाजी बाजीराव आणि याच काळात त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते म्हणून त्यांनी दाभाडे घराण्याशी करार करून त्यांच्या मिळकतीत हक्क दाखविला आणि दाभाड्यानां अडचणीत आणले. या कराराला विरोध करून देखील उमाबाईंचा प्रयत्न असफल झाला.
या लढ्यात उमाबाईंना साथ मिळाली ती म्हणजे छत्रपती ताराराणींची. ताराराणींना देखील पेशव्यांबद्दल राग होता म्हणूनच त्यांनी उमाबाईंशी संधान बांधले आणि परस्परांना मदत करण्याचे आश्वासन दिले. उमाबाईंनी इतके वाद असूनही लढाई करण्याचे विचार बाजूला ठेवले होते व चर्चेवर भर देण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचे समजूतदारीचे अनेक प्रयत्न फोल गेले परंतु तरीही उमाबाईंनी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्यातर्फे महादेव निरगुडे यांना सलोख्याची बोलणी करण्यासाठी पेशवे दफ्तरी धाडले परंतु पेशव्यांनी हि देखील विनंती धुडकावून लावली.
याउपरही उमाबाईंही स्वतः आळंदी येथे पेशव्यांची भेट घेतली व हा करार आमच्यावर जबरदस्तीने लादला गेला असून आम्हाला तो मान्य नाही त्यामुळे, हा करार रद्द करण्यात यावा असा दावा केला परंतु, हा दावा झुगारून लावत पेशवा दाभाडे घराण्याच्या गुजरात मधील मिळकतीमधील अर्ध्या हिस्स्याच्या मागणीवर अडून राहिले. आता मात्र सलोख्याचे प्रयत्न करून भागण्यासारखे नव्हते, काहीतरी ठोस कृती गरजेची होती.

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा भाग २

 

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा
लेखन ::निखील पाटील (INFOBUZZ)


भाग २
उमाबाईंना एकूण ३ मुले, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने आणि इतर दोन्ही मुले वयाने लहान असल्याकारणाने त्यांच्याकडे हि जबाबदारी सोपविता येत नव्हती. या परिस्थितीमुळे घराणे व वतन दोन्ही वाऱ्यावर आले होते. घराण्यात कोणीही वतन संभाळण्यायोग्य नसल्यामुळे दाभाड्यांचे वतन नाहीसे होण्याच्या मार्गावर होते. एकंदरीत पाहता आता उमाबाईच घरातल्या मुख्य आणि कर्त्या स्त्री म्हणून राहिल्या होत्या. साहजिकच त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या होत्या म्हणूनच त्यांनी आणखीन एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे स्वतः वतन सांभाळणे होय.
उमाबाईंनी हे मोठे आव्हान स्वतः घेतले आणि समर्थपणे पेलले देखील. त्यांनी घरदार तर संभाळलेच, शिवाय दफ्तरीचे कामकाज पहिले, सेनेचे नेतृत्व देखील केले, वेळप्रसंगी स्वतः सैन्यासोबत लढाईत उतरून लढल्या सुद्धा. एक स्त्री असून त्या काळात असे धाडस करणे हे फार मोठे पाऊल होते. त्यांचे शौर्य, कर्तव्यदक्षपणा आणि कामकाज लक्षात घेऊन शाहू महाराजांनी त्यांना सरदार केले आणि उमाबाई दाभाडे आता सरदार उमाबाई दाभाडे झाल्या. त्यांना सरसेनापती व सेना सरखेल हे अधिकार देखील देण्यात आले.
उमाबाई दाभाडे या मराठ्यांच्या पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. एक स्त्री म्हणून उमाबाईंचे धाडस खरंच कौतुकास्पद आहे. परंतु उमाबाईंच्या या निर्णयाला सगळ्यांचेच समर्थन होते असे नाही, अनेक वेळा अनेक प्रकारचे विरोध उमाबाईंना झाले. पुढे जेव्हा रामराजे सत्तेवर छत्रपती म्हणून आले परंतु ते नामधारीच राहिले आणि त्यांच्या अनेक सरदारांनी उमाबाई एक स्त्री आहेत म्हणून त्यांना कमी लेखून त्यांच्या अधिकारातील बराचसा प्रदेश कमी करण्याचा प्रयत्न केला. इतके विरोध होऊनही उमाबाईंनी आपले वर्चस्व टिकवून ठेवले.

