- दिनेश पाटील, वारणानगर
(९६२३८५८१०४)
भारतात
महापुरुषांना विविध उपाध्यांनी संबोधण्याची मोठी परंपरा आहे. भारत हा
व्यक्तीपुजक देश असल्यामुळे विशिष्ट कालावधीनंतर ‘नेता आणि अनुयायी’ हा
अनुबंध ‘देव आणि भक्त’ या अनुबंधात रुपांतरीत झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या
अवतीभोवती आढळतात. ही परंपरा रामाला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ या उपाधीने
संबोधण्यापासून विचारात घेतली तर ते फारच मनोरंजक ठरेल. ‘महापुरुषांच्या
उपाध्या’ यावर स्वतंत्र संशोधन ग्रंथ तयार झाला तर त्यातून ‘भारतीय
मानसशास्त्र’ आकार घेईल. या पार्श्वभूमीवर आधुनिक भारतातील विविध
महापुरुषांना लावलेल्या उपाध्या आणि त्यांचे मूळ सूत्रधार यांचा शोध घेतला
तर नवा ऐतिहासिक तपशील हाती लागतो.
भारतीय
समाजक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे जोतीराव फुले यांना आपण आदराने आणि
प्रेमाने ‘महात्मा’ असे संबोधतो. परंतु त्यांना ही पदवी देणाऱ्या
द्रष्ट्या महापुरुषाबद्दल आपल्याला माहिती नसते. फुलेंना ही पदवी महाराजा
सयाजीराव गायकवाड यांच्या सूचनेवरून देण्यात आली होती. हा इतिहास आम्ही
गंभीरपणे घेतला नाही आणि सांगितलाही नाही. परिणामी इतिहासाच्या सातत्यपूर्ण
नव्या शोधाची अपरिहार्यता निर्माण झाली. ११ मे १८८८ रोजी ही पदवी फुलेंना
समारंभपूर्वक देण्यात आली.
रवींद्रनाथ
टागोरांनी जुलै १९१५ मध्ये गांधीजींना सर्वप्रथम ‘महात्मा’ संबोधल्याचे
मानले जाते. परंतु याच्या ६ महिने अगोदर २७ जानेवारी १९१५ रोजी गोंडल
राससाला (Gondal Rasasala) या गोंडल संस्थानच्या आयुर्वेदिक औषधालयाने
आफ्रिकेहून परतलेल्या मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा
यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. गोंडल संस्थानचे राजवैद्य आणि
‘गोंडल राससाला’ औषधालयाचे संस्थापक जीवराम शास्त्री यांनी या समारंभाच्या
स्वागतपर भाषणात १९०८ ते १९१४ या काळात गांधींनी आफ्रिकेत वंशभेदाविरुद्ध
दिलेल्या लढ्याचे कौतुक करताना त्यांचा ‘महात्मा’ असा उल्लेख सर्वप्रथम
केल्याचे अधिकृत पुरावे सापडतात. १९१९ मध्ये कानपुर येथे झालेल्या अखिल
भारतीय क्षत्रिय कुर्मी परिषदेत शाहू महाराजांना ‘राजर्षी’ पदवी देण्यात
आली. बाळ गंगाधर टिळकांना ‘लोकमान्य’ ही पदवी कुणी, कधी आणि कुठे दिली
याबाबत तपशील सापडत नाहीत.
मतवाला
या हिंदी साप्ताहिकाच्या १५ ते १४ नोव्हेंबर १९२४ च्या अंकात लिहिलेल्या
‘विश्वप्रेम’ या लेखात भगतसिंगांनी वि.दा. सावरकरांचा ‘वीर सावरकर’ असा
उल्लेख केला होता. तर सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ पदवी कुणी दिली याबाबत
गूढ संभ्रम आहे. १९२७ नंतर भीमराव आंबेडकरांना त्यांचे अनुयायी ‘बाबासाहेब’
या उपाधीने संबोधू लागले. १९४६ मध्ये मुंबई येथील जाहीर सभेत प्र.के.
