विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 23 November 2023

बहुरूपी शस्त्रं!

 


बहुरूपी शस्त्रं!
'कला' म्हटलं आपल्या डोळ्यांपुढे काय येतं? नृत्य, संगीत, शिल्प..वगैरे. पण मध्ययुगीन भारतात यामध्ये आणखी एक कला गणतीमध्ये होती, ती म्हणजे 'युद्ध आणि शस्त्रं'! भारतीय ज्ञान परंपरेत १४ विद्या आणि ६४ कला सांगितलेल्या आहेत. वेगवेगळ्या काळात आणि ग्रंथांमध्ये ही यादी थोड्याफार फरकाने जराशी वेगळी आहे. प्रबंधकोश, ललितविस्तर, कलाविकास, शिवतत्वरत्नाकर यांसारखे प्राचीन आणि मध्ययुगीन ग्रंथ शस्त्र बनवणे, शस्त्रांना धार लावणे, व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे, मल्लविद्या, कौशल्याने तलवार चालवणे, द्वंद्वयुद्ध करणे, अश्वारोहण इ. चा समावेश व उल्लेख 'कला' म्हणून करतात! कौशल्य, अभिव्यक्ती आणि सौंदर्य ही कलेची त्रिसूत्री युद्ध आणि शस्त्रासारख्या प्राणघातक संकल्पनेमध्ये बघण्याची दृष्टी खचितच कल्पक होती. मात्र, या कलेची व्यापकता केवळ युद्धभूमीपुरती मर्यादित मुळीच नव्हती. शस्त्रांचे मध्ययुगात असलेले सार्वत्रिक अस्तित्व आणि वापर यांमुळे ही व्यापकता खेळ, स्पर्धा, व्यापार इतकेच काय तर मनोरंजनापर्यंतही पोचली होती. मध्ययुगातली काही interesting miniature paintings याची साक्ष आपल्याला देतात!
पोस्टसोबत जोडलेले लघुचित्र (Miniature Painting) हे विजापूरच्या अली आदिलशहा दुसरा याचे आहे. सतराव्या शतकातल्या या चित्रात अली आदिलशहा महालावरील छतावर बसलेला असून रंगमहालातील युवती त्याचे मनोरंजन करत आहेत. चित्रात नृत्य, वाद्य, संगीत हे दिसत आहेच पण त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूच्या युवतींच्या हातात असलेली शस्त्रं आणि त्यातून होत असलेला कलाविष्कार हे सगळ्यात interesting चित्रण आहे. नृत्य करणाऱ्या महिलांच्या मागे एक तरुणीने हातात दांडपट्टा घेऊन ताल धरला आहे, तिच्यामागील दोघी जणी हातात ढाल-तलवार नाचवत तिला साथ देत आहेत. आदिलशहाच्या समोर दोन तरुणी तर चक्क हातात चिलनम् चाकू घेऊन द्वंद्वयुद्ध करत आहेत! सदर चित्र हे सौंदर्यपूर्ण शस्त्राविष्काराचे उत्कृष्ट चित्रण आहे. या एकाच चित्रातून अनेक गोष्टी आपल्याला समजून घेता येऊ शकतात. पहिली म्हणजे, 'शस्त्रांचा युद्धाव्यतिरिक्त केला जाणारा वापर'. मध्ययुगीन भारतात युद्धाशिवाय शस्त्रांचा वापर हा मुख्यत्वे समारंभांमध्ये, धार्मिक विधीमध्ये अथवा खेळाच्या प्रात्यक्षिकांमध्ये होत होता. मात्र, या सर्व ठिकाणी त्यांचे उद्देश हे सौंदर्य अथवा सादरीकरण होते. तलवारबाजीच्या, युद्धकलेच्या स्पर्धा त्याकाळी होत असल्या तरी त्यांचे स्वरूप अतिशय सार्वजनिक आणि स्पर्धात्मक होते. वैयक्तिक मनोरंजनासाठी अशा प्रकारे शस्त्रांचा राणीमहालात, रंगमहालात वापर होणे हा शस्त्रांचा एक आगळाच सांस्कृतिक पैलू म्हटला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे 'स्त्रिया आणि शस्त्रे' हा बंध! स्त्रियांसाठी पूर्वापार दूरस्थ मानल्या गेलेल्या युद्धं, शस्त्रं विषयांबद्दलच्या ग्रहांना अशी चित्रे अनेकदा उभा छेद देतात. स्त्रियांकडून शस्त्रांचा होणारा वापर हा सार्वत्रिक आणि सार्वजनिक नसला तरीही या कलाकौशल्यामध्ये स्त्रियाही काही प्रमाणात नक्कीच पारंगत होत्या असे दिसते. राणीमहालातील, रंगमहालातील, जनानखान्यातील मनोरंजनासाठी जसे विविध कला येणे आवश्यक असायचे (नृत्य, संगीत, क्रीडा इ.) तसेच यात 'युद्धकला' / 'शस्त्रकला' अवगत असणे हाही एखादा criteria होता का? याचाही अभ्यास करणे रंजक ठरेल! चित्रातल्या शस्त्रं चालवणाऱ्या युवतींची दाखवलेली मोहकता, ग्रेस ही निश्चितच वाखणण्याजोगी आहे.
एखादी वस्तू ही एखाद्या काळात एकाचवेळी मृत्यूचे आणि मनोरंजनाचे साधन असावी हा वस्तूंबद्दलच्या मानवी धारणांच्या contrast polarization चा कदाचित सर्वोच्च बिंदू असावा! विषयात जितकं खोल उतरत जाऊ तितकं वेगळं काहीतरी हाती लागत जातं, शोध थांबायला नको!
छायाचित्रे © : Sotheby's, UK
गिरिजा दुधाट

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...