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा भाग १

 

इतिहासातील पहिल्या महिला मराठा सरसेनापतींच्या पराक्रमाची गाथा
लेखन ::निखील पाटील (INFOBUZZ)

भाग १
ज्या काळात स्त्रिया शक्यतो चूल आणि मूल याच जाळ्यात अडकल्या होत्या त्या काळातही अनेक स्त्रियांनी अतुलनीय पराक्रम केले आहेत. आज पाहूया अशीच एक गोष्ट.
आपल्या समाजात फार पूर्वीपासून पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे अनेक स्त्रियांचे हाल झाले, स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले. परंतु सध्या हि परिस्थिती फार सकारात्मकरित्या बदलली आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपले गुण सिद्ध करतात आणि बरेचवेळी पुरुषांनादेखील मागे टाकतात.
या बदलाची सध्या आपल्याला सवय जडली आहे त्यामुळे आपण स्त्रियांच्या या बदलत्या गोष्टींकडे बरेच दुर्लक्ष करतो, पण ज्या काळात स्त्रिया शक्यतो चूल आणि मूल याच जाळ्यात अडकल्या होत्या त्या काळातही अनेक स्त्रियांनी अतुलनीय पराक्रम केले आहेत. आज पाहूया अशीच एक गोष्ट. हि कहाणी आहे उमाबाई दाभाडे यांची, ज्यांनी मराठ्यांच्या काळात आपल्या कर्तृत्वाने इतिहासात नावलौकिक मिळविला.
उमाबाई दाभाडे
उमाबाई यांच्या जन्मसालाबद्दल इतिहासात विश्वसनीय नोंद सापडत नाही परंतु, हे नक्की समजते कि त्यांचा जन्म नाशिक मधील अभोणे येथे झाला. उमाबाई या अभोणच्या देवराव ठोके देशमुख यांच्या कन्या होय. कालांतराने उमाबाईंचा विवाह खंडेराव दाभाडे यांच्याशी झाला आणि खंडेराव दाभाडे यांच्या तीन पत्नींपैकी उमाबाई सर्वांत लहान होत्या. तसेच उमाबाई व खंडेराव यांना त्रिंबकराव, यशवंतराव आणि सवाई बाबुराव अशी तीन मुले व शाहबाई, दुर्गाबाई व आनंदीबाई अशा तीन मुली अशी एकूण ६ अपत्ये झाली.
उमाबाईंनी कहाणी
दाभाडे घराणे शिवरायांच्या काळापासूनच मराठ्यांच्या सैन्यात होते. याच घराण्यात जन्मलेले खंडेराव दाभाडे यांच्याशी उमाबाईंचा विवाह झाला. पुण्यानजीक तळेगाव हे दाभाडे घराण्याचे वतनाचे गाव होते. खंडेराव हे मराठा साम्राज्याचे सरदार होते, त्यांच्या अनेक अतुलनीय कामगिरीनंतर त्यांना शाहू राजांकडून सेनापती घोषित केले गेले. बाजीराव पेशवा जेव्हा स्वराज्यविस्ताराचे कार्य करीत होते तेव्हा खंडेराव स्वतः गुजरातच्या मार्गाने कार्य करीत होते. पुढे मग दाभाडे घराण्याकडे गुजरातमधील अनेक प्रांतांचे अधिपत्य आले आणि त्यांनी उत्तमरीत्या ते सांभाळले.
सुमारे १७२९ मध्ये खंडेराव दाभाडे यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मोठा मुलगा त्रिंबकराव गादीवर आला. गुजरात कडून मिळणारी चौथ व सरदेशमुखी हे दाभाडे घराण्यासाठी महत्वाचे उत्त्पन्न साधन होते परंतु पेशवा बाजीराव व त्रिंबकराओ यांच्यात याच गुजरातच्या विषयावरून वाद झाले पुढे हे वाद विकोपाला गेले आणि डभोई येथील लढाईत सुमारे १७३१ मध्ये बाजीरावांनी त्रिंबकरावांना पराभूत करू

Thursday, 22 June 2023

शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया भाग ७

 



शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया
भाग ७
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
१० ) गोव्याची लढाई
आपली शेवटची स्वारी आहे गोव्याची. शंभूराजांनी अनेकदा गोव्यावर स्वारी केली पण त्यांना बरेच वेळा अर्ध्यातूनच माघारी यावे लागत होते हे आपण पहिलेच आहे. या आधी जुवे बेटावर सुद्धा शत्रूला पूर्ण धडा शिकविता आला नव्हता आणि फोंडा किल्ल्यावर केलेल्या हल्ल्याची परतफेडही राहिली होती. याचसाठी शंभूराजांनी पुन्हा गोवा मोहिम हाती घेतली आणि ६००० स्वार आणी १०,००० सैन्य घेऊन शंभूराजे आगेकूच करते झाले. वाऱ्याच्या वेगाने जात शंभूराजांनी डिसेंबर १६८३ दरम्यान बारदेश आणि साष्टी येथे हल्ला केला, सोबतच मडगाव, रचोळ वगैरे ताब्यात घेतले आणि पुढे रायतूरच्या किल्ल्याला वेढा घातला.
एवढ्यावरच न थांबता मराठ्यांनी शापोरा, थिये वगैरे ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली आणली. एक, दोन नव्हे तर तब्बल २६ दिवस शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी हलकल्लोळ माजविला होता, संपूर्ण गोवा मराठ्यांच्या प्रभावाखाली होता आणि या काळात मराठ्यांना विरोध करत आलेल्या प्रत्येक शत्रूची मराठ्यांनी अशी काही दाणदाण उडविली कि सारेच फिरंगी सैन्य जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत सुटले. मराठ्यांवर फिरंग्यांनी केलेल्या आधीच्या प्रत्येक हल्ल्याची परतफेड मराठी सैन्यांनी व्याजासकट केली असे म्हणायला हरकत नाही. हा सगळा धुमाकूळ घालून मुअज्जमचा बंदोबस्त करण्यासाठीं शंभूराजे स्वराज्यात रायगडावर पोहोचले.
तर, या दोन भागांत आपण ज्या लढायांचा आढावा घेतला त्या लढाया तर शंभूराजांच्या जीवनातील एक छोटासा भाग आहे. शंभूराजांनी आपली सारी कारकीर्दच अशी धावत, पळत, लढत आणि स्वराज्य रक्षण व विस्तारात घालविली. मराठ्यांच्या प्रत्येक शत्रूला शंभूराजांनी वेळोवेळी पूर्ण ताकदीनिशी धडा शिकविला आहे. शिवरायांनी स्वराज्य घडविले आणि शंभूराजांनी स्वराज्य पुढे त्याच जिद्दीने, मेहेनतीने आणि निष्ठेने जपले, वाढविले आणि बळकट केले. शंभूराजांच्या या शौर्याबद्दल बोलावे, लिहावे तेवढे कमीच पण या सर्व लढायांवर नजर फिरविली कि एक मात्र नक्की समजते कि शंभूराजांसारखे आदर्श व्यक्तिमत्त्व या जगात पुन्हा होणे नाही.

शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया भाग ६

 


शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया
भाग ६
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
९ ) फोंडा किल्ल्यावर झालेला हल्ला
चौथी गोष्ट आहे १६८३ दरम्यानच्या फोंडा किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याची. मराठ्यांनी उत्तरफिरंगाणात चांगलाच वचक बसविला होता; रेवदंडा, चौल आणि अशी बरीच ठाणी मराठ्यांनी काबीज केली होती. या प्रकारामुळे पोर्तुगीझांनी ०१ नोव्हेंबर १६८३ रोजी एकाएकी मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. त्या वेळी फोंडा किल्ल्याचे किल्लेदार येसाजी कंक होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे देखील हल्ल्यास प्रतिउत्तर देत होते. सतत ८-९ दिवस फोंडा किल्ल्यावर जोरदार तोफांचा मारा चालू होता तरीही गड खंबीर होता परंतु, हळूहळू तोफांच्या हल्ल्याने फोंडा किल्ला ढासळू लागला आणि गडाच्या तटाला खिंडार पडले तसे फिरंगी सैन्य किल्ल्यात शिरू पहात होते.
परंतु आपल्या मराठी सेनेने शेवटची ढाल म्हणून काही लाकडी फाळ घेऊन त्यांचा तट उभारला आणि काही काळापुरता शत्रूला रोखले पण अखेर शत्रू गडात शिरले आणि बरोबर अशाच वेळी शंभूराजे स्वतः ८५० घोडदळ आणि १५०० सैन्य घेऊन मदतीला दाखल झाले आणि शंभूराजांचे हे सारे सैन्य अगदी ताज्या दमाचे होते आणि इकडे फिरंगी सैन्य लढून दामले होते यामुळेच, फिरंग्यांना हि लढाई चांगलीच महागात पडली आणि शेवटी फिरंगी सैन्याने हार पत्करून माघार घेतली आणि पळून गेले. या लढाईत आपण विजयी झाला पण किल्लेदाराचा मुलगा कृष्णाजी कंक जखमी होऊन मरण पावले.

शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया भाग ५

 


शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया
भाग ५
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
८ ) जुवे बेटावरील स्वारी
आता आपण पाहूया जुवे बेटावरील स्वारी. गोव्यानजीक असलेल्या या बेटावरील किल्ल्यावर हल्ला करण्याचे राजांनी ठरविले. या मनसुब्यानुसार दिनांक २४ नोव्हेंबर १६८३ रोजी शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी जुवे बेटावरील किल्ल्याला वेढा दिला. वेढा दिल्यानंतर देखील प्रतिउत्तर म्हणून किल्ल्यावरून काहीही हालचाल झालीच नाही शेवटी आपल्या मराठी सैनिकांची एक छोटी तुकडी रात्रीच्या सुमारास किल्ल्यात शिरली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे किल्ल्यातील सैनिकांना साधी खबरही नव्हती कि ते मराठ्यांच्या वेढ्यात अडकले आहेत. मग मात्र हा किल्ला घेणे सहज शक्य झाले आणि मग लगेचच पुढल्या दिवशी गोव्याचा व्हॉइसरॉय त्याचे जवळपास ४०० सैन्य घेऊन मराठ्यांवर चालून आला.
कितीही संकटे आली तरी आपल्या मराठी फौजा काही माघार घेणार नाही हे तर वेगळे सांगायला नकोच, अखेर आपले मराठी सैन्य गनिमी काव्याने लढले आणि पोर्तुगीझ सैन्याची पूर्ण दाणादाण उडविली. मराठ्यांचा वार इतका जबरदस्त होता कि शत्रूसैन्य जीव मुठीत घेऊन पळू लागले, इतकेच कशाला अहो खुद्द व्हॉइसरॉय सैन्यासोबत पळ काढत होता.
व्हॉइसरॉय पळतोय हे पाहून शंभूराजे अजूनच खवळले आणि आपल्या घोड्यावर स्वार होऊन खुद्द शंभूराजे त्याचा पाठलाग करू लागले. व्हॉइसरॉयने त्याचा घोडा पाण्याच्या दिशेने नेला आणि नेमकी त्याच दिवशी पाण्याला भरती आली होती परंतु, त्याची परवा न करता आपले शंभूराजे त्यांचा घोडा घेऊन स्वतः पाण्यात उतरले आणि कसलीही तमा न बाळगता पुढे जात राहिले. मागून आपल्या फौजादेखील पाण्यात उतरत होत्या.
शंभूराजांचा घोडा आता खोल पाण्यात पोहोचला आणि त्याचा तोल जाऊ लागला परंतु, लगेचच खंडो बल्लाळांनी पाण्यात उडी घेऊन शंभुराजांना सावरले. शत्रूसैन्य त्या भरतीचा फायदा घेऊन पसार झाले. इतिहासात या घटनेचा उल्लेख करताना म्हटले जाते कि, ‘त्या दिवशी गोवा तर घेतलेच असते पण, फिरंग्यांचे दैव समुद्राने राखले.’ पुढे मुअज्जम दक्षिण कोकणात येत असल्याने फार वेळ न दवडता शंभूराजांनी जुवे बेट दोन दिवसात सोडले आणि कोंकणात रवाना झाले.

शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया भाग ४

 



शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया
भाग ४
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
6) चिक्कदेवरायावर हल्ला
प्रथम आपण पाहुया चिक्कदेवराय याच्यासोबत झालेली लढाई. शंभूराजे कर्नाटक मोहिमेवर असतांनाची हि गोष्ट. शंभूराजांनी चिक्कदेवरायावर हल्ला करण्याचे योजिले परंतु, आपले सैन्यबळ कमी म्हणून शंभूराजांनी कुतुबशाही आणि बसप्पा नाईक यांच्याशी तह करून त्यांच्या फौजांचा आधार घेतला आणि या एकत्रित फौजा घेऊन शंभूराजांनी बाणावर येथे तळ ठोकला. चिक्कदेवरायावर हल्ला करण्याचा मनसुबा मनात होताच आणि त्याच दृष्टीने सगळी योजना होत होती आणि एकाएकी अचानक चिक्कदेवरायानेच शंभूराजांच्या फौजांवर आक्रमण केले.
सैन्याची एकच दाणादाण उडाली आणि बऱ्याच सैन्यांनी माघार घेतली, कुतुबशाही सैन्यदेखील पळते झाले आणि शंभुराजांना येऊन मिळणारे एकोजीराजांचे सैन्यदेखील अजून पोहोचले नव्हते. परिणामी मराठी सैन्य एकटे पडले आणि शंभूराजांनी माघार घेत त्रिचनापल्ली गाठली पण चिक्कदेवरायाचे सैन्य तेथेही आले. अशातच एकोजीराजांचे सैन्य शंभुराजांना मिळाले आणि मग या एकत्रीत फौजांनी चिक्कदेवरायाच्या फौजेचा धुव्वा उडविला आणि खुद्द चिक्कदेवरायलाच कैद केले. कैदेत असलेल्या चिक्कदेवरायाला पुढे मग खंडणीच्या बदल्यात सोडून देण्यात आले.
7 ) श्रीरंगपट्टणमची लढाई
दुसरी लढाई जी आपण पाहणार आहोत ती सुद्धा चिक्कदेवराया विरुद्धच आहे. चिक्कदेवरायाविरुद्ध झालेल्या पहिल्या लढाईत खंडणी घेऊन त्याला सोडून देण्यात आले होते परंतु, शंभुराजांना इथेच थांबायचे नव्हते. कर्नाटक मोहिमेवर असतांनाच शंभूराजांनी कर्नाटकातील स्थानिक नाईकांची साथ मिळविली आणि चिक्कदेवरायाविरुद्ध मदतीचे आश्वासन घेतले. अखेर शंभूराजांनी हल्ला करायचे ठरविले आणि श्रीरंगपट्टणम येथे हल्ला केला. हि श्रीरंगपट्टणमची मोहीम राजांच्या कर्नाटक मोहिमेतील दुसरी सर्वांत मोठी आणि महत्वाची लढाई गणली जाते.
हि श्रीरंगपट्टणम ची लढाई साधारण महिनाभर सुरु असेल आणि एवढ्यातच चिक्कदेवरायाला हि लढाई लढणे जड जाऊ लागले. लढाई म्हटली कि आगाऊ रसद, शस्त्रसाठा आणि अशा अनेक गोष्टी आल्याच आणि त्यासोबतच अमाप खर्च देखील आलाच. म्हणूनच हा खर्च भरून काढण्यासाठी चिक्कदेवरायाने चक्क त्याच्या जनतेवर लढाईचा अतिरिक्त कर बसविला. चिक्कदेवरायाच्या या करवाढीचा त्याच्याच जनतेकडून जोरदार विरोध झाला आणि जनतेनेच चिक्कदेवरायांविरुद्ध उठाव करत मराठी फौजांशी संधान बांधले आणि चिक्कदेवरायालाच घेरले. चिक्कदेवरायाने मदतीसाठी त्याच्या मदुरेच्या किल्ल्यातील सैन्याला बोलाविले. या सर्व युद्धप्रसंगातच शंभुराजांना खबर लागली कि औरंगझेबाने विजापूरची मोहीम आटोपली आणी पुढे तो पन्हाळा गडाला वेढा देण्याच्या बेतात आहे. याच खबरीमुळे शंभुराजांना हि चिक्कदेवरायाची मोहीम सोडून नाईलाजाने स्वराज्यात माघारी यावे लागले.

शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया भाग ३

 



शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया
भाग ३
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
४ ) पुणे प्रांतातील लढाई
चौथी लढाई पाहूया पुणे प्रांतातील. साधारण १६८५ च्या सुमारास; मराठी सैन्याची सुमारे १०,००० सैनिकांची तुकडी पुणे-सुपे या प्रांतात मुघलांच्या छावण्यांवर छापा टाकीत होते. या त्रासाला कंटाळून मराठ्यांना प्रतिकार करण्यासाठी रौदंदाझ खान या मुघल सरदाराची नेमणूक झाली. इतके असूनही मराठे मुघलांवर छापे टाकून दर दिवसा एक तरी मुघल छावणी उध्वस्त करीत होते. या सततच्या हल्ल्यानी वैतागून शेवटी रौदंदाझ खान, बरामंद खान आणि अझीम खान अशी तिहेरी जोडी आपल्या फौजेसहित एकवटली आणि मराठ्यांवर प्रतिहल्ला केला.
हि परिस्थिती सांभाळण्यासाठी शंभूराजे स्वतः काही सैन्य घेऊन मदतीला धावले. शंभूराजे येणार हे समजताच मुघल सैन्य माघार घेऊन मराठा सैन्याला परांडा किल्ल्यापर्यंत घेऊन आले आणि त्याच वेळी परांडा किल्ल्यानजीक असलेले ताज्या दमाचे १०,००० घोडेस्वार मराठ्यांवर तुटून पडले आणि नाईलाजाने मराठ्यांना माघार घ्यावी लागली.
५ ) शिर्केंविरुद्धची लढाई
पाचवी लढाई अत्यंत महत्वाची आहे. या लढाईतील संघर्षच पुढे शंभुराजांना जेरबंद करण्यात कारणीभूत झाला. शंभूराजांचे विश्वासू मित्र कवी कलश यांच्या हातात शंभूराजांनी विश्वासाने स्वराज्याची अनेक कामकाजें सोपविली होती. स्वराज्याचा कारभार कवी कलशांच्या हाती जाणे हे अनेकांना खटकत होते आणि यांतच शिर्के देखील होते. शिर्के घराणे म्हणजेच महाराणी येसूबाईंचे घराणे होय. येसूबाईंचे बंधू गणोजी राजे शिर्के यांना आपले वतन हवे होते. शिर्क्यांच्या या मागणीला कवी कलशांचा विरोध होता.
शेवटी हि नाराजी लढाईत रूपांतरित झाली आणि १६८८ च्या सुमारास गणोजी शिर्के पन्हाळगडाच्या परिसरात कवी कलशांवर चालून गेले त्यामुळे कवींचा नाईलाज झाला आणि त्यांना विशाळगडाकडे धाव घ्यावी लागली. यानंतर शिर्क्यांनी विशाळगडालादेखील वेढा दिला. आपले परममित्र कवी कलश संकटात आहेत हे समजताच दस्तुरखुद्द शंभूराजे स्वतः त्यांच्या मदतीला विशाळगडाकडे धावले. शंभूराजे विशाळगडाकडे प्रस्थान करताहेत हे समजल्यावर गणोजीनी आपले सैन्य संगमेश्वरी वळविले. शंभूराजांनी कवी कलशांना सोबत घेऊन शिर्क्यांची पाळणारी फौज गाठली आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना चांगलीच अद्दल घडविली.

शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया भाग २

 



शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया
भाग २
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
२ ) तारापूरची लढाई
दुसर्या लढाईमध्ये नजर टाकूया तारापुरच्या लढाई वर. गोष्ट आहे सुमारे १६८३ च्या आसपासची. ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या वाक्याप्रमाणे औरंगजेबाने इंग्रज, फ्रेंच, डच, इत्यादींना शंभूराजाना विरोध करण्याचे आदेश पत्रव्यवहाराने दिले. यापुढे पोर्तुगीजाने मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजि यांना अटक केली. हे समजताच स्वतः शंभूराजे सुमारे १००० घोडदळ व २००० सैन्य घेऊन आले आणि तारापूरच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि बाहेरील शहर बेचिराख केले.
तारापूर मधील वाखारींच्या अधिकार्यांनी मराठी फौजेवर हल्ला केला आणि सोबतच गोव्याकडुन मदत मागविली. पोर्तुगीज येत आहेत म्हणून मराठ्यांनी त्यांची रसदच अडविली त्यामुळे, पोर्तुगीज जेरीस आले आणि अखेर त्यांनी मराठ्यांचे वकील येसाजी यांची सुटका केली. पुढे पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी शंभूराजांनी आपली मोहीम गोव्याकडे वळविली आणि त्यामुळे तारापूर ताब्यात येता येता राहिले.
३ ) चौलची लढाई
आता आपण पाहूया चौलची लढाई. सुमारे १६८२ च्या सुमारास शंभूराजांनी डिचोली येथे दारूगोळ्याचा कारखाना सुरु केला होता. यामुळे गोवेकर पोर्तुगीझ नाराज झाला आणि त्यांनी कोकणात रयतेची छळवणूक सुरु केली. याच काळात मराठ्यांची सिद्दीशी चकमक सुरूच होती आणि त्यातच पोर्तुगीझांनी चौल नजीकच्या किनाऱ्याजवळ सिद्दीच्या सैन्याला आणि गलबतांना आश्रय देऊ केला.
हि खबर जशी शंभुराजांना लागली तसे शंभूराजांनी आपले सैन्य घेऊन मोहीम चौल कडे वळविली. राजांच्या सैन्यांनी चौलचे ठाणे गाठले आणि या ठाण्याबाहेर तट उभारण्याचे काम सुरु केले. पोर्तुगीझांनी मराठ्यांवर हल्ले सुरु केले आणि मग मराठ्यांनी सुद्धा जोरदार प्रतिउत्तर दिले आणि शेवटी चौलचे ठाणे ताब्यात घेतलेच आणि तट बांधून पूर्ण केला आणि विजय मिळविला

शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया भाग १

 


शंभूराजेंच्या उल्लेखनीय लढाया
भाग १
लेखन :निखील पाटील (INFOBUZZ)
शौर्य या शब्दाची एका वाक्यात व्याख्या करायची झाली तर मी म्हणेन शौर्य म्हणजे संभाजीराजे.
छत्रपती शिवरायांचे थोरले पुत्र संभाजी यांनी अनेक पराक्रम केले, अनेक वेळी स्वतःची योग्यता सिद्ध केली आणि शिवरायांप्रमाणेच स्वतःचे नाव स्वतःच्या कार्याने इतिहासात अजरामर केले. शंभूराजांनी अनेक लढाया लढल्या, अनेक शुत्रूंना सळो की पळो करून सोडले. शंभुराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेणे तसे फार मोठे काम आहे पण आज आपण शंभूराजांनी लढलेल्या १० लढायांचा थोडक्यात आढावा घेऊया.
1 ) जंजिरा मोहीम
पहिली लढाई अतिशय महत्वाची आहे आणि इतिहासात शंभुराजांची हिम्मत आणि जिद्द दर्शविणारी सुद्धा. ही लढाई म्हणजे जंजिरा मोहीम. जंजीर्यावर अंमल होता सिद्दीचा आणि या सिद्दीची सर्वात मोठी शक्ति होती किल्ले जंजिरा. सिद्दीने जंजिर्यालगतचा बराच प्रदेश ताब्यात ठेवला होता. याव्यतरिक्त सिद्दी मराठ्यांच्या मुलूखात देखील उपद्रव माजवत होता आणि त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. कोकण किनारपट्टीलगतच्या मुलूखात सिद्दी धुडगूस घालीत होता म्हणून शेवटी शंभुराजांनी किल्ले जंजिरा मोहीम सुमारे 1682 च्या सुमारास हाती घेतली.
सुरूवातीला मराठा आरमाराने गलबते पाण्यात सोडून सर्व बाजूंनी सर्व शक्तिनिशी जंजिऱ्यावर मारा केला परंतु हा प्रयत्न असफल गेला, कारण किल्ले जंजिरा अभेद्य किल्ला होता. असे प्रयत्न करून किल्ला ताब्यात येत नाही म्हंटल्यावर शंभूराजांनी सागरात जंजिर्यापर्यंत सेतु उभारून पोहोचण्याचे ठरविले आणि आदेशानुसार सेतूचे बांधकामही सुरू झाले.
भलेमोठे लाकडी ओंडके, दगड-धोंडे, माती वगैरे वापरुन हा सेतु बनविण्यात आला, सेतु बांधून पूर्ण होत नाही तोच सिद्दीच्या मदतीला मुघल पुढे आले आणि मुद्दाम हसन अली खान याला कल्याण-भिवंडी येथे धुडगूस घालण्यास धाडले आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शंभुराजांनी ही मोहीम आणि हा वेढा आपले विश्वासू सरदार रघुनाथ प्रभू महाडकर यांच्या हाती सुपूर्द करून हसन अली खानच्या मागावर जाणे योजिले.