अत्रेंनी नाना पाटलांना ‘क्रांतिसिंह’ पदवी दिली. महाराष्ट्र भाऊराव
पाटलांना ‘कर्मवीर’ म्हणून ओळखतो. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात
यशवंतरावांना ‘प्रतिशिवाजी’ ही उपाधी दिली गेली. तर त्यांचे वारसदार शरद
पवार यांना ‘जाणता राजा’ ही उपाधी लावली जाते. या उपाध्या म्हणजे
नेतृत्वस्थानी असणाऱ्या कर्तबगार लोकांच्या जनमानसातील ‘अढळ’ स्थानाचे
प्रतिबिंब असते.
महापुरुषांना
दिल्या गेलेल्या उपाध्या या लोकमान्यतेची पोच असते. परंतु महाराष्ट्रातील
काही उपाध्याबाबत कमालीची संदिग्धता आणि अतिशयोक्तीसुद्धा आढळते. एका
महापुरुषाने तर आपले स्वतःचे चरित्र टोपणनावाने लिहून स्वतःलाच एक ‘Larger
than life’ उपाधी लावून घेतल्याचा शोध संशोधकांनी लावला आहे. इतिहासात अशा
गमतीजमती होत असतात.
महात्मा
फुले आणि महाराजा सयाजीराव हा आपल्या पुरोगामी इतिहासातील हिमालयासारखा
अनुबंध टाळून आपल्या चळवळीच्या रथाचे घोडे बेफाम पळत राहिले. त्यामुळे
आपल्या परंपरेच्या वैचारिक प्रवास कोणत्या दिशेने झाला हे अज्ञात राहिले.
फुले सयाजीरावांचा फोटो आपला आदर्श म्हणून आपल्या बैठकीच्या खोलीत लावत
होते. तर त्याचवेळी सयाजीराव सत्यशोधकांना ‘फुलेंना ‘महात्मा’ ही पदवी
जाहीर कार्यक्रम घेवून द्या’ अशी सूचना देत होते. या घटना फुलेंच्या
जीवनाच्या शेवटच्या ५ वर्षातील आहेत. यावेळी सयाजीराव वयाच्या पंचविशीत
होते. असे असूनसुद्धा आपल्या इतिहासाने या दोघांमधील ‘क्रांतीपूल’ झाकुन
ठेवला. हा इतिहास जर वेळीच उजेडात आला असता तर आपला इतिहास किती दैदिप्यमान
आणि प्रेरणादायी आहे हे कळले असते. परिणामी पुरोगामी चळवळीचे जातीयकरण
झाले नसते.
१८८३
ते १८९० या वर्षात फुल्यांचे बडोद्याला सातत्याने जाणे-येणे होते. यामध्ये
एकदा ते तीन महिने बडोद्यात राहिले होते. १८८४ च्या दरम्यान
धामणस्करांकरवी महाराजांनी फुल्यांना बडोद्याला बोलावले. समाजसुधारणेवर
त्यांची २-३ व्याख्याने ठेवली. हेच धामणस्कर पुढे १९०१ मध्ये बडोदा
संस्थानचे दिवाण झाले. नामांकित कंत्राटदार असणाऱ्या स्वामी रामय्या
व्यंकय्या अय्यावारू या प्रमुख सत्यशोधक नेत्याला सयाजीरावांनी आपल्या
लक्ष्मीविलास राजवाड्याच्या बांधकामाचे काम दिले. दामोदर सावळाराम यंदे
आणि रामजी संतुजी आवटे यांनी ११ ऑक्टोबर १८८५ रोजी ‘बडोदा वत्सल’ हे
सत्यशोधकी वर्तमानपत्र बडोद्यात सुरू केले. तर ३१ नोव्हेंबर १८९३ रोजी
दामोदर सावळाराम यंदे यांनी ‘श्री सयाजीविजय’ हे नवे साप्ताहिक
स्वतंत्रपणे सुरू केले.
१८८५
मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात शेटजी-भटजींच्या विरुद्ध
सत्यशोधकांच्या ज्या सभा होत त्यावेळी सत्यशोधक समाजातर्फे सयाजीरावांचा
सत्कार झाला होता अशी आठवण सत्यशोधक नारो बाबाजी महागट यांनी नोंदवली आहे.
यावेळीच सत्यशोधकांच्या काही शाळांमध्ये महाराज उपस्थित राहिले होते.
सत्यशोधक समाजाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या शाळेला महाराजांनी बरीच
वर्षे दरमहा १०० रुपये देणगी दिली.
रामजी
संतूजी आवटे आणि धामणस्करांनी मिळून १८९६ च्या दरम्यान बडोद्यात माधवराव
पवार यांच्या घरी मराठा जातीचे पुजारी तयार करण्याचा वर्ग सुरू केला.
वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सत्यशोधक सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे
ग्रंथपाल होते. त्यांचे ‘क्षत्रीय व त्यांचे अस्तित्व’ हे पुस्तक
सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाले. १७ फेब्रुवारी १९३० रोजी
महाराजांनी लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सत्यशोधक समाजाच्या काही
कार्यकर्त्यांची व्याख्याने जनतेसाठी मुद्दाम ठेवली होती. या व्याख्यानांना
महाराज स्वत: हजर होते. यावेळी नारो बाबाजी महागट यांना मदत म्हणून २००
रु. रोख दिले होते.
मॅक्स
मुल्लरने भाषांतरीत केलेल्या ‘सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट’ या मालेत
प्रकाशित केलेल्या बारापैकी सात उपनिषदांचा मराठी अनुवाद करण्याचे काम
सयाजीरावांनी सत्यशोधक विचारधारेच्या केळूसकरांवर सोपवले. हे भाषांतर करत
असताना केळूसकरांनी मॅक्स मुल्लरऐवजी मूळ संस्कृत ग्रंथांवरून ते केले.
संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळूसकर हे पहिले
ब्राह्मणेत्तर ठरतात. कोल्हापूर संस्थानचे दिवाण भास्करराव जाधव
सयाजीरावांच्या आश्रयाने सुरु असलेल्या गंगारामभाऊ म्हस्के यांच्या डेक्कन
मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकले. त्यांना सयाजीरावांनी
बडोद्यात नोकरीस येण्याची सूचना केली होती. सत्यशोधक कर्मवीर भाऊराव पाटील
यांनासुद्धा रयत शिक्षण संस्थेची प्रेरणा सयाजीरावांकडून मिळाली होती हे
त्यांनी स्वतःच नोंदवून ठेवले आहे. सत्यशोधक जागृतीकार पाळेकर बडोद्यात
‘जागृती’ वर्तमानपत्र यशस्वीपणे चालवत होते.
महात्मा फुलेंचा ‘शेतकर्यांचा
असूड’ हा ग्रंथ प्रकाशित होण्याअगोदर दोन वर्षे १८८१ मध्ये सयाजीरावांना
राज्याधिकार प्राप्त झाले. १८८३ मध्ये बडोदा भेटीत फुलेंनी हा ग्रंथ
सयाजीराव महाराजांना वाचून दाखविला. याच भेटीत महाराजांनी ‘शेतकर्यांचा
असूड’ या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मदत केल्याचा उल्लेख या ग्रंथाच्या
शेवटच्या पानावर येतो. फुले लिहितात, “श्रीमंत सरकार गायकवाड सेनाखासखेल
समशर बहादूर सयाजीराव महाराज यांनी मी बडोद्यास गेलों होतो त्यावेळी आपल्या
सर्व राजकीय कामातील अमोल्य वेळांत काटकसर करून अप्रतिम उल्हासाने व
सप्रेम भावानें मजकडून हा ग्रंथ वाचवून साग्र लक्षपूर्वक ऐकिला व
श्रीम्महाराजांनी आपल्या औदर्याप्रमाणे मला द्रव्याद्वारे मदत करून माझा
यथासांग अत्युत्म आदरसत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा फार फार ऋणी आहे.”
विशेष
म्हणजे या ग्रंथाचे पहिले दोन भाग नारायण मेघाजी लोखंडे संपादक असणाऱ्या
दीनबंधू पत्रात क्रमशः प्रकाशित झाले होते. परंतु फुलेंनी या ग्रंथात
भारतातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीसाठी जबाबदार भारतातील ब्राह्मणी
व्यवस्थेबरोबरच ब्रिटीश सरकारवरही सडकून टीका केली होती. ब्रिटीश सरकारचा
रोष आपल्यावर येऊ नये म्हणून सत्यशोधक असणाऱ्या लोखंडेंनी या ग्रंथाचे
क्रमशः प्रकाशन बंद केले. या पार्श्वभूमीवर सयाजीरावांचे उघडपणे या
ग्रंथाला अर्थसहाय्य करणे किती हिमतीचे होते हे आपल्या लक्षात येईल. नुकताच
राज्यकारभार हाती घेतलेल्या अवघ्या २० वर्षाच्या राजाने कारकीर्दीच्या
आरंभीच इंग्रजांशी थेट भिडण्याची ही कृती अतिशय महत्वाची आहे. महात्मा
फुल्यांच्या संदर्भाने गेली ६० वर्षे संशोधन-लेखनाचे पीक उदंड झाले असता
फुल्यांच्या एकाही अभ्यासकाने सयाजीरावांच्या या कृतीचे मोल लक्षात घेतले
नाही.
