भाग ४
जानोजी भोसले
रघूजीला दोन पत्न्या होत्या. त्यांपासून त्यास चार मुलगे झाले : मुधोजी, बिंबाजी, जानोजी व साबाजी. जानोजी व साबाजी हे दुसऱ्या पत्नीचे मुलगे होते; पण जानोजी हा सर्वांत मोठा मुलगा होता. म्हणून रघूजीने आपल्या पश्चात जानोजीस नागपूर संस्थानची गादी मिळावी व इतरांना आवश्यक तेवढे उत्पन्न द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. दुसरी गोष्ट जानोजी त्याच्या अखेरच्या दिवसांत त्याच्याबरोबर स्वारीत असे. कर्नाटक व बंगाल (१७४९-५०) मधील स्वाऱ्या त्याने स्वतंत्र रीत्याही हाताळल्या होत्या. रघूजी १४ फेब्रुवारी १७५५ रोजी मरण पावला. त्याच्या मुलांत नागपूरच्या गादीबद्दल नंतर तंटे सुरू झाले.
जानोजी (कार. १७५५ - ७२) रघूजीनंतर नागपूरच्या गादीवर आला. त्याला वऱ्हाडचे सुभेदार कृष्णाजी गोविंदराव, नागपूरचे सुभेदार नरहर बल्लाळ रिसबुड, रघूजी करांडे, शिवाजी केशव टाळकुटे वगैरे मातब्बर सरदारांचे साहाय्य व सहानुभूती होती. मुधोजी थोरल्या बायकोचा असल्यामुळे वारसाहक्क मागत होता. यामुळे दोघांचे भांडण अखेर पेशव्यांकडे पुण्याला नेण्यात आले. पेशव्यांनी जानोजीस सेनासाहेबसुभा हे पद दिले आणि सेनाधुरंधर हे नवीन पद निर्माण करून ते मुधोजीस दिले. मुधोजीस चांदा व छत्तीसगढ हे प्रदेश देऊन त्यांची शासकीय व्यवस्था त्याजकडे सोपविली. बिंबाजीने छत्तीसगढ येथे आणि साबाजीने वऱ्हाडातील दारव्ह येथे रहावे, असे ठरले. सर्व भोसले बंधूंनी पेशव्यांना २० लाख रुपये द्यावेत. प्रत्यक्षात सेनासाहेबसुभा ही सनद ताराबाईने पुढे पहिला माधवराव पेशवा झाल्यानंतर १७६१ मध्ये दिली; तथापि पुण्यास दोघा बंधूंमध्ये समेट घडत असता व नंतरही दोघे एकमेकांशी झगडत होते. अखेर १७५७ मध्ये दोघांनी लढाईने तंटा मिटविण्याचे ठरविले. रहाटगावजवळ लढाई झाली. मुघोजीचा पराभव झाला आणि तह होऊन काही काळ शांतता आली. निजामाने जानोजी कर्नाटकात गेला आहे, हे पाहून वऱ्हाडावर स्वारी केली. त्या वेळी जानोजीने परत येऊन सर्व वऱ्हाडचा प्रदेश पादाक्रांत केला (१७५७); तेव्हा निजामाने पुढे जानोजीबरोबर एलिचपूर येथे सुलतान खापन्ही याच्या मध्यस्थीने में १७५८ मध्ये तह केला. त्यानुसार निजाम व भोसले यांत वऱ्हाडच्या उत्पन्नाची विभागणी झाली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील पराभवानंतर (१७६१) जानोजी नानासाहेबास जाऊन मिळाला; पण पुढे जानोजी पुन्हा निजामाकडे गेला (१७६२). दोघांनी मिळून पेशव्यांचा मुलूख पुण्यासह जाळला. राक्षसभुवनच्या लढाईत (१७६३) जानोजी व मुधोजी पेशव्यांना पुन्हा मिळाले. त्याबद्दल रघुनाथरावाने त्यांना ३२ लाखांचा प्रांत दिला. यानंतर साबाजी रूसून माधवराव पेशव्यांकडे जात असता जानोजी व त्याची बायको दर्याबाई यांनी त्याचे मन वळविले. माधवरावाने नागपूर जाळून त्यांचा पुष्कळ प्रांत काबीज केला. जानोजी व मुधोजी या बंधूंवर गोपाळराव पटवर्धनास पाठविले. गोपाळरावाने मध्यस्थी करून कनकापूर येथे माधवराव पेशवे व जानोजीत तह घडवून आणला (१७६९). जानोजीस मूल नसल्यामुळे त्याने मुधोजीचा मुलगा रघूजी (दुसरा) यास दत्तक घेण्याचे ठरविले. दत्तकमंजुरीस पुण्यास जाऊन परत येत असताना पोटशुळाच्या व्यथेने तो बालेघाटात १६ मे १७७२ रोजी मरण पावला. त्याच्याबरोबर त्याच्या अनेक स्त्रिया सती गेल्या. जानोजीच्या वेळी दिवाकर पुरुषोत्तम ऊर्फ देवाजीपंत चोरघडे हा नारखेडचा गृहस्थ जानोजीचा राजकीय सल्लागार म्हणून पुढे आला. जानोजीनंतरच्या भोसले घराण्यातील अनेक व्यक्तींना त्याचा सल्ला महत्त्वाचा ठरला. जे स्थान नाना फडणीसाचे पुणे दरबारात होते, तेच नेमके दिवाकरपंताचे नागपूरकर भोसले यांच्या दरबारात होते.
No comments:
Post a Comment