अपराजित हर्षवर्धनला पराभवाचे पाणी पाजनारा पराक्रमी राजा

 


अपराजित हर्षवर्धनला पराभवाचे पाणी पाजनारा पराक्रमी राजा
सातवाहनांच्या तब्बल 460 वर्षाच्या सत्तेनंतर महाराष्ट्र प्रदेशावर वाकाटक घराण्याचा उदय झाला. इतिहासातील नोंदींनुसार या काळात महाराष्ट्राने सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगती केली आहे. वाकाटक साम्राज्यामध्ये फार पराक्रमी ज्याने राज्याचा इतिहास दुसऱ्या प्रदेशात केला अश्या राजाचा उदय झाल्याचा नोंदी नाहीत. वाकाटक नंतर महाराष्ट्रामध्ये चालुक्य घराण्याची सत्ता प्रस्तापित झाली.
या घराण्यातील पहिला राजा जयसिंग आहे पण बदामीच्या चालुक्यांच्या झेंडा देशभर फडकवला तो पहिला पुलकेशी. अश्वमेध यज्ञ करून साम्राज्याची राजधानी वातापी म्हणजेच बदामी पहिल्या पुलकेशीनेच केली. यानंतर इतिहासात नोंद घेण्यासारखा पराक्रमी राजा झाला तो कीर्तीवर्मन, याने आपल्या फक्त 11 वर्षाच्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला. कदंब आणि नल या पराक्रमी राजाचा पराभव करू आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.
पण खऱ्या अर्थाने बदामी चालुक्यांच्या झेंडा वाऱ्याच्या वेगाने फडकवणारा राजा म्हणजे ‘दुसरा पुलकेशी’. बदामी चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ आणि पराक्रमी राजा. वारसा हक्कात निर्माण झालेल्या अस्थिर मध्येही त्याने सामंत आणि मांडलिक राजांवर आपली घट्ट पकड निर्माण केली आणि सैन्याव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. दुसऱ्या पुलकेशी इतका पराक्रमी होता की आपल्या काळातील जवळपास सगळ्याच राजांना त्याने पराभवाचे पाणी पाजले आहे. उत्तरेत मौर्य, कलचुरी, नाल, राष्ट्रकूट, कदंब, आलूप अश्या राजांचा पराभव करत त्याने सगळं प्रदेश आपल्या साम्राज्याखाली आणला. विशेष करून महाराष्ट्रातील भाग याच काळात चालुक्यांच्या अधिपत्याखाली आला. यामध्ये मावळ, कोकण आणि विदर्भाचा समावेश आहे.
त्या काळात आपल्या पराक्रमाच्या कथांनी दुसरा पुलकेशी श्रेष्ठ ठरला होता पण हर्षवर्धन पेक्षा नाही, कारण त्या काळात हर्षवर्धन हा वर्धन साम्राज्याचा राजा महापराक्रमी समजला जायचा. त्याने चालुक्यांच्या उत्तरेतील भागावर आक्रमण केले यावेळी दुसरा पुलकेशी आणि हर्षवर्धन समोरासमोर आले. या युद्धात पुलकेशीने हर्षवर्धनला पराभवाचे पाणी पाजून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. एहोळ येथे असलेल्या एक शिलालेखात पुलकेशीच्या या विजयाची माहिती मिळते. पुलकेशीने कोसल आणि कलिंग ही मोठी राज्ये जिंकली आणि यानंतर पुलकेशीच्या अधिपत्याखाली चालुक्य साम्राज्य शिखरावर पोचले.
पुढे पल्लव राजा नरेंद्र वर्मा याने दुसरा पुलकेशीचा पराभव केला, याच युद्धात हा पराक्रमी पुलकेशी मारला गेला. पुढे झालेले राजे त्याच्याइतके पराक्रमी नसल्याने चालुक्यांच्या राज्याला उतरती लागली आणि हळूहळू सत्ता संपुष्टात आली.

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...