फुलेंनी
‘शेतकऱ्यांचा असूड’ मध्ये मांडलेली भूमिका आणि व्यक्त केलेल्या अपेक्षा
आपण जेव्हा सयाजीरावांच्या शेतीविषयक कार्याशी जोडून समजून घेतो तेव्हा
सयाजीरावांच्या कृतीशीलतेचे मोठेपण लक्षात येते. सयाजीरावांनी १८९७ मध्ये
बडोद्यात स्वतंत्र शेती खाते सुरू केले. शेतीसाठी पाणी, अवजारांबरोबरच
कृषिविषयक प्रगत ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. 'कृषीकर्मविद्या' हा
६०० पानांचा ग्रंथ १८९८ मध्ये प्रकाशित केला. बँक ऑफ बडोदा आणि विविध
सहकारी पतपेढ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले.
संस्थानाच्या वतीने १२,००० विहिरी खोदल्या. संस्थान आणि शेतकऱ्यांच्या
संयुक्त मालकीचा गणदेवी हा आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना १८८५ ला
सुरू करून भारतात कृषी-औद्योगिक क्रांतीचा पाया घातला. शेती विकासासाठी ५८
प्रकारच्या सहकारी संस्थांमार्फत ‘कृषी सहकारा’चा मानदंडही निर्माण केला.
हे सर्व प्रयत्न म्हणजे फुल्यांच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमाचाच परिपूर्ण
विकास आहे.
१९
ऑक्टोबर १८८२ रोजी महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर बहुजनांना शिक्षण
देण्यासंदर्भात मागणी केली. त्याच वर्षी सयाजीरावांनी अस्पृश्य आणि
आदिवासींसाठी मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य आणि वसतिगृहाच्या सोयीसह
उपलब्ध करून देवून फुल्यांच्या मागणीबरोबर प्रत्यक्ष कृतीचे पाऊल टाकले.
इतकेच नव्हे तर स्त्रीशिक्षिका तयार करण्याच्या उद्देशाने स्त्रियांचे
शिक्षणशास्त्र महाविद्यालयही याच वर्षी सुरु करून सयाजीरावांनी
शुद्रातिशुद्र आणि स्त्रिया यांच्या उन्नतीचे महाद्वार उघडले. इतकी
कृतिशीलता सयाजीरावांच्या नंतर एकाही फुले अनुयायाला प्रत्यक्षात आणता आली
नाही.
पुढे
१९०६ मध्ये भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानात महाराजांनी सक्तीच्या आणि
मोफत प्राथमिक शिक्षणाचा क्रांतिकारक कायदा लागू केला. या कायद्यात
सयाजीरावांनी १० वर्षापर्यंतची मुले आणि ८ वर्षापर्यंतच्या मुलींना शाळेत न
पाठवणाऱ्या पालकांना दिवसाला एक रुपया दंडाची तरतूद केली. या तरतुदीचा थेट
संबंध १८८२ च्या फुल्यांनी हंटर कमिशनसमोर केलेल्या मागणीशी आहे. कारण ही
मागणी करत असताना फुल्यांनी पालकांना दंड करून पालकांकडून जमा होणारा दंड
बहुजनांच्या शिक्षणावर खर्च करावा अशीही मागणी केली होती. १९०६ च्या १
रुपयाचे आजचे मूल्य २५०० रु. भरते हे वाचून आज आपण यावर विश्वास ठेवणार
नाही.
