भाग ५
दुसरा रघूजी (कार. १७७२-१८१६) भोसले
जानोजीनंतर दुसरा रघूजी (कार. १७७२-१८१६) भोसल्यांच्या गादीवर आला; पण तत्पूर्वी त्याचे दत्तकविधान झाले नसल्यामुळे पुन्हा भोसले घराण्यात कलहास सुरुवात झाली. मुधोजीचा धाकटा भाऊ साबाजी याने माधवरावाकडून सेनासाहेबसुभा ही सनद रामाजी बल्लाळ गुणे या मध्यस्थामार्फत मिळविली; कारण मुधोजी हा रघुनाथरावाच्या पक्षाचा होता. याच वेळी जानोजीची पत्नी दर्याबाई साबाजीस मिळाली व आपण गरोदर असून आपणास मुलगा झाल्यास त्यास गादी मिळावी, म्हणून तिने खटपट सुरू केली. मुधोजीने आपली सर्व कुटुंबीय मंडळी चांद्याच्या किल्ल्यात पाठविली आणि सु. २५,००० ची फौज जमविली. साबाजी व मुधोजी यांत कुंभारी येथे युद्ध होऊन (१७७३) असे ठरले की, सेनासाहेबसुभा हे पद दुसऱ्या रघूजीस देऊन साबाजी व मुधोजी या दोघांनी संयुक्तरीत्या राज्यकारभार पाहावा; तथापि साबाजीस ही योजना पसंत नव्हती. त्याने पेशवा नारायणरावाची रघुनाथरावाविरुद्ध बाजू घेतली. निजामही नारायणरावाच्या बाजूचा होता; पण रघुनाथरावाने निजामाचा पराभव केला. अखेर हा तंटा पंचगावच्या लढाईत साबाजी मरण पावल्यानंतर संपुष्टात आला (२६ जानेवरी १७७५). दर्याबाई व इतर साबाजीचे लोक साहजिकच मुधोजीस मिळाले आणि मुधोजी (कार. १७७५-१७७८) हा काही काळ सत्ताधीश झाला व रघूजीस रितसर सेनासाहेबसुभा हा किताब सवाई माधवरावाकडून मिळाला (१७७५). मुधोजी हा बारभाईविरुद्ध रघुनाथरावास मिळाला. मुधोजीने निजामाचा सरदार रूकन उद्दौला यासही रघुनाथरावाच्या पक्षात सामील करून घेतले. पुढे भोसल्यांनी बंगालमध्ये चौथाईचा बहाणा करून इंग्रजांवर स्वारी करण्याचे ठरले असतानासुद्धा दुसऱ्या रघूजीने दिवाकरपंतांच्या सल्ल्याने हा बेत रद्द केला. एवढेच नव्हे, तर जनरल गोडाई पुण्याकडे जात असता मुधोजीने आपल्या राज्यातून त्यास मार्ग दिला व पेशव्यांविरुद्ध त्याच्याशी तह केला. तेव्हा नाना फडणीसाने बिंबाजीच्या साहाय्याने मुधोजीविरुद्ध मसलत उभारली. त्या वेळी मुधोजी घाबरला व त्याने इंग्रजांचा पक्ष सोडला; तथापि त्याचे एकूण धोरण इंग्रजांना मदत करण्याचे होते, हे पुढे इंग्रजांनी टिपूवर जी स्वारी केली, त्यात स्पष्ट झाले. अखेर तो नाना फडणीसास टिपूविरुद्धच्या बादामीच्या वेढ्यात मदतीला आला (१७८६). यानंतर तो नागपूरास परत गेला व तेथेच १९ मे १७८८ रोजी मरण पावला. तत्पूर्वीच त्याचा भाऊ बिंबाजी मरण पावला होता. मुधोजीस रघूजी, खंडोजी व व्यंकोजी असे तीन मुलगे होते. रघूजीने पेशव्यांची मर्जी संपादून व्यंकोजीस सेनाधुरंधरची वस्त्रे मिळविली (१७८९). पुढल्या वर्षी खंडोजी एकाएकी वारला.
मुधोजीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या रघूजीच्या हातात सत्ता पूर्णतः आली. रघूजीचे व नाना फडणीसाचे संबंध मित्रत्वाचे होते. खर्ड्याच्या लढाईत (१७९५) रघूजीने विठ्ठल बल्लाळ या सुभेदाराच्या नेतृत्वाखाली फौज धाडली. यामुळे रघूजीस साडेतीन लाखांचा मुलूख व गंगथडी प्रदेशाचा घासदाणा मिळाला. निजामाने सु. २९ लाख
रुपयांची बाकी रघूजीस देण्याचे कबूल केले. याशिवाय नवीन सनदेनुसार नर्मदेच्या दक्षिणेकडील मुलूख आणि नाना फडणीसाने पाच लाख रुपये व गढा-मंडल्याचा प्रदेश दिला. पुढे त्यास सागरच्या राजाने अमीरखानविरुद्ध मदत केल्याबद्दल काही मुलूख दिला. १८०० मध्ये रघूजीचे राज्य विस्ताराने इतर मराठी संस्थानिकांपेक्षा मोठे व समृद्ध होते; परंतु त्याचा ईस्ट इंडिया कंपनीशी संबंध आल्यानंतर अवनतीस सुरुवात झाली. लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर (१७९८) त्याने तैनाती फौजेची पद्धत सुरू केली व हळूहळू ती एतद्देशीय संस्थानिकांवर लादली. मराठी संस्थाने हळूहळू त्याच्या कच्छपी जात होती. वेलस्लीच्या सैन्याने अखेर गाविलगढावर हल्ला केला. अडगावच्या लढाईत रघूजीचा पराभव झाला (२९ नोव्हेंबर १८०३) आणि देवगाव येथे तह होऊन युद्ध संपले (१७ डिसेंबर १८०३). यावेळी इंग्रजांनी भोसल्यांवर अपमानकारक अटी लादल्या व मुलूख घेतला. वऱ्हाड प्रांत निजामास देण्यात आला आणि भोसल्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (कार. १८०४-१८०७) हा नागपूरास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेंट नेमण्यात आला. देवगावच्या तहानंतर तैनाती फौज ठेवावी, म्हणून रघूजीवर दडपण आणले. एल्फिन्स्टननंतर रेसिडेंट म्हणून आलेल्या रिचर्ड जेंकिन्सने आग्रह धरला; पण रघूजीने आपल्या हयातीत तैनाती फौज स्वीकारली नाही. रघूजीची संपत्ती दानधर्मात खर्च झाली, शिवाय उत्पन्नही कमी झाले होते. त्यामुळे अखेरच्या दिवसांत संस्थानला कर्ज झाले. रघूजी २२ मार्च १८१६ रोजी मरण पावला.
No comments:
Post a Comment