१८८४ ला फुल्यांनी मुंबई सरकारकडे बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे बालविवाह करणार्या
दोन्ही पक्षातील पालकांकडून दंड वसूल करावा आणि हा दंड बहुजनांच्या
शिक्षणासाठी खर्च करावा हा मुद्दाही या मागणीत होता. सयाजीरावांनी
फुल्यांच्या मागणीनंतर ४ वर्षांनी १४ जुलै १८८६ रोजी सर इलियट यांना
लिहिलेल्या पत्रात बालविवाह प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा निश्चय
केल्याचे लिहिले आहे. पुढे १९०४ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात बालविवाह
प्रतिबंधक कायदा लागू केला. हा कायदा फुल्यांच्या मागणीला सुसंगत होता. पण
येथेही महाराजांनी फुलेंच्या पुढे एक पाऊल टाकले होते. फुल्यांनी बालविवाह
करणार्या वधू आणि वर पक्षाला दंड करावा अशी मागणी केली होती.
महाराजांनी मात्र वधू आणि वर पक्षाबरोबर लग्न लावणार्या
भटजीलासुद्धा दंड आणि शिक्षेच्या तरतुदीत आणले होते. ५० रु. दंड किंवा १
महिन्याचा तुरुंगवास असे या शिक्षेचे स्वरूप होते. पुढे १९३७ मध्ये दंडाची
रक्कम ५० रु. वरून १०० रु. करण्यात आली. ही दंडाची रक्कम आजच्या रुपयाच्या
मूल्यात १ लाख ५७ हजार रु.हून अधिक भरते.
पुरोहितशाहीच्या
विळख्यात जगातील सर्वच मानवी समाज ‘गुदमरत’ जगत आले आहेत. फुल्यांनी
म्हणूनच या पुरोहितशाहीवर घणाघात केले. या पुरोहितशाहीला पर्याय देण्याचा
‘प्रतिकात्मक’ प्रयत्न केला. या प्रयत्नाचाच भाग म्हणून महात्मा फुलेंनी
सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधक विधिंसंबंधी मंगल अष्टकांसह सर्व पूजा विधींची
छोटी पुस्तिका १८८७ मध्ये प्रकाशित केली होती. फुल्यांचे हे काम याच वर्षी
१८८७ मध्ये ‘नितीविवाह चंद्रिका’ हा ग्रंथ मराठीत प्रकाशित करून सयाजीराव
पुढे व्यापक करताना दिसतात. ‘हे असे का घडले’ याचा शोध घेण्याचे आमच्या
‘महान’ संशोधन परंपरेने टाळले. यातूनच प्रबोधन परंपरेचे आजचे ‘अनर्थ’ घडले.
या मालेत पुढे १९०३ मध्ये ‘वधूपरीक्षा’, १९०४ मध्ये ‘लग्नविधी व सोहळे’ ,
१९१३ मध्ये ‘विवाह विधीसार’, १९१६ मध्ये ‘उपनयन विधीसार’ पुढे
‘श्राद्ध-विधीसार’ , ‘अंत्येष्ठिविधिसार’ , ‘दत्तकचंद्रिका’, ‘दानचंद्रिका’
इ. ग्रंथ प्रकाशित करून फुल्यांनी सुरू केलेल्या धर्मचिकित्सेला
सयाजीरावांनी सकारात्मक धर्म साक्षरता अभियानात रुपांतरीत केले.
१८९६
च्या वेदोक्तानंतर सयाजीरावांनी सर्व वेदोक्त विधींच्या संदर्भातील १६
संस्कारांच्या विधींचे मराठी भाषांतर करून छापण्याचे काम रियासतकार
सरदेसाईंकडून करून घेतले होते. इतकेच नाही तर १९०५ च्या हिंदू विवाह
कायद्यात १९२८ साली सुधारणा करून लग्नविषयक सर्व वैदिक मंत्रांचे मराठी,
गुजराती व हिंदी या भाषांमध्ये भाषांतर करून ते सरकारमार्फत प्रसिद्ध
करण्यात यावे व ते भाषांतर वधू-वरांच्या मातृ भाषेत लग्न लावणाऱ्या
पुरोहिताने वाचून समजावून सांगावे व तसे न केल्यास त्याला ५० रु. दंड
करण्याची तरतूद केली. ही दंडाची रक्कम आजच्या रुपयाच्या मुल्यात १ लाख ३०
हजार रु.हून अधिक भरते.
पक्षाघाताच्या
पहिल्या आजारपणात उपचारासाठी सयाजीरावांनी फुल्यांना आर्थिक मदत केली. या
आजारात उजवा हात पक्षाघाताने निकामी झाल्यामुळे डाव्या हाताने फुल्यांनी
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा महत्वाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या शेवटी
फुल्यांनी या आजारपणातून वाचण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त करणारा एक अखंड लिहिला आहे. त्या अखंडाच्या पहिल्या दोन
ओळी महत्वाच्या आहेत. या अखंडाची सुरुवातच सयाजीरावांच्या उल्लेखाने झाली
आहे.
त्या ओळी पुढीलप्रमाणे -
गायक्वाडी आश्रय, घोल्याची नजर ॥ होती अनिवार ॥ फी न घेतां ॥१॥ गा.॥ धृ.॥
दुष्ट रोगांतून फुल्या वांचविला ॥ आनंदी पत्नीला ॥ केली ज्याच्या ॥२॥
महात्मा
फुल्यांची सर्वात महत्वाची लेखनकृती असणारा ‘सार्वजनिक सत्यधर्म ’ या
पुस्तकाच्या शेवटी सयाजीरावांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना फुले महाराजांचा
उल्लेख ‘सद्सदविचारसंपन्न’ असा करतात. यावरून फुल्यांच्या जीवनात
सयाजीरावांचे स्थान काय होते हे लक्षात येते.
फुलेंनी
पत्राद्वारे मागणी करून सयाजीरावांचा फोटो हवा असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार महाराजांनी आपला राजवेषातील फोटो फुलेंना पाठवला. परंतु
त्याऐवजी साध्या वेशातील फोटो मागवून तो फुल्यांनी त्यांच्या बैठकीच्या
खोलीत लावला होता. महात्मा फुल्यांनी सयाजीरावांचा फोटो आपल्या बैठकीच्या
खोलीत लावणे यातच पुरोगामी महाराष्ट्राचा ‘खरा’ इतिहास लपला आहे.
महाराष्ट्र जेवढ्या लवकर हे वास्तव स्वीकारेल तेवढे ते महाराष्ट्राच्या
पुरोगामी परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी पोषक ठरेल.
१८९०
मध्ये फुल्यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाई आणि यशवंत यांना अत्यंत हलाखीत
दिवस काढावे लागत होते. मामा परमानंदांच्या विनंतीवरून महाराजांनी
सावित्रीबाईंच्या मदतीसाठी धामणस्करांच्या हस्ते एक हजार रूपयांचा चेक
पाठवून दिल्याचे १०-२-१८९२ च्या धामणस्करांनी मामांना लिहीलेल्या पत्रावरून
कळते. हा चेक मामांचे स्नेही तुकाराम तात्या भागीदार असणार्या
एस. नारायण कंपनीत ठेऊन त्या रकमेच्या व्याजातून दर तिमाहीस
सावित्रीबाईंना ५० रु. मदत मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. या ठेवीची
पावती सावित्रीबाईंकडे ठेवण्याचा हुकूम महाराजांनी धामणस्करांना
दिल्याप्रमाणे रजिस्टर पत्राने ती सावित्रीबाईंकडे पाठवण्यात आली.
फुल्यांच्या
मृत्यूनंतर बडोद्यातील ‘बडोदावत्सल ’ या सत्यशोधकी विचाराच्या
साप्ताहिकाने ७ डिसेंबर १८९० मध्ये लिहीलेल्या मृत्यूलेखात फुल्यांचे समग्र
वाङ्मय प्रकाशित करण्याची मागणी सर्वप्रथम केली होती. पुढे ७९ वर्षांनी
१९६९ मध्ये महाराष्ट्र शासनाने फुल्यांचे समग्र वाड्मय प्रकाशित केले. १८९२
मध्ये ‘बडोदा वत्सल’ने सावित्रीबाईंचा भाषणसंग्रह प्रकाशित केला.
फुल्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक झाल्यास त्याला आर्थिक मदत करण्याची
सयाजीरावांनी तयारी दर्शवली होती. परंतु तसे प्रयत्न न झाल्याने तो विषय
तेथेच थांबला. पुढे ‘सत्यप्रकाश’ हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र प्रकाशित
करण्याची योजना पुढे आल्यानंतर त्याला मदत करण्याची भूमिका सयाजीरावांनी
घेतली होती.
वरील
सर्व तपशील लक्षात घेता फुलेंच्या वैयक्तिक संकटात जशी महाराजांना त्यांना
साथ दिली त्याच पद्धतीने फुलेंना अपेक्षित असणाऱ्या समाजक्रांतीला
सातत्याने ‘खतपाणी’ घालुन ती ‘जोमदार’ करण्याचा सयाजीरावांनी जेवढा प्रयत्न
केला त्याच्या निम्याइतकाही प्रयत्न आधुनिक महाराष्ट्रातील एकाही
राज्यकर्त्याला जमला नाही. कारण सयाजीरावांची फुले विचाराशी असणारी
बांधिलकी ‘जैविक’ स्वरुपाची होती. सयाजीराव टाळून फुले विचाराची चर्चा
झाल्यामुळेच फुलेंच्या नावाने चाललेल्या सर्वच चळवळी ‘कुपोषित’ आणि
‘संकुचित’ झाल्या. फुले विचाराला नवचैतन्याची पालवी फुटावी असे जर आपल्याला
वाटत असेल तर आपल्या प्रबोधन परंपरेचा ‘सयाजीराव’ नावाचा ‘जोडइतिहास’
स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.
सयाजीरावांच्या
धोरणांमध्ये फुले विचाराचे परिपूर्ण प्रतिबिंब दिसते यात फुलेंच्या
कार्याचे मोल स्पष्ट होते. सयाजीरावांसारखा जागतिक कीर्तीचा विद्वान
फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानत होता. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे
फुलेंच्या कामाचे मोल सर्वप्रथम आणि सर्वाधिक जर कुणी जाणले असेल तर ते
सयाजीराव होते. फुलेंना महात्मा ही पदवी देण्याची सूचना सायाजीरावांना कशी
केली होती हे दामोदर सावळाराम यंदे यांनी आपल्या फुलेंविषयक आठवणीत
सुस्पष्टपणे सांगितले आहे. यंदे हे महाराजांच्या राजाश्रयाने आपला ग्रंथ
प्रकाशन व्यवसाय करत होते. तसेच ते सत्यशोधकसुद्धा होते.
ते
आपल्या आठवणीत ‘महात्मा’ पदवीचा इतिहास नोंदवताना म्हणतात, “... जोतीराव
फुले यांचे नाव घेतेवेळी महाराज त्यांच्या नावापूर्वी हटकून ‘महात्मा’ हा
बहुमानदर्शक शब्द वापरीत असत, हे मला पक्केपणी माहित आहे. ते जोतीरावांना
‘आधुनिक महात्मा’ म्हणत असत. “बहुजन समाजाला अज्ञानातून वर काढून त्याला
अर्वाचीन काळी जागविणारा या देशातील पहिला पुरूष जोतीराव हाच होय. त्यांचे
कार्य विशाल आहे आणि त्यांचा त्याग तर त्याहूनही अधिक थोर आहे. त्याने ज्या
मार्गाने कार्य केले आहे, त्याच मार्गाने कार्य झाल्यास आपल्या राष्ट्राचे
हित व उद्धार होणार आहे. महात्मा बुद्धाप्रमाणे मानवजातीच्या उद्धाराचे
कार्य जोतीराव करीत असल्यामुळे त्यांना महात्मा म्हटले पाहिजे.” असे महाराज
म्हणत असत, इतकेच नव्हे तर महाराजांनी मुंबईच्या मंडळींना जोतीरावांना
‘महात्मा’ ही पदवी देण्याबद्दलची सूचना केल्यावरून सन १८८८च्या उन्हाळ्यात
जोतीराव मुंबईला आले असता त्यांचे रघुनाथ महाराजांच्या समाधीवर एक
व्याख्यान झाले. त्याप्रसंगी मुंबईकरांनी त्यांना ‘महात्मा’ पदवी अर्पण
केली ह्या सभेस मी हजर होतो. ह्यावरून श्रीमंत महाराजांच्या मनात
जोतीरावांबद्दल किती आदर वसत होता व जोतीराव किती थोर दर्ज्याचे पुरूष होते
याची कोणासही सहज कल्पना होईल.”
महाराजा
सयाजीराव महात्मा फुलेंचा गौरव ‘हिंदुस्तानचा वाशिंग्टन’ असाही करत.
‘महात्मा’ ही पदवी अर्पण करण्याचा कार्यक्रम ११ मे १८८८ रोजी मुंबई येथे
पार पडला.
No comments:
Post